गव्हाबरोबरच मकाही जगात मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो. आपल्याकडे जरी तो फक्त पांढऱ्या आणि पिवळा रंगात मिळत असला तरी इतरत्र निळा, जांभळा, काळा, लाल अशा विविध रंगांत आढळतो. या मक्याच्या दाण्यांत वेगवेगळी अ‍ॅन्टिऑक्सीडन्टस असतात. ताजी मक्याची कणसं, मक्याचं पीठ यापासून विविध पदार्थ केले जातात. पॉपकॉर्न किंवा ताजे मक्याचे दाणे चावून खाल्लय़ामुळे त्यातला चोथा पचनक्रियेला मदत करतो आणि आतडय़ाच्या कर्करोगाचा धोका कमी करतो. शिवाय मक्यात जीवनसत्त्व अ, ब६, ब१२, ई आणि थायमिन, नायसिन तसेच खनिजेही आहेत. पंजाबातली मकईची रोटी आणि मेक्सिकन टॉर्टिया प्रसिद्ध आहेत. शिवाय ते पौष्टिकही आहेत.
मका-अननस शिरा
साहित्य: मक्याच्या कणसाचा कीस दीड वाटी, १ वाटी अननसाचा कीस, १/४ वाटी रवा, पाऊण वाटी साखर, २ मोठे चमचे तूप, चवीला मीठ, सजावटीसाठी बदामाचे काप.
कृती: रवा कोरडा खमंग भाजून घ्यावा. तूप तापवून त्यात मक्याचा कीस घालून परतावा. मग त्यात रवा आणि अननसाचा कीस घालून परतावे, रवा शिजला की, साखर आणि मीठ घालून परतावे, साखर विरघळून मिश्रण घट्ट झाले की, बदामाचे काप घालावेत.