पूर्वीचं अस्सं, पूर्वीचं तस्सं!  आत्ता कुण्णाला काही म्हणजे काही करायला नक्कोय मुळी, असा एकंदर नकाराचा सूर. विशेषत: खाण्याच्या बाबतीत तर ठामच. पण खरं तसंच घडतं आहे का? जुनं ते टाकाऊ ठरवून पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी तयार झाली आहे का? याबाबत अनेकींशी संवाद साधला असता असं आढळलं, असा टोकाचा बदल मुळीच झाला नाहीए. पूर्वीसारखे वा त्या प्रमाणात नसतील,  पण आजही अनेक पदार्थ केले जातातच. आजची पिढी मागच्या पिढीच्या मदतीने स्वत:ची भर टाकून पदार्थाची गोडी वाढविते आहे. श्रावणातल्या खाद्यसंस्कृतीच्या निमित्ताने..

‘हल्लीच्या मुली म्हणजे..’ प्रत्येक पिढीची पुढच्या पिढीबाबत असलेली ही तक्रार. कदाचित कौसल्या सीतेला आणि कुंती आणि गांधारी द्रौपदीलाही, असं म्हणाल्या असाव्यात असं वाटावं इतकी पुरातन काळापासून समाजात रुजलेली आहे. हल्लीच्या मुलींना पूर्वीचं काही नकोच, असं कायमच आधीच्या पिढीला वाटत राहतं. त्यावर चर्चा होत राहते आणि चच्रेचा सूर कायम ‘आमच्या वेळी’ असाच असतो. सावित्रीबाईंच्या कृपेने आम्ही शिकलो, सवरलो, स्वतंत्र झालो, पण हा सूर काही बदलत नाही. सून किंवा मुलगी गलेलठ्ठ पगार मिळवत असेल तर सूर थोडासा खालचा असतो एवढंच. उलट, ‘मी कस्सं सग्गळं सांभाळून नोकरी करत होते. काय बाई, सणवार, व्रतवैकल्यं होती सांगू आमच्या सासूबाईंची. आता कुण्णाला सांगून पटणारसुद्धा नाही. पण आताच्या मुलींना..’ असं काहीबाही बोललेलं ऐकू येतंच. त्याबाबत चर्वतिचर्वण केलं जातं आणि मुख्यत्वे वर्णन बऱ्यापकी भारी असतं त्यामुळे ते अनेकदा खरंही भासतं. हो, भासतं असंच म्हणतेय कारण ते खरं आहे का, अगदी खरं तसंच घडतं आहे का? करायला नकोच आहे का कुणाला काही? जुनं ते टाकाऊ ठरवून अगदी रोज पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी तयार झाली आहे हे खरं आहे का? याबाबत खूप विचार केला, खूप जणींशी संवाद साधला आणि असा टोकाचा बदल मुळीच झाला नाहीए या निष्कर्षांप्रत आल्यावर हायसं वाटलं.    
     पूर्वीच्या तुलनेत अगदी तसेच केले जात नसले तरीही बऱ्याच अंशी घरात वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने पदार्थ केले जातात तेही अनेकदा मागच्या पिढीच्या मार्गदर्शनाखाली. मागच्या पिढीचं हे संचित आता पुढच्या पिढीकडे येतं आहे. नात्यांचीही गोडी त्यामुळे वाढतेच आहे.
कारण आत्ताही मुलींना जुन्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा वाटतो, त्यांची रेसिपी जाणून घेऊन ती करावीशी वाटते म्हणून तर ‘गुगल’ आणि ‘फेसबुक’वर अनेक रेसिपीजचा खजाना सापडतोच ना. मात्र अनारसे, पुरणपोळ्या वगरे खटाटोप थोडासा कठीण वाटतो एवढंच. मग थोडीशी बाहेरची मदत म्हणजे इन्स्टंट पिठं वगरे, थोडीशी विकतच्या मनुष्यबळाची मदत असं करून अजूनही सणावारांना ते ते पदार्थ करण्याचा, खाऊ घालण्याचा आनंद लुटला जातोय. जी खाद्यसंस्कृती आहे ती  टिकवली जातेच आहे आणि तिचा प्रसार केला जातोय; फक्त सोयीनुसार आणि आटोपशीर पद्धतीने इतकंच.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिढय़ांनी या पारंपरिक पदार्थाची मजा घेतली आहे, त्यांची चव त्या पिढय़ांच्या जिभेवर रेंगाळते आहे. खाणं आणि बोलणं यांबाबतीत जिभेला लगाम घालणं भल्याभल्यांना शक्य होत नाही त्यामुळे त्या विशिष्ट चवींना सरावलेली ती जीभ असं कसं स्वस्थ बसू देईल. त्यासाठीच आधी आठ-आठ दिवस प्लॅनिंग करून हळदीची पानं, वेचक नारळ, बासमतीची किंवा आंबेमोहराची पिठी अशी जमवाजमव करून नागपंचमीच्या दिवशी पातोळे करणाऱ्या माझ्या सहकारी मत्रिणी पाहिल्या की याची प्रचीती येतेच. ज्या पिढीनं जे खाल्लेलं आहे, जे अनुभवलेलं आहे ज्याची सवय झाली आहे त्यात बदल करणं बरंच कठीण जातं. अगदी स्थळ-काळ बदललं तरी ते अनुभव जपण्याचीच तीव्र इच्छा असते. म्हणूनच शिक्षणासाठी घर सोडून दूर असलेल्या माझ्या मुलाला श्रावणी सोमवारी माझ्या हातच्या पायसची आणि नागपंचमीदिवशी आजीच्या हातच्या खांडवीची न चुकता आठवण येतेच.
याचंच अजून एक उदाहरण म्हणजे माझी मत्रीण योगिनी स्वत: एम.बी.बी.एस. आहे. स्वत:च्या व्यवसायात अगदी व्यग्र असते. तरी दिव्याच्या अमावास्येला दिवे करण्याची तिच्या माहेरची पद्धत तिने सासरी सुरू केली आणि आजही ती ते कधी चुकवत नाही. श्रावणात अगदीच शुक्रवारी नाही तर जेव्हा सवड असेल तेव्हा सासूबाईंना मदत करत पुरणपोळ्यांचा घाट घालतातच त्यांच्या घरी. आय. टी. क्षेत्रात काम करणारी माझी पुतणी पूर्वा जसे आजच्या पद्धतीचे नवीन पदार्थ सुंदर बनवते तसे चविष्ट मोदक करण्यातही तिचा हात कुणी धरू शकणार नाही. फक्त यांच्यात आणि पूर्वीच्या स्त्रियांमध्ये एवढाच फरक की, पूर्वीच्या स्त्रिया पूर्णपणे गृहिणी तरी असत किंवा नोकरी सांभाळून संसार करत असल्या तरी परंपरांचा पगडा असणाऱ्या असत. त्यामुळे त्या त्या वेळी ते ते झालंच पाहिजे अशी त्यांची मनोवृत्ती असे. पण, आता थोडासा बदल झालाय म्हणून व्यवसायाने प्रोफेसर असणाऱ्या नागपूरकर रेखाने ती शेजारी असेपर्यंत नारळी पौर्णिमेच्या आसपासच्या रविवारी आमच्याकडे नारळीभातावर आडवा हात मारला आणि गोकुळाष्टमीच्या नजीकच्या रविवारी आणि श्रावणात अधूनमधून आम्हाला गोपाळकाला न चुकवता खिलवला.
कोल्हापूरला राहणाऱ्या माझ्या मत्रिणीचा वीकपॉइंट आहे राळ्याची खीर. तिच्या अनेक मत्रिणींचाही हा वीकपॉइंट आहे. ही राळ्याची खीर खिलवण्यासाठी सण लागत नाही तर राळ्याची खीर खाऊ घालण्याचा आनंद तिला जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणून कोणत्याही एखाद्या सवडीच्या दिवशी तिचा फोन जातो प्रत्येकीला आणि ती तोच सणाचा दिवस ठरवून प्रत्येकाला राळ्याची खीर खायचं आमंत्रण देते आणि सणाच्या दिवशीही राळ्याची खीर प्रत्येकाला पाठवली जाते ती वेगळीच. म्हणजे पाहा नं, काळानुसार थोडं बदलून ही राळ्याची खीर तिने नुसती जोपासलीच नाही तर राळे माहीतही नसलेल्या आमच्यापर्यंत ती पोहोचवलीच म्हणजे तिचा प्रसारही केला.
 ‘मायक्रोवेव्हमध्ये अळूवडी मस्तच होते गं’ असा जेव्हा एखाद्या मत्रिणीचा फोन येतो तेव्हा ती खायला श्रावणच कशाला हवा ? मात्र टाकळा, कर्टुलं, कुर्डू, भारंगी या भाज्या श्रावणातच पिकतात. हळदीची, अळूची पानं याच दिवसांत दिसतात आणि याच दिवसांत चविष्ट लागतात म्हणून बाजारातून आणून एकदा तरी पातोळ्या, अळू वडय़ा, अळूचं फतफतं करून खाण्याकडे कल असतोच, म्हणूनच हल्ली बाजारात या भाज्या दिसतातच ना आणि त्या विकत घेण्यासाठी त्यांच्यावर उडय़ा पडतातच हे कशाचं द्योतक आहे?
उलट आजच्या ‘फुड कॉन्शस’ तरुणी-स्त्रियांमुळे आणखी एक चांगलं घडतंय, कोणताही पदार्थ करून खाताना त्याच्या चवीबरोबर त्याचं पौष्टिकमूल्यही विचारात घेतलं जातं. त्यामुळे एकाच सरधोपट पद्धतीनं तो न करता त्यात इनोव्हेशन्सही केली जातात आणि तीही विचारपूर्वक. बरोबर ‘फेसबुक’सारख्या सोशल नेटवर्कवरून रेसिपीजची देवाणघेवाण होतेय. त्यातून एकच पदार्थ बनवण्याच्या अनेक पद्धतींची देवाणघेवाण सुलभ झालीए. ‘व्हॉटस् अॅप’वर स्वत: बनवलेल्या आणि सजवलेल्या पदार्थाचे फोटो टाकल्यामुळे इतरांनाही चालना मिळतेय. आता बघा नं, श्रावणात अनेकदा पुरण किंवा पुरणपोळी करण्याची पद्धत माझ्या एका मत्रिणीच्या सासरी अनेक र्वष होती पण सततचे हे पदार्थ खाऊन सगळे कंटाळतातच आणि त्यातून फारसं पौष्टिक मूल्यही मिळत नाही हे लक्षात आल्याने तिने पुरणाऐवजी ‘मनगणं’, ‘शकुनउंडे’ हे गोव्याचे पदार्थ करायला सुरुवात केली. तिचं म्हणणं या दोन्ही पदार्थात चणाडाळीबरोबर ड्रायफ्रुटस् सढळपणे वापरता येतात. बरोबरच शकुनउंडे हे तळलेले असल्याने थोडीशी स्निग्धताही पोटात जाते जी हितकारक असते. सोमवारी पानावर गोड काही हवं म्हणून रव्याचा शिरा करण्याऐवजी कुणी एखादी कणकेचा फायबर जास्त असलेला शिरा करते एवढंच. आता, वालाचं बिरडं, सोललेल्या मुगांची उसळ वगरेसारखे काही खटपटीचे पदार्थ वारंवार करणं शक्य नसतं तरीही ते जमतील तेव्हा जमतील तसे म्हणजे विकतच्या डािळब्या वगरे आणणं, मत्रिणी-मत्रिणींनी एकत्र मिळून करणं किंवा प्रसंगी ऑर्डर देणं असं करत केले जातातच. मी एका ऑफिसमध्ये पाहिलंय, श्रावण मंगळवारी सर्व जणी एकेक पदार्थ वाटून घेतात. प्रत्येक जण तो पदार्थ घेऊन येतो. मग एकत्र बसून त्या पदार्थाचा आस्वाद घेतात. म्हणजे झालीच की सुंदर पंगत आणि व्हरायटी फुडचाही आनंद मिळालाच की आपोआप. सणाचं उद्दिष्ट याहून वेगळं कोणतं असतं? तसं आमच्या गावात अजूनही गोकुळाष्टमीचा मांड असण्याची पद्धत आहेच आणि आश्चर्य म्हणजे आजची तरुणाई पुढे सरसावत ती जोपासतेय. या मांडावर रात्री आंबोळ्या, चटणी, शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि मस्त उसळ यांची सुंदर मेजवानी केली जाते. शेजारी-पाजारी, मित्र-मत्रिणी यांना एकत्र जमवून एकत्रितपणे हे पदार्थ बनवून सहभोजनाचा आनंद घेतला जातो. आणि हे सगळं आत्यंतिक आवडीने केलेलं असतं हे विशेष. म्हणजे जेवण बनविण्यात आणि खाण्यात दोन्हींतही व्हरायटी नक्कीच.
म्हणूनच मागच्या पिढीची ही ओरड वा दटावणी प्रेमळ आहे, एवढाच निष्कर्ष काढूया. अनेक घरात याच मागच्या पिढी आणि पुढच्या पिढीच्या एकत्रिकरणातून नवनवीन पारंपरिक आणि आधुनिक पदार्थ तयार होत आहेत. नात्यांची गोडी वाढत आहे. फरक इतकाच झालाय की,अजूनही तुम्हाला घरोघरी पुरणपोळी खायला मिळेलच, फक्त ती श्रावणी शुक्रवारीच असं नाही. कदाचित घराघरात फुड प्रोसेसर, मायक्रोवेव्ह वगरेसारखे हस्तक शुक्रवारऐवजी रविवारी राबतील. कोकणात नागपंचमीच्या निमित्ताने होणाऱ्या पातोळ्यांची जागा कडबू किंवा िदडेही घेतील एवढंच. ‘रेडी टू युज’ अशी इन्स्टंट पिठांची पाकिटं आणि शक्य असेल, तिथे पेड सíव्हसेसचा आधार घेतला जात असेल पण हल्लीच्या मुलीही श्रावण सोमवारी एखादं बारीकसं पक्वान्न पानात वाढतीलच. सध्या पहिली पाच र्वष मंगळागौर पुजणं कालबाहय़ ठरावं एवढं ‘बॉर्डरलाइन’ला आलं आहे. पण एकच वर्ष का असेना श्रावण मंगळवारी भाजणीचे वडे आणि उसळ फस्त करणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीए, आवर्जून श्रावणी शुक्रवारी चणे, गूळ असं लोकलमध्ये किंवा ऑफिसमध्ये वाण देण्याची अपूर्वाई आहेच की अजून. असं सगळं आहे मग एखाद्या वेळी नारळी पौर्णिमेला नारळीभात न करता भावाला आवडणारा पदार्थ केला गेला तर अगदीच हल्लीच्या मुलींना नावं ठेवून नाही चालणार. कारण बदल हा जीवनाचा स्थायिभाव आहे. आणि हे सगळं असंच चालणार हे हल्लीच्या मुली जाणून आहेत.
प्रेमाचा मार्ग पोटातून जातो तेही या पिढीला  माहीत आहे आणि भारतीय सण-परंपरातून खाणं वेगळं काढलं तर बाकी काय उरतं तेही!