ch22लहानमोठय़ा कारणासाठी स्त्रियांना बडवणे ही आपली संस्कृती वाटावी इतकी सर्वसामान्य गोष्ट आहे. त्यावर उपाय म्हणून स्त्रीवादी विचारांच्या प्रसारामुळे कुठलंही दु:ख खासगी, आपल्यापुरतंच नसतं, ते सार्वत्रिक असतं, म्हणून कुढत बसण्यापेक्षा दु:खाला वाचा फोडा हे सांगणारी चर्चासत्रे स्त्री संस्थांनी आयोजित केली. त्यातून निर्भय बनण्याचे धडे गिरवले गेले.
नुकतीच वृत्तपत्रातून एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. ‘एक-दोनदा केलेली मारहाण क्रौर्य ठरू शकत नाही. संबंधितांवर एवढय़ा कारणाने खटला दाखल करता येणार नाही? हुंडय़ासाठी महिलेच्या छळप्रकरणी न्यायालयाने व्यक्त केलेले वरील मत वाचून आपण एखादे पाऊल पुढे न टाकता पुन्हा चार पावले मागे जात आहोत की काय असे वाटून गेले. या मारहाणीची परिणती त्या स्त्रीच्या मृत्यूत झाल्यावर दाद मागायची काय? मुळातच दीर आणि नणंदेला घरातल्या या सन्माननीय व्यक्तीला मारण्याचा अधिकारच काय? एका जाणत्या स्त्रीला मारण्याचा अधिकार खरे तर नवऱ्यासकट कोणालाच नाही. विवाहित स्त्री म्हणजे काय लहान मूल आहे, की तिला कोणीही चार थपडा माराव्यात? आजकाल लहान मुलांना मारणं हीसुद्धा अ‍ॅट्रॉसिटीची केस होऊ शकते. केवळ हुंडय़ासाठीच स्त्रिया मार खातात असे नाही, तर कोणत्याही लहानमोठय़ा कारणांसाठी स्त्रियांना बडवणे ही आपली संस्कृती वाटावी इतकी सर्वसामान्य गोष्ट आहे.
दारूच्या अमलाखाली असणारे नवरे बायकोला चोपतात, एवढेच नव्हे लाथाबुक्क्यांनीसुद्धा मारहाण करतात; पण एरवीसुद्धा कोणाकडे बघून हसली, कोणाशी बोलली, घरी उशिरा आली, फार नटली किंवा चांगली दिसत नाही, भाजीत मीठ जास्त पडलं, शेजारणीला घरच्या गोष्टी सांगते, असल्या किरकोळ कारणांवरूनसुद्धा बायका माराच्या धनी होतात. त्याची परिणती कित्येकदा बायकांचा जीव घेण्यापर्यंत होते. इंदुमती जोंधळे यांच्या ‘बिनपटाची चौकट’ या आत्मचरित्रात किराणा मालाच्या दुकानात आईने एका गिऱ्हाईकाला उधार वस्तू दिली म्हणून वडिलांनी रागाच्या भरात डोक्यावर पाटा मारून तिला मारून टाकल्याची हकिगत आहे. अशा किती तरी घटना आपण वृत्तपत्रातून वाचतो आणि बधिरपणे पानं उलटतो. स्त्रीला पुरुषाच्या दृष्टीने किती खालचे स्थान आहे आणि तिच्यावर हुकमत गाजवण्यातच पुरुषार्थ आहे अशी समजूत किती ठाम आहे याचे निदर्शक म्हणजे कुटुंबात स्त्रीवर होणारे अत्याचार.
जेवायला न देणे, जाणूनबुजून घरात सतत कामाला लावणे, भिंतीवर डोके आपटणे, केसांना हिसके देणे, ढकलून देणे, हात पिरगळणे, गळा दाबणे, चटके देणे, रात्रभर घराबाहेर उभे करणे, शरीर नग्न करून चामडय़ाच्या पट्टय़ाने मारणे, हातापायांचे केस ओढणे, बाहेरून दिसणार नाही अशा पद्धतीने मारहाण करणे, नाजूक जागी अत्याचार करणे अशा छळाच्या अनेक गोष्टी बायकांनी सांगितल्या आहेत. आम्ही बाईवर कधीच हात टाकत नाही, अशी शेखी मिरवणाऱ्या पांढरपेशा घरातही ‘छुप्या अस्त्राने’ स्त्रीचा छळ चालू असतो. बायकोशी बोलायचेच नाही, हे व्रत वर्षांनुवर्षे चालू ठेवणारी कुटुंबे आहेत. यातून तिचा मानसिक कोंडमारा इतका होतो की, चार थपडा मारा, पण बोला, असे म्हणण्याइतकी ती मानसिकरीत्या चेचली जाते. बोलण्याची भूक ही शरीराच्या भुकेइतकीच महत्त्वाची आहे. आर्थिक कोंडमारा करून छळ करण्याचेही अनेक प्रकार आहेत. बायको पैसे मिळवत असेल तर तिचे सर्व पैसे काढून घ्यायचे, दिलेल्या पैशातल्या पै न् पैचा हिशोब मागायचा. खर्चासाठी विनवणी करून मागितल्यावरच पैसे द्यायचे. तिला कोणताही खर्च तिच्या मनाप्रमाणे करू द्यायचा नाही, नवीन कपडे घेऊन द्यायचे नाहीत, ही सगळी आर्थिक पिळवणूक बायकोच्या छळाचीच आहे याची कल्पनाही अनेक बायकांना नसते.
आर्थिक, मानसिक छळाप्रमाणेच सामाजिक कोंडी करणं हा अत्याचाराचाच प्रकार आहे. स्त्रीला घराबाहेर जाऊ न देणं, आसपास शेजारी, मैत्रिणींशी संबंध ठेवू न देणं, एवढंच काय आपल्या मर्जीखातर तिला नोकरी करू न देणं किंवा केलीच तर तिच्यावर सतत लक्ष ठेवणं असे छळाचे अनन्वित प्रकार आहेत. आपल्याकडे मुलींना लहानपणापासून चार भिंतींबाहेर आतल्या गोष्टींचा बभ्रा न करण्याची कडक शिस्त लावली जाते, त्यामुळे स्त्रिया मोठेपणीही असा छळवाद तोंड दाबून सहन करतात, पण अनेकदा माहेरीसुद्धा त्याबाबत बोलत नाहीत! ‘नवऱ्यानं मारलं अन् पावसानं झोडपलं तर सांगायचं कुणाला?’ अशी आपल्याकडे म्हण आहे; पण स्त्रीवादी विचारांच्या प्रसारामुळे ‘ पर्सनल इज पोलिटिकल’ हा संदेश बऱ्याच स्त्रियांच्या मनात झिरपला. कुठलंही दु:ख आपलंच, खासगी, आपल्यापुरतंच नसतं, ते सार्वत्रिक असतं, त्यामागे पितृप्रधान व्यवस्थेचं राजकारण असतं, म्हणून कुढत बसण्यापेक्षा दु:खाला वाचा फोडा, चार जणींशी ते बोलल्याने त्यातून काही उत्तरे मिळू शकतात. याच हेतूने अनेक स्त्री संस्थांनी चर्चासत्रे आयोजित केली. हिंसेविरुद्ध हिंसा न करता स्त्रियांनी प्रतिकार करायला हवा. आक्रमक किंवा शरणागत न होता ठाम राहून आत्मसन्मान टिकवणं महत्त्वाचं. मुकाटय़ानं सहन करणं म्हणजे स्वत:च स्वत:ची हत्या करून चूपचाप राहण्यासारखं आहे. स्वत: निर्भय बना आणि इतरांना निर्भय बनायला मदत करा. पुरुष निसर्गत: स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समर्थन करणारी विचारप्रणाली असल्यावर आधारित आहे, त्यामुळे तिला विरोध करण्यासाठी स्त्रीचं सर्व क्षेत्रांत सबलीकरण व्हायला हवं. नवऱ्याची भीती, एकटं राहायची भीती, विरोध करण्याची भीती या सर्वावर स्त्रीनं स्वत:च पुढाकार घेऊन मात करायला हवी. अनेक ठिकाणच्या स्त्री चळवळींनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जाणीव-जागृती, प्रबोधनं, निदर्शनं, मोर्चे, परिसंवाद, कार्यशाळा, समुपदेशन केंद्र इत्यादी मार्गानी कृती केली आहे. तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात स्वत: लढा देणं आणि आपलं जगणं आत्मनिर्भर करणं ही या संघर्षांतली महत्त्वाची गोष्ट आहे.
पुण्यात नारी समता मंचाने त्यासाठी ‘बोलत्या व्हा’ केंद्र सुरू केले. सुरुवातीला स्वत:च्या आयुष्याबद्दल न बोलणाऱ्या स्त्रिया जेव्हा छोटय़ा गटातून इतरांचे अनुभव ऐकू लागल्या तेव्हा स्वत:बद्दल बोलू लागल्या. अशा प्रकारच्या चर्चेतून स्त्रीला मानसिक बळ मिळते, विरोधासाठी उभं राहण्याची ऊर्जा तयार होते. घर टिकवणं ही एकटय़ा स्त्रीचीच जबाबदारी नाही. ज्या घरात स्त्रीवर अत्याचार होतात, ते घर कधीच स्थिर पायावर उभं राहू शकत नाही. टोकाचा अत्याचार सहन करण्यापेक्षा घटस्फोट होऊन वेगळं राहणं चांगलं. शिवाय माहेरच्यांनीही मुलीच्या पाठीमागे ठाम उभं राहिलं पाहिजे, मुलींना शिक्षणाबरोबर आचारविचार स्वातंत्र्य राबवायला शिकवलं पाहिजे, हे समाजमनाचे परिवर्तन स्त्री चळवळींमुळेच झाले. मुंबईमध्ये स्त्री मुक्ती संघटना, महिला दक्षता समिती, शिवाय राजकीय पक्षांच्या महिला शाखांनीही या संदर्भात भरीव कार्य केले आहे. १९८१ मध्ये नागपूरला सीमाताई, सुगंधा शेंडे, कुसुम पावडे इत्यादींच्या प्रयत्नांतून स्त्री अत्याचार विरोधी परिषद आयोजित करण्यात आली. जाती, धर्म, राजकीय गुंडगिरी, दबाव हे सर्व बाजूला ठेवत नागपूरमध्ये सीमाताईंनी स्त्रियावरील सर्व प्रकारच्या अत्याचारविरोधात चांगलाच लढा दिला.
२००५ साली कौटुंबिक अत्याचार विरोधातील कायदा संमत झाला. लग्नसंबंध, स्त्री-पुरुष सहजीवनाचे संबंध कायम ठेवून आर्थिक सुरक्षितता, निवासाचा हक्क आणि संरक्षण देणारा हा कायदा आहे. या कायद्याचा आधार घेऊन घरातील संघर्ष कायद्याच्या चौकटीत सोडवणे शक्य झाले. १९८३ मध्ये भारतीय दंडविधानात ४९८-अ या कलमाचा समावेश झालेलाच होता. पती व सासरच्या मंडळींनी क्रूरपणे वागवले, मानसिक छळ करून स्वत:लाच शारीरिक इजा करून घेण्यास भाग पाडले, तर तीन वर्षे कैद, दंड अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असल्याने स्त्रियांसाठी तो एक संरक्षक ढाल ठरला आहे. मात्र काही वेळा स्त्रिया तो शस्त्र किंवा सूड म्हणून त्याचा गैरवापरही करतात, असेही आरोप होऊ लागले आहेत.
कायद्याने समाजातील कुठलेच प्रश्न शंभर टक्के सुटत नाहीत. कोणताही संघर्ष सामोपचाराने व सहिष्णुतेने सोडवण्याची दोन्ही बाजूंची तयारी असेल, तर स्त्रियांचे छळ थांबू शकतात. स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व त्यासाठी प्रत्येक पुरुषाच्या अंगी बाणणे आवश्यक आहे. दुसऱ्यावर आक्रमण करण्याने आपलेही जीवन सुखी होऊ शकत नाही, ही जाणीव हवी. प्रेम हा वैवाहिक जीवनाचा खंबीर पाया असेल, तर दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जपल्या जातील आणि त्याचा आत्मसन्मान जतन केला जाईल.
डॉ. अश्विनी धोंगडे – ashwinid2012@gmail.com

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!