‘‘एकदाच नक्की आणि पक्कं ठरवा बाबा. तुम्ही कधी म्हातारे आणि कधी तरुण असणार आहात? कुठपर्यंत तुमचे निर्णय तुम्ही घेणार आणि कधीपासून मी त्यात पडायचं? अशी रेघ ओढलीत तरच आपले चांगले ‘जमेल’ बाबा.  तुम्ही बाहेर पडता, नातेवाईक, मित्र-सभा-संघटनांमध्ये मिसळता हे तर छानच आहे. त्यातून तुम्हाला शंभर सल्लागार मिळतात हेही एक वेळ ठीक आहे, पण कुठे काही हुकलं.. चुकलं.. फिसकटलं तर निस्तरायला मी एकटाच सापडतो ना? मागे परस्पर त्या कुठल्या ट्रेकला गेलात. निम्म्यात ब्रेथलेस झालात, तेव्हा कोणाला पळत सुटावं लागलं हातची कामे सोडून?’’ शशी तळमळीने म्हणाला.
‘बाबांचं काहीतरी बिनसलेय आजकाल,’ असं बायको शशीला फोनवर दोन-तीनदा म्हणालीच होती. दौऱ्यावरून घरी येताच त्याला ते जाणवलं. संध्याकाळची वेळ असून घरामध्ये सामसूम होती. बाबांच्या खोलीतून टी.व्ही.चा मोठ्ठा आवाज येणं, त्यावर आवाजाची पट्टी चढवून बायकोचं फोनवर बोलणं ही नेहमीची गजबज नव्हती. बायकोकडून फारसं काही कळलं नाही, तेव्हा शशी बाबांच्या खोलीत गेला. ते भिंतीकडे तोंड करून पलंगावर पडले होते. तेही ‘बरं आहे’, ‘नेहमीचंच’, ‘विशेष काही नाही रे’ वगैरे टोलवत राहिले. तेव्हाच काहीतरी विशेष आहे हे शशीला कळलं. शशीनं तेवढय़ापुरतं त्यांना मोकळे सोडले ते रात्री उशिरा छडा लावायचाच या निश्चयाने. विषय ‘पेंडिंग’ ठेवण्यात अर्थ नव्हता. चार दिवसांनंतर त्याला पुन्हा दिल्लीला जायचं होतं.
रात्री जेवल्यानंतर त्याने बाबांना पुन्हा गाठलंच,
‘‘काय झालंय बाबा? नीट सांगा. त्या शिवाय मी इथून हलणार नाही.’’
‘‘माझे दोन लाख रुपये गेले रे.’’ बाबा रडायच्या बेतात.
‘गेले? कसे? कधी? कुठं?’
‘प्रगती म्युच्युअल फंडात लावले होते मी.’’
‘‘कधी?’’
‘‘हे आत्ताच की.’’
‘‘कशासाठी’’
‘‘१५ टक्केरिटर्न कबूल केला होता रे त्यांनी. मला वाटलं छान आहे. एकदम रक्कम वाढवावी आणि तुला चकित करावं.’’
‘‘विचार चांगला होता. पण तुमच्यापर्यंत कसा आला?’’
‘‘आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये भाषण झाले होते एका सल्लागाराचे. गुंतवणुकीबाबत. इंटरेस्टिंग वाटलं.. म्हणून..’’
‘‘ठीक आहे. असं होते कधी कधी. लवकरात लवकर विसरायचा प्रयत्न करा. मी पण विसरून जातो.’’
‘‘तुझं सोपं आहे रे. विसरलो म्हणायला लक्षात ठेवतोस कुठे तू?’’
एक रिकामटेकडा म्हातारा आहे घरात, तो आपल्या नगण्य पैशांचे नगण्य व्यवहार करतोय इतपत आस्था तुला..’’
‘‘अच्छा ऽ म्हणजे आता पैसे बुडाल्याचा राग तुम्ही माझ्यावर काढणार तर! प्रगती फंड माझा आहे? त्यात पैसे गुंतवायला मी कधी सांगितले होते?’’
‘‘तू कुठे काय सांगतोस मला? कुठे काय बघतोस? वेळ नाही, मूड नाही, नंतर बघू अशी टोलवाटोलवी तुझी.’’
‘‘शक्य आहे एकदा असं होणं बाबा. आमच्या कंपनीच्या या कोलॅबोरेशन प्रकरणात एवढा अडकलोय ना मी..’’
‘‘आमच्या अण्णांच्या म्हातारपणातला पै-पैशाचा व्यवहार आम्ही मुलांनी पाहिला. दादाकडे गेला की तो बघे, इथे मी बघे.’’
‘‘आठवतंय. लांज्याचे घर-वाडी सगळे उरकून अण्णा आजोबा येथे आले, तेव्हा एक छोटी बॅग तुमच्यासमोर ठेवली होती त्यांनी. म्हणाले होते, ही माझी जन्माची पुंजी यापुढे तू सांभाळ. यातून सुटून ‘हरी हरी’ करायला कधी मोकळा होईन,असं झालंय मला. चांगले आठवतंय.’’
‘‘आई गेली आणि त्यांचा सगळ्यातला रसच गेला. थकले होते.’’
‘‘अर्धा अर्धा तास उकिडवं बसून दूर्वा काढू शकायचे की अंगणातल्या. म्हणजे एवढे काही थकले नसणार. पण त्यांनी अंग काढून घेतले. त्यांना जमले ते.’’
‘‘इथे शहरात आल्यावर व्यवहार करणे नाहीतरी त्यांना कठीणच गेले असते. माझे तसं नाही. मला सवय आहे, एक्स्पोजर आहे, मग मी एवढय़ात परावलंबी का व्हावे?’’
‘‘परावलंबी?’’
‘हो म्हणजे पावला पावलाला तुला विचारणे, तुझी मदत मागणे, तुझ्यासाठी अडून राहणे वगैरे रेऽ’’
‘‘मुलावर अवलंबून राहणे हा परावलंब वाटतो तुम्हाला. तुम्हाला स्वावलंबन हवं, स्वातंत्र्य हवं. म्हातारपण आलं तरी..’’
‘‘छय़ा! मी काही म्हाताराबितारा नाही. आता ८०-८५ पर्यंत जगायचं असेल, तर सत्तरीला म्हातारपण येऊन कसं चालेल? म्हणून तर आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणवून घेतो.’’
‘‘म्हणा काहीही हो. शब्दात काय आहे? भावना खरी. तुम्हाला स्वातंत्र्यही हवं आणि ते अंगाशी आलं की मुलांवर खापर फोडायलाही हवं हे जमणार नाही बाबा.’’
‘‘पुरे हा विषय.’’
‘‘का? तुमच्या गैरसोयीच्या वळणावर जातोय म्हणून?’’
‘‘नाही. काही निष्पन्न होणार नाही म्हणून. एक मात्र सांगतो, निरलसपणे ज्येष्ठांची सेवा करण्यासाठी नक्कीच मनाचा मोठेपणा लागत असणार. तो तुमच्या पिढीत नाही.’’
‘‘आणि निर्ममपणे पुढच्यांच्या स्वाधीन होण्यासाठी पण तोच लागत असेल तर.. तो आहे तुमच्या पिढीत?’’
‘झोपतो आता. आधीच तीन रात्री डोळ्याला डोळा नाही लागलेला माझा..’’
‘‘म्हणून तर सांगतो. उद्या बघतो मी त्या प्रगती प्रकरणाचं. तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. पण एकदाच नक्की आणि पक्कं ठरवा. तुम्ही कधी म्हातारे आणि कधी तरुण असणार आहात? कुठपर्यंत तुमचे निर्णय तुम्ही घेणार आणि कधीपासून मी त्यात पडायचं?’’
‘‘अशी रेघ ओढणे मला नाही जमणार.’’
‘‘पण ओढलीत तर आपले चांगले ‘जमेल’ बाबा. बघा. कधीपासून हे सांगावं सांगावं म्हणत होतो. निमित्त आज मिळालं. तुम्ही बाहेर पडता, नातेवाईक, मित्र-सभा-संघटनांमध्ये मिसळता हे तर छानच आहे. त्यातून तुम्हाला शंभर सल्लागार मिळतात हेही एक वेळ ठीक आहे पण कुठे काही हुकलं.. चुकलं.. फिसकटलं तर निस्तरायला मी एकटाच सापडतो ना? मागे परस्पर त्या कुठल्या ट्रेकला गेलात. निम्म्यात ब्रेथलेस झालात, तेव्हा कोणाला पळत सुटावं लागलं? हातची कामे सोडून?’’ शशी तळमळीने म्हणाला. बाबांच्या त्या ट्रेकची त्याला एक प्रकारची भीतीच बसली होती. वेळ बरी होती म्हणून..’’
हे सगळं आठवायला, बोलायला आताची वेळ बाबांना मात्र तेवढीशी बरी वाटली नसणार. त्यांनी पटकन पांघरूण ओढून घेतलं आणि म्हणाले,
‘‘पुरे रे आता! डोकं कलकलायला लागलं माझं. आता या वयात फार चिकित्सा नको वाटते.’’
‘म्हणजे आता यांचं अचानक वय झाले म्हणायचं.’ मनातल्या मनात म्हणत शशीने स्वत:ला एक काल्पनिक टप्पल मारून घेतली आणि तिथून उठला.
सकाळी उठायला त्याला रोजच्यापेक्षा उशीरच झाला तर बाबा घरात दिसेनात. दचकलाच. कालचे बोलणं सहन झालं नाही की काय यांना? पण कधीतरी मनातलं खरं एकमेकांना कळायला नको? ऐच्छिक किंवा ऑप्शनल म्हातारपणाशी डील करणं आपल्याला डिफिकल्ट जातंय हे डायरेक्ट कन्व्हे करायला नको?
भीतभीतच बायकोला विचारलं, ‘‘बाबा कुठे गेल्येत?’’
बायको हसली. ‘‘मित्रांबरोबर आहेत. पहाटेपासून त्यांच्या रोजच्या मॉर्निग वॉकर्स ग्रुपशी फोनाफोनी चालली होती. त्या प्रगती म्युच्युअलने पोळलेल्यांची काहीतरी समिती, संघटना वगैरे तयार करायचं चाललंय त्यांचं.. कसले चेवात होते सकाळी ते.. युवर बाबा.. आय टेल यू..’’
‘‘डोण्ट टेल मी एनिथिंग’’ शशी अगोदर खेकसला आणि क्षणात बायकोच्या हसण्यात सामील झाला. दुसरं काय करणार होता तो?    
mangalagodbole@gmail.com