भारतीयांमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे, त्यात तरुणांची वाढती संख्या कळीचा मुद्दा आहे. तरुणाईला भेडसावणाऱ्या नैराश्य, एकटेपणा या समस्यांवर काम करत, तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मोहीम उघडणाऱ्या रिचा सिंग हिच्या ‘युवर दोस्त’ या उपक्रमाविषयी..
आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वानाच ताण-तणावाला सामोरं जावं लागतं. अनेकदा हा ताण असह्य़ होऊन अनेक जण व्यसनाधीनतेकडे वळतात किंवा आयुष्यच संपवण्याचा प्रयत्न करतात. अभ्यास, करिअर, घरच्यांच्या अपेक्षा किंवा नात्यांमधील समस्या यामुळे आजची बहुसंख्य तरुणाई तर प्रचंड मानसिक तणावाखाली जगते आहे. हाती पैसा असला तरी त्यांना जाणवणारा एकटेपणा इतका वाढतो आहे की थेट आत्महत्या करण्यापर्यंत पाऊल उचललं जातं. अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनी दुखावलेल्या, असहाय्य झालेल्या तरुणांना थांबवायला हवं, त्यांच्यात आशावाद जागवावा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या या मानसिक अवस्थेमागची नेमकी कारणं समजून घ्यावीत, या उद्देशाने भोपाळच्या रिचा सिंग या तरुणीने पुढाकार घेतला.
रिचा सिंग एक आयआयटीची विद्यार्थिनी. प्रखर बुद्धिमत्तेची संवेदनशील मुलगी. रिचाने २००९ मध्ये गुवाहाटी येथून तिचं शिक्षण पूर्ण केलं. आयआयटीमध्ये शिकत असताना एका घटनेनं तिला हेलावून सोडलं. तरुणांना जाणवणाऱ्या तणावाविषयी ठोस विचार करायला भाग पाडलं. तिच्या हॉस्टेलमध्ये दोन खोल्यांपलीकडे राहणाऱ्या तिच्या आयआयटीमधील एका मुलीनं आत्महत्या केली. कँटिनमध्ये, लायब्ररीमध्ये भेटणारी ही मुलगी इतकी अस्वस्थ होती, याची साधी कल्पनाही कुणाला आली नाही. हॉस्टेलमध्ये अनेकदा भेटणाऱ्या त्या मुलीच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू असू शकतील याची सुगावाही कुणाला लागला नाही. किती अदृश्य भिंती उभ्या आहेत, आपल्या सगळ्यांमध्ये? विशेष म्हणजे त्यांच्या आयआयटीमध्ये ‘समुपदेशन कक्ष’ कार्यरत होता. त्यांचीही मदत त्या मुलीने घेतली नाही. रिचाला या घटनेने अंतर्बाह्य़ धक्का बसला आणि तरुणाईच्या या समस्येवर काम करण्यासाठी तिला भाग पाडलं.
वेळेच्या अभावामुळे, हरवत चाललेल्या संवादामुळे आजची तरुण पिढी मनातल्या गोष्टी अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू शकत नाही. बऱ्याचदा घरातून वेगवेगळ्या कारणांसाठी जाणवणारा दबाव, अभ्यासातील पिछेहाट, प्रेमप्रकरणं, पैशांची नड अशा अनेक कारणांमुळे वैफल्य येतं. जर एखादा जवळचा, विश्वासाचा आणि समजून घेणारा मित्र असेल तर बऱ्याचदा त्याच्याजवळ मन मोकळं केलं की खूप हलकं वाटतं. त्यातून जर तो मित्र योग्य शब्दांत आपल्याला समजावून देऊन वाईट विचारांपासून परावृत्त करू शकला तर आयुष्य सुसह्य़ आणि आनंददायी नक्कीच बनू शकतं. पण स्पर्धेमुळे वा आधीच्या वाईट अनुभवांमुळे तरुणांना कुणाविषयीच असा निखळ विश्वास वाटत नाही. हेच ओळखून रिचाने तरुण पिढीचा मित्र होण्याचं ठरवलं. त्यातूनच आकाराला आली ‘युवर दोस्त’ ही वेबसाइट. ‘युवर दोस्त’ म्हणजे भावनिक आधार देणारी, विश्वासार्ह व वाट्टेल तेव्हा मदतीला धावून येणारी यंत्रणा असंही म्हणता येईल.
पण विचार आला आणि ही वेबसाइट सुरू झाली इतका हा प्रवास सोपा नव्हता. तब्बल पाच र्वष मध्ये जावी लागली. रिचा २००९ मध्ये आयआयटीमधून बाहेर पडल्यानंतर तिने अनेक कंपन्यांमध्ये हैदराबाद, बंगळुरू येथे विविध पदांवर काम केलं. कंपनीची विविध उत्पादनं, उत्पादनांविषयीची योजना, त्याचं डिझाइन असं तिच्या कामाचं स्वरूप असे. नोव्हेंबर २०१४ ला ‘युवर दोस्त’ची स्थापना करीपर्यंत ती ‘सीनिअर प्रॉडक्ट मॅनेजर’ म्हणून कार्यरत होती. या कामादरम्यान तिच्या मनात आयआयटीमध्ये रुजलेल्या तरुणांच्या समस्यांचा विचार आणि त्यावर काही तरी उपाय शोधण्याचे विचार मात्र सुरूच होते. या कालावधीत ती ज्या ज्या शहरांमध्ये काम करत होती तिथल्या अनेक मानसोपचारतज्ज्ञांना तिने भेट दिली. त्यांच्याकडे येणारे तरुण, त्यांच्या समस्या, त्यांचे तणाव यावर त्या तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय याची तिने माहिती घेतली, चर्चा केली. त्या समस्या, त्यांचे उपाय तिने ब्लॉगद्वारे मांडण्यास सुरुवात केली. अर्थात ते तिच्या शब्दांमध्ये. त्यात कोणत्याही वैद्यकीय शब्दांचा वापर नव्हता की अवघड भाषा. अगदी सोप्या शब्दांत तिने लिहिलेल्या ब्लॉगला फारच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच मग अशा प्रकारची वेबसाइट तयार करण्याची कल्पना रिचाला सुचली. त्यापूर्वी तिने आणि तिच्या मित्रांनी बिझनेस फोरममध्येही ही संकल्पना मांडण्याच्या प्रयत्न केला होता. पण त्या वेळी काम झालं नाही. पण वेबसाइटची कल्पना सुचल्यावर, त्या दिशेने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. सध्या बंगळुरूमधून त्यांची टीम ‘युवर दोस्त’चं काम पाहते आहे.
‘युवर दोस्त’ या वेबसाइटवर कोणीही तरुण त्यांना तणाव देणाऱ्या समस्या मांडून मन मोकळं करू शकतो. त्यासाठी वेबसाइटवर कोणत्याही नावाने तुम्ही ‘लॉग इन’ करून चॅट करू शकता. तुमचं खरं नाव देण्याची अजिबात गरज नाही. तुमच्याशी तेथील ‘स्पेशल फ्रेंड’ चॅट करून तुमचा ताण हलका करण्याचा प्रयत्न करतात. ‘युवर दोस्त’च्या टीममधील बहुतांश सदस्य हे मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञ आहेत. शिवाय इतर व्यवसायांतील किंवा उच्च शिक्षण घेत असलेले तरुण-तरुणीही ‘युवर दोस्त’चे सदस्य आहेत. वेबसाइटवर अनेक महत्त्वाच्या परंतु परिस्थितीशी झगडून मोठय़ा झालेल्या व्यक्तींचे विचार, लेख, ब्लॉग आहेत. तसेच येथे वेगवेगळ्या विषयांवर, समस्यांवर खुली चर्चाही केली जाते.
रिचा म्हणते, आव्हानात्मक काम आणि अवघड समस्या मला नेहमीच प्रेरणा देतात. अवघड समस्या सोडवायला आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी सोप्प्यात सोप्पा उपाय कुठला असेल, यावर विचार करण्यात मी तासन् तास खर्ची घालते. ही वैचारिक प्रक्रिया मी खूप एन्जॉय करते. माझे तंत्रज्ञानाविषयीचं ज्ञान वापरून तरुणांना तणावाला सामोरं जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ‘सपोर्ट सिस्टीम’ निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘युवर दोस्त’तर्फे तरुणाईच्या समस्या ज्या पद्धतीने हाताळल्या जातात, त्याला प्राथमिक पातळीवर तरी शास्त्रशुद्ध समुपदेशन असं म्हणता येणार नाही. कारण मन मोकळं करण्यासाठी मित्राइतकं जवळचं कोणी असू शकत नाही. त्यामुळे एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारून, त्याला ‘मन की बात’ सांगून मन मोकळं करणं हेच ‘युवर दोस्त’चं प्राथमिक स्वरूप आहे.
आणि हेच या वेबसाइटचं वैशिष्टय़सुद्धा म्हणावं लागेल. कारण तुमची समस्या तुमच्या भाषेत तुम्ही मांडू शकता, तुमची खरी ओळख, राहण्याचं ठिकाण वगैरे कोणतीही माहिती ‘युवर दोस्त’ मागत नाही. त्यामुळे औपचारिकतेच्या सगळ्या भिंती गळून जातात व तरुणांना ही साइट त्यांची वाटते. ‘युवर दोस्त’च्या प्रत्येक टीम मेंबर (स्पेशल फ्रेंड)ना मानसशास्त्र तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिलं जातं. उच्च शिक्षण घेतलेले हे सदस्य त्या त्या तरुणांचे ताण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात व त्यांना योग्य मार्गदर्शनही करतात, शेवटी कुणाचं तरी आयुष्य आपल्या हातात आहे, याचं गांभीर्य आम्ही कधीच विसरत नाही, असं रिचा सांगते.
‘युवर दोस्त’वर आतापर्यंत जवळपास ४,६०० जणांनी आपल्या समस्यांबाबत चर्चा केली आहे. तर प्रत्येक महिन्याला साधारणत १० ते ११ हजार जण भेट देतात. ब्लॉगवाचन, चर्चामध्ये सहभाग, संदेश लिहिणं अशा स्वरूपात त्यांचा सहभाग असतो. त्यात दर महिन्याला ३० टक्के नवीन लोकांची भर पडते आहे. रिचा सांगते, या सर्व प्रक्रियेत महत्त्वाची आहे ती विश्वासार्हता. ‘युवर दोस्त’वर व्यक्त होणाऱ्यांना त्यांची ओळख, त्यांच्या समस्यांची वाच्यता होणार नाही, याची खात्री येथे दिली जाते. दुसऱ्यांचे चॅट तुम्हाला वाचता येत नाहीत व तुमचे चॅटही गुप्त ठेवले जातात. हे आमचं ब्रीद आम्ही काटेकोरपणे पाळतो.
‘युवर दोस्त’च्या साइटवर आत्महत्या प्रतिबंधक संस्था, त्यांच्या हेल्पलाइन्स यांचीही माहिती आहे. तरुणांच्या आत्महत्या, व्यसनाधीनता यांवर अनेक संस्था काम करत आहेत. त्यांची एकहाती मूठ बांधण्याचा रिचाचा विचार आहे.
‘युवर दोस्त’मध्ये सध्या रिचाची भूमिका, टीम मेंबर्स नियुक्ती, कायदेशीर बाबी, निधी उभारणी आणि काही प्रमाणात तांत्रिक बाबींकडे लक्ष देणं अशी आहे. सध्या केवळ इंटरनेटची सुविधा हाताशी असणारे आणि त्याची माहिती असणारेच तरुण-तरुणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. पण तणाव तर अगदी एखाद्या लहान गावातील तरुणालाही जाणवतोच. म्हणून त्यांच्यासाठीही ‘युवर दोस्त’ची सेवा उपलब्ध करून देता यावी अशी रिचाची इच्छा आहे. त्यासाठी  मोबाइलद्वारे संवाद साधण्याचा एक प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन आहे. तसेच भविष्यात संपूर्ण भारतात ‘युवर दोस्त’ची केंदं्र उभारण्याचीही रिचाची महत्त्वाकांक्षा आहे.
निराश झालेल्यांची भावनिक गरज ओळखून त्यासाठी काम करणारी ‘युवर दोस्त’ म्हणजे तरुणाईच्या प्रतिनिधीने तरुणांसाठी दिलेला मदतीचा हात आहे. म्हणूनच हा वेगळा उपक्रम ठरतो. रिचाच्या या कामाची दखल ‘हफिंग्टन पोस्ट’ने घेतली असून ‘असामान्य कामगिरी करणारे सामान्य भारतीय’ हा सन्मान तिला बहाल केला आहे. अवघ्या २८ वर्षांच्या रिचाने घेतलेली ही गरुडझेपच म्हणावी लागेल.