गोव्याच्या पर्यावरणरक्षणासह खाणमाफिया, जुगारी अड्डे, अंधश्रद्धाविरोधात काम करणाऱ्या, निसर्ग आणि पर्यायाने माणूस वाचवण्यासाठी अखंड धडपडणाऱ्या, गोव्याची माती, संस्कृती यांचं रक्षण हाच श्वास आणि ध्यास असणाऱ्या  डॉ. राजेंद्र केरकर या सर्जनशील कार्यकर्त्यांच्या सेवादानाची ही कहाणी.
माणसाच्या बाह्य़ रूपावरून त्याच्या आंतरिक सामर्थ्यांची कल्पना येत नाही हेच खरं! गोव्याचे भूमिपुत्र डॉ. राजेंद्र केरकर यांना भेटल्यावर याच विधानाची प्रचीती आली. सर्वसामान्य वाटणाऱ्या या असामान्य माणसाने गोव्यातील पर्यावरण व वन्यजीवन संवर्धनासाठी जे काम केलंय त्याला तोड नाही. गोव्याची माती, तिथली संस्कृती यांचं रक्षण हा त्यांचा श्वास आहे आणि ध्यासही. पश्चिम घाटाचा भाग असलेली दोन जंगलं, एक म्हादईचं आणि दुसरं नेत्रावळीचं अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आली आहेत. हा त्यांच्या गेल्या २०/२२ वर्षांच्या चळवळीचा विजय आहे. पर्यावरणासह खाणमाफिया, जुगार अड्डे, अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या, निसर्ग आणि पर्यायाने माणूस वाचवण्यासाठी अखंड धडपडणाऱ्या एका सर्जनशील कार्यकर्त्यांच्या अनोख्या सेवादानाची ही कहाणी.
जंगल, नदी-नाले, पशू-पक्षी हे राजेंद्रचे बालपणापासूनचे सोबती. सत्तरी तालुक्यातील त्याचं केरी गाव म्हणजे वाघेरी, मोर्लेगड, बोळेरीचो टेंब अशा सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांत वसलेलं. शिवाय अनेक समृद्ध देवरायांची गावाला देणगी. राजेंद्र सांगतात, ‘दहावीचा अभ्यास करताना मध्यरात्र उलटून गेल्यावर मोर्लेगडावरच्या जंगलात वाघाच्या डरकाळया सुरू व्हायच्या आणि मी पुस्तक मिटून वडिलांच्या कुशीत शिरायचो.’ डोंगराळ भागातून सायकल दामटवत दहा-वीस कि.मी. फिरणं हा त्यांचा लहानपणीचा नेम. (सायकल रपेट आजही सुरू आहे. फक्त अंतर थोडं कमी झालंय इतकंच). मात्र परिस्थिती बेताची असल्याने हा फेरफटका मारताना विकण्यासाठी पाव-बिस्किट, आइसफ्रूट, वर्तमानपत्र यांचं ओझं बरोबर असायचं. या भ्रमंतीमधून त्याचं जंगलाशी नातं जुळलं. किती तरी जखमी पक्षी, साप, प्राणी त्याने घरी आणले, जगवले आणि पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडून दिले. जंगलातील प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरून कोण गेलं आणि किती वेळापूर्वी गेलं हे तो ओळखायला लागला. कॉलेजमध्ये असताना तर त्याने कबुतराची एक जोडी पाळली होती. हा सायकलवर आणि खांद्यावर दोन कबुतरं हे दृश्य नेहमी दिसे.
ch09
सामाजिक चळवळीचं बाळकडू राजेंद्रयांना रक्तातूनच मिळालं. त्यांचे पणजोबा पोर्तुगिजांविरुद्धच्या १९१२ मधल्या बंडात सहभागी झालेले तर वडील गोवा स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. ते देखील कॉलेजमध्ये असल्यापासूनच गोव्यातील विविध वर्तमानपत्रांतून सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर लिहू लागले. त्यानंतर अनेक लेखमाला लिहिल्या. या लिखाणामुळे त्यांना अनेक मित्र मिळाले (व शत्रूही). कॉलेज संपता त्यांनी गोव्यातील खाणीच्या प्रश्नावर ‘खणखण माती’ ही अभ्यासपूर्ण लेखमाला पुरी दोन वर्षे लिहिली. त्यामुळे खूपच खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सप्टेंबर २०१३ पासून गोव्यातील सर्व खाणी बंद झाल्यात. पण त्या आधी राजेंद्रंनी लेखमाला, आंदोलने, गावकऱ्यांबरोबर सभा.. अशा विविध मार्गानी खाणमालकांच्या नाकी दम आणला होता. गोव्याच्या सांगे, केपे, सत्तरी, डिचोली या पट्टय़ातील हजारो वृक्षांचे जंगल तोडून उजाड केलेले डोंगर पाहिल्यावर कळतं की राजेंद्र खाणींविरोधात एवढा जिवावर उदार होऊन का लढत होता ते.
ते गावक ऱ्यांना सांगत, जंगल टिकलं तर पाणी मिळणार.. पाणी मिळालं तर झरे-ओहोळ वाढणार.. ते वाढले तर शेती टिकणार.. असं बरंच काही. गावकऱ्यांना पटायचं पण त्यांची पाठ वळली की खाणमालक शेतकऱ्यांना फितवायचे. पुन्हा शून्यापासून सुरुवात. परंतु त्यांनी माघार घेतली नाही. ते कळवळून सांगत, किती र्वष ते तुम्हाला काम देतील? फार तर त्यांचा इथला कार्यभाग संपेपर्यंत. नंतर बोडके डोंगर, पाणी नाही, शेती कशी करणार? ..अनेक वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. गावातलं चित्र हळूहळू बदलू लागलं. सालेली गावातील ४० खाणी (स्टोन क्रशर) बंद झाल्या.
स्वामी विवेकानंद हे त्यांचे आदर्श. विसाव्या वर्षीच त्यांनी ‘स्वामी विवेकानंद स्मृती संघ’ ही संस्था स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून समविचारी मित्रांसह गावागावातून जनजागृतीचे कार्यक्रम केले. ज्या खाणमालकांनी अटी पाळल्या नाहीत, मंजुरीपेक्षा जास्त क्षेत्र व्यापलं त्यांच्यावर खटले भरले. आंदोलनं केली. त्यामुळे कित्येक खाणींचे परवाने रद्द करण्यात आले. परिणामी खाणमालक चवताळले. दमदाटी करूनही हा माणूस बधेना, म्हणून एकाने भाडोत्री गुंडांमार्फत सरळ एक ट्रकच त्यांच्या मोटारसायकलवर घातला. पण केवळ जखमी होण्यावर निभावलं. मृत्यूच्या दारातून परत येण्याचे असे किती तरी प्रसंग त्यांच्यावर आलेत.
एकदा गावातील एक बाई त्यांना म्हणाली, पेपरात एवढं लिहितोस मग गावातल्या जुगारी अड्डय़ांविरुद्ध का नाही लिहीत? या जुगाराने आमची घरं उद्ध्वस्त झालीत. राजेंद्रनी अभ्यास केला आणि पेपरात मथळा झळकला, ‘पोलीस पोस्ट की जुगारी अड्डे’. हा घाव पोलिसांच्या वर्मी बसला. त्यांनी छापे घालून जागोजागचे अड्डे बंद पाडले. त्यामुळे अड्डेवाले चिडले. गुंडच ते. एके दिवशी रात्री लाठय़ा-काठय़ा घेऊन यांचं डोकं फोडायला आले. पण ते जमावाला शांतपणे सामोरे गेले. त्यांना जुगाराचे दुष्परिणाम समजावले. आश्चर्य म्हणजे मंडळी गुपचूप माघारी गेली.
अशी असंख्य प्रकरणं. पत्रं तर अशी की आपण वाचूच शकणार नाही. तुझे तुकडे तुकडे करून टाकू आणि काय काय? उपरती होऊन पाया पडणारेही अनेक. गोव्यातील माजी मंत्री अच्युत उसगांवकर (वर्षां उसगांवकर यांचे वडील) यांनी १९५५ मध्ये सोपो गड (ता. सत्तरी) येथे मँगनीज खाण सुरू केली. ती १९९९ मध्ये म्हादई अभयारण्याची अधिसूचना आल्यावर बंद झाली. आपली चूक त्यांना कळली असावी, कारण पुढे एका कार्यक्रमात ते राजेंद्रबरोबर व्यासपीठावर एकत्र आले असताना या ९५ वर्षांच्या गृहस्थाने पश्चातापदग्ध भावनेने त्यांना मिठीच मारली.
गोव्यातील म्हादई (२०८ चौ.कि.मी.) व नेत्रावळी (२११ चौ.कि.मी.) ही जंगलं अभयारण्य म्हणून घोषित झाली तो राजेंद्र यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस (जून १९९९). सह्य़ाद्री पोखरणारा खनिज उत्खननाचा व्यवसाय रोखून त्या जंगलातील पट्टेरी वाघांचं रक्षण व्हावं यासाठी अभयारण्याच्या प्रस्तावाची पूर्वतयारी त्यांच्या केरीच्या घरातच झाली. त्या वेळी लोकनियुक्त सरकार नसल्याने राज्यपाल जेकब हेच प्रशासक होते. या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरलला पटवण्याची जबाबदारी राजेंद्रवर सोपवण्यात आली. राज्यपालांनी पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा मागितला. एक आठवडय़ाची मुदत मिळाली. इथे येण्याआधीच पिसुर्लेच्या जंगलात एका वाघाची शिकार झाल्याचं राजेंद्र यांना कळलं होतं. त्यांचं नेटवर्क भक्कम. विकली गेलेली नखं मिळवून त्यांनी राज्यपालांच्या हातात ठेवली. त्यानंतर आठवडाभरातच अभयारण्याची अधिसूचना निघाली.
त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे २८ फेब्रुवारी २००९ रोजी आणखी एका वाघाची शिकार झाली. मारलेल्या वाघाचा मारेकऱ्यासह मोठय़ा कौतुकाने काढलेला(!) फोटो राजेंद्र यांनी मिळवून वृत्तपत्रामध्ये जोरदार लेख लिहिला. चौकशीची सत्रं सुरू झाली. थोडी हाडं, दात मिळाले. काही पुढारी मंडळींना अटक झाली. गावचं वातावरण तापलं. यांच्या घरावर बहिष्कार घालेपर्यंत वेळ आली. लोक म्हणत, ‘ही हाडं वाघाची नव्हेतच. शेवटी ती तपासणीसाठी डेहराडूनच्या वन्यजीव संस्थेकडे पाठवली. रिपोर्ट आला ती वाघाचीच आहेत म्हणून. विरोधकांची तोंडेच बंद झाली. राजेंद्र म्हणतात, ‘गोव्यातील सामाजिक संस्था व वर्तमानपत्रे यांच्या पाठिंब्यामुळेच हा लढा मला लढता आला.’
आज पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेले डॉ. राजेंद्र केरकर हे इतिहास व समाजशास्त्र या दोन विषयांत एम.ए. आहेत. शिवाय बी.एड.ही केलंय. डॉक्टर ही पदवी त्यांना लोकांनी प्रेमाने दिलीय. झाडांचा डॉक्टर.. निसर्गाचा डॉक्टर.. मूळगाव येथील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयात १७ वर्षे शिकवून २०१२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. लांबलांबच्या विद्यार्थ्यांपैकी कुणी ना कुणी सतत त्यांच्या घरी राहायला असे. एकदा तर दोन दलित मुलांना घरी ठेवलं म्हणून गावात खळबळ माजली. पण सर म्हणजे गावातील सर्वच मुलांचं दैवत. त्यामुळे विरोध थंडावला. खाणमालकांनी राजकारण्यांना हाताशी धरून त्यांची नोकरी घालवण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण संस्थाचालक पांडुरंग राऊत त्यांच्यापाठी उभे राहिले. ‘शाळेला या माणसाचा अभिमान आहे.’ केरकर सर अधिक जोमाने कामाला भिडले.
अशा ध्येयवेडय़ा माणसाबरोबरचा संसार म्हणजे सुळावरची पोळीच. मात्र पत्नी पौर्णिमाने हे शिवधनुष्य सहज पेललंय. तिचा पिंड खरा तर साहित्याचा. आधी कविता करायची आता चळवळीत रमलीय. ‘विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गोव्यातील मतिमंद मुलांसाठी काम करते, अर्थात विनामूल्य. या दाम्पत्याची एकुलती एक कन्या समृद्धी तर विशेष आहे. ही चौदा वर्षांची मुलगी चार भिंतीतील बंदिस्त शाळेत कधी गेलीच नाही. घरीच स्वत:हून अक्षरं, अंक शिकली. कॉम्प्युटरमध्येही प्रवीण आहे. वडिलांबरोबर जंगलात जाते. ट्रेकिंग करते. नदीच्या काठावर बसून कविता करते. गोव्याच्या जंगलांतील शेकडो पक्षी (४४७ प्रकारचे) आणि फुलपाखरं ओळखते. २०१० मध्ये तिचा ‘निसर्ग’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर ‘अप्रूप वसुंधरेचे’ हे जंगलातील सगे-सोयऱ्यांवर लिहिलेलं चित्रकथांचं पुस्तक.
सरांच्या टीमचे आणखी तिघे सहकारी म्हणजे गावोगाव फिरून समाजाला जागृत करणारे, स्लाइड शो दाखवण्यात मदत करणारे- चंद्रकांत शिंदे, सर्प व अन्य जीवांचं रक्षण हेच ज्याचं जीवनध्येय आहे असा अमृतसिंग आणि केरकर सरांच्या लिखाणाचं टायपिंग, फायलिंग व इतर पडेल ते काम करणारी शुभदा चारी. या शिलेदारांसह सरांचं खिंड लढवणं सुरू आहे.
स्वत: राजेंद्र केरकर ही एक स्वयंभू संस्था आहे. २८ वर्षांपूर्वी त्यांनी स्थापन केलेल्या ‘विवेकानंद स्मृती संघ’ या संस्थेच्या किती तरी उपशाखा आपलं स्वतंत्र अस्तित्व राखत कार्यरत आहेत. त्यातील विवेकानंद पर्यावरण जागृती फौज तर आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. गोव्याची माती, संस्कृती या विषयांवरील त्यांची चार पुस्तकं प्रकाशित झाली असून, दोन प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. गोव्याच्या लोकसंस्कृतीवर त्यांनी केलेलं डॉक्युमेंटेशन म्हणजे एक अमूल्य ठेवच आहे. गोव्याचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी त्यांना ‘गोमंतकाचे सांस्कृतिक संचित’ या शब्दात गौरवलंय. त्यांच्या केरीच्या घरात प्रकाश आमटे, मेधा पाटकर, अनिल अवचट असे अनेक नामवंत राहून गेलेत. राजेंद्र केरकर यांना एकदा भेटलं, ऐकलं की तुम्ही त्यांना विसरूच शकत नाही. पर्यावरणाच्या इतिहासात त्यांचं नाव गौरवाने लिहिलं जाईलच.
राजेंद्र केरकरांनी पर्यावरणाचा गोवर्धन उचललाय. त्याला आपली काठी तरी लाभावी एवढीच इच्छा!
संपदा वागळे -waglesampada@gmail.com

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली