बुवा मनमोकळं हसले. म्हणाले, ‘साधी गोष्ट असते दादा, एकमेकांशी गोड बोलणं, कुणाला न दुखावणं. संक्रांतीचा दिवस खरं तर रोजच असला पाहिजे. जिथं आवश्यक तिथं स्पष्टपणा, परखडपणा ठीक, पण सतत कडवट बोलण्यानं माणसं दुखावतात.. दुरावतात!’
गेल्या १४ जानेवारीची गोष्ट. दुपारी साडेतीन-चारचा सुमार. मुंबईला जाणाऱ्या भोर-बोरीवली एशियाड बसमध्ये पुण्यात कोथरूडला आम्ही दोघं चढलो. तिकिटं, पैशांची देवाण-घेवाण झाल्यावर कंडक्टरनं खिशातनं एक प्लॅस्टिक पिशवी काढली, अन् आमच्या हातावर ‘हलवा’ ठेवत म्हणाला, ‘हं, हे घ्या. तीळगूळ घ्या गोड बोला!’ चेहऱ्यावर निर्मळ हास्य.
‘अरे वा.. खरंच की, आज मकरसंक्रांत..’
‘थांबा जरा..’ पत्नी म्हणाली, अन् तिने बॅगमधनं छोटय़ा डब्यातून तिळाच्या दोन वडय़ा कंडक्टरच्या हातावर ठेवीत म्हटलं, ‘तीळगूळ घ्या, गोड बोला.’
कंडक्टरचे डोळे आश्चर्यानं विस्फारले. ‘वहिनी, सकाळपास्नं मी प्रवाशांना हलवा देतोय! रिटर्न तीळगूळ देणारे तुम्ही पहिले. बरं वाटलं.’ दोन्ही वडय़ा प्लॅस्टिक पिशवीत ठेवत इतरांना तिकिटं द्यायला कंडक्टर पुढं सरसावला. डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, ओठावर तुकाराम बुवांसारख्या- खरं तर ‘संत तुकाराम’ सिनेमातल्या विष्णुपंत पागनीसांसारख्या मिशा, गळ्यात माळ.. माळकरी दिसतायत् ‘बुवा’. बस एक्स्प्रेस-वे ला लागली. घाट उतरून खालापूरला फूड मॉलला थांबली, तेव्हा पाय मोकळे करायला खाली उतरलो. आधीच खाली उतरून थांबलेले बुवा माझ्या बरोबरीने चालू लागले. तेव्हा युनिफॉर्मच्या पट्टीवरचं नाव वाचलं! तुकाराम पां. कोर्डे! गंमतच आहे.
‘आपण आपल्या सगळय़ा चांगल्या गोष्टी विसरत चाललो आहोत नाही?’ बुवा म्हणाले. ‘पण तुमचं कौतुक केलं पाहिजे. एसटीच्या रूक्ष कारभारांत प्रवाशांना तीळगूळ देणारे तुम्ही एकमेव असाल.. आपुलकीचा ओलावा निर्माण करणाऱ्याचं आडनाव मात्र कोरडे!’
क्षणभर प्रश्नार्थक चेहेरा करून नंतर बुवा मनमोकळं हसले. म्हणाले, ‘साधी गोष्ट असते दादा, एकमेकांशी गोड बोलणं, कुणाला न दुखावणं. संक्रातीचा दिवस खरं तर रोजच असला पाहिजे. जिथं आवश्यक तिथं स्पष्टपणा, परखडपणा ठीक, पण सतत कडवट बोलण्यानं माणसं दुखावतात.. दुरावतात!’
‘खरं आहे. आवश्यक तिथं रोखठोक बोलणारे तुकोबा देहूचे, तुम्ही कुठचे?’
‘तुकोबा देहूचा. देवमाणूस.. मी भोरचा भक्त!’ तत्परतेनं बुवांनी परतफेड केली, हसतच.
‘वा! हे उत्तम.. याच गाडीला असता ना नेहमी!’
‘आठवडय़ातून तीन दिवस. बाकी सातारा-कराडच्या बाजूला असते डय़ुटी.’
‘मग भेट होतच राहील आपली. माझीदेखील आठवडय़ाला पुण्याची चक्कर असते.’
पुन्हा भेट झाली तिनेक महिन्यांनी. पहाटेच्या पहिल्या बोरिवली-भोर एशियाडमध्ये. फारशी गर्दी नव्हतीच. मला चढताना पाहून बुवा म्हणाले, ‘बसा इथंच, पहिल्या सीटवर. मी आलोच तिकिटं देऊन.’
‘अरे वा. म्हणजे अजून ओळख आहे तर!’
‘तीळगूळ घ्या, गोड बोला..! बुवा हसत म्हणाले व कामाला लागले. नेरूळ-कळंबोलीला दोन-तीन प्रवासी चढले. हिशेब पूर्ण करून बुवा शेजारी येऊन बसले.
‘बोला, आता पुण्यापर्यंत निवांत.’
‘हे बरं झालं. पण पहाटे लवकर निघण्यामुळे झोप होत नसेल ना?’
‘तशी इथं मुंबईत झोप येतच नाही. काल दुपारी दीडला भोरहून निघालो.. आपण मागं भेटलो तीच ट्रीप.. आता घरीच जाऊन निवांत झोपायचं. आपलं घर ते आपलं घर!’
‘हे खरंच.. थोडीफार शेती-वाडी असेलच ना भोरला?’
‘थोडीच आहे, वाटण्या होऊन तुकडे पडलेली. नोकरीशिवाय भागणं कठीण. वडिलोपार्जित घर आहे. दूधदुभतं घरचंच. भाजीपाला घरचाच. घरच्या भुईमुगाच्या शेंगांचं तेल घाणीवर काढून आणायचं. थोडा फार गहू होतो. डाळी-बिळी तेवढय़ा विकत आणाव्या लागतात, पण शेतीचं आता काही खरं नाही. शेतीचं महत्त्वच कुणाला राहिलं नाही. पावसाचा भरवसा नाही. शेतीसाठी मजूर मिळत नाहीत. मजुरी देण्याएवढी आवक नाही.. कठीण परिस्थिती आहे गावाकडं!’
‘घरी कोण कोण असतं?’
‘आम्ही दोघं अन् मुली. एकूण तिघी. गेल्या मोसमात थोरलीचं लग्न झालं. पुण्याकडंच दिली. अजून दोघींची व्हायचीत. कॉलेजात शिकतायत. पोरी हुशार निघाल्या.. भरपूर शिकायचंय, लग्नाची घाई करू नका म्हणतात!’
‘शिकतायत तर शिकू द्या.. पण लग्नांचा घोर असणारच जीवाला.’
‘मी नाही घोर लावून घेत. एकीचं झालं, दुसरीचं होईल. नंतर तिसरीचा विचार. बायकोला म्हटलं, पोरींना शिकवू मस्त.. बाकी पांडुरंगावर सोडू. पटलं तिला.’
‘वारीला जाता वाटतं?’
‘दरवर्षी नाही जमत. सहकारी डय़ूटी सांभाळून घेतात तेव्हा जातो. अट्टहास नाही.. वारीत कुठं असतो भेदभाव, जात-पात, रंग आणि राव? एक गंमत सांगतो, गेल्या दिवाळीत दिवाळसणाला जावयाबरोबर त्यांचे बंधूदेखील आले होते. मुक्कामात एकदा म्हणाले, काका, तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार नाही.. शुभ-अशुभ दिशा, पॉझिटीव्ह-निगेटिव्ह एनर्जी अन् काय काय दगड, माती, धोंडे! जावयाचा भाऊ, मी काय बोलणार? मनाशी खूणगाठ बांधली, ७०-७५ वर्षे तिनेक पिढय़ांचं थंडी-वारा, ऊन-पाऊस यांपासून रक्षण करणारं मजबूत घर अशुभ कसं असेल? सूर्य तर आपल्या पृथ्वीची-जीवनाची ऊर्जा. त्याचं पूर्वेला उगवणं-पश्चिमेला मावळणं, वर्षांत विभागलेलं उत्तरायण-दक्षिणायन, हा जर निसर्गनियम असेल, तर दिशा शुभ-अशुभ कशा?
इतक्यात बोगदा लागला. बोगदा संपताना म्हटलं, ‘बोगद्या अखेरीस उजेड असला तरी पुरेसं आहे, नाही?’ बुवा हसले. गंभीर झाले. गाडी रुळावर आणण्यासाठी म्हटलं, ‘घराची देखील एक गंमत असते. दाग-दागिने, पैसा-अडका, धनसंपदेचं रक्षण करण्यासाठी कडय़ा-कोयंडे, कुलुपं, हल्ली तर इलेक्ट्रॉनिक उपकरणं- कॅमेरे. केवढा आटापीटा लागतो. पण ज्ञानसंपदेची चोरी होईल ही भीती असते कधी? मिळेल तेवढं ज्ञान कमीच. हे ज्ञान-विज्ञान चुकीच्या हाती पडलं, तर धोका, विनाश.. पण हा दोष त्या वृत्तीचा, ज्ञानाचा नव्हे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा दोष जसा वास्तूत नसतो, आपल्या वृत्ती-प्रवृत्तीत असतो. वास्तू शुद्धच असते, तसंच ज्ञानदेखील शुद्धच असतं!
‘म्हणून तर पोरींना शिकवायचंय. त्यासाठी कष्ट करायचे. लग्न कार्याच्या खर्चाची मी नाही चिंता करीत. पैसा केव्हाही अपुराच असतो. बायको दोन वर्षे सांधेदुखीमुळे त्रस्त आहे. गेल्या आठवडय़ात पुण्यात नेऊन एक्स-रे काढले बारा-पंधरा. दीड हजार रुपये खर्च आला. तिची तब्येत तर सुधारलीच पाहिजे.. पैशाला काय कशाही वाटा फुटतात!’
‘अन् वाटांना पैशांचे ‘टोल’ फुटतात.. आला तुमचा टोल-नाका.’ बुवा हसून उठले. टोल नाक्यानंतर फूड-मॉलला बस थांबली उतरल्यावर बुवांना म्हटलं, ‘चला सकाळचा चहा घेणार ना?’
‘चहा तर एरवीदेखील कटाप, बाहेर असताना.. बिनसाखरेचा चहा बनवावा लागतो.’
‘बिन साखरेचा चहा?’
‘तर हो! तसा मी जन्मजात श्रीमंत. मधुमेह.. कसं श्रीमंत नाव आहे नाही? मग साखर वाढून कसं चालेल?
‘तरीच साखरेचा हलवा वाटता इतरांना मकरसंक्रातीला, अन् म्हणता गोऽऽड बोला!’ बुवा मनापासून हसले. म्हणाले, ‘तब्येतीनुसार गोड खावं, पण नित्यनेमानं गोड बोलावं.. सगळ्यांच्याच तब्येतीला चांगलं.’ ‘तरीच त्यादिवशी संक्रांतीला तीळवडय़ा स्वत: न खाता पिशवीत ठेवून दिल्यात!’
‘त्या दोन्ही लेकींसाठी, त्यांना तीळवडय़ा प्रचंड आवडतात.’
‘त्या वडय़ा आम्हालादेखील आमच्या पुण्यातल्या लेकीनं दिल्या होत्या.’
‘भले! काय योग आहे. ही पोरींची माया!’
‘या गोडव्यानं मधुमेह कमी होतो.’ बुवांनी टाळी दिली.
पुण्याला उतरताना बुवांनी विचारलं, ‘परत भेट?’
‘भेटीचेदेखील योग असतात, तोवर मंत्र लक्षात ठेवतो, ‘गोऽऽड बोला!’
प्रभाकर बोकील -pbbokil@rediffmail.com