आमच्या  ‘दहावी १९८२’ च्या कट्टय़ावर आम्ही जमायला लागलो आणि पुन्हा एकदा बालपण परतून आल्यासारखं वाटलं.. ते गमवायचं नव्हतंच त्यामुळे मग कट्टय़ावरून प्रयाण केलं ते थेट ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर. माझ्यासाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ म्हणजे अनुबंध आहे, ज्यामध्ये आमचा कट्टा सामावलेला आहे.
रस्ता ओलांडून पलीकडे आले. इतक्यात एक गाडी हळूहळू बाजूला येऊन उभी राहिली. ‘माधुरी..’ मागून हाक आली. मला आताशा या माहेरच्या नावाने हाक मारणारे येथे तरी कोणी नव्हते. मी चमकून मागे पाहिले. गाडीतून उतरणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख करून दिली. ‘मी चंद्रशेखर देशमुख. आपण वांद्रय़ाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो!’ जवळजवळ २६-२७ वर्षांनी आम्ही भेटत होतो. एवढय़ा वर्षांनंतर याने कसं काय ओळखलं? माझ्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित हसू होते. काय बोलावं क्षणभर कळत नव्हतं. पण हळूहळू एकेक आठवणी निघायला लागल्या आणि औपचारिकपण बाजूला पडलं. गप्पा मारता मारता कळलं की चंद्रशेखर, मकरंद, राज यांनी खूप मेहनतीने आमचा ‘दहावी १९८२चा कट्टा!’ जमवला होता. साहजिकच या कट्टय़ावर मीसुद्धा सामील झाले. तो दिवस मला फु लपाखरासारखा वाटला. या सगळय़ांनी माझं बालपण समृद्ध केलं होतं. ते दिवस पुन्हा आल्यासारखे वाटत होते.
लवकरच आम्ही ‘दहावी १९८२’ कट्टय़ावर भेटायला लागलो, कधी मुलांचं कौतुक करायला, तर कधी आमच्या गुरुजनांचा सन्मान करायला, तर कधी कुणाचं यश साजरं करायला. या-त्या कारणाने भेटत होतो. कारणांपेक्षा ‘भेटणं’ महत्त्वाचं होतं. शांता शेळकेंची कविता आठवली-
सखे सोबती अवतीभवती
बोलत होते किती भरभरूनी
पूर्ण मोकळे स्वत:स करूनी
निरागस, निर्मळ लोभस सारे!
मी स्वत:वरच खूश होते. आमच्या कट्टय़ावरची आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे आमचे हौशी मित्र आपल्या कुटुंबासमवेत, तर कधी सहचारिणीबरोबर येत, पण आम्ही मैत्रिणी मात्र आमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवत कट्टय़ाची मजा घेत होतो. मला इथे प्रकर्षांने जाणवत होतं की, आपण आयुष्यात स्वत:ची कुठे तरी ‘स्पेस’ शोधत असतो ती कदाचित आम्हा मैत्रिणींना येथे मिळत होती. शेवटी सुख हे सापेक्ष असतं. आता या कट्टय़ामुळे फोना-फोनी, ई-मेल यांची नोंद, प्रत्येकाची पत्त्यासकट माहिती, विशेषत: आम्हा मैत्रिणींची लग्नाआधीचं नाव याची व्यवस्थित माहिती प्रत्येकाला पाठविली गेली आणि हे सर्व आमच्या मित्रमंडळीमुळे शक्य झालं. त्यांच्याकडून येणारे एसएमएस, ई-मेल हे माझ्या घरातील मंडळींना कुतूहलाचा विषय ठरू होता. माझ्यापेक्षा माझे पती नियमितपणे ई-मेल वाचू लागले आणि मला उत्साहाने वाचायला सांगू लागले.  माझ्या कुटुंबालाही आता या दहावी कट्टय़ाची अपूर्वाई वाटू लागली.
दिवस या ओल्या आठवणीने सरत होते. काही विशेष असेल तर फोनवरून बोलणंही सुरू होतं. मीही स्वत: वेळ काढून आता ई-मेल पाहत होते, पाठवत होते. परंतु एकाएकी फोन कमी होऊ लागले. आणि ई-मेलही. पाण्यावर खडा टाकावा आणि त्याचे तरंग हळूहळू विरून जातात तसं काहीसं झालं. शेवटी राज, मकरंदला फोन केला, ‘अरे, तुमचे एसएमएस, कविता सगळं कुठे गेलं? आहात कुठे?’
तर उत्तर आलं, ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर! आता झाली ना पंचाईत?  माझा मोबाइल इतका साधा की त्यावर ती सोय नव्हती. दहावी कट्टय़ाची ओढ होतीच, ती आता नव्या अत्याधुनिक सोयीचा आधार मागत होती. घरचे म्हणायलाच लागले, ‘‘मोबाइल बदलू या म्हणून किती वेळा सांगितलं, पण पटलं नाही. आता काय कराल? बरं झालं तुझा कट्टा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आला.’’
शेवटी कट्टय़ाचा विजय झाला आणि मी माझा मोबाइल बदलला आणि कट्टय़ावरून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आले. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. बदलत जाणाऱ्या आयकॉनवर नजर ठेवावी लागायची. म्हणजे सुरुवातीला त्याचीसुद्धा गमतीशीर नावं- दहावी कट्टा, श्रीमंत मंडळी, नॉनस्टॉप नॉनसेन्स, देवा तुझ्या दारी आलो.. आणि खूप काही. खूप वेगवेगळे ग्रुप्स. खूप वेगवेगळी माणसं भेटायला लागली. माझा दिवस ‘व्हॉट्सअ‍ॅप’मय होऊ लागला.
आता त्यांना सांगावंसं वाटतं, ‘‘माझ्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच्या दोस्तांनो, यापूर्वीची माझी सुप्रभात खरं तर रेडिओवरच्या गीताने व्हायची ती आता मकरंद, प्रिया, राज यांच्या गुड मॉर्निग, सुप्रभात मंडळी, सुविचार कवितेने होते. दिवसभरात आलेले मेसेज रात्रीपर्यंत पुरतात. येता-जाता मुलं आता चिडवू लागली,‘ लगे रहो मम्मी, ‘व्हॉट्सअ‍ॅप’पे!!
कधी माझ्या फॉर्वर्ड्सना वीणा, विनय, मकरंद याची येणारी दाद सुखावून जाते. तर कधी गिरीश, श्रीधर यांचे पाठविलेले हटके व्हिडीओ दुसऱ्यांना फॉर्वर्ड केले जातात. वाक्यातून होणारा संवाद दिवसाअखेर शब्द किंवा स्माइलीने संपतो. कधी-कधी वाटतं, येणारी किंवा दिली जाणारी दाद उत्तरादाखल तर नसेल ना? आपण उगाच गॉसिप करत यात अडकत तर चाललो नाही ना? तुम्हाला आवडो की न आवडो ‘व्हॉट्सअ‍ॅप’नं तुम्ही कुणाच्या तरी घरात शिरणार किंवा कुणी तरी तुमच्या घरात.
सुमेधाने एक पोस्ट  पाठविली- ‘व्हॉट्सअ‍ॅप’ म्हणजे काय ‘‘इधर का माल उधर’’ हे जरी असलं तरी माझ्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ म्हणजे अनुबंध आहे. ज्यामध्ये आमचा कट्टा सामावलेला आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या दोस्तांनो, तुम्ही मला विचारता नवीन काय लिहिलं?
एक कविता तुमच्यासाठी-
मैत्रीचं नातं कधी रुजलं
कळत नाही.
त्यांना फुटतात अचानक
कोवळे संदर्भ
गेलेला गत्काल गेला
पण नव्हता व्यर्थ
कुणी तरी कुठे तरी
असतं फुलतं
फूल खरे असेल तर
येईल मैत्रीचा ‘गंध’   

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”