पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत किमान अडीचशे मुलींचे शिस्तबद्ध पथक बर्ची नृत्य करीत ढोल-ताशांसह सामील झालेले दिसते. पायातील बुटापासून खांद्यावरील ओढणीपर्यंत नीटनेटक्या गणवेशात असणाऱ्या या युवती विसर्जन मिरवणुकीला एक प्रकारचा डौल आणि जोश देत आहेत. समाजात एक चांगला पायंडा पडण्यासाठी आपण हे करतो आहोत ही भावना या मिरवणुकींना वेगळी उंची देते.
एक हवाहवासा पाहुणा म्हणून दहा दिवस मुक्कामी येणाऱ्या गणपतीच्या आगमनाची निव्वळ चाहूलही  मराठी मातीत चैतन्य निर्माण करते. मग घरोघरी मोदक-खिरापतीची तयारी सुरू होते तर सार्वजनिक मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंडप-मिरवणुकीचे वेध लागतात. ज्याची आपण दहा दिवस यथासांग, मनोभावे पूजा करतो, सुगंधी-सुंदर फुलांनी ज्याला सजवतो आणि तऱ्हेतऱ्हेची पक्वान्न खाऊ घालून तृप्त करतो अशा पाहुण्याला निरोप देण्याच्या वेळी आपण अर्वाच्च, बेशिस्त का वागतो. आपला सगळा सुसंस्कृतपणा खुंटीवर टांगून ठेवत त्या निरोपाच्या कातर क्षणांचा असा विचका का करून टाकतो? बीभत्स हावभावाची नृत्ये, गुलालाची अर्निबध उधळण यापेक्षा काही वेगळे वळण या मिरवणुकीला लावता येणार नाही का? असे अस्वस्थ करणारे प्रश्न अप्पा पेंडसे नावाच्या द्रष्टय़ा शिक्षणतज्ज्ञाला अडीच-तीन दशकांपूर्वी पडले. त्यातून जन्म झाला एका वेगळ्या प्रयोगाचा! गणपती विसर्जन मिरवणुकीत जोशपूर्ण बर्ची नृत्य करणाऱ्या आणि त्याला ढोल-ताशाची दमदार साथ देणाऱ्या पथकांची उभारणी अप्पांच्या मार्गदर्शनाखाली झाली. युवकांसह युवतींचीही अशी नृत्य-वादक पथके पुण्याच्या मिरवणुकीत सहभागी होत आहेत. त्याला गेल्या वर्षी तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्यक्ष सामील होण्याची कल्पनाही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मान्य होणे शक्य नाही. असे असताना पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मात्र किमान अडीचशे मुलींचे शिस्तबद्ध पथक बर्ची नृत्य करीत ढोल-ताशांसह सामील झालेले दिसते. पायातील बुटापासून खांद्यावरील ओढणीपर्यंत नीटनेटक्या गणवेशात असणाऱ्या या युवती विसर्जन मिरवणुकीला एक प्रकारचा डौल आणि जोश देत आहेत.
या उपक्रमाची सुरुवात झाली ती अर्थातच तरुणांच्या गटापासून. ज्ञान प्रबोधिनीसारख्या वेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक चळवळीची उभारणी करणाऱ्या अप्पांना गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाढता बीभत्सपणा बेचैन करीत होता. या ऊर्जेला काही वेगळी दिशा देत तिचा आविष्कार घडवता येणार नाही का, या विचारातून त्यांनी प्रथम युवक गटाची उभारणी केली पण नृत्यांचा जो आनंद, जो जोश युवकांना अनुभवता येतो त्याचा आनंद युवतीही घेऊ शकतात याच विचाराने ज्ञान प्रबोधिनीमधील युवती विभागातील तरुणींनाही या नृत्याचे ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण सुरू झाले. बर्ची हे शिवकालीन हत्यार. पण त्या प्रकारच्या काठीला गोंडे लावून त्याचा वापर नृत्यासाठी केला जातो आणि या नृत्याला जोश देण्यासाठी त्याला ढोल-ताशांच्या कडाडत्या नादाची साथ दिली जाते. वीस मुलींचा एक वाद्यगट आणि या गटाच्या मागे व पुढे चाळीस मुलींचा नृत्य/ लेझीम गट असे शंभर-शंभर मुलींचे तीन गट, साधारणत: तीनशे मुली या मिरवणुकीत सहभागी होतात. प्रत्येक गटात एक ध्वजही उंच नाचत असतो. त्यापैकी ८०-९० मुली महाविद्यालयीन तर अन्य शाळेत शिकणाऱ्या असतात.
या नृत्य व ढोल पथकाच्या सरावाला प्रारंभ होतो तो गणपतीचे आगमन होण्यापूर्वी किमान महिनाभर आधी. दरवर्षी अनेक नव्या मुलींना या पथकात सामील होण्याची इच्छा होत असते, कारण त्यांनी त्यापूर्वी या पथकाचे नृत्य, वादन ऐकलेले असते. अशा शंभर-सव्वाशे मुली तरी या पथकात सहभागी होण्याच्या इच्छेने प्रबोधिनीमध्ये चौकशीसाठी येतात. त्यांना प्रशिक्षण देणे आणि जुन्या युवतींबरोबर सराव करण्याच्या उपक्रमाला प्रारंभ होत असतानाच या युवतींमध्ये उत्साहाचे वारे खेळू लागते. बर्ची किंवा लेझीमचे वेगळे हात किंवा खेळण्याचे नवीन प्रकार या सरावादरम्यान शिकायला मिळतातच, पण ढोल-ताशा वादनातील नवे ताल, वेगळा ठेका आवर्जून शिकवला जातो. रोज किमान दोन तास तरी हा सराव सुरू असतो आणि याच काळात मग मंडळांची आमंत्रणे येऊ लागतात. ही युवती पथके केवळ विसर्जन मिरवणुकीतच सहभागी होत नाहीत तर गणेशोत्सवाच्या दहाही दिवसांमध्ये पुण्यातील वेगवेगळ्या परिसरांमध्ये वसाहतींमध्ये मिरवणूक काढण्यासाठी त्यांना आमंत्रणे मिळतात. या पथकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे वेळेचे व्यवस्थापन. दोन-अडीच तास चालणाऱ्या या मिरवणुकीतील प्रत्येक मिनिटाचे नियोजन आधी केलेले असते व त्याप्रमाणेच मिरवणुकीत वेळेचे नियोजन केल्यास चाळीस-चाळीस तास चालणारी मिरवणूक वेळेत संपू शकते असा संदेश देण्याचाही हेतू या नियोजनामागे आहे. त्यामुळे त्याही मिरवणुकीत ही पथके सामील होतात, तेव्हा दोन ते अडीच तासांपेक्षा अधिक वेळ त्यांचा सहभाग नसतो.
बर्ची किंवा लेझीम नृत्य सतत दोन तास करीत राहाणे एकवेळ शक्य आहे, पण ढोल किंवा ताशा कमरेला अडकवून तो सातत्याने दोन-अडीच तास वाजवणे हे मुलींसाठी फारसे सोपे नाही. साधारणपणे २१ ते २३ इंचांपेक्षा मोठा ढोल या मुली वापरत नाहीत, पण एकदा ढोलवर टिपरी पडून त्याचा नाद घुमायला लागला की, बाकी सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि उरतो फक्त तो नाद आणि जोश, असे श्रुती गोसावी म्हणते. एका इंजिनीअरिंग कंपनीत
काम करणारी कॉम्प्युटर इंजिनीअर असलेली श्रुती गेल्या पाच वर्षांपासून पथकप्रमुख म्हणून काम करते आहे. दरवर्षी त्याच त्याच प्रकारचे नृत्य, ढोल वाजवणे कंटाळवाणे वाटत नाही का, असे जेव्हा तिला कोणी विचारते तेव्हा ती म्हणते, या सर्व प्रक्रियेत केवळ नृत्य वा ढोल महत्त्वाचा नाही तर त्यातून मिळणारा अनुभव, होणारे शिक्षण महत्त्वाचे आहे. या सगळ्या अनुभवातून या युवतींमध्ये नेतृत्व गुण विकसित होत असतात. दोन-तीन वर्षे वादक वा नृत्य गटात सहभागी होणारी युवती स्वाभाविकपणे या गटाच्या जबाबदाऱ्या घेऊ लागते. निर्णयात, नियोजनात सहभागी होऊ लागते. वेळेचे काटेकोर
नियोजन करणे, पथकातील इतर युवतींच्या मदतीने ते अमलात आणणे या गोष्टींमुळे परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास या मुलींमध्ये येतो. समूह वागण्याचे शिक्षण, न थकता मेहनत करण्याचा धडा हा या अनुभवाचा आणखी एक लाभ आणि हे सगळे आपण वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर समाजात एक चांगला पायंडा पडण्यासाठी करतो आहोत ही भावना या सर्व प्रयत्नांना वेगळी उंची देते, असे या पथकाची आणखी एक प्रमुख मेधाविनी वाटवे हिचे म्हणणे आहे.
ज्ञान प्रबोधिनी युवती विभागाच्या या युवती आता पुणे शहरातील विविध वस्त्यांमधील मुलींना या नृत्यवादनाचे धडे द्यायला जात आहेत आणि वडारवाडी, दांडेकर वस्ती या दोन्ही वस्तींमधील मुली आता या पथकात सामील झालेल्या आहे. पुणे जिल्ह्य़ातील गावांमध्ये होणाऱ्या देवीच्या यात्रा, उत्सव यामध्येही ही पथके आता मिरवणूक काढण्यासाठी जात असतात. मिरवणुकीतील जोश, अनेकांनी एकत्र येऊन नृत्य-वादन करण्याचा आनंद, हे मिळविण्यासाठी शिस्त, वेळेचे नियोजन याच्याशी तडजोड करावी लागत नाही. ते न करता उत्सवाचा निर्भेळ आनंद लुटता येतो हे म्हणणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जावे यासाठी गेल्या २५ वर्षांपासून हे प्रयत्न या युवती विभागातर्फे सुरू आहेत. त्या विभागातर्फे वर्षभर अन्य अनेक विधायक उपक्रमही चालतात. शालेय पातळीवर विज्ञान, कला व क्रीडा याची गोडी वाढावी यासाठी अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम हा युवती विभाग राबवतो आहे.
आपले समाजजीवन आणि सार्वजनिक उत्सव दिवसेंदिवस बकाल आणि असंस्कृत होत चालले आहेत. गणेश विसर्जनासारख्या मिरवणुकींमधून मद्यपान आणि बीभत्स वर्तन हे सरसकट दिसणारे दृश्य आहे. अशा वातावरणात रस्त्यावर ढोल वाजवताना, नृत्य करताना कधी या युवतींना असुरक्षित वाटते का? मेधाविनी चटकन म्हणते, ‘कधीही नाही!’ शिस्त, संयम, चारित्र्य या गोष्टी कोणत्याही, कशाही समूहात आपला धाक निर्माण करतात. आपली छाप उठवतात म्हणून अशी पथके गावोगावी उभे राहण्याची गरज आहे.    
vratre@gmail.com

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या