कायद्यात वेळोवेळी अनेक सुधारणा होऊनही पैशांसाठी सुनांचा छळ आणि हत्या यांचे सत्र आज २०१५ मध्येही संपलेले नाही. जोपर्यंत स्त्रीला सन्मानाने वागविण्याची आणि समतेचे स्थान देण्याची मानसिकता निर्माण होत नाही, तोपर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार.

स्त्री म्हणजे बाजारातील सुखोपभोग देणारी एक वस्तू. भरपूर हुंडा घेऊन लग्न करून तिला एकदा घरी आणली की ती सर्वाच्या हक्काची दासी. तिला माहेरहून सतत पैसा, दागदागिने, वाहन वा अन्य काही cr23चैनीच्या वस्तू घेऊन येण्यासाठी सतत सगळय़ांनी बोलणे, मारणे आणि तरीही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, तर या ना त्या मार्गाने तिला मारून टाकणे आणि मग दुसरा विवाह करून पुन्हा त्या बायकोकडून भरपूर हुंडा वसूल करणे ही अमानुष वृत्ती अपवादात्मक नाही. गेल्या ३० वर्षांत आपल्या देशातील लाखो स्त्रिया या लोभी वृत्तीच्या हकनाक बळी गेल्या आहेत.
भारतातल्या सर्व राज्यांतील सर्व जातीधर्मातील, गरिबांपासून अत्यंत श्रीमंत स्तरातील, निरक्षरांपासून ते प्राध्यापक, डॉक्टर असलेल्या नवविवाहित स्त्रिया हुंडानामक राक्षसाने काळाच्या पोटात गडप केल्या आहेत. जी स्त्री आपले रक्ताचे, मायेचे स्नेहसंबंध सोडून सासरचे घर विश्वासाने आपले मानते, शरीरासकट आपले सारसर्वस्व तुमच्या स्वाधीन करते, तिचा पैशासाठी शारीरिक, मानसिक छळ करून तिला संपवून टाकण्याची वृत्ती किती हीन दर्जाची आहे याची कल्पनाही करता येणार नाही. हे पाशवी कृत्य करणारे फक्त पुरुष नाहीत तर सासू, नणंद, जाऊ यांच्या भूमिकेतील बायकाही आहेत, हे जास्त लाजिरवाणे आहे.
समकालीन स्त्रीवादी आंदोलनांमध्ये १९७५ मध्ये हैदराबादमध्ये प्रथम हुंडय़ाच्या प्रथेविरुद्ध प्रगतशील महिला संगठनद्वारे मोर्चे काढण्यात आले. दोन वर्षांनंतर हुंडाविरोधी आंदोलन दिल्लीत नव्याने सुरू झाले. पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश इत्यादी अनेक राज्यांतून स्त्री आंदोलनांनी जोर धरला, परंतु दिल्लीतील आंदोलने मोठय़ा प्रमाणात झाली, त्याला कारणही तसेच होते की, हुंडय़ाच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांची संख्या, तुलनात्मकदृष्टय़ा दिल्लीत अधिक होती.
स्त्रियांना आंदोलनामुळे लक्षात आले की, हा कुटुंबातला, आपापसातला मामला आहे असा समज करून घेऊन शेजारीपाजारी यात लक्ष घालत नाहीत, तर दुसरीकडे एवढय़ा मोठय़ा संख्येने स्त्रियांची आहुती पडत असूनही राज्यशासनेही या प्रश्नात पुरेसे लक्ष घालत नाहीत. ‘आत्महत्या’ असे शिक्के मारून पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसते. एखाद्या महिलेने मृत्युपूर्व जबाबात आपल्याला आत्महत्या करणे कोणी भाग पाडले त्यांची नावे सांगितली, तरी पोलिसांच्या सुस्त कारवायांमुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्याची भरपूर संधी मिळते. या विषयीचे अभ्यास, हुंडाबळींच्या त्यांच्या पालकांच्या मुलाखती, लोकांची मानसिकता, समाजातील स्त्रीचे स्थान वगैरेंचा विचार करता स्त्रियांनी अनेक गोष्टी उजेडात आणल्या.
सालंकृत कन्यादान, वरदक्षिणा इत्यादी विवाहातील विधींमध्ये वधुपित्याने मुलीला व वराला काही रक्कम स्वेच्छेने देणे अनेक वर्षांपासून चालत आलेली रूढी आहे, मांत्र अशा देण्यासाठी करार आणि जबरदस्ती सुरू झाली, तेव्हापासून ही प्रथा मुलींच्या आयुष्याला जाच बनू लागली. वधुपिता नाडलेला असतो. लवकरात लवकर मुलीचे लग्न करून द्यावे अशा मनोवृतीतून तो वराकडच्या मागण्या, कुवतीबाहेरच्या असल्या तरी मान्य करतो, मात्र पुढे ही हाव वाढत चालली की ती पुरवणे त्यालाही कठीण असते. मुलगी एकदा सासरच्यांना दिली, म्हणजे तिने माहेरी पुन्हा परत येऊ नये अशीच तिच्या कुटुंबाची इच्छा असते. त्यामुळे तिच्या छळाच्या कहाण्या ऐकल्या तरी त्याकडे कानाडोळा करण्याचीच प्रवृत्ती जास्त प्रमाणात असते. तिला माहेरी परत बोलवून तिला भक्कम आधार देणारी घरे अपवादात्मक.
स्त्रियांच्या मनोवृत्तीचे या निमित्ताने निरीक्षण करणाऱ्या स्त्रियांना अनेक धक्कादायक गोष्टी लक्षात आल्या. पती परमेश्वर आहे ही श्रद्धा स्त्रियांच्या मनात एवढी घट्ट बसलेली आहे की, त्याने पहिल्यांदा हात उगारला, तरी त्यांना त्याचे काही वाटत नाही. हळूहळू त्याचा मार खाण्याची सवय होते. आपल्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणूनच तो मारतो अशीही काही जणी समजूत करून घेतात. हळूहळू चटके देणे, उपाशी ठेवणे, अबोला धरणे, कामाला वेठीस धरणे असे अघोरी छळ सुरू होतात. तरीही बायका एवढय़ा सहनशील असतात की त्या गप्प राहून सगळे सहन करतात. बायकांची कोंडी इतकी मुस्कटदाबी करणारी असते की या तुरुंगातून बाहेर पडायला त्यांना जागाच नसते. माहेरी परत गेल्यावर कायमचा आसरा मिळेल याची खात्री नसते. त्यातून लग्नाच्या लहान बहिणी असल्या तर विवाहित मुलगी परत आली म्हणून त्यांचे लग्न होणे कठीण. माहेरची आर्थिक परिस्थिती माहीत असल्याने सासरच्या सततच्या मागण्या पुरवणे शक्य नाही याचीही त्यांना जाणीव असते. स्वतंत्र एकटीने राहण्याइतकी आत्मनिर्भरताही सामान्य स्त्रीत नसते आणि एकटीच्या सुरक्षिततेचेही भय असते. अशा सर्व बाजूंनी घेरली गेलेली बाई एकतर स्वत:ला जाळून घेते किंवा बऱ्याच प्रकरणात जाळली जाते. आपल्या मागे पत्र लिहून ठेवणाऱ्या कित्येकींनी ‘आता दुसऱ्या बायकोचा तरी माझ्यासारखा छळ करू नका.’ असे लिहिलेले वाचताना अंगावर काटा येतो. ‘मानुषी’मध्ये अशी काही पत्रे प्रकाशित झाली आहेत. हुंडय़ाच्या विरोधात काम करणाऱ्या अनेकींनी अशा छळाच्या कहाण्या प्रकाशित केल्या आहेत.
पुण्यात १९८२ मध्ये शिकल्यासवरलेल्या प्रतिष्ठित घरातील मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर यांच्या हत्या झाल्या आणि समाज मनातून पार हादरला. अशा गोष्टी खेडय़ापाडय़ात वा झोपडय़ात होतात अशा समजाला या घटनेने सुरुंग लागला. पुण्यातील ‘नारी समता मंच’ने विद्या बाळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. संजय पवार यांनी ‘मी एक मंजुश्री’ नावाचे पोस्टर प्रदर्शन करून दिले आणि ते महाराष्ट्रभर दाखवण्यात आले. हे प्रदर्शन बघणारे मनातून हादरले, बोलले आणि रडलेसुद्धा. स्त्रियांची घुसमट, छळ, त्यांच्या पायातील परंपरेच्या बेडय़ा याची झळ हजारो लोकांपर्यंत पोचली. उच्च न्यायालयाने आरोपीला फाशी सुनावली होती, पण सर्वोच्च न्यायालयात पुरेशा पुराव्याअभावी त्याला निदरेष सोडण्यात आले. यावेळी पुण्यात नापसंती दर्शक दहा हजार सह्य़ा गोळा करण्यात आल्या. रात्री कँडल मार्च काढण्यात आला. रिव्ह्य़ू पिटिशनचा अर्ज दिला गेला. तो नामंजूर होणार हे माहीत असूनही भविष्यात ही कृती अन्याय निवारणासाठी उपयोगी पडेल अशी आशा होती.
नागपूरमध्ये डॉ. रुपा कुलकर्णी, सीमा साखरे  या रणरागिणींनी हुंडाविरोधी संघर्ष सुरू केला होता. अखिल भारतीय स्तरावर १९८६ साली बिहारमध्ये अधिवेशन झाले. ‘ए ब्राइड हू वुड नॉट बर्न’, ‘ओम् स्वाहा’, ‘मुलगी झाली हो’, ‘अनुत्तरीत’ अशा पथनाटय़ांनीही चांगली जाणीव जागृती केली. अलीकडे आलेला ‘पुढचे पाऊल’ हा सिनेमाही या प्रश्नाच्या प्रभावी चित्रीकरणाने चांगलाच गाजला.
खरे तर १९६० मध्येच हुंडाप्रतिबंधक कायदा झाला होता. पण हुंडा शब्द न वापरता वधुपित्याला अनेक मार्गाने पिळून घेणे बंद झाले नाही. उलट लग्नातला थाटमाट, जेवणावळी, सासरच्यांना आहेर यांचे प्रमाण वाढत गेले. मुलीने पुढे छळाला कंटाळून आत्महत्या केली वा तिला मारण्यात आले हे हुंडय़ाच्या जाचामुळे झाले हे सिद्ध करणे फार कठीण होते. म्हणून १९८६ मध्ये या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संसदेला सादर करण्यात आले. हुंडा या शब्दात वरपक्षाला दिलेल्या सर्व वस्तू, दागिने, रोख रक्कम यांचा समावेश झाला. हुंडय़ाची मागणी केली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी हुंडा घेणाऱ्यावर टाकण्यात आली. विवाह झाल्यावर सात वर्षांच्या आत स्त्रीचा मृत्यू झाला तर त्याची चौकशी करण्यात येईल, तसेच मारहाण, छळ या बाबतीत ४९८ ए अंतर्गत आरोपीला ताबडतोब अटक करण्याची सोय झाली. हुंडा घेणाऱ्या व देणाऱ्या व्यक्तीस जबर दंड व कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद झाली. मुलीला लग्नात मिळालेले दागिने व वस्तूंवर स्त्रीधन म्हणून तिची मालकी राहील. कायद्यात अशा काही सुधारणा वेळोवेळी होऊनही पैशासाठी सुनांचा छळ आणि खून यांचे सत्र आज २०१५ मध्येही संपलेले नाही. गेल्या १५-२० वर्षांत एकत्रितपणे स्त्री संघटना आणि चळवळी यांनी काही दीर्घ पल्ल्याचे काम केलेले दिसत नाही. झटपट पैसा मिळवून श्रीमंत होण्याची सुखलोलुप वृत्ती समाजात वाढते आहे. विवाह हे आजही त्यासाठी एक साधन आहे. स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याची संवेदनशीलता आजही सार्वत्रिक नाही. मुलीचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, प्रत्यक्ष जावयालाच शिक्षा होऊ नये, म्हणून मुलींचे पालक आजही तक्रार न करता तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात.
जोपर्यंत स्त्रीला सन्मानाने वागविण्याची आणि समतेचे स्थान देण्याची मानसिकता निर्माण होत नाही, तोपर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार.

डॉ. अश्विनी धोंगडे -ashwinid2012@gmail.com