आजारी, लहान मुलं आणि इतरांच्याही आरोग्यासाठी मोड आलेले मूग हे उत्तम समजले जातात. मुगाचं सूप, उसळ किंवा कच्चेच सॅलडमध्ये घालून खाल्ले तरी चालतात. कमी कॅलरीयुक्त असूनही भरपूर प्रथिने आणि शरीराला आवश्यक असा चोथा यात असतो. वजन कमी करण्यासाठी मुगाचा उपयोग होतो.
मूग-दलिया यांचे अप्पे
साहित्य: एक वाटी मोड आलेले मूग, अर्धी वाटी दलिया, एक मोठा चमचा आलं मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरं, चार लसूण पाकळ्या बारीक चिरून, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीला मीठ, साखर, एक मोठा चमचा लिंबाचा रस, एक चमचा इनोज फ्रूट सॉल्ट, तेल
कृती: दलिया दोन तास कोमट पाण्यात भिजत घालावा. दलियातील पाणी काढावं. मूग, दलिया, आलं-मिरचीचे तुकडे, जिरं मिसळून मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. नंतर त्यात मीठ, साखर, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, लिंबाचा रस मिसळावा.
नॉन स्टीक आप्पेपात्र तापत ठेवावं, मूग-दलियाच्या मिश्रणात इनोज घालून फेसून वर दोन चार चमचे पाणी घालावं आणि प्रत्येक खळग्यात तो अर्धा भरेल एवढं पीठ घालून पोकळ झाकण ठेवावं. २-३ मिनिटात अप्पे उलटावे. दुसरी बाजू झाली की बाहेर काढावे.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com