‘इमोशनल पॅरालिसीस’ अर्थात आपला एकूणच अभ्यास झालेला नाहीये, असं वाटू लागणं आणि त्या विषयाचा धाक जाणवायला लागणं आणि त्यातून भीती उत्पन्न होणं आणि पुन्हा त्या भीतीतून ताण वाढणं, हे एक दुष्टचक्र आहे.- मुलांच्या परीक्षा जवळ येऊ लागल्या आहेत. त्यासाठी खास मार्गदर्शन.
दहावी-बारावीच्या परीक्षा आता जवळ येऊ  लागल्या आहेत. घरोघरी अभ्यासाची उजळणी आणि पेपर सोडविण्याचे सराव सुरू झाले आहेत. प्रत्येकाच्या घरातलं वातावरण वेगवेगळं असतं, तशी मुलांची मानसिकताही. एकूणच स्वत:चं दडपण, कुटुंबाचं आणि समाजाचं दडपण अशा तीन परिस्थितींमधूून त्यातल्या कमी-अधिक दडपणातून मुलं जात असतात. त्यामुळे मुलांच्या मन:स्थितीकडे लक्ष देणे या काळात गरजेचे आहे.
मुलांचा अभ्यास अगदी अंतिम टप्प्यात आला असेल. कुठल्या विषयाची चांगली तयारी झाली आहे आणि कुठले विषय किंवा त्यातील धडे-प्रकरणे अजून नीट करायला हवे आहेत, याची एव्हाना मुलानांही कल्पना आलेली आहे. अभ्यासाचे वेळापत्रक आखून त्यानुसार अभ्यास सुरू असेल, पण अनेकदा असे होते की एखाद्या दिवशी ठरवलेला धडा पूर्ण नाही झाला, तर मुलांना सारे ठप्प झाल्यासारखे वाटते. यालाच मानसशास्त्राच्या भाषेत ‘इमोशनल पॅरालिसीस’ म्हणतात. ज्यामुळे आपला एकूणच अभ्यास झालेला नाहीये, असं वाटू लागतं आणि त्या विषयाचा धाक जाणवायला लागतो, मग त्या धाकातून भीती उत्पन्न होते आणि त्या भीतीतून एक प्रकारचा ताण येतो, असे हे एक दुष्टचक्र आहे.
पण हे दुष्टचक्र भेदणे सहज शक्य आहे – पालकांना आणि मुलांनासुद्धा. समजा, गणितातील एखादे समीकरण सोडवता आले नाही, तर आपल्याला गणित हा विषयच जमलेला नाही असा समज मुलं करून घेतात. पुस्तकात ‘हिरो’ आणि ‘खलनायक’ दोघेही असतात.  हिरो म्हणजे जे पटकन कळतं तो अभ्यास आणि खलनायक म्हणजे जिथे गाडी अडते तो. पुस्तकातील पहिली सतरा-अठरा पाने आठवली आणि एकोणिसाव्या पानावरचे समीकरण आठवले नाही तर ते सोडून पुढे जाणे चांगले. पेपर सोडवताना एखादं उत्तर पटकन नाही आठवलं तर पुढच्या प्रश्नांकडे वळा. सगळे प्रश्न सोडवून झाले की मग त्या न आठवलेल्या प्रश्नाच्या उत्तराकडे या. त्यावेळी ते नक्की आठवेल. मात्र तिथेच खणत बसले तर मानसिक गुंता वाढत जाईल आणि मन त्यात अडकून राहतील. तसं होऊ  नये कारण परीक्षा हा एक धबधबा आहे आणि तीन तास तो वाहत राहिला पाहिजे, थांबून चालणार नाही.
मुले अभ्यास करताना अशी एका प्रकरणात सारखी अडकत असतील, तर मुलांनी पालकांशी आणि शिक्षकांशी त्याबाबत मोकळेपणाने बोलावे. मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी, समस्या, कठीण वाटणारे विषय सोपे करण्यासाठी १० टक्के आठवून लिहिणे आणि त्या पुढचं १० टक्के आठवणीत राहण्यासाठी पुन्हा लिहून काढणे यासारख्या गोष्टी करता येतील. ‘मला काहीच येत नाहीये किंवा मी सगळा अभ्यास विसरतोय’ या विचाराचा मुलांच्या मनावर ताण येतो. मनाच्या संगणकात सगळा अभ्यास तयार असतो. जेव्हा काहीच आठवत नाही असं वाटेल, तेव्हा थोडा वेळ शांत बसून मुलांनी दीर्घ श्वास घ्यावा. दोन-चार वेळा असं केलं की आपोआप सगळं आठवेल. इथे स्वत:शी बोलणे म्हणजेच ‘सेल्फटॉक’ महत्त्वाचा. स्वत:ला नकारात्मक विचारातून काढणे महत्त्वाचे. त्यासाठी मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा नक्की काय येत नाहीये आणि कुठे अडतोय, हे शोधून काढल्यास त्यावर लक्ष केंद्रित करणं शक्य होतं. आपल्या जर अंगठय़ाला जखम झाली, तर आपण अख्खा हात बांधून ठेवत नाही, फक्त अंगठय़ाचा इलाज करतो. तसंच एखादे समीकरण सोडवता आले नाही, तर अभ्यासच येत नाही असा होत नाही.
लक्षात ठेवण्याच्या निरनिराळ्या पद्धती
सध्याचे हे परीक्षेच्या आधीचे काही दिवस आहेत. या दिवसांत सगळा अभ्यास पुन्हा एकदा मुलांच्या डोळ्याखालून जाणे आवश्यक आहे. ज्याची तयारी नीट  झाली नाहीये असं वाटत असेल ते त्यांनी पुन्हा पुन्हा वाचावे. काही वेळा मुलं आपल्या पालकांना धडा वाचून दाखवायला सांगतात अशावेळी पालकांनी, ‘मी धडा वाचून काय उपयोग? परीक्षेला तुला बसायचं आहे, तुझा अभ्यास तूच करायला हवास’ असे म्हणण्याऐवजी धडा वाचून दाखवावा. काही मुलांना ऐकलेले चांगले लक्षात राहते, काही मुलांना स्वत: वाचलेले चांगले लक्षात राहते, तर काही मुलांना फळ्यावर लिहिलेले किंवा बोर्डवर लावलेला कागद वाचून तेही चांगले लक्षात राहते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मुलांनी मदत मागितली तर पालकांनी त्यांना अभ्यासात जरूर मदत करावी. या दिवसात जे येतंय त्याची उजळणी करता येईल. अशी उजळणी पालक आणि मुलं एकत्र बसून करू शकतील. बरेच वेळा ‘ए टू झेड अभ्यासक्रम पूर्ण झालाच पाहिजे’ या वाक्यानेसुद्धा ताण येतो. ‘मला सगळं येतं याहीपेक्षा मला बरंचसं येतंय हे महत्त्वाचे असतं’ अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. जे जमणार नाही असं मुलांना वाटतंय, ते पुन्हा पुन्हा वाचल्याने लक्षात राहील.  
 या दिवसात मुलांच्या झोपेच्या बाबतीतही काही नियम पाळा. रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास नको. अभ्यासाप्रमाणेच झोपेलाही एक शिस्त हवी आणि ती पाळायला हवी. किमान सात तास सलग झोप आवश्यक आहे, तरच मुलांना उठल्यावर ताजं वाटेल. आणि जेव्हा उठल्यावर ताजंतवानं वाटतं तेव्हा झोप पूर्ण झालेली असते. संपूर्ण रात्र जागून अभ्यास करायची गरज नाही.
मनाची एकाग्रता कशी साधायची- हाही एक प्रश्न असतोच. अभ्यास सुरू असताना मार्काचा किंवा टक्केवारीचा (magic figer) जास्त  विचार करुन आणि त्याबद्दल मुलांच्या डोक्याशी भुणभुण लावू नये. त्यामुळे मन एकाग्र होण्यात अडथळे येतात. ओळखी-पाळखीचे, शेजार-पाजारचे लोक सारखंसारखं ‘किती मार्क्‍स मिळणार’ असं विचारतात, अशा लोकांना या दिवसात दूर ठेवावं.
मुलं दहावी-बारावीत गेली की घराचं वातावरण पार बदलून जातं. अगदी स्मशानशांतता जाणवायला लागते. पालकांनी आणि मुलांनीसुद्धा आता प्रिलीम्सच्या मार्काचा जास्त विचार करीत बसू नये. मुलांनी स्वत:शी प्रामाणिक राहून अभ्यास करायचा आहे. या दिवसांत पुस्तक हाच मुलांचा मित्र असणार आहे. मनात वेडेवाकडे विचार येत राहतात, ते तसे आले तरी त्याचा ताण घेऊ  नका. वेडय़ावाकडय़ा विचारांना लगेच बाहेरचा रस्ता दाखवायला सांगा. जर कुठल्या विचारांचा जास्त त्रास जाणवायला लागला, तर शिक्षक किंवा समुपदेशकाची मदत घेता येईल. जेव्हा डोक्यात काहीच शिरत नाहीये असं वाटतं, तेव्हा त्यांच्या मेंदूला आरामाची गरज आहे हे ओळखून मुलांनी आराम करायला हवा.
‘दोन तास अभ्यास कर आणि मग खेळ’ असे सांगण्यापेक्षा मुलांनी दर पाऊण तासाने दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा आणि पुन्हा अभ्यासाला लागावे. या काळात सगळी इलेक्ट्रोनिक्स आयुधं दूर ठेवा. मोबाइल, टीव्ही, व्हॉट्सअ‍ॅपपासून आणि खूप अभ्यास केल्याच्या बढाया मारणाऱ्या मित्रांपासून दूर राहायला सांगा. व्हिडीओ गेम्समुळे टेन्शन हलकं वगैरे काहीही होत नसतं, पण लोकांचा तसा समाज असतो.
 ज्यांनी आतापर्यंत फार अभ्यास केला नाहीये, अशा मुलांच्या पालकांनी त्यांना घाबरवून न सोडता अजूनही वेळ गेलेली नाही आणि अजूनही ६० टक्के अभ्यास करता येईल. जर कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर तो शिक्षकांशी बोलून मन मोकळे करावे. परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि परीक्षेच्या दिवशी मुलांनी खूप अभ्यास करायची गरज नाही. भिंतींवर लावलेल्या अभ्यासाच्या तक्त्यावरून एकदा नजर फिरवली तरी पुरेसे आहे.
मुलांना शुभेच्छा देताना चेहऱ्यावर फार काळजी, व्याकूळता, ताण आदी भावभावना दाखवू  नयेत, कारण मुलं पालकांच्या शुभेच्छांच्या शब्दांपेक्षा त्यांचा चेहरा न्याहाळत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मुलांच्या नजरेतून सुटत नाहीत. परीक्षा केंद्रावर जाताना पुस्तक वाचीत जाण्याची गरज नाही. त्याने काहीही साध्य होत नाही. केलेला अभ्यास डोक्यात असतोच. वर्गात शांत आणि प्रसन्न मुद्रेने बसावे आणि चेहरा प्रसन्न ठेवावा.
बुद्धितेजक किंवा स्मरणशक्तिवर्धक औषधांनी स्मरणशक्ती वाढत नाही, पण या दिवसांत आहार चांगला हवा. हिमोग्लोबिन चांगलं असायला हवं. काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. पालकांनो, मुलांना उदासीनता कधीही जाणवू शकते, अशावेळी समुपदेशकाचा सल्ला घ्या. ज्योतिषापेक्षा यावेळी समुपदेशक महत्त्वाचा असतो.
मुलांच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून आई-बाबांनी मुलांना घरी आणलंय, मार्कशीटला नाही. आई-बाबा नेहमीच बरोबर असणार आहेत, हा विश्वास मुलांबरोबर सतत असू द्या.     
डॉ. हरिश श़ेट्टी
शब्दांकन- मनीषा नित्सुरे-जोशी -harish139@yahoo.com