‘गोवा ते कन्याकुमारी’ हा जवळपास १२०० किमीचा प्रवास १२ दिवसांमध्ये पूर्ण करणाऱ्या सुनीता कुंभकर्ण आणि वंदना भावसार या दोन मैत्रिणी. संसार, नोकरी, मुलंबाळं यांच्या धबडग्यातूनही आपला सायकलिंगचा आनंद मनमुराद लुटत त्यांनी केलेल्या या  सायकल सफारीचे हे अनुभव.

जब हम छोटे थे,
कितने सपने मन में समेटें हुए थे,
जहाँ उड़ान के परिंदे पलकोंपर ही बसते थे..
वो मंज़िले.. अब हमे दिखाई क्यूं नहीं देती?
वो अन्जान राहें अब हमें आवाज़्‍ा क्यूं नहीं देती?
क्यू जीते हैं हम रुके रुके से और डर डरकर?
क्या जाकर कह सकेंगे रबसे;
तूने जो ज़िंदगी दी मैने वो जी ली खुलकर..!
मैं ज़िंदगी से गुजरा हूँ ज़िंदगी को छूकर ..
क्यू ज़िंदगी से मुँह मोड़ लेते है हम?
अन्जान राह पर क्यूं ड़गमगाते है हम?
अरे दोस्तों.. थम जाने से
बेहतर है भट़कते रहे हम..
क्या जाने कौन सी राहपर मिल जाये
खुदी से हम..           
कभी अपने सपनों को तलाश
कर उड़ान भर हौसलों की राह पर
और, पंखो की ताकद़ आज़्‍ामाकर देख;
जान जाओगे आसमाँ भी
झुक जाता है ज़्‍ामीपर..   
    – सुनीता कुंभकर्ण
 
वंदना भावसार या आपल्या मैत्रिणीसोबत सायकलने ‘गोवा ते कन्याकुमारी’ हा जवळपास १२०० किमीचा प्रवास १२ दिवसांमध्ये पूर्ण करणाऱ्या सुनीता कुंभकर्ण यांची ही कविता. नवी मुंबईनजीकच्या पनवेलमध्ये राहणाऱ्या चाळिशीतील या दोन तरुणी. लग्नानंतर संसाराच्या धावपळीत काही गोष्टी करायच्या राहून गेल्या. पण मग न करता आलेल्या गोष्टींचं दु:ख आयुष्यभर का कवटाळत बसा, त्यामुळे इच्छा आहे आणि मुख्य म्हणजे संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं करूया हे सरळ-साधं गणित. पण या गणितातून त्यांना करता आली चांगल्या अनुभवांची बेरीज झाली आणि वाईट विचारांची वजावट!
दोघींची मैत्री २२ वर्षे जुनी आणि दोघींनाही सायकलिंगची फार पूर्वीपासून आवड. पण मधल्या काही काळात सायकलला साधी पायंडल मारणंही जमलं नव्हतं. योगायोगाने दोन वर्षांपूर्वी एका ग्रुपसोबत पनवेल ते शिर्डी अशा तीन दिवसांच्या सायकल सफारीची संधी मिळाली आणि तिथून पुन्हा सुरू झालेल्या सायकलिंगमुळे लक्षात आलं की सायकल चालवण्याने शारीरिक क्षमता वाढण्याबरोबरच, शांत-संयमित वेगामुळे निसर्गाचाही आनंद मनमुराद लुटता येतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही सायकल लाभदायक शिवाय मैत्रीचा एक नवा आयाम विणला जातो. त्याचाच परिपाक म्हणजे दोघींचा नुकताच झालेला ‘गोवा ते कन्याकुमारी’ हा सायकल प्रवास.
याआधी ग्रुपसोबत आणि पुरुषांच्या साथीने सायकल सफरी केल्या होत्या. पण त्यात विशेष काय? अशी एक प्रतिक्रिया त्यांना हमखास मिळायची. आमच्या क्षमता यांना का जाणवत नाहीत, असं त्यांना वाटायचं. तेव्हा उत्तर मिळायचं की, आपलं मन सुरक्षिततेच्या नावाखाली आपल्या आरामदायी कोषातून बाहेर पडून अनिश्चिततेची आव्हानं स्वीकारायला तयार होत नाही. म्हणून त्यांनी आव्हान स्वीकारलं. आणि मग दोघींनीच एखादी लांबवर सायकल सफर करण्याची कल्पना डोक्यात घर करू लागली. त्याच वेळेस एका स्त्रीला घरातील जबाबदाऱ्या दूर सारून फार दिवस बाहेर पडणं जिकिरीचं आहे ते लक्षात आल्यावर ही मोहीम छोटी होत होत १२ दिवसांच्या मडगाव (गोवा) ते कन्याकुमारी या जवळपास १२०० कि.मी.च्या मार्गावर येऊन थांबली.
पर्यटन हा विषय आता नवीन राहिलेला नसला तरी दोन स्त्रियांनी स्वतंत्रपणे अशी एखादी मोहीम आखावी यात स्त्रियांमधलं आत्मभान तपासावं, असंही त्यांना वाटलं. आणि त्यांनी या मोहिमेच्या आखणीची सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी लेडीबर्ड सायकल चालवणाऱ्या या दोघींनी या वेळी मात्र चांगल्या गिअरच्या सायकलींची निवड केली. सुनीता यांच्याकडे फायरफॉक्स एमटीवी आणि वंदना यांच्याकडे कॅनंडेल ही सायकल आहे. ‘see the world differently’ या घोषवाक्याला धरून सारी आखणी झाली. या वेळेस कोणत्याही ग्रुपबरोबर जात नसल्याने मार्ग ठरविण्यापासून ते मुक्कामाचे ठिकाण, वाटेत येणारी प्रेक्षणीय स्थळे, कुठे किती वेळ थांबायचे व किती वेळात किती अंतर कापायचे इतकंच नाही तर संभाव्य विलंब टाळावा यासाठी सायकल रिपेरिंग शिकण्यापर्यंत त्यांनी अनेक गोष्टींवर विचार केला आणि ते प्रत्यक्षात आणलं. कारण या संपूर्ण प्रवासातले सर्व निर्णय, त्यांचे परिणाम ही फक्त त्या दोघींची जबाबदारी होती. सायकलचा किट, हवा भरायचा पंप, हेल्मेट, हँडग्लोव्ह्ज, ब्लिंकर, कॅमेरा होल्डर, कॅमेरा मोनोपॉड असं सर्व सामान वाहून नेण्यासाठी सायकलला योग्य असे कॅरिअर व पॅनिअर्स (कॅरिअरला लावायच्या सामान ठेवायच्या बॅगा) ची जुळवाजुळव केली. गिअरच्या सायकलींची घ्यावयाची काळजी, पंक्चर काढणे, सायकल जोडणीचे मार्गदर्शन यासाठी पनवेल येथील गिरीमित्र आणि सायकलपटू धनंजय मदन व सुमित पारिंगे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्याबरोबरच रोज साधारण २५ ते ३० कि.मी. सराव चालू केला. एकदा सरावासाठी पनवेल ते नाशिक हे अंतरही पार केले. गर्दीत लगेच लक्षात येण्याच्या दृष्टीने दोघींनी सारखेच कपडे शिवून घेतले.
दोन स्त्रिया अशा एकटय़ाच सायकल सफरीला जात आहेत हे कळल्यावर स्त्रीसुलभ प्रतिक्रियाही मिळाल्या. अनेकांनी नाकंही मुरडली. या वयात हा कसला वेडेपणा असं म्हणूनही पाहिलं पण घरातल्या लोकांनी खूप सहकार्य केल्याचं दोघी सांगतात. एवढंच काय तर, ‘आई तू सायकल मोहीम अर्धवट सोडून आलीस तर याद राख,’ असा दमही सुनीता यांच्या मुलींनी भरला. त्यामुळे साहजिकच त्यांचं मनोबल वाढलं.
आणि येईल त्या प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी ठेवून त्यांनी प्रवासाला आरंभ केला. आणि त्याचा प्रत्यय सुरुवातीला मिळाला. मँगलोर एक्स्प्रेसचं पनवेल-मडगाव तिकीट कन्फर्म न झाल्याने स्लिपर कोचच्या दोन बर्थमध्ये पथारी टाकून झोपावे लागले. २९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता मडगाव रेल्वे स्टेशनला उतरून सायकली पार्सलमधून ताब्यात घेऊन जोडणी करून आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने त्यांचे पॅडलिंग सुरू झालं.
गोव्यातील चर्चेस, मोठय़ा प्रांगणातील शाळा, मडगावचे मार्केट बघत बाहेर पडून हायवेला लागताच घाटाला सुरुवात झाली. सूर्य डोक्यावर चढत होता, घाटाचा रस्ता असल्याने पहिल्याच दिवशी त्यांचा कस लागला होता. सुंदर निसर्ग, चढ-उतार अन् श्वासाच्या लयीचा मिलाप, चढ चढतानाचे कष्ट आणि उतारावरील अपूर्व आनंद यात दिवस कसा गेला कळलेही नाही. लाल माती, हिरवीदाट झाडी, लहान-मोठे घाट पार करत गोवा सोडून कधी कर्नाटकात उतरलो समजलंही नाही. वंदना न थांबता सांगत सुटल्या होत्या, उतारावर सायकल सोडून द्यावी तसं.
 इतर वाहनांपेक्षा सायकलने हिंडण्याची मजा आणि अनुभव वेगळा असतो. कमी वेगामुळे त्या त्या भागातील बारीकसारीक गोष्टींची माहीती होत असते. स्थानिक लोकांशी संवाद साधता येतो आणि तेच नि:संकोचपणे या दोघींनीसुद्धा केलं. कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर, रस्त्याच्या कडेचे धारेश्वर मंदिर, उडुपीचे कृष्णधाम अशी अनेक लहानमोठी अप्रतिम कर्नाटक शैलीतील मंदिरे बघून मन तृप्त झाले. वाटेत त्यांनी केरळ आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज, एक खाजगी आर्ट गॅलरी, व जुन्या पौराणिक वस्तूंचा संग्रह व विक्री केंद्र, तसेच नवीन चायनीज बनावटीच्या असंख्य सजावटीच्या वस्तूंची दुकानं व समुद्रकिनाऱ्यांना भेटी दिल्या.
या दोघींकडे प्रवासातील अनुभव आणि वेगवेगळ्या किश्श्यांची खाणच आहे, हे त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून लक्षात आलं.
वाटेत भेटलेल्या बगीता या महिलेने आग्रहाने घरी नेऊन जेवायला घातले. तर एका ठिकाणी पाणी मागितले असता आत बोलावून अगदी दिवाळीचा फराळ व चहासुद्धा आग्रहाने दिला गेला. एके ठिकाणी त्या दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलेल्या असताना तिथे जमलेल्या शाळकरी मुलांनी औत्सुक्यापोटी गिअरच्या सायकली चालवून बघितल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या दोघींना एक वेगळेच समाधान देऊन गेला. तर गोकर्णला भेटलेली फॅन्सी कपडे विकणारी राजस्थानी कुसुम हिला सायकल मुशाफिरी फारच भावली व आपलीही मुलं मोठी झाल्यावर अशीच भटकंतीला बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली.
 वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधत यांचा प्रवास सुरू होताच. मुरुडेश्वरला त्यांना काही स्त्रिया भेटल्या. त्यांना तर ही कल्पना भन्नाट वाटलीच, पण त्या दोघीच इतक्या लांबचा प्रवास करत आहेत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आणि त्यांनी प्रश्नाची सरबत्ती केली. तुमचा घटस्फोट झाला आहे का? तुम्हाला हे कसं शक्य झाले? घरचे कसे सहकार्य करतात? तुम्ही रात्रीच्या मुक्कामाचं काय करता? अशा एक ना अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं. तुम्हीही हे करू शकता असं म्हटल्यावर मात्र आम्हाला हे शक्य होणार नाही, ही खंत व्यक्त केली. तर काहींनी घरचे कितपत पाठिंबा देतील याबाबत साशंकता दाखवल्याचं सुनीता म्हणाल्या. काही महिला जगभर एकटय़ा फिरतात आपण निदान आपल्या देशात तरी फिरायला हवं. काही दिवसांपूर्वी दहा देश पालथे घालून इंग्लंडवरून रुबिना नावाची मुलगी पनवेलला आली होती, ही आठवणही यानिमित्ताने सुनीता यांनी सांगितली.
दोघींनीही अद्याप दक्षिण भारत पाहिला नव्हता. शिवाय जीपीएसचाही वापर न करायचे ठरविल्याने अनवट वाटा, गावांची नावं व उच्चारही वेगळे, न समजणारी तेलगू, कन्नड, मल्याळम भाषा. जेवणखाण कसं असेल, ते वेळेवर मिळेल की नाही? हे प्रश्न असायचेच. शिवाय सायकल चालवताना शारीरिक ताकद जास्त खर्ची पडत असल्याने भूकही प्रचंड लागायची. पहिले तीन-चार दिवस दक्षिणेकडील इडली-सांबार, डोसा यांचा आस्वाद घेण्यात आनंद वाटला, पण नंतर आपली पोळीभाजी व साधे वरणभात याची आठवण येऊ  लागली तेव्हा मनाला समजावलं, तुझ्या मनाची गरज मी आता पूर्ण करू शकत नाही. मला फक्त पोटाची गरज भागवावी लागेल. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही कळल्यावर पोटानेही ते मान्य केलं व परत कधीही तक्रार केली नाही, वंदनांनी मिश्कीलपणे सांगून टाकलं. त्यांनी बरोबर मूग, शेंगदाणे, बदाम नेले होते ते रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्याचा उपयोग पहाटेच्या पहिल्या न्याहरीसाठी करायच्या.
रोज सकाळी तयार होऊन सहा वाजता सायकलिंग सुरू करायचं, मग ८ ते ९ च्या दरम्यान नाष्टा व ११-१२ च्या दरम्यान एखादे चांगलं हॉटेल बघून जेवण व तिथेच जवळपास एखाद्या झाडाच्या किंवा मंदिराच्या सावलीत दोनपर्यंत आराम व संध्याकाळी ५ ते ५.३० पर्यंत ठरलेल्या गावी पोहोचून राहण्याची व्यवस्था बघणे, असा त्यांचा दिनक्रम. प्रवासाला निघायच्या आधी राहण्यासाठी कुठल्याही हॉटेलचं बुकिंग केलं नव्हतं. त्यामुळे ठरलेल्या गावी पोहोचल्यावर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था बघणं ही रोजची परीक्षा होती. एके ठिकाणी उशीर झाल्यावर स्थानिक पोलिसांनी राहण्यासाठी खोली मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.  
महामार्ग असला तरी बराचसा मार्ग एकेरी असल्याने सायकल चालवताना बरीच सावधानता बाळगावी लागत होती. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होताना बघून दोघींचं मन विदीर्ण व्हायचं.
एक चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण प्रवासात त्यांची सायकल एकदाही पंक्चर झाली नाही परंतु, सहाव्या दिवशी सुनीता यांच्या सायकलच्या पायंडलमध्ये प्ले आला. २५-३० कि.मी. गेल्यावर एका सायकल दुरुस्तीच्या दुकानात तात्पुरतं काम झालं. पण दरवेळेस कुठे दुकान शोधणार म्हणून पुढे तो प्ले काढायचं कामही त्या शिकल्या.
 या प्रवासातलं अवघड व मजेदार वळण होतं ते केरळच्या घाटांचं. सरळसोट रस्ता कंटाळवाणा वाटायचा त्यापेक्षा घाट लागला की चढताना होणारी दमछाक सोडल्यास उतरणीवरचा वारा पिऊन सुसाट, विनासायास मिळणारा आनंद वेगळाच होता. आयुष्याच्या अवघड, पण आनंद देणाऱ्या वाटांसारखाच.  या बारा दिवसांच्या प्रवासातील अनेकविध अनुभवांनी त्यांचं जीवन समृद्ध केलं, निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला, मनसोक्त भटकेगिरी उपभोगली पण कुठेही त्यांचं ‘स्त्री असणं आडवं आलं नाही.’ माणूस म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं गेलं.  केरळच्या ‘लेटेस्ट डेली’ वर्तमानपत्राच्या पत्रकाराने मुलाखत घेऊन ‘Two girls are missing’ या मथळयाने छापून आणली.
 अनेकदा तर घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, अशी कधी कधी मनाची अवस्था व्हायची, पण निग्रहाने मनाला समजवत ध्येयाकडे वाटचाल करत राहिलो. भीतीचा बागुलबुवा मनातून काढून टाकून स्व-सामर्थ्यांवर स्त्रियांनी विश्वास ठेवावा चांगले-वाईट दोन्ही अनुभव व्यक्तिमत्त्व घडविण्यात मदत करतात तेव्हा जीवनाला सामोरं जावं आणि समर्थपणे स्वत:ला घडवावं. तुम्हाला मदत लागली तर तुम्ही माणूस म्हणून मदत मागावी. तुम्ही स्त्रीच्या भूमिकेत गेलात की समोरचा आपोआप पुरुषाच्या भूमिकेत जातो, तसं होऊ द्यायचं नाही. सुनीतांनी आपला अनुभव सांगितला.
 मतभेदावर कशी मात मिळवता यावर त्या दोघींनी सांगितलं की मतभेद होतात, पण ते तेवढय़ापुरतेच असतात. आम्ही दोघी कधीही एकमेकींना उगाचच क्रॉस करत नाही. एखाद्या गोष्टीला आत्मसन्माचा विषय न बनवता एकमेकींना समजून घेतो. आम्हा दोघींचे यजमानही एकाच कंपनीत नोकरीला असल्याने त्यांचाही संवाद घडत असतो व त्याचा फायदा आम्हाला मिळतो, असं  त्यांनी सांगितलं.

ch17
वंदना लग्नाच्या आधी ट्रेकिंग करायच्या, पण नंतर ते सुटलं. सध्या त्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आहेत. त्यांचा मुलगा नाशिक येथे बी.एस्सी. अॅग्रि.च्या शेवटच्या वर्षांला आहे. तोही सायकलिंग करतो. मुख्य म्हणजे कॉलेजच्या पहिल्या वर्षी वंदना यांनी त्याला मोटारबाइक घेऊन न देता सायकल दिली होती. सुनीता यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आणि नंतर बी.एड. केलं आहे. सध्या त्या क्लासेसमध्ये शिकवतात. त्यांना दोन मुली आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्या कविताही करतात. यापुढे त्यांना आपली कविता समृद्ध करायची आहे. स्त्रियांबद्दल लिहायचं आहे. दोघींनाही घरातलं मॅनेजमेंट आणि सायकलिंग या दोन्ही गोष्टी तेवढय़ाच आव्हानात्मक वाटतात. घराबाहेर पडताना कुठलीही परिस्थिती ओढवली तर त्यावर मात करून बाहेर पडू असा आत्मविश्वास त्यांना होता. शिवाय आपण आपले विचार सकारात्मक ठेवल्यास कोणत्याही अडचणी सहज सोडवू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
या प्रवासादरम्यान, त्यांनी तयार केलेल्या सायकल मोहिमेच्या फिल्ममध्ये चांगल्या गोष्टीच दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कारण  कष्ट दाखवले तर ज्या स्त्रियांच्या मनात असं काही करण्याची इच्छा आहे, त्याला लगाम लागू शकेल. स्त्रियांना आत्मनिर्भरतेने वाटचाल करण्यास या पाऊलखुणांचा उपयोग व्हावा एवढाच प्रामाणिक हेतू यामागे असल्याचं त्या सांगतात.
यापुढे काय करायचंय असा प्रश्न दोघींना विचारला असता म्हणाल्या, आता लवकरच हिमाचल प्रदेशमधील जलोरीपासला जायचंय, तेही सायकलवरूनच!