तडजोड करीत जगण्यापेक्षा दु:खाचे स्वरूप समजावून घेऊन त्याचा वस्तुनिष्ठ स्वीकार करायला हवा आणि एकदा का तो स्वीकार केला की त्याचे निराकरण करून आपले कर्म नीतीमार्गाने शांत चित्ताने करीत राहिल्यास समाधानी, आनंदी जीवन जगता येते. यासाठी त्रिपिटकात बुद्धाने चार आर्यसत्ये म्हणजे पायाभूत सत्ये सांगितली आहेत – दु:ख व त्याचे स्वरूप, दु:खाचे कारण, दु:खाचे निराकरण आणि समाधानी जगण्यासाठी अष्टांगिक मार्ग.
गौतम बुद्धाने सर्वसामान्य जनतेला नीतीयुक्त आचरणासाठी सांगितलेली तत्त्वे अतिशय तर्कशुद्ध आहेत. माणसाच्या शुद्ध कर्मावर बुद्धाने भर दिलेला आढळतो. दु:खांशी लढण्यात किंवा त्यांना शरण जाऊन कसेबसे जगण्यापेक्षा दु:खाचे स्वरूप समजावून घेऊन त्याचा वस्तुनिष्ठ स्वीकार करणे. त्या स्वीकारानंतर त्यांचे निराकरण करून आपले कर्म नीतीमार्गाने शांत चित्ताने करीत राहिल्यास समाधानी, आनंदी जीवन जगता येते. यासाठी त्रिपिटकात बुद्धाने चार आर्यसत्ये म्हणजे पायाभूत सत्ये सांगितली आहेत. याचबरोबर बुद्ध असेही म्हणतो की, मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास न ठेवता त्याचा प्रत्यय घ्या. अमुक व्यक्तीने किंवा अमुक ग्रंथात सांगितले म्हणून ते सत्य मानणे चूक आहे. कार्यकारणभाव तपासून तर्कशुद्ध रीतीने तत्त्वाचा प्रत्यय आल्यावरच त्याचा अंगीकार करावा. बुद्धीशी वैर करणारे, युक्तीशी विसंगत, चिकित्सक बुद्धी व शास्त्रीय शोध यांच्यापुढे न टिकणारे काहीही माझ्या उपदेशात कधीही येणार नाही असे बुद्धाने वारंवार उद्घोषित केले आहे. १) दु:ख आणि त्याचे स्वरूप २) दु:खाचे कारण ३) दु:खाचे निराकरण ४) समाधानी जगण्यासाठी अष्टांगिक मार्ग. ही चार पायाभूत आर्यसत्ये आहेत.  
दु:ख : जन्म, जरा, व्याधी, मृत्यू या शरीराशी निगडित गोष्टी दु:खकारक असल्या तरी त्या अपरिहार्य आहेत. त्यांचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करणे सयुक्तिक ठरते, असे बुद्ध म्हणतो. माझ्याच वाटय़ाला व्याधी का? दु:खद परावलंबित्व का? वृद्धत्वाचे भोग का? असा विचार करणे किंवा वृद्धत्वाचा माझ्यावर काही परिणाम नाही, मला कधीही रोग झाला नाही, मी सदा सुखी आहे असा विचार करणे दोन्हीही योग्य नाही. दु:खाचा समदृष्टीने स्वीकार केला, वस्तुस्थिती स्वीकारली की परिस्थितीशी जमवून घेत शांतभावाने जगता येते.
शारीरिक दु:खांसारखी मानसिक दु:खेही प्रत्येकाच्या वाटय़ाला येतात. कधी कधी नको असलेल्या व्यक्तींशी अपरिहार्यपणे संबंध येतो. तेव्हा दु:खाचा उद्भव होतो. तेव्हा राग येतो, हताश वाटते. असहाय झाल्याची भावना बळावते. त्या भावना आपण दडपतो. आपण दु:खात आहोत हे नाकारतो. तो राग दुसऱ्या कुणावर तरी निघतो. कारण नसताना आपण रागावल्याने ती व्यक्तीही दुखावते. आपल्याच माणसाला अकारण दुखावल्याने आपल्याला अपराधी वाटू लागतं. या तऱ्हेने कार्यकारणभावाची शृंखला तयार होऊन दु:ख वाढत राहते. कधी कधी घरातील मुलांशी किंवा इतर कुटुंबीयांशीसुद्धा पटत नाही. या सर्वातून दु:ख उगम पावते. कित्येकदा आपण ते जाणिवेच्या पातळीवर नाकारतो. मला कुणापासून काहीही त्रास होत नाही, असे म्हणतो. असं करताना आपण आपलीच फसवणूक करत असतो. या दमनामुळे मानसिक गंड उद्भवू शकतात. ते दु:खकारक ठरतात. म्हणूनच दु:खाच्या वस्तुस्थितीचा समभावाने स्वीकार करणेच योग्य असते.
प्रियजनांचा वियोग किंवा मृत्यू हे एक फार मोठे दु:ख असते. प्रियजनच काय आपल्या मालकीच्या वस्तूंमध्येसुद्धा आपले मन गुंतून पडलेले असते. त्या वस्तू हरवल्या तर आपण दु:खी होतो. वस्तू वा माणसे दुरावणार या वस्तुस्थितीचा स्वीकार केला की मनाची क्षुब्धता ओसरू लागते.
आपला मुलगा मृत्यू पावला आहे त्याला जिवंत करावे, अशी बुद्धाकडे याचना करणाऱ्या दु:खी आईला बुद्धाने सांगितले होते की, ज्या घरात मृत्यू झालेला नाही तेथून मूठभर मोहऱ्या घेऊन ये म्हणजे मी तुझ्या मुलाला जिवंत करतो. दु:खाने वेडय़ा झालेल्या आईने सगळीकडे शोध घेतला आणि मग मृत्यूचे दु:ख सर्वत्र आहे याचे तिला भान आले. दु:खाचा स्वीकार केल्यावर शांतभाव उपजला.          
आपल्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, इच्छा यांची पूर्ती झाली नाही की दु:ख होते. याची प्रचीती आपल्या सर्वाना वारंवार येत असते. आपल्याला हे हवे, ते हवे, अमक्याने असे वागायला हवे, तमक्याने आपल्यासाठी आपल्याला हवे ते करायला हवे. या साऱ्या ‘हवे’ ला अंत नसतो. ‘हवे’ ते मिळाले नाही की दु:ख होते. त्याचा बिनशर्त स्वीकार केला की त्याच्याशी जुळवून घेणे शक्य होते.
दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य सर्वकालीन, सार्वत्रिक आहे. दु:ख समुदय म्हणजे पुन:पुन्हा उत्पन्न होणारी व सर्वत्र आसक्ती उत्पन्न करणारी तृष्णा, वासना! ती दु:खाचे कारण असून ती हळूहळू कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा, हे तिसरे आर्यसत्य होय.
पुष्कळदा ‘मला अजिबात वासना नाही’ असं म्हणण्यातही अहंकार असतो. बुद्धभिक्षू दहर याची या संदर्भातली कथा प्रसिद्ध आहे. दहर याच्यासाठी त्याच्या वडिलांनी वारसा म्हणून बऱ्याच सुवर्णमुद्रा ठेवल्या होत्या. भिक्षू दहर गावी आला तेव्हा त्याच्या लहान भावाने त्या सुवर्णमुद्रा दहरच्या स्वाधीन केल्या. त्या त्याने रागाने फेकून दिल्या. ‘एका भिक्षूला सुवर्ण हे मातीसमान आहे’, असं तो म्हणाला. यात अहंकार होता. क्रोधही होता. फेकून देण्यात भीतीही होती की न जाणो याचा मोह होईल. तरीही आतमधील सुवर्णाची अभिलाषा लोप पावली नव्हती. मग तो आपल्या त्यागाचा गाजावाजा करू लागला. म्हणजे दंभही आला. या सर्वाच्या आत तळाशी इच्छा होतीच. तिने हळूहळू डोके वर काढायला सुरुवात केली. त्याला वाटू लागलं, धन जवळ असताना भीक मागून जगण्यात काय अर्थ? या तऱ्हेने निश्चय, ध्येय, तप, साऱ्याचा पाया त्या इच्छेने पोखरला. अखेर त्याने संन्यासाचा त्याग केला.
म्हणून बुद्धाने असे सांगितले आहे की, दु:खाच्या मुळाशी असलेली वासना नाहीशी करण्याचा सराव करायला हवा. आपण कितीही म्हटले तरी हे आचरणात आणणे कठीण असते. एक इच्छापूर्ती आपोआप दुसऱ्या इच्छेला जन्म देत असते. आपल्या मुलाने बारावीत उत्तम गुण मिळवावेत म्हणून आपण आटापिटा करतो. जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत मुलगा उत्तम गुण मिळवतो. त्यासाठी आपण मोठाले क्लास लावतो. खर्च करतो. पैसे मिळवायला कष्ट करतो. त्यासाठी भलेबुरे मार्गही चोखाळतो. या सगळ्यात दु:ख, क्लेश, ताण असतात. पण ही इच्छा पूर्ण झाल्यावर सुखी होते का..नाही. मग मुलाला वैद्यकीय अभ्यासक्रमाला किंवा आय. आय. टी.ला प्रवेश हवा त्यासाठी परत धावाधाव! ती इच्छाही एकदाची पूर्ण झाली, की तात्पुरते सुख मिळते. मग मुलाने अधिक उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे ही इच्छा मागोमाग येतेच! समजा यातील एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर संताप, अपमान, मनोभंग अशा अनेक भावनांनी दु:ख आणि निराशा पदरी येते. तर अशा पुन:पुन्हा निर्माण होणाऱ्या इच्छांचे स्वरूप ओळखून त्यातून निर्माण होणाऱ्या दु:खाचे स्वरूप समजून घेत आपल्या कुवतीनुसार योग्य ध्येय निश्चित करून त्यानुसार आपले कर्म शांतपणे करीत आयुष्याची वाटचाल करणे सामान्य माणसाकरिता हितकर असते.  
चौथे आर्यसत्य म्हणजे अष्टांगिक मार्ग. यात सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मात, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीचा समावेश होतो.    

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र