आजच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त आयुष्यात स्वत:ची तंदुरुस्ती टिकवायची असेल, तर नियमित व्यायाम आवश्यक आहे, मात्र ‘वेळ नाही’चं तुणतुणं इथेही येतंच. अशांसाठी अगदी पोरकट, बालिश वाटणाऱ्या, परंतु प्रभावी ठरणाऱ्या छोटय़ा छोटय़ा खेळांतून फिटनेस सांभाळता येणं शक्य आहे. करून तर बघा हे छोटे छोटे खेळ. त्यातून तुमचं बालपण परतेल आणि त्या वेळचा आनंद, धमाल मस्तीही अनुभवता येईल, एवढं मात्र नक्की.

सेल’ किया ‘सेल’ फोन से.. तसंच ‘सेल’ (Cell’) फोननं काहीही ‘सेल’ (Sell”) करता येतं.. अशा जाहिराती टी.व्ही.वर लागल्या, की त्यातल्या संगीताच्या तालावर नकळत आपली पावलं थिरकू लागतात. या जाहिरातीत सामान विकल्याच्या आनंदात एक मध्यमवयीन आणि एक वयस्कर स्त्री ज्या बेधुंदपणे हातवारे करत नाचतात, तो बेधुंदपणा अनेकांना मनापासून आवडतो, कारण आनंद झाल्यावर तो बेधुंदपणे नाचून साजरा करायचा हे वयाच्या १७-१८ व्या वर्षीच आपण सोडून दिलंय. तरुण, मध्यम वयात करिअरमध्ये गुंतल्यावर, विशेषत: व्यावसायिकतेची झालर व्यक्तिमत्त्वाला लागल्यावर असं ‘बेधुंद नाचणं’ हे न शोभणारं असंच आपण ठरवून टाकलंय; पण हे आपण आपल्यावरच लादलेलं बंधन आहे. कुणी तरी असं मस्त नाचतंय म्हटलं, की खरं तर मनातून आपल्यालाही नाचावंसं वाटतंच; पण पटत असूनही अनेकदा वळत नाही हे खरं. आजच्या काळातही ही व्याधीमुक्ती आणि तणावमुक्ती सहज शक्य आहे आणि उपायही अगदी सोपा आणि विनाखर्च! ती मुक्ती मिळते, बेधुंद नाचण्यानं, खेळातून आणि संगीतातून!
नृत्याचा फायदा
नृत्याचा वा नाचण्याचा दुहेरी फायदा असतो. एक म्हणजे मनाला अतिशय आनंद मिळतो आणि दुसरा म्हणजे शरीर-मनाची तंदुरुस्ती टिकून राहते. तरीही अर्थात त्याची गणना कला (आर्ट) या प्रकारात केली जाते; पण त्यामागे असणारा ‘फिटनेस’चा फायदा लक्षात घेता नृत्याची गणना क्रीडा (स्पोर्टस्) प्रकारातही करायला हवी. असं तना-मनाला आनंद देणारं नृत्य क्रीडा प्रकारात यावं आणि त्याला मान्यता मिळावी यासाठी इंटरनॅशनल डान्स स्पोर्ट्स फेडरेशन (IDSF) प्रयत्नशील आहे. याचा अ‍ॅथलेटिक्समध्ये समावेश करावा असं त्यांचं म्हणणं असून ‘बॉलरूम’ हा नृत्य प्रकार अतिशय देखणा एकमेव असा खेळ आहे, असं मानावं असं फेडरेशनला वाटतं. DSF considers competitive ballroom dancing to be one of the most graceful sport.  तो क्रीडेचा (Dance Sport) प्रकार जाहीर करावा म्हणून फेडरेशन प्रयत्नशील आहे. म्हणजेच नृत्यातूनही खेळाचे, फिटनेसचे फायदे मिळतात हे यातून सिद्ध होतंय. हे झालं जागतिक पातळीवर; पण आपल्याकडेही नृत्याची नियमित साधना करून शरीराची तंदुरुस्ती कशी टिकवता येते याचं डोळ्यासमोरचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित! कुणी म्हणेल स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना हे गरजेचं असतं; पण तसं नाहीये. नियमितपणे गटागटाने किंवा एकटय़ाने आवडत्या संगीतावर नृत्य केलं किंवा विशिष्ट लयीत हात-पाय हलवले, तर नक्कीच आपल्याही फिटनेससाठी त्याचा उपयोग होतो. याचा अनुभव घेतलाय एका वैद्यकीय व्यावसायिकांच्या गटानं!
हौस म्हणून १०-१२ डॉक्टरांनी एका कार्यक्रमासाठी नृत्य बसवलं. त्याच्या तालमी करण्यासाठी भेटणं, एकत्र येणं, आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या कोरिओग्राफरकडून शिकणं हे इतकं छान होतं, की तो महिनाभर अतिशय आनंदात गेला. ‘‘टाइम मॅनेजमेंट करावं लागायचं; पण वैद्यकीय व्यावसायिक कामाचा ताण प्रॅक्टिस करताना निघून जायचा व ताजंतवानं वाटायचं,’’ असं यात सहभागी झालेल्या डॉ. मानसी, डॉ. संगीता,         डॉ. राजश्री, डॉ. दीपाली यांचा स्वानुभव! व्यवसायातल्या व्यग्रतेमुळे दररोज वेगळा वेळ देता येत नाही; पण ठरवून वेळ काढून आम्ही भेटतोच, असं त्यांनी सांगितलं.
पाककला व चित्रकला या दोन्हीतही प्रावीण्य मिळवलेल्या दिल्लीच्या अनिता गोखले सांगतात, पाककला व चित्रकला या दोन्ही गोष्टींनी मनाला खूप आनंद मिळतो; पण पूर्ण शरीराला व्यायाम मिळत नाही. म्हणून शारीरिक फिटनेस टिकवण्यासाठी नेहमीची कामं झाल्यावर नियमित २०-३० मिनिटे मी मोबाइलवरच वाद्यसंगीत लावून हात-पाय-कंबर यांना व्यायाम मिळेल अशा डान्स स्टेप्स करते. यात छोटय़ा मुद्राही करता येतात. यामुळे मला उत्साही वाटतं.
ऑफिसमध्ये बैठे काम करणारी केतकी म्हणाली, ‘‘आम्हालाही फिटनेसचं महत्त्व माहिती आहे; पण सकाळी ६ ला दिवस सुरू होतो तो रात्री ११.३० ला संपतो. स्वत:साठी वेळ काढणार तरी कधी?’’ केतकची समस्या खरोखरच आज अनेक मध्यमवयीन स्त्री-पुरुषांना भेडसावतेय. दिवसभराच्या कामातून छोटासा ब्रेक घेऊन मनाला आनंद देणारं काही तरी करावं, असं प्रत्येकाला वाटतं; पण काय करावं हे सुचत नाही. घरात स्वयंपाक सुरू असताना, टी.व्ही. चालू असताना, दिवसभर काम करून आलेल्या- थकलेल्या शरीराला आणि कंटाळलेल्या मनाला उत्साही करण्यासाठी हलक्या स्वरूपाचे ‘ताण’ देणारे कोणते खेळ खेळता येतील? तसंच घरातली अशी कोणती कामं आहेत जी करताना व्यायामही होईल आणि खेळाच्या रूपात कामंही पार पडतील, याचा विचार मांडणं हे या लेखाचं उद्दिष्ट.
हे खेळ खेळण्यासाठी दिवसभरातली, तुमची कामं झाल्यानंतरची नियमित एक वेळ ठरवून घ्या. तुमच्या कामातील ब्रेक असला तरी शरीराला व्यायाम होणार म्हणून त्याआधी अर्धा तास कपभर चहा-कॉफी आणि एखादं बिस्किट खा. नेहमीच्या वेळेपेक्षा अधिक काळ ऑफिसमध्ये घालवणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी एखाद्या स्पेअर रूममध्ये किंवा मोठय़ा रेस्ट रूममध्येही हे व्यायाम करायला हरकत नाही. त्यासाठी मोबाइल फोन उपयोगी पडेलच. त्यावर उत्साह निर्माण करणारं आवडतं गाणं किंवा वाद्य संगीत लावा. मग ताठ उभं राहून दीर्घ श्वसन करा. यानंतर पायामध्ये थोडं अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही हात भिंतीवर ठेवून जेवढा जोर लावता येईल तेवढा लावा. भिंत ढकलण्याची क्रिया करा. १५-२० सेकंदांनी हात एकदम सैल सोडा. असं किमान १०-१२ वेळा करा. यानंतर शाळेत असताना हाता-पायांच्या जशा कवायती करायचो तशा करा. हात वर नेणं, बाजूला नेणं तशाच पायांच्या हालचाली करा. यामुळे ताणलेल्या स्नायूंना आराम मिळतो.
नंतर मध्यम आकाराची किंवा कपडे वाळत घालायची मध्यम आकाराची काठी घ्या. या काठीची दोन्ही टोकं दोन्ही हातांच्या मुठीत पकडा. प्रथम जेवढय़ा घट्ट पकडीने पकडता येईल तेवढी जोर लावून काठी पकडा. मग २५-३० सेकंदांनी हात सैल करून काठी पकडून ठेवा. हे किमान १० वेळा करा. सुरुवातीला सवय नसल्याने थोडी हाताला रग लागेल; पण सवयीने केल्यास स्नायूंची लवचीकता व क्षमता निश्चित वाढेल. हे झालं की, मग काठी छातीच्या दिशेला घट्ट धरा. मग हात ताणून काठी जेवढी छातीपासून लांब नेता येईल तेवढी न्या. असे पुढे-पाठी किमान १० वेळा करा. संगणकावर सतत काम करणारे, ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणाऱ्यांनी हे जरूर करावं. स्नायूंची लवचीकता वाढतेच व टोनिंग मिळते.
याच पद्धतीनं पाठीचा कणा ताठ ठेवून काठी डोक्यावर धरून नंतर खाली आणा. हाताचे स्नायू ताणले जातील इतकी काठी वर न्या; पण स्नायू फार ताणला जाऊन दुखापत होणार नाही ना याची काळजी मात्र करणाऱ्यांनी घेतली पाहिजे. असं १० वेळा करा. पायाच्या व्यायामासाठी काठी दोन पायांच्या पकडीमध्ये व हाताने पकडा. कंबर कणा ताठ ठेवून एक गुडघा दुसऱ्या गुडघ्यावर ठेवून एका पायावर उभे राहा. काठीत पाय अडकवा, मग सोडवा. मग पाऊल अडकवून ते सोडवा. हे सर्व खेळ आपण लहानपणी खेळलो आहोत. मोठी माणसं त्याला ‘उद्योग’ म्हणायची; पण हेच खेळ पुढील वयात स्नायूंची लवचीकता, बळकटपणा, क्षमता वाढविण्यासाठी उपयोगात येतात हे आता खेळवैद्यक तज्ज्ञही सांगतात. वरील सर्व प्रकारानं छाती, पाठ, दंड या सर्वाना चांगलं टोनिंग मिळतं.
काठीप्रमाणेच घरोघरी उपलब्ध असणारी एक वस्तू म्हणजे चेंडू. क्रिकेटसाठी असतो त्या आकाराचा बॉल घ्या. बॉलच्या साहाय्यानं खेळताना मात्र पाठीचा कणा ताठ ठेवून हालचाल खुब्यातून करा. शक्यतो श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवत चेंडूच्या साहाय्याने वेगवेगळे खेळ खेळा. अगदी २-४ वर्षांची मुलं जशी बॉल जमिनीवर टाकतात आणि तो वरती उडाला की झेलतात तसं किमान १५- २० वेळा करा. तसंच बॉल भिंतीवर मारा आणि तो झेला. बॉल भिंतीवर एकाच ठिकाणी न मारता खाली, वर, बाजूला मारून पकडा. याने सर्वागाला व्यायाम होतोच तसेच वेळेची अचूकता, निरीक्षण, चपळता वाढायला मदत होते. यानंतर आपण सर्वच जाणतो तो खेळ म्हणजे बादलीत चेंडू टाकायचा. तुमच्या हळूहळू येणाऱ्या अचूकतेनुसार तुमच्यातलं आणि बादलीतील अंतर वाढवत जा आणि घडय़ाळ लावून २ ते ३ मिनिटं असा खेळ खेळा. यामुळे अचूक नेम धरून लक्ष्य कसं साधायचं हे तर समजतंच, त्याचा एक वेगळा आनंद मिळतोच; पण कंबर, हात, पाय यांना व्यायाम मिळतो. मैत्रिणीला किंवा इतर कुणाला घेऊन, सोसायटीतील बच्चे कंपनीला घेऊन कॅच पकडण्याचा खेळ खेळू शकता. स्नायूंना थोडे ताण देऊन शरीराला ताणविरहित व लवचीकता निर्माण करणाऱ्या खेळानंतर थोडे हलक्या स्वरूपाचे खेळ आणि घरातील कामाचे प्रकार पाहू.
सांघिक खेळ  
हे खेळ एकटय़ाने खेळायचे वा सांघिक आहेत. अनेकांबरोबरही खेळता येतील. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्षमता वापरून हे प्रकार करा. आपली आपल्याशीच स्पर्धा करा. हे सर्व गेम्स ३-४  मिनिटांसाठीच खेळायचे. लहानपणी आपण टिपऱ्या खेळायचो तसं घरात-घराबाहेर विशिष्ट लादी ठरवून त्यावर (टिपरी) (चपटा दगड) टाका. सुरुवातीला आपणच खेळलेला खेळ कठीण वाटेल, पण सरावाने जमेल. यामुळे अचूकता, योग्य लक्ष त्याप्रमाणे हातांची योग्य प्रमाणात हालचाल (को-ऑर्डिनेशन) करायला जमू लागेल. (उतारवयात हातांना कंप येतो त्या वेळी सुरुवातीच्या अवस्थेत स्नायूंची ताकद, बोटातील पकड वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल.) अशाच अचूक पकडीचा फायदा सागरगोटे खेळल्यानेही होईल. मान, हात, डोकं या सर्वाचं सुंदर एकत्रित मूव्हमेंटस् याने होतात.सांघिक खेळाचा फायदा असा की आजूबाजूच्या लोकांशी, बिल्िंडगमधल्या अनेकांशी नुसती ओळखच नव्हे तर जवळचं नातं तयार व्हायला मदत होईल. तुमच्या सोसायटीचा गट असो, भजन मंडळ, भिशीचा गट असो वा फिरायला जाणारा गट. तुम्ही तुमची नियमित कामे झाल्यावर एखादा खेळ खेळू शकता. किंवा सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी मुद्दाम वेळ काढून करू शकता. त्यातला एक खेळ डॉज बॉल.  हलका फुटबॉलच्या आकाराचा बॉल घ्या. मध्ये एकाला ठेवून बाजूने रिंगण करा आणि रिंगणातल्या पळणाऱ्या व्यक्तीस लागेल असा बॉल अचूकतेने मारा. संगीत खुर्ची तर अनेक जण खेळतातच. तो नियमितही करता येईस. खुच्र्या नसतील तर बाकांचा, पायऱ्यांचा उपयोग करा. तसेच एकेका मिनिटाचे खेळ म्हणजे, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल न करता स्थिर ठेवून एकमेकांच्या डोळ्यात पाहा. मग खेळल्यावर डोळ्यातून मस्त पाणी येईल. पण ते येऊन गेल्यावर डोळे ताणरहित होतील आणि झक्कास वाटेल. तसंच मेणबत्त्या एका रांगेत लावून त्या काडीने पेटवणं, दोन कडधान्यं एकत्र करून ती वेगळी करणं, उदबत्त्या पेटवणं आदी एका मिनिटाचे सांघिक खेळ खेळून करमणूक करता येईल. हे सगळे खेळ तुम्हाला अगदी बालिशच वाटतील. हे वय आहे का असले खेळ खेळण्याचं, असंही वाटेल पण त्यातली फिटनेसची उपयुक्तता लक्षात घेतली. सकारात्मक विचार केल्यास तुमचं बालपण परतून आल्यासारखं वाटेल.
घरकामालाही शिस्त
घरातलं काम प्रत्येक जण करतोच. पण ते आपापल्या सोयीनुसार करतो. जर त्यात व्यायाम आणायचा असेल तर ती कामं घडय़ाळ लावून ४-५ मिनिटांत करायची. यात स्वत:ची स्पर्धा स्वत:शीच असेल किंवा घरातल्यांना त्यात सहभागी करून घ्या किंवा मैत्रिणींना. ठरावीक मिनिटं ठरवून तुम्हाला पालेभाज्या कोथिंबीर, शेंगा अशा भाज्या निवडणं, तोडणं याची स्पर्धा करता येईल. यात फायदा भाजी तर निवडून होईलच, पण मिनिटांचे गणित असल्याने हात-बोटं लवकर चालतील व स्नायूंना निश्चित व्यायाम मिळेल व चपळता येईल. याच मिनिटांच्या खेळात कडवे वाल, नेहमी स्वयंपाकात लागणारा लसूण निवडता येईल. वरील प्रकार निरोगी व्यक्तींनी तर स्पर्धा लावून करावेतच पण विविध आजारांचे रुग्ण जे अंथरुणावरच असतात त्यांनी तर जरूर करावेत. याच प्रमाणे विस्मृतीत गेलेलं काम जे बोटांच्या स्नायूंना लवचीकता देतं, पकड मजबूत करण्यास मदत होते ते म्हणजे रवीने दही घुसळून ताक करणं आणि कापसाच्या वाती वळणं. ताक तर घरात दररोज लागतंच, पण वातीचाही उपयोग स्वत:च्या घरी करता येतो. देवघरात निरांजन लावत नसाल तर परिचितांमध्ये जे लावतात त्यांना द्या. माझ्या ओळखीत सुशीलाताई वैद्य आजी होत्या. त्या दुपारी जेवणानंतर तासभर वाती वळायच्या आणि परिचितांमध्ये जाऊन नियमित द्यायच्या. त्यांना विचारलं तर म्हणायच्या, ‘अगं माझा वेळ जातो आणि बोट आखडत नाहीत या वयात!’ अशा कित्येक गोष्टी करता येतील ज्याचा फायदा फिटनेससाठी आपल्याला होईलच पण दुसऱ्यालाही त्याचा उपयोग करून देता येईल. स्मार्टफोनचा उपयोग
 याचबरोबर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर इंटरनेटवर उपलब्ध असलेले छोटे-छोटे गेम खेळा. पण फक्त १५ मिनिटं तेही जेवणाच्या आधी. झोपण्याच्या आधी नाही. अर्थात हे गेम्स ऑफिस, घर येथील तणावाच्या प्रसंगात पाच मिनिटं ब्रेकमध्येही खेळू शकता. (अर्थात ऑफिसमध्ये परवानगी असेल तर)
आजारी लोकांसाठी व्यायाम
 ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत. घराच्या बाहेर जाता येत नाही, शारीरिक हालचालींना मर्यादा आहेत अशांना शरीर आखडू नये म्हणून डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट व्यायाम देतात ते जरूर करावेत. पण त्याचबरोबर लहान मुलांची पिपाणी वाजवणे. शाळेत असताना पेनाचे टोपण घेऊन त्यावर तोंडाने हवा सोडून शिटी वाजवायचो तसं करणे. शिवाय बासरीही तुम्ही वाजवू शकता. तो तर वेगळाच आनंद देणारा प्रकार. स्ट्रॉसारखी पोकळ नळी घेऊन श्वास घेऊन जोरात फुकणीतून उच्छवास बाहेर टाकत जोरात छाती-पोटातील हवा बाहेर टाका. नंतर या नळीला शेवटी फुगा लावून तो फुगवा. तसंच साधे फुगे फुगवा. तसंच अंतर वाढवत वाढवत मेणबत्ती विझवणं यांसारख्या खेळात घरातल्या प्रत्येकांनी यात सहभाग घ्या. एकमेकांत स्पर्धा करा म्हणजे व्यायामाबरोबर आनंद मिळेल, याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. रक्ताभिसरण चांगलं व्हायला मदत होते. त्यामुळे आजारपणातही उत्साह वाटतो.
या सर्व क्रीडा-व्यायामामुळे शरीराला नेमका कसा फायदा होतो हे सांगताना फिजिओथेरपिस्ट प्रज्ञा तेलंग म्हणाल्या, आपलं शरीर म्हणजे हाडं आणि स्नायूंचा उत्कृष्ट आकृतिबंध आहे. या हाडं-स्नायूंची जोडी एकमेकांत आतील चक्राप्रमाणे अडकली आहेत. म्हणूनच मध्यमवयीन वयस्कर स्त्री-पुरुषांनी जे निरोगी आहेत अशांनी फिजिकल मेंटेनन्ससाठी हलक्या स्वरूपाचा पण नियमित व्यायाम करावा. यामुळे शरीराचा आकृतिबंध (पोश्चर) योग्य राहतो, तर कंबरेमध्ये शरीराचा बॅलन्स व इतर अवयवांशी योग्य कोऑर्डिनेशन साध्य केलं जातं. एका गोष्टीकडे खेळ किंवा व्यायाम करताना लक्ष द्यायला हवं की पाठीचा कणा ताठ ठेवून हात, पाय यांचा व्यायाम करावा.  आत्ताच उल्लेख केलेल्यापैकी ३-४ मिनिटांचे खेळ, कामाचा खूप ताण असला केली तरी १५-२० मिनिटांत दमलेल्या शरीराचा शिणवटा निघून जाईल आणि निश्चितच ताजंतवानं वाटेल अन् शरीराचे आरोग्य कायम राहील.
बुद्धिबळ मनाच्या तंदुरुस्तीसाठी
शरीराच्या फिटनेसबरोबर मनाची तंदुरुस्ती महत्त्वाची! कारण आपल्याला माहिती आहे की, शारीरिक आजारांमुळे मनावर गंभीर परिणाम होतात तर पुष्कळ वेळा मन:स्वास्थ्य बिघडल्याने त्याने शारीरिक आजार होतात. तेव्हा या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं तर मनाला विचारांची योग्य दिशा देणं महत्त्वाचं! एकदा विचार योग्य प्रकारे विवेकबुद्धीनं करता येऊ लागला की मनाविरुद्धच्या कोणत्याही स्थितीत आपण अतिरेकी विचार करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधतो. सध्या आपण आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी किती पर्यायांचा विचार करतो? जास्तीत जास्त ४-५ किंवा ७-८ याच्यावर आपण पर्यायांचा विचार करतच नाही. पण आपण नियमितपणे बुद्धिबळाचा खेळ खेळला तर आपण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किमान ५० हून अधिक पर्यायांचा नक्कीच विचार करू. बुद्धिबळ हा खेळ ५ वर्षांच्या बालकापासून ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंत कुणीही खेळू शकतो. दिवसातून एकदा तरी हा खेळ जरूर खेळावाच. प्रत्यक्ष जोडीदार स्पर्धक घरातल्यापैकी कुणाला तरी घ्यावं किंवा मोबाइल अॅप्स, इंटनेटवर प्रतिस्पध्र्याशी खेळावं. फक्त संगणकाबरोबर खेळू नये. त्या खेळाचा फायदा-अनेक पर्यायांचा त्यातील फायद्या तोटय़ांचा विचार करून ठरावीक कालावधीत अचूक निर्णय घेणं हे या खेळातून आपल्याला साधतं हे महत्त्वाचं! बुद्धिबळ खेळामध्ये प्रत्येक खेळी खेळताना (मूव्ह) ती किती प्रकारांनी करता येते? या विषयी माहिती देताना अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये गणित विभागात कार्यरत असलेल्या डॉ. श्रद्धा इंगळे म्हणाल्या, ‘गणिती शास्त्रानुसार शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, या खेळात एका चालीनंतर ४०० वेगवेगळ्या प्रकारच्या चालींचे पर्याय उपलब्ध असतात. तर दोन्ही खेळाडूंनी २ चाली खेळल्यावर ७२,०८४ इतके चालीचे प्रकार उपलब्ध असतात.’ म्हणजे पाहा नियमित बुद्धिबळ खेळलं तर वैचारिक क्षमता किती प्रचंड प्रमाणात वाढेल आणि मग कौटुंबिक, करिअर, वैयक्तिक जीवनात कोणतीही गुंतागुंतीची समस्या आली तर मग बुद्धीला, नियमित खेळल्याने सवय झाल्याने समस्याग्रस्त वेळी भावनात्मक विचार न करता त्यावर लॉजिकली विचार करू. आपल्याकडे असलेल्या गोष्टीतून समस्येवर मात करण्यासाठी १००-२०० पर्यायांचा विचार करू शकू. एवढं जर झालं तर समस्येचा आपल्यावर पडणारा ताण निश्चितच कमी होईल. असा ताण कमी होतो, असा खेळाडूंचा प्रत्यक्ष अनुभव आहे. ताणाच्या प्रसंगात बुद्धिबळाचे एक मिनीट, तीन मिनीट असे छोटे डाव खेळल्याने ताणातून मुक्तता होते का? याविषयी स्वानुभव व इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्षानुभव यांच्या आधारावर, मुंबईतील एकमेव ग्रॅण्डमास्टर, अर्जुन पुरस्कार विजेते प्रसिद्ध बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे म्हणाले, ‘‘मोठय़ा स्पर्धा खेळताना एखादा गेम हरल्यावर दुसऱ्या दिवशीच्या गेमसाठी तयारी करताना हरल्याचे विचार, ताण जाण्यासाठी स्पर्धा झाल्यावर आम्ही एक-एक मिनिटांचे ७-८ गेम्स खेळतो. त्याने लगेच फ्रेश व्हायला होतं. बुद्धिबळ खेळताना इतकी तल्लीनता येते की समजा डोळे दुखत असतील आणि मी बुद्धिबळ खेळायला घेतलं तर काही मूव्हज् झाल्यावर डोळेदुखीची वेदनाच मला जाणवत नाही. अनेक ज्येष्ठ खेळाडूंचाही असाच अनुभव आहे. पूर्वी अनेक खेळाडू असे होते की ज्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणी होत्या. पण बुद्धिबळ खेळायला लागले आणि चार-पाच मस्त मूव्हज् केल्या की त्यांना जो आनंद व्हायचा तो बघितला की वाटायचं खरंच त्याच्या आयुष्यात यांना इतक्या समस्या आहेत का? प्रवीण ठिपसे यांच्या पत्नी भाग्यश्री ठिपसे याही महिलांमधील इंटरनॅशनल मास्टर आहेत. प्रवीण ठिपसे म्हणाले, आम्हाला कंटाळा आला, व्यावसायिक ताण असेल तर आम्ही मस्त बुद्धिबळाचे छोटे गेम्स खेळतो आणि एकदम फ्रेश होतो. असा आपल्यामध्ये उत्साह निर्माण करणारा, संयमी वृत्तीनं समस्येवर विविध पर्याय शोधायला शिकवणारा, मनाला आनंद देणारा हा बुद्धिबळाचा खेळ प्रत्येकाने खेळायलाच हवा. खूप वेळ नसेल तर घडय़ाळ लावून अध्र्या तासाचा छोटा खेळ खेळा आणि दिवसभराच्या ताणातून मुक्त व्हा.
 थोडक्यात, तुम्ही तंदुरुस्त राहणं हे तुमच्या हातात आहे, तुम्ही आणि तुम्हीच त्यासाठी वेळ काढायला हवा. खेळ तुम्हाला आनंद देतील. व्याधींमधून, तणावातून मुक्ती देतील. मुख्य म्हणजे तुमचं बालपण परतून येईल. तेव्हा खेळ खेळा, आनंदी जगा.   
‘जिणे वैधव्याचे..’ या २९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्याडॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी ई-मेल sharda.mahandule@gmail.com

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…