11-anandस्व-स्वच्छता अभियानाबद्दल आपण मागच्या लेखात जाणले. या स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगताना स्वामी चिन्मयानंद म्हणत, ‘माझी तुमच्या आयुष्यातील भूमिका एखाद्या झाडूप्रमाणे आहे. म्हणजे तुमच्यातील दोष लक्षात आणून देऊन त्या घाणीची सफाई करणारा मी झाडू आहे. पण एकदा माझे काम झाले, की मात्र मला उचलून कोपऱ्यात उभे करून ठेवा.’ शंकाराचार्यानीही आपल्यातील अज्ञान काढून टाकण्यासाठी, काय करायला हवे हे ‘आत्मबोध’ या ग्रंथातून सांगितले आहे. 

सुरुवातीलाच ते म्हणतात, ‘अज्ञानाचा अंधार फक्त केरसुणीने झाडून टोपलीने बाहेर काढून टाकता येणार नाही. त्यासाठी ‘ज्ञानाचे’ बटण लावावेच लागेल तरच प्रकाश पडेल. योगी अरविदांनी आपल्या तत्त्वज्ञानातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला. आध्यात्मिक उंची, अधिमानसापर्यंतचा सोपान चढायचा असेल तर जुन्या स्मृतींची, अहंकाराची शिडी उपयोगी ठरणार नाही. चांगल्या-वाईट स्मृतींची सफाई स्वत:ची प्रगती साधण्यासाठी आवश्यकच आहे. नाही तर अशा वाईट गोष्टी, आठवणी, विचार मनात येत राहिले तर आनंदाच्या गाभ्यापासून आपण खूप दूर राहतो.
चांगल्या घटना, आठवणी तात्पुरता स्मृतींचा आनंद जरूर देतात पण तेही सुख शाश्वत या जातकुळीत बसत नाही. चांगले वाईट, इष्ट-अनिष्टच्या पसाऱ्यात वर्तमानाचा आनंद आपण घालवतो. म्हणून स्मृतींची सफाई अत्यावश्यक आहे. आयुष्य रोलर कोस्टरप्रमाणेच आहे हे गृहीत धरले की आनंद लुटता येतो.
भ्रामरी प्राणायाम
आज आपण भ्रामरी प्राणायामाचा सराव करू या. भ्रामरी हा प्राणायाम आहेच, पण त्यातील नादोपासना दिव्य परिणाम साधू शकते.
बठक स्थितीत सुखासन धारण करा. डोळे मिटून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास घ्या व सोडून द्या. आता पुन्हा एकदा ओठ मिटून खोल श्वास घ्या, थोडेसे थांबा, उच्छवास करताना भुंग्यासारखे गुंजन करा. भ्रामरी प्राणायामाचे गुंजन हे ‘म’ काराच्या उच्चाराप्रमाणे असते. जाणिवेसह रेचक करा.
हा प्राणायाम नादांतील कंपनांमुळे सूक्ष्म स्तरावर परिणाम घडविणारा आहे. निद्रानाश, ताणतणाव यावर रामबाण उपाय म्हणजे भ्रामारी प्राणायाम!

12-nivruttiआनंदाची निवृत्ती : सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न

ch13प्रभाकर जोशी
निवृत्त कधी होणार याची तारीख आधीच कळत असल्यामुळे, निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा याचा आराखडा मी आधीपासूनच निश्चित केला होता. त्यामुळे रिकामेपण कधीच जाणवले नाही.

निवृत्त झाल्यावर मला प्रथमच एकांतवास अनुभवायला मिळाला. मुले कॉलेजला जायची व पत्नीही कामावर गेली की घरात मी एकटाच असायचो. तसा माझा पिंड आध्यात्मिकच. म्हणूनच या वेळेचा सदुपयोग करत मी श्रीसमर्थाचा दासबोध, आत्माराम व ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव या ग्रंथांचा अभ्यास केला, त्याचे मनन, चिंतन केल्यावर चार छोटी पुस्तके लिहिली. कीर्तन-प्रवचन करताना याचा मला फार उपयोग झाला. ‘प्रसाद’ मासिकातही मी काही लेख पाठविले.
आपल्याला समाजाकडून अनेक गोष्टी मिळत असतात. ते ऋण फेडण्यासाठी आपण समाजासाठी काही केले पहिजे, या विचाराने मनात पक्के ठाण मांडले होते. म्हणूनच ‘मुंबई ग्राहक संघा’च्या एका गटाची ‘संघ प्रमुख’ ही जबाबदारी स्वीकारली. ‘मुंबई ग्राहक संघा’तून बिले आणणे, सुमारे पंधरा सभासदांकडून पैसे गोळा करून बँकेत भरणे, सामान आल्यानंतर जवळपास सत्तर-ऐंशी वस्तूंचे वाटप करणे ही अनेक कामे केली. वाटपाला पत्नीची व सुनेची मदत झाली. वाटपात जे पदार्थ मिळतात ते उत्तम-स्वस्त असतात. त्यासाठी हा खटाटोप. वयोमानानुसार संघप्रमुखाची जबाबदारी व इतर कामे अन्य सभासदांना दिली आहेत. देखरेख असतेच, तसेच वाटपही अजूनही आमच्याच घरात होते.
एखाद्या घरातील कुणी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर घर आणि हॉस्पिटल हे दोन्ही करताना घरातल्या स्त्रीची दमछाक होते. रुग्णाकडे दुर्लक्ष करता येत नाही व घरातील कामेही पार पाडावी लागतात. अशा परिचित वा नातेवाइकांना मदतीचा हात म्हणून मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत चारपाच तास जाऊन बसत असे. बरोबर जेवणाचा डबा नेण्यास विसरत नसे. त्याचप्रमाणे जमेल तशी आर्थिक मदतही केली.
मला अमेरिकेला जाण्याचा दोनदा योग आला. ‘बी इंडियन बाय इंडियन’ याचा मी पुरस्कर्ता असल्याने इतर काही खरेदी केली नाही, पण बर्ड फिडर घेतल्याशिवाय राहवले नाही. त्यांच्यामध्ये तांदूळ कणी व बाजरी एकत्र करून घालतो. चिमण्या खूप कमी झाल्या आहेत अशी सर्वत्र ओरड आहे, पण आमच्याकडे या बर्ड फिडरवर सतत चिमण्या, पोपट असतातच. जवळजवळ एक महिन्याला दहा किलो धान्य लागते. पर्यावरणाला हातभार व मला पण पक्षी पाहून प्रसन्न वाटते.
एका जाळीच्या बास्केटमध्ये ओला कचरा घालून त्यावर गांडूळखत बनवण्याचा घाट घातला आहे. भाज्यांची देठे, फळांच्या सालीपण त्यात घातलो. त्याचे छान खत तयार होते. पुठ्ठे, पेपरचे तुकडे वगैरे सुका कचरा वेगळा जमा करतो. महानगरपालिकेच्या ‘शून्य कचरा मोहिमे’ला मदत.
समाधान ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. ती विकत मिळत नाही. माझ्या निवृत्तीनंतरचा वेळ वर सांगितलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये घालवल्याने मी अत्यंत समाधानी व आनंदी जीवन जगत आहे. सामाजिक ऋण काही अंशी तरी फेडण्याचा हा प्रयत्न आहे.