‘क्षमा’ करणं फक्त शरीर-मनाला स्वस्थ करतं असं नाही तर निकटच्या नात्यांमधील तीव्र संघर्ष ‘दुरुस्त’ करणारं ते एक प्रभावी साधन आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आपली जी ऊर्जा खर्च होते आणि गैरसमजांचे डोंगर उभे राहतात ते ‘क्षमे’च्या एका फटकाऱ्यानं नेस्तनाबूत होऊ शकतात.
सध्या दूरचित्रवाणीवर गाजणाऱ्या एका कुटुंबकथेमध्ये एका स्त्री-पात्राच्या तोंडी सारखं एक वाक्य ऐकू येतं..‘ xxx कारणासाठी xxx ला मी या जन्मात cr02कधीही माफ करणार नाही!’ जवळजवळ प्रत्येक दिवशीच्या प्रसंगांत एकदा तरी ती हे वाक्य तारस्वरात म्हणते. ते पाहताना माझ्या मनात नेहमी येतं, की खरंच प्रत्यक्षात जर अशी कुणी व्यक्ती असेल तर दुसऱ्यांच्या वागण्याची अशी भारंभार ओझी स्वत:च्याच मनावर लादल्यामुळे त्या व्यक्तीचं किती नुकसान होत असेल! जणू काही एखाद्या डबक्यात पाणी साठून राहावं, त्यात सारखा पालापाचोळा पडून पडून ते अजून घाण बनावं, कालांतरानं त्यावर बुरशीचा तवंग पसरून त्या पाण्याला असह्य़ वास यावा तसं काही तरी घडत असावं. त्याउलट जे पाणी वाहतं, खळखळतं आहे, त्यात कितीही पाचोळा पडो, तो झटदिशी वाहून कुठल्या तरी किनाऱ्यावर पसरत जाईल असं वाटतं.
आयुष्यात अनेकदा कुणाकडून तरी जाणता-अजाणता आपण दुखावले जात असतो, चिडीला येत असतो. कुणी आपल्या अपेक्षांना डावलून जातं तर कुणी माहीत असल्या-नसलेल्या कारणासाठी आपल्यापासून दूर जात असतं. कुणी शब्दांनी वार करतं, तर कुणी कृतीनं जखमी करतं. अशा जखमा कायम उघडय़ा-भळभळत-दुखऱ्या ठेवण्याचा हुकमी रस्ता म्हणजे ‘मी तुला कधीही माफ करणार नाही’ असं आळवून आळवून म्हणणं.
सोडून देणं (लेट गो), क्षमा करता येणं हा आश्वासक मानसशास्त्रातील एक महत्त्वाचा पैलू आहे. खरं तर आपल्या संस्कृतीमध्येही ‘क्षमे’चा केवढा गौरव केला आहे. साधं सकाळी उठून जमिनीला पाय लावायचा असला तरी आपण ‘क्षमस्व मे’ म्हणावं असं मनावर बिंबलेलं असतं. क्षमा मागणं जितकं आपल्याला प्रगल्भ बनवतं त्यापेक्षा किती तरी जास्त जाण क्षमा करण्यामुळे येत असते हे बऱ्याचदा आपण लक्षातच घेत नाही.
किती छोटय़ा-छोटय़ा कटू आठवणींना आपण कुरवाळत बसतो! विणाला लग्न झाल्या झाल्या तिच्या सासूनं सांगितलं, ‘तू नोकरी करणार ना मग घरातल्या गोष्टीत फार लक्ष घालायचं नाही. मी खंबीर आहे सगळं करायला!’ ते वाक्य विणाच्या मनात असं काही रुतून बसलं की नंतर दुर्दैवाने सासूला अर्धागवायूचा झटका येऊन त्यांची शुश्रूषा करायची वेळ आली तेव्हाही प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे वीणा त्यांना त्या वाक्याची आठवण करून द्यायची आणि भरतवाक्य म्हणायची, ‘आता कोण खंबीर आहे ते कळेलच!’ आता खरं तर हे म्हणून काय साधणार होतं? तिचं ‘करणं’ मात्र वेगळय़ा नजरेतून बघितलं जायला लागलं. तिच्या मनातली अढी शेवटपर्यंत दूर झाली नाहीच पण, इतरांच्या मनात नवीन अढय़ा तयार व्हायला लागल्या.
विजयचं आणि नरेशचे ऑफिसमध्ये एका डीलवरून चांगलंच वाजलं. दोघांनाही कंपनीचं भलंच करायचं होतं, पण आपापल्या पद्धतीनं! बॉसला विजयचं म्हणणं पटलं आणि नरेशला ते ऐकावं लागलं. याचा इतका राग त्याच्या मनात साठून राहिला की पुढचं वर्षभर तो विजयशी चकार शब्द बोलला नाही. एके काळी कंपनीतले जिवलग मित्र असलेले विजय आणि नरेश मनानं काही योजनं लांब गेले. ‘विजयनंच बॉसला फितवलं. मी त्याला कधीही माफ करणार नाही.’ असा नरेशचा घोष मनातल्या मनात चालू राहिला. विजयला तर दु:ख झालंच पण नरेशनंही या निमित्तानं मायग्रेन (तीव्र डोकेदुखी) आणि रक्तदाब हे दोन मित्र मिळवले.
आपण काही जणांकडून अजाणता दुखावले जातो तर काही जण मुद्दामही दुखावणारं वागणं करतात. हेतू कसाही असो, कधी तरी याची बोचणी मनाला खातेच! अशा वेळी समोरच्यानं (आपण) जर ‘लेट गो’ केलेलं असेल तर माणूस किती निश्चिंत होतो. नातं पुन्हा नव्याने उभारण्याची एक उभारी येते. नाही तर चरत जाणाऱ्या जखमेसारखी एक वेदना आयुष्यभर मनाला वेढून राहते.
संशोधन सांगतं की पुष्कळदा, अयशस्वी, वेदनादायी नात्यांमध्ये (विशेषत: पती-पत्नींच्या) ‘क्षमे’चा अभाव असतो. इथे ‘क्षमा’ म्हणजे नुसती स्वत:ची समजूत घालणे (जाऊ दे! काय फरक पडणार आता!) वेगळा अर्थ काढणे (त्याला असं म्हणायचंच नसेल)- घटना नाकारणं (असं खरं तर घडलेलंच नाही!) विसरून जाण्याचा प्रयत्न करणं (हे मला विसरायला हवं..) यातलं काहीही नाही. यापेक्षा खूप वेगळं आहे.
खऱ्याखुऱ्या क्षमतेमध्ये अगतिकता नाही तर सहभावना करुणा असायला हवी. अर्थात, ही एक हळूहळू विकसित होणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी मनाला त्यातला निश्चितपणा पटायला हवा. अदितीला प्रथमपासूनच आई आपल्यात आणि मोठय़ा बहिणीत फरक करते असं वाटायचं. लग्नाच्या वेळी तिला आईचा एक नेकलेस हवा होता पण आईनं तेव्हा तो तिला न देता बहिणीला दिला याचं दु:ख आणि राग किती तरी र्वष तिच्या मनात दबा धरून बसला होता. आईनं तिचे सगळे सणवार/ बाळंतपणं खूप लाडानं, प्रेमानं केली, पण प्रत्येक वेळी तिला वाटायचं, एवढं करते, मग तो साधा नेकलेस द्यायला काय झालं होतं?’ आणि आईसाठी जिभेवर आलेले प्रेमाचे शब्द परत मागे जायचे. एक प्रकारचा कडवटपणा मागे रेंगाळत राहायचा. तिच्याकडेच यायला निघाली असताना हृदयविकाराचा झटका येऊन आई अचानक आयुष्यातून निघून गेली आणि मग मात्र अदितीला आपल्या रागामधला निर्थकपणा कळायला लागला. आधी तो राग आणि नंतर त्याबद्दलचा अपराधीपणा या भावनांनी तिचं मन उबून गेलं. नैराश्याचे झटके यायला लागले. एका छोटय़ाशा अळीचं रूपांतर ‘तक्षक’ नागात झालं होतं. केवळ वेळेवर ‘क्षमा’  करून न टाकल्यामुळे केवढं नुकसान झालं! तिचं आणि आईचंही!
केवळ कर्तव्य किंवा नाइलाजानं नव्हे तर मनापासून ‘क्षमा’ करण्याचे किती तरी छोटे पण नित्य होणारे आश्वासक परिणाम संशोधकांना सापडले आहेत. ‘क्षमे’च्या अभावामुळे ज्या तीव्र भावनांची मनात गर्दी होते त्या हृदयविकारामध्ये मोठा वाटा उचलत असतात, अशा वेळी ‘क्षमे’चा उतारा त्या विषाचं अमृत बनवू शकतो. कॉलेजमध्ये केलेल्या एका प्रयोगात काही विद्यार्थ्यांना आयुष्यातील खरोखर घडलेल्या नकोशा प्रसंगाबाबतचं ‘क्षमे’च्या प्रसंगाचं कल्पनाचित्र रंगवायला सांगितलं तर काहींना ती वेदनादायक आठवण पुन:पुन्हा उगाळून कधी कधी माफ न करण्याचा मंत्र आळवायला लावला. पहिल्या गटातल्या मुलांना ज्यानं त्रास दिला त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, अशी वर्णनंही सांगितली. त्यानंतर शरीरातील घडलेले बदल तपासले तेव्हा गट दोनमध्ये हृदयगतीतील बदल खूप तीव्र झालेले आढळले, इतकंच नाही तर त्वचेची विद्युतवहनाची क्षमता (थोडक्यात घामाघूम होणं) वाढलेली दिसली, राग, दु:ख या भावना अनुभवण्यात आलेल्या दिसल्या. पहिल्या गटाच्या बाबतीत मात्र अगदी उलट (सुखद-आश्वासक) चित्र दिसलं.
‘क्षमा’ करणं फक्त शरीर-मनाला स्वस्थ करतं असं नाही तर निकटच्या नात्यांमधील तीव्र संघर्ष ‘दुरुस्त’ करणारं ते एक प्रभावी साधन आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आपली जी ऊर्जा खर्च होते आणि गैरसमजांचे डोंगर उभे राहतात ते ‘क्षमे’च्या एका फटकाऱ्यानं नेस्तनाबूत होऊ शकतात. कुठल्याही समारंभ/ घरगुती कार्यक्रमांमध्ये ‘मी ७७७ ला कसं माफ केलेलं नाही/ करणार नाही’ याची ‘रागदारी’ आळवण्यापेक्षा त्या ‘७७७ ला’ एक खुलं-मोकळं हसू बहाल करता आलं तर आपल्या बाजूने निम्मा पहाड कोसळणारच ना? पण मनात तशी विनापरताव्याची तयारी मात्र पाहिजे. नाही तर ‘पहले आप-पहले आप’ म्हणत आपण ‘क्षमे’चं स्टेशन कायम पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरच पाहू!
वाटतं तितकं हे सोपं नाही कबूल, पण आपल्याच चित्तशुद्धीसाठी छान वाटण्यासाठी मनातला हा सगळा मळ (नावडता नवरा/ बायको/ मित्र/ मैत्रीण/ सासू/ सासरे/ आई/ वडील/ भावंड/ बॉस/ सहकारी यांच्याबद्दलचा) धुवून काढला तर? ज्या निरागसतेनं छोटी मुलं आपल्या आई-बाबांना त्यांच्याकडून जाणता-अजाणता घडलेल्या चुकांसाठी माफ करतात, ती आपण थोडी तरी जपली तर? ‘भले बुरे जे घडून गेले.. विसरूनी जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर.. असं आपण कुठल्याही वयात, कुठल्याही नात्याबद्दल म्हणू शकतो आणि आपलं जगणं अधिकाधिक आश्वासक बनवू शकतो, नाही का?
anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…