सत्याला ‘एक्स्पायरी डेट’ असू शकत नाही, हे अगदी मान्य आहे. पण हे सत्य सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या पुराव्यासाठी जेव्हा ‘एक्स्पायरी डेट’ सक्तीची ठरते, तेव्हा मात्र कायद्याच्या परिपूर्णतेची गरज अधोरेखित होतेच, पण न्याय मिळण्याबाबतीतही प्रश्नचिन्ह उभे राहते. सध्या अमेरिकेत बिल कोस्बी हा विषय एखाद्या लाव्ह्य़ासारखा उसळतोय..
बील कोस्बी, टेलिव्हिजनचा एके काळचा ‘अमेरिकन डॅडी’. प्रचंड यशस्वी, लोकप्रिय माणूस, गेली पन्नास वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर. स्टँडिंग कॉमेडीचा बादशहा, दूरचित्रवाणीवर अनेक वर्षे सातत्याने चालणाऱ्या मालिकांचा सर्वेसर्वा. ‘चाइल्डडूड’, ‘फादरहूड’ आदी लोकप्रिय पुस्तकांचा लेखक, सरकारचा प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम’ पुरस्कार मिळवणारा..पण आज वयाच्या ७८ व्या वर्षी बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या आरोपांमुळे लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह टाकून स्वत:ला सावरायचा .. सत्याआड लपायचा प्रयत्न करतो आहे..
आज त्याच्या विरोधात थोडय़ाथोडक्या नाहीत ४६ स्त्रिया पुढे आल्या आहेत. प्रत्येकीकडे त्याच्या या काळ्या कृत्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कथा आहेत. दहा वर्षांपूर्वी एकीने, अ‍ॅन्ड्रियाने त्याला न्यायालयात खेचलं खरं पण ही केस पैशाच्या जोरावर गाडून टाकण्यात आली. मात्र हळूहळू एकेकीने धाडस एकवटत पुढे यायला सुरुवात केली आणि २०१४ पासून १० नंतर २० नंतर ४० स्त्रिया त्याच्या विरोधात उभ्या राहिल्या. आज या सगळ्या जणींची वयं आहेत, ३० ते थेट ८० पर्यंतची. वयाच्या १७, १८, १९ व्या वर्षी ग्लॅमरचं आकर्षण व टीव्हीच्या आणि चंदेरी दुनियेत काम करण्याची स्वप्नं डोळ्यात घेऊन त्या त्याच्याकडे आलेल्या. कोणी मॉडेल, कोणी अभिनेत्री, कोणी लेखिका तर कोणी बॅक स्टेजला काम करणारी. बिल कोस्बीसारख्या माणसाकडे आपल्याला काही शिकायला मिळतंय, तो आपला मेन्टॉर होऊ पाहतोय या कल्पनेनेच हुरळून गेल्या. बिनदिक्कत तो म्हणाला तिथे गेल्या. सुरुवातीला कामं झालीही, पण मग बंगल्यावर नेणं, ड्रिंक्स ऑफर करणं, ते घेतल्यावर हळूहळू शुद्ध हरवणं आणि शुद्धीवर आल्यावर आपल्या बाबतीत काय झालंय याचं भान येईपर्यंत सगळं संपलेलं असायचं. त्याने सगळं ओरबाडून घेतलेलं असायचं. त्यांच्या हाती त्रागा करण्यापलीकडे काहीच उरलेलं नसायचं. अशा एक दोन नाही तब्बल ४६ जणी. अर्थात ज्यांना हे काहीही आठवायचंही नाही, यावर काहीही बोलायचं नाही अशा कितीतरी जणी अद्याप पडद्यामागेच आहेत.
बार्बरा म्हणते, ‘‘१७ वर्षांची होते मी त्या वेळी. कोण ऐकणार होतं माझं? बिल त्या वेळी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होता.’’ पण तिचं इथेच चुकलं. तिच्यासारख्या अनेकजणी गप्प राहिल्या आणि याचं फावत गेलं. बार्बरासारख्या तरुणींची चूक किती जणांचं आयुष्य फरफटवणारी होती हे त्यांना कळलं जेव्हा ‘न्यूयॉर्क मॅगझिन’ने त्यांना एकत्र आणलं. जुलै-ऑगस्ट महिन्यातल्या या अंकात त्यांनी कव्हरपेज इतकं भन्नाट केलंय की फोटो काय करून जातो याची प्रचीती येते. या अंकाच्या कव्हरवर (सोबतच्या छायाचित्रातील) कोस्बी – द वूमन – ‘अ‍ॅन अनवॉन्टेड सिस्टरहूड’ या शीर्षकांतर्गत बिलवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या ३५ जणींचे फोटो आहेत, खुर्चीवर बसलेले, एकसारखे. आणि शेवटची खुर्ची मात्र रिकामी ठेवण्यात आलेली आहे.. यापुढेही कुणाला आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायचा असेल तर तिने पुढे यावं हे सांगणारी. या अंकात या ३५ जणींचे अनुभव आहेत. काहींच्या मुलाखतीही ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्या ऐकताना जाणवतं की आजही त्यांच्या मनात तो किळसवाणा अनुभव तसाच्या तसा घट्ट रुतून बसलाय. ती कटुता, ती सल घेऊन त्या इतकी वर्षे जगताहेत.
बिलविरुद्ध तक्रार करणाऱ्या ४६ पैकी ३५ जणींनीही आपले फोटो काढायला या मासिकाला परवानगी दिली. या लेखाच्या आणि फोटो शूटच्या दरम्यान या सगळ्या जणी जेव्हा एकत्र आल्या, तेव्हा आपल्यासारख्या अनेकजणी आहेत. त्यांचेही अनुभव तसेच जीवघेणे, किळसवाणे आहेत. हे ऐकून अनेकींनी आपण मुक्त झाल्याची भावना व्यक्त केली, कारण पहिल्यांदाच त्या कोणाकडे तरी व्यक्त होत होत्या. त्या जवळ आल्या खऱ्या, पण ते होतं नको असणारं ‘सिस्टरहूड’!
पण मूळ मुद्दा राहतोच आहे. इतक्या जणींनी थेट आरोप करूनही बिल कोस्बीला अद्याप अटक का होऊ शकलेली नाही? (निदान हा लेख पूर्ण होईपर्यंत तरी तशी बातमी नाही.) याचं कारण कायद्यातली त्यांनी शोधलेली पळवाट. खरंतर २००५ ला अ‍ॅन्ड्रियाने त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्याने आपल्या अ‍ॅटर्नीच्या मार्फत ज्यांच्याबरोबर मला सेक्स करायचा होता त्यासाठी ‘क्वालूड्स’ हे सिडेटिव्ह वापरल्याचं मान्यही केलं. मात्र ते सगळं त्यांच्या परवानगीने, त्यामुळे मी गुन्हेगार ठरतच नाही, असा दावा केला. अनेकींनी त्याचा हा दावा ठामपणे फेटाळून लावला. आपल्या बायकोपर्यंत ही गोष्ट जाऊ नये म्हणून एकीला एका कंपनीमार्फत ५ हजार डॉलर्स दिल्याचंही नंतर सिद्ध झालं, तरीही या संपूर्ण प्रकरणात काळाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या घटना घडल्या आहेत १९७०, ८०, ९० च्या दशकात. एखादा गुन्हा सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काळाची एक चौकट कायद्याने आखलेली आहे. तीही वेगवेगळ्या राज्यांतल्या वेगवेगळ्या कायद्यांनुसार आणि त्यानुसार हा तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा काळ फारच दूरचा आहे ‘एक्स्पायर’ झालेला. तेव्हाचे कोणते पुरावे ग्राह्य़ मानणार?
अर्थात कायद्यातल्या पळवाटा शोधणारे जसे आहेत तसे त्यातले दुवे शोधणारेही असतातच त्यानुसार बिल कोस्बी या माणसाला शिक्षा होईलच. सध्या तरी या ४६ जणींचं ठामपणे एकत्र असणं हेच या लैंगिक शोषणाविरुद्धचं मोठं शस्त्र आहे.

ते पाच दिवस..  

रस्त्यावर, तेही घराविना राहणाऱ्या बाईचं दर मासिक पाळीत काय होत असेल? हा एकच विचार सानया मसूद आणि सोफी हेरॉल्ड या दोन मैत्रिणींना अस्वस्थ करून गेला आणि त्यांनी सुरू केली एक मोहीम, या स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पून पुरवण्याची!

या दोघी इंग्लंडमधल्या. ‘द होमलेस पिरिएड’ या मोहिमेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मासिक पाळीविषयी जो टॅबू लोकांच्या मनात आहे तो दूर करणं आणि त्यांच्या परिसरातील स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठी या लोकांनी पुढे यावं यासाठी जगजागृती करणं हा या मोहिमेचा उद्देश. त्या अंतर्गत सरकारने या स्त्रियांसाठी मोफत नॅपकिन्स पुरवावेत किंवा त्यांच्यावरचा कर कमी करून कमी दरात ते उपलब्ध द्यावेत यासाठी सह्य़ांची मोहीमही राबविण्यात आली. ज्यावर एक लाख लोकांनी सह्य़ाही केल्यात. मात्र सानया आणि तिची मैत्रीण सोफिया यांनी प्रत्यक्ष कामालाच सुरुवात केली. अर्थात सुरुवातीला त्यांना कळलं की रस्त्यावर फक्त पुरुषच राहतात. स्त्रिया नाहीत. पण त्यांनी असा परिसर शोधून काढला जिथे रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया सापडल्या काही हजार स्त्रिया. तो होता लिव्हरपूल शेल्टर.
त्यांनी आपल्या मित्रमंडळींना, ओळखीच्या लोकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि बघता बघता लोकांनी त्यांना असे सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स पाठवायला सुरुवात केली. आणि गेल्या महिनाभरात त्यांच्याकडे असे १०० बॉक्स जमले आहेत. आपल्या फेसबुक पेजवरून त्या जास्तीतजास्त लोकांना या मोहिमेकडे आकर्षित करत आहेत. सोफीच्या म्हणण्यानुसार हा स्त्रीच्या स्वच्छतेचा, आरोग्याचा प्रश्न तर आहेच, पण प्रतिष्ठेचा जास्त आहे. सरकारने त्यांना मोफत कंडोमप्रमाणे ही सुविधा पुरवली पाहिजे.
आपल्यासाठी श्रीमंत असलेल्या इंग्लंडमधल्या रस्त्यावर राहणाऱ्या ‘काही’ स्त्रियांसाठी अशी मोहीम राबवली जाते तर मग आपल्या भारतातल्या आपल्या बायकांचं काय? गरिबीतच नव्हे तर दारिद्रय़ रेषेही खाली राहणाऱ्या आमच्या २७ कोटी माताभगिनींचं काय? एका आयुष्यात सुमारे तीस वर्षे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या त्या पाच दिवसांत काय होत असेल त्यांचं? कसं सांभाळत असतील त्या आपलं आरोग्य आणि आपली प्रतिष्ठा? काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी? कोण असतील आपल्याकडच्या सानया आणि सोफी?
arati.kadam@expressindia.com