उन्हाळ्यात डोळे येणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कारण उन्हाळय़ात गरम हवेमुळे डोळय़ांचे अश्रू वाळतात. मात्र योग्य काळजी घेतली तर त्यावर लगेच उपाय होऊ शकतो. शिवाय हा संसर्गजन्य असल्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे खूप गरजेचे आहे.
परीक्षा संपल्यानंतर उन्हाळय़ाच्या सुट्टीत घरातील सर्वानाच दैनंदिन जीवनाबाहेर पडून ताण हलका करायचा असतो. गावाला जाऊन मजा करणे, लग्न समारंभ ठरवणे, घरातच वेगवेगळे गट जमवून जागरण करणे, खेळ खेळणे यामध्ये शरीराला मिळणारा नियमितपणा मात्र जातो. दूरचित्रवाणी, सिनेमा हॉल, मोबाइल गेम, सुसाट वेगाने गरम हवेत प्रवास यामुळे डोळय़ांना निश्चितच ताण येतो, अपायही होतो. वेगवेगळे लोक एकत्र येण्याबरोबर साथीचे आजार पसरवण्यासही मदत होते.
अचानक डोळे लाल होणे, चिकट द्राव सारखा डोळय़ात साठणे, सतत टोचल्यासारखे वाटणे, दिसण्यात थोडासा धूसरपणा वाटणे, क्वचित डोळा दुखणे, काही वेळा ताप, कणकण वाटणे याबरोबर सर्दी झाल्यासारखे होणे; सुरुवातीला एकाच डोळय़ाला, पण नंतर दोन्ही डोळय़ांना या तक्रारी सुरू होतात. डोळय़ांच्या पापण्यांना आतून पुरळ येणे, छोटे रक्ताचे ठिपके, पापणीला सूज अशा वाढत्या तक्रारी लगेच उपाय न झाल्यास दिसतात.
उन्हाळय़ात गरम हवेमुळे डोळय़ांचे अश्रू वाळतात, कोरडय़ा डोळय़ाच्या तक्रारी जास्त जाणवतात. सतत डोळे चिकटणे, लाल होणे, स्राव पापण्यासह चेहऱ्यावर चष्म्यावर लागणे यामुळे दुसऱ्यांपर्यंत साथ पोहोचू शकते. मुले, युवावर्ग, कामगारवर्ग मुद्दाम लक्ष देऊन स्वच्छता ठेवत नाहीत, यामुळे रोगजंतूंचा फैलाव पटकन होतो. विषाणू आणि  डोळय़ांची साथ हस्तस्पर्श, वस्तूंची देवघेव, घामट वातावरण, कपडय़ांची अदलाबदल किंवा समान वापर उदा. रुमाल यामधून झपाटय़ाने पसरते. पोहणे, खेळ, वाहनामध्ये दाटीने बसणे, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना हा प्रसार वेगाने सर्वदूर होतो.
ज्यांचे पूर्वी काचबिंदूचे ऑपरेशन झाले आहे किंवा ज्यांची चष्म्याचा नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया झाली आहे अशांनी डोळे आल्यावर वेळीच परिणामकारक उपाय न केल्यास दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याऱ्या व्यक्तींनीसुद्धा डोळे आल्यास लेन्स लावू नयेत व नेत्रतज्ज्ञांकडून डोळय़ांच्या पापण्या, बुब्बुळे इ. पूर्ण बरे झाल्यावरच परत वापर सुरू करावा.
गायीचे दूध, बकरीचे दूध हे आपल्याला खाद्य आहे. जंतूनाही त्याचा पुरवठा केला तर ते वाढतात आणि डोळे येण्याच्या आजारात वाढ होते, असे उपाय करू नयेत. कांद्याचा रस, गोमूत्र, स्वमूत्र आणि इतर असंख्य अशास्त्रीय उपायांनी आजाराची क्लिष्टता वाढते. धूर, धूप , मध आणि इतर कोणतेही घरगुती उपाय करण्याची गरज नाही, स्वच्छताही पुरेशी आहे. होमिओपथी किंवा आयुर्वेदिक शास्त्रीय औषधे त्याच पॅथीच्या तज्ज्ञांकडून घ्यावीत, पण कोणतेही बाबा, महाराज यांच्या चित्रांनी, पत्त्यांनी सजवलेली पण औषधांची माहिती न छापलेली औषधे डोळय़ांत घालू नयेत.
काही वेळा प्रतिकारशक्ती चांगली असल्यास
२-३ दिवसांत आपोआप या तक्रारी कमी होऊन डोळय़ांचे नुकसान न होता conjunctivitis  अर्थात डोळे येणे आटोक्यात येतो. पण कमकुवत शक्तीची मुले, आजारी माणसं, गरोदर स्त्रिया यांना मात्र डोळय़ाचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.
सुदैवाने या साथीमध्ये तपासण्या कराव्या लागत नाहीत. पण तातडीने डोळय़ांत थेंबाची औषधे, प्रतिबंधात्मक उपाय केल्यास दोन-तीन दिवसांत डोळे पूर्ववत होतात.
स्वच्छ पाण्याने नियमितपणे दिवसातून तीन-चार वेळा डोळे स्वच्छ ठेवणे हा सर्वात उत्तम उपाय. स्वच्छता केल्यावर प्रतिजैविकंचे (अ‍ॅन्टीबायोटिक) थेंब सुरुवातीला सतत टाकणे, नंतर निदान दिवसातून चार वेळा टाकणे यामुळे आजार आटोक्यात येतो. गरजेनुसार सूज ओसरण्याची घ्यायची औषधे, डोळय़ांवर आवरण म्हणून स्वच्छ गॉगल लावणे, सार्वजनिक ठिकाणी न जाणे हे पाळावे. डोळे आले असतील तर स्टिरॉइड्सचे थेंब सतत टाकावेत, यामुळे डोळय़ांमधील सूज ओसरते, पापुद्रे तयार होत नाहीत. डोळय़ांच्या पापण्या एकमेकांना चिकटू न देणे, सारखी स्वच्छता ठेवणे यामुळे बुब्बुळाला इजा होत नाही. ज्यांना कातडीच्या जखमा, आजार आहेत; उन्हाळय़ात ते वाढतात त्याला पूरक  उपायही करावेत.
लहान मुले, वृद्ध यांची सर्दीसाठी तक्रार असेल, तर योग्य ती प्रतिजैविके द्यावीत. तरुण वर्गात अतिसंपर्कामुळे होणाऱ्या डोळय़ांच्या साथीसाठी खायची औषधेही द्यावी लागतात.
ज्यांना चटकन एलर्जी होते, अस्थमा होतो, कातडीचे त्रास होतात त्यांना मूळ आजार दुरुस्त होईपर्यंत जास्त काळ डोळय़ांना थेंबाचे औषध घालावे लागते. वृद्ध आणि स्त्रियांमध्ये संधिवातासारखी लक्षणेही डोळे येण्याबरोबर असली तर त्यांना डोळय़ांत घालायच्या औषधांबरोबर खायची औषधेही घ्यावी लागतात. पापण्यांना आतून सतत लाली, फोड, पापुद्रे येणे हे बराच काळ टिकू शकते. काही औषधांच्या एलर्जीचा दुष्परिणाम म्हणूनही लाली व पापुद्रे बराच काळ त्रास देऊ शकतात.
पावसाळय़ात येणाऱ्या साथीनंतर अचानक बुब्बुळावर (cornea) बारीक, असंख्य ठिपके येऊन दृष्टीला त्रास होतो. हे ठिपके नीट औषधोपचार करूनही काही आठवडे टिकतात आणि हळूहळू जातात.
व्हायरल, बॅक्टेरियल ही सार्वजनिक साथी येणाऱ्या डोळ्यांच्या साथीची नावे आहेत. काही डोळ्यांची साथ बरी न होण्यास विशेष शारीरिक बदलही कारणीभूत असतात. त्यांच्या उपचारासाठी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला व उपायच करावा. काही वेळा दीर्घकाळ उपचार आणि इतर शरीराच्या तपासण्याही कराव्या लागतात.
विशेषत: मुलग्यांना लहानपणापासून हवेच्या बदलाने दर ऋतूबरोबर भारतात फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये पापण्यांना सूज येणे, उजेड सहन न होणे, डोळ्यात टोचण्याची तक्रार आदी त्रास होतात. कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या मोठय़ांमध्येही असा त्रास दिसतो. काही विशिष्ट एलर्जी जाण्याच्या औषधांनी हा कमी होतो. क्वचितच स्टिरॉइड्सची मदत लागते. मुलगा वयात येईपर्यंत हा त्रास होतो, नंतर येत नाही. दरवर्षी या डोळे येण्यामुळे डोळय़ाचे तेज, स्वच्छ पांढरेपणा कमी होतो. सुदैवाने दृष्टीवर काहीही परिणाम होत नाही.
पाळीव प्राणी, सतत बागबगिच्या, शेतीच्या कामात संपर्क, दमटपणा ह्य़ामुळे बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा अ‍ॅलर्जिक कन्जक्टिव्हिटिज बरा होण्यास वेळ लागतो.
हॉस्टेल्स, युवावर्ग, कॅम्पस, पोहण्याचे तलाव, गर्दीतून बस-रेल्वेने प्रवास, लग्नसमारंभ ही सगळी गर्दीची ठिकाणे, उन्हाळय़ाची गरम हवा, स्वच्छतेचा अभाव, म्हणजे शिस्तीची सवय नाही आणि सोयी नाहीत अशा सगळय़ा कारणांनी एक ते दोन आठवडय़ांत ८-१० शहरांत एकदम साथ पसरल्याचे नेत्रतज्ज्ञांना जाणवते.
स्वत:ला तक्रारी, लक्षणे जाणवताच स्वयंशिस्त आणि सामाजिक जबाबदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी न जाणे हा चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे. एकमेकांच्या वस्तू, रुमाल, टॉवेल, डोळय़ांच्या औषधांच्या बाटल्या वापरू नयेत. डोळय़ांची सतत स्वच्छता ठेवावी, पापणी चिकटू देऊ नये. लहान मुले, वृद्ध, आजारी माणसे यांची विशेष निगा म्हणून प्रतिबंधात्मक योग्य ती प्रतिजैविक औषधे सुरू करावीत. अस्थमा, ताप, एलर्जी आदी असणाऱ्यांनी तोंडावाटे घ्यायची औषधे सुरू करावीत. चष्मे, गॉगल्स स्वच्छ ठेवावेत. गरम वारा, दमणूक, प्रवास टाळावा. सतत हातांची स्वच्छता ठेवावी. शक्यतो हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी कोठेच हात लावू नये.
कारखाने, महाविद्यालये, पोहण्याचे तलाव, कार्यालये, कार्यक्रम हॉल येथे सार्वजनिक जबाबदारी म्हणून डोळे आलेल्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये, त्याचा कुणी राग मानू नये. डोळय़ांच्या रचनेत बदल किंवा दृष्टीत फरक वाटला तर दोन दिवसांहून जास्त काळ गुण न आल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सध्याच्या सुधारणेच्या युगात पटकन गुण येणारी, परिणामकारक प्रतिजैविकं थेंबाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. औषधांचे डोळय़ांवरही काही दुष्परिणाम होत नाहीत.  viral infection  साठी विविध परिणामांची सुसह्य़ वाटणारी स्टिरॉइड्स औषधेही बाटलीत मिळतात. या औषधांच्या बाटल्या हलक्या, वापराला सोप्या, टिकाऊ आहेत. पूरक उपाय म्हणून शारीरिक आजाराच्या गोळय़ाही पोटात घ्याव्यात. स्वच्छ पाण्याने सातत्याने डोळे स्वच्छ ठेवणे, डोळय़ांवरून आवरण असणे, ताण कमी ठेवणे याला अजून पर्याय नाही.
सुटीच्या उत्साहात, बाकी तब्येत ठणठणीत असताना अचानक डोळय़ांची साथ येऊन नियोजित कामावर विरजण पडणे हे टाळता येण्यासारखे आहे. जागरूक राहून वेळीच प्रतिबंधात्मक थेंब टाकावेत. डोळे येण्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय माहिती असणे, वेळोवेळी शाळा-कॉलेजमध्ये याची माहिती देणे यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये याची भीती रहाणार नाही. आणि निरोगी डोळे ठेवून उन्हाळा किंवा पावसाळा याचा आनंद लुटता येईल.   

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
side effects of vitamin B3
‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा