मुंबईच्या नायरमधून एम.बी.बी.एस. झाल्यावर इंटर्नशिपच्या काळात अनेक गोष्टी व नियोजने चालू होती. त्यापैकी एक होते लग्न!  पुढचं उच्च शिक्षण घेण्यापूर्वी  लग्न ठरलं तर त्या दृष्टीने गरजेची शाखा दोघांनी निवडून अधिक पूरक काम करता येईल, असंही वाटे. तेव्हाच विद्याताई बाळांच्या घरी शशिकांतचे नाव सुचवले गेले. ज्या अणदूर गावामध्ये हॉस्पिटल सुरू करायचा निर्धार शशिकांतचा होता, त्या ठिकाणीही जाऊन आले. गरज तेथे होतीच तरी पण मनात अनेक शंकांचा पिंगा! तरीही भरभरून बोलणारा आणि स्वत:च्या मताचा आग्रह धरणारा शशिकांत. समाजवादी शाळेच्या व घरच्या संस्कारांना, सेवादलाची पाश्र्वभूमी असणाऱ्या मला योग्य वाटला. त्यातही डॉक्टरांनी खेडय़ामध्ये गेलं पाहिजे, असं आग्रहाने िबबवणाऱ्या आमच्या केतकर सरांच्या संस्कारांपुढे हे योग्य होतं. अशा रीतीने आमचं लग्न १ नोव्हेंबर १९७९ मध्ये झालं. माझा मुंबई ते अणदूर व्हाया औरंगाबाद अशा प्रवासाला सुरुवात झाली.
औरंगाबाद येथे मी डीजीओ (स्त्रीरोगतज्ज्ञासाठीचा) अभ्यास केला. शशिकांतने डीए म्हणजे भूलतज्ज्ञासाठीचा अभ्यास चालू केला. त्याच काळात ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ची निर्मिती, त्यातून जोडले गेलेले सर्व विद्यार्थी, रविवारी पदरमोड करून होणाऱ्या गाव पातळीवरच्या भेटी, त्यानंतर होणारं पुढील नियोजन यात दोन र्वष कशी गेली कळलंच नाही. अणदूरचं जानकी रुग्णालय सुरू करण्यासाठीची जमवाजमव सुरू झाली. अखेर १९८२ च्या सप्टेंबरमध्ये आमच्या मुलीचा ‘मुक्ता’चा जन्म झाला. माझी डिलीव्हरी औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्येच माझ्या प्रोफेसरांकडेच झाली. १९८३ एप्रिलमध्ये अणदूरात जानकी रुग्णालयात सुरुवात झाली. रुग्णांच्या माध्यमातून वेगवेगळे अभ्यास सुरू झाले. आरोग्याचा संबंध किती बहुआयामी आहे. जात, धर्म, आर्थिक स्तर, अंधश्रद्धा, परंपरेचे जोखड, खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयी इत्यादीचाही अभ्यास सुरू झाला. त्यातून लहानशा गल्लीत भरणारे अभ्यास वर्ग, गच्चीवरचे अभ्यासवर्ग यातून विविध विषयांवर चर्चा होऊ लागली. रुग्णांच्या फायद्यासाठी ‘अरे तुम्ही इंजेक्शन कशासाठी घेताय? तुम्ही या गोळ्यांच्या मदतीनेच बरे व्हाल’ असं सांगणारे आम्ही दोघं अवलिया डॉक्टर वाटत असू!
कोणतीही गोष्ट वैयक्तिक न ठेवता सामुदायिक-सार्वजनिक करण्याकडे शशिकांतचा कल असे. नोव्हेंबर १९८७ मध्ये आनंदचा जन्म झाला. मुलांचं सुरुवातीचं शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. मुंबईच्या शाळा आणि इकडचं जिल्हा परिषद यातील फरक बघून माझा जीव वरखाली होई. मुलांना दुसऱ्या शाळेत घालण्यापेक्षा व्यवस्था बदलू म्हणणारा नवरा मला जड वाटे. लग्नानंतर अणदूरला स्थायिक होण्याच्या निर्णयाने जितका त्रास झाला नव्हता तो त्रास माझ्यातल्या आईला या वेळी झाला. मुलांच्या शिक्षणाचा बळी देऊन याला व्यवस्था बदलण्याची हिंमत करावीशी वाटते, या विचाराने त्रागा व्हायचा. यथावकाश चित्र निवळत गेलं. जवळपासच्या चार-पाच महिलांनी दर आठवडय़ाला जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांच्या अभ्यासाविषयी, शाळेच्या स्वच्छतेविषयी चौकशी करून दबावगट करण्याची योजना आखली. असे अनेक उपक्रम आखले व यशस्वी केले.
        ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ची सुरुवात झाल्यानंतर आमचा लोकांचा संग्रह प्रचंड वाढायला सुरुवात झाली. शशिकांतची विविध प्रश्नांना भिडण्याची हिंमत, उत्तरं शोधण्यासाठीची धडपड, बहुआयामी व्यक्तिमत्त्व यामुळे खूप शिकायला मिळालं. समाजामध्ये विविध स्तरावर काम करताना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. एके दिवशी रात्री आमच्या दवाखान्यावर कोणीतरी धमकीचं पत्र चिटकवलं. दोन पानी मजकूर त्यात होता. ‘हे काम तातडीने बंद करा. काही लोकांना संस्थेतून काढून टाका आणि त्यासाठी काही मुदत दिली होती. हे पत्र पोलिसात दिलं किंवा आमचं ऐकलं नाही तर भोसकून टाकू, खून करू, बलात्कार करू’ अशा अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत धमकी दिली होती. क्षणभर मनातून आम्ही दोघंही घाबरलो. नको ते विचार डोक्यात यायला लागले. मुलांची काळजी वाटायला लागली आणि तेवढाच संतापही आला. यासाठी आपण इथे आलो का? असं वाटायला लागलं, पण शशिकांत फार संयमी, शांत होता. चळवळीचा खूप अनुभव होता. दोन-तीन वेळा पत्र त्याने वाचलं, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि ठरवलं हा प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडवला पाहिजे. ज्या गावातील माथेफिरूचं हे पत्र होतं तेथे ग्रामसभा घेऊन लोकांनीच काय करायचं ते ठरवावं, असा विचार मांडला. अखेर लोकांनीच त्या विकृत व्यक्तीला शोधून काढलं. शशिकांतने त्याच्यावर पोलीस केस करण्यास विरोध केला. हा प्रसंग त्याने गंभीरपणे घेतला, पण तेवढय़ाच सहजपणे सोडवला आणि आमची कौटुंबिक अस्थिरता पण संपवली. अशा उलथा पालथीचा कौटुंबिक जीवनावर नकारार्थी परिणाम त्याने होऊ दिला नाही. त्यामुळे आमच्या मुलांनाही बळ आलं. आजही शशिकांत अजातशत्रू आहे.
घरात येणाऱ्यांची वर्दळ आणि संस्थेच्या कार्यक्रमांची रेलचेल १९९३ पासून सुरू झाली ती आतापर्यंतही चालूच आहे. एक गाव एक पाणवठा, गावागावांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत्या, शाळेतील कार्यक्रम, संस्थेचा भारतवैद्याचा उपक्रम आणि त्यातून सुरू झालेले बचत गट हे सर्व गेली २५ र्वष सातत्याने चालू आहे. या कामातून आनंदवनचे बाबा आणि साधनाताई, शेतीतज्ज्ञ दाभोळकर, नियोजन मंडळाचे मधू दंडवते, विजय तेंडुलकर अशा विविध लोकांचा सहवास आणि अशा दिगज्जांसोबत काम करायची संधी मिळत गेली. भारतवैद्य प्रकल्पातून संस्थेची वाढ मोठय़ा प्रमाणात होत गेली. गावोगावी चालणारी आरोग्य यात्रा, बालविवाह प्रतिबंध अभियान, असे जवळपास ५० पेक्षा जास्त प्रकल्प अविरतपणे आजही चालू आहेत. ‘हॅलो’चं काम खरोखरच लोकल ते ग्लोबल झालं आहे याचा खूप अभिनान आहे. २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संस्थेच्या कामाची मांडणी झाली. आज अणदूरपासून सुरू झालेला ‘हॅलो’चा प्रवास जवळपास १५ देशांपर्यंत पोहोचला. देशाच्या बाहेरही संस्थेचा खूप मोठा लोकसंग्रह आज तयार झाला आहे.
प्रश्नाकडे अत्यंत सकारात्मकपणे बघणारा शशिकांत, त्यांची सहनशीलता, विविध अवघड प्रश्नांचं सोपं व दीर्घकालीन टिकणारं उत्तर आणि आमचं अणदूरचं असलेलं सर्वासाठीचं ओपन होम! आत्तापर्यंत झालेला ‘हॅलो’चा मोठा परिवार याची सुरुवात एका दीर्घकालीन टिकणाऱ्या शशिकांतसोबतच्या नात्यातून शक्य झाली. त्याच्यासह नात्याची वीण विणली नसती गेली तर इतकं समृद्ध, अनुभव आयुष्य जगता आलं नसतं.
शशिकांत माझ्या नाही पण मुलांच्याही वाटय़ाला फारसा येत नसे, याची रुखरुख तेव्हा होती, त्यावर आता फुंकर घातली जाते आहे. आम्ही झपाटलेपण घेऊन जगलो आणि आता ही धुरा सांभाळण्यासाठी पुढची पिढी सज्ज झाली आहे आणि त्याला आधुनिकतेची आणि व्यावसायिकतेची जोड मिळत आहे हा अतिशय समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
Thieves stole AC from medical
यांचा काही नेम नाही! नागपुरातील मेडिकलच्या शल्यक्रिया गृहातून चोरट्यांनी एसी पळवले…
Nagpur Bench High Court
केवळ घटनास्थळी उपस्थित होते म्हणून… ३६ वर्षांनंतर निर्णय देताना उच्च न्यायालय काय म्हणाले जाणून घ्या