हितकर, आवश्यक तेवढंच, आनंददायी, प्रेमळ, परिणामकारक, गोडमधुर या गुणांनी युक्त असं आपलं बोलणं असावं असं एका सुप्रसिद्ध सुभाषितात म्हटलं आहे. त्या जोडीला सकारात्मकता, सुसंस्कृत, संयमी वाणी, राग-संताप-अपमान यांना वजा करणारं संभाषण हवं असे आणखी तीन गुण श्रुतप्रज्ञ स्वामींनी जोडले आहेत.
सर्वसामान्य माणसाला आपल्या घरात, कुटुंबात शांतता, तणावरहित वातावरण मिळालं तर तो आनंदी राहतो. पण आपलं कुटुंब शांत, समाधानी करायचं तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. आपली भांडणं जिभेमुळे होतात. कसं बोलावं आणि किती बोलावं हे नीट माहीत हवं. शिवाय समोरच्या माणसाचं म्हणणं सहभावाने समजून घेता यायला हवं. कित्येकदा शब्दामागचा नेमका अर्थ आपल्याला उलगडत नाही, कारण आपण समजून घेणं टाळतो. ऐकून घेणं ही क्रिया केवळ शब्दांचं श्रवण एवढय़ापुरती मर्यादित नाही. समोरचा माणूस हे का बोलतोय, त्याच्या शब्दांमागे कोणत्या भावना, विचार, संवेदना, संकल्पना आहेत हे जाणून घेण्याची क्रिया घडत नाही तोवर ऐकणं म्हणजे ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असं घडतं.
ऐकणं हृदयापासून व्हायला हवं. बोलणाऱ्याशी ऐकणाऱ्यानं जोडलं जायला हवं. शब्दांच्या अर्थामागचा अर्थ मनात उलगडता यायला हवा. शब्दांच्या माध्यमातून जी माहिती बोलणारा देऊ करतो, ती समग्रतेने संदर्भासहित समजून घ्यायला हवी. समजा, भर दुपारी आपल्याकडे आलेला एखादा माणूस म्हणाला की, ‘‘आज सकाळपासून मी कामं करीत िहडतो आहे. भावाने हे पुस्तक आजच्या आज तुमच्याकडे पोहोचवायला सांगितलं म्हणून कामे आटोपून लगेच तुमच्याकडे आलो.’’ तर हे बोलणं ऐकल्यावर त्यानं घेतलेल्या कष्टांची जाणीव व्हायला हवी. हा सकाळपासून िहडतो आहे, कदाचित भुकेला असेल, ही समज त्या वाक्यातील माहितीतून यायला हवी. आपण त्याला चहा, जेवणखाण या संदर्भात आपुलकीने विचारायला हवं. या संवादामुळे त्या क्षणी आपल्या आणि त्याच्यामध्ये चांगल्या भावनांचा पूल बांधला जातो. नात्याचा अंकुर उगवतो. या तऱ्हेचा संवाद म्हणजे एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या विचार भावनांचा आदर करीत झालेला कृतिशील संवाद असतो. तो नाती पक्की करीत जातो. भावनांचा ओलावा आपल्यालाही हवा असतो. संवादातून तो रुजतो. श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात की, बोलणं किंवा न बोलणं यापेक्षा तुम्ही काय ऐकता, ते किती हृदयापासून ऐकता, त्यावर प्रतिसाद कसा आणि कोणत्या शब्दात देता हे महत्त्वाचं असतं. आपलं बोलणं कसं असावं या संदर्भात श्रुतप्रज्ञ स्वामी एक संस्कृत श्लोकाचा दाखला देतात.
हितमं मितं प्रियं स्निग्धं मधुरं परिणामियत्। भोजनं वचनंचापि युक्तं मुक्तं प्रशस्यते।।
हितकर, आवश्यक तेवढंच, आनंददायी, प्रेमळ, परिणामकारक, गोडमधुर या गुणांनी युक्त असं आपलं बोलणं असावं असं या सुभाषितात म्हटलं आहे. त्या जोडीला सकारात्मकता, सुसंस्कृत, संयमी वाणी, राग-संताप-अपमान यांना वजा करणारं संभाषण असे आणखी तीन गुण श्रुतप्रज्ञ स्वामींनी जोडले आहेत.
* हितकर बोला : समोरच्याच्या हिताचं ते बोलायला हवं. समजा, त्याची चूक असेल तर ती त्याच्या नजरेला आणताना आपली भाषा सौम्य असावी. आपण श्रेष्ठ असल्याची भावना नसावी. अशी भावना शब्दातून, देहबोलीतून प्रगट झाली, अपमानास्पद भाषा वापरली गेली तर समोरची व्यक्ती आपलं काही चुकलंच नाही असा पवित्रा घेऊ शकते. आपलं कसं बरोबर आहे ते हिरिरीने मांडू शकते. भाषा अशी हवी की अमुक केलं तर अधिक लाभ होईल किंवा अधिक समाधान होईल हे समोरच्या व्यक्तीला पटायला हवं. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, ज्ञान, व्यक्तिमत्त्व, वय, त्याची प्रगल्भता हे सारं लक्षात घेऊन त्यानुसार विचार मांडावयास हवेत. लहान मूल जर कात्री-सुरीला हात लावू लागलं तर आईच्या बोलण्यात, देहबोलीत नाराजी प्रगट व्हायला हवी. पण मूल घाबरेल असा आवाज, अशी देहबोली नको. नाराजी पोहोचली की मूल योग्य तो बोध घेतं. आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसमोर मत मांडावं, सल्ला द्यावा, चर्चा करावी. व्यक्ती आपल्याहून वयाने, ज्ञानाने मोठी असेल तर नम्रता आणि आदर बोलण्यात प्रगट व्हायला हवा. तर हा संवाद फायदेशीर ठरतो.
* आवश्यक तेवढंच बोला : जास्त बोलणारी व्यक्ती दुसऱ्याचं ऐकून घेत नाही. संवाद होत नाही. संवाद हा सम+वाक् असतो. भावना, विचार, कल्पना, अनुभव इत्यादींचं आदानप्रदान असतं. समोरची व्यक्ती आपल्या बोलण्याने कंटाळत तर नाही ना, याचा अंदाज हवा. मोजकं व अचूक बोलणारी आणि इतरांचं शांतपणे ऐकून घेणारी व्यक्ती सगळ्यांना आवडते. श्रुतप्रज्ञ स्वामी असं म्हणतात की, जास्त बोलणाऱ्या व्यक्तीचं मन अस्थिर आणि चंचल असतं. जिथे बोलण्याची गरज आहे तिथेच बोलावं. जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या अनुयायांना भगवान महावीरांनी भाषा समितीचं सूत्र समजावलं. भाषा समिती म्हणजे संयम राखून भाषेचा योग्य वापर.
* आनंददायी बोला : सत्य बोलणं हितकार आहे, पण ते दुसऱ्याला धक्का देणारं, दु:ख देणारं नसावं. राजा भोज आणि कालिदास यांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा राजाच्या दरबारात एक प्रसिद्ध ज्योतिषी आला. राजाची कुंडली बघून त्याने म्हटलं, ‘‘महाराज, मी सत्य तेच सांगणार आहे तेव्हा मला अभय द्या.’’ राजाने अभय दिल्यावर तो म्हणाला, ‘‘आपले सगळे आप्तस्वकीय आपल्यासमोर मरतील.’’ हे ऐकून राजाला फार दु:ख झालं. तो ज्योतिषी निघून गेला. राजा दु:खीच होता. हे कळल्यावर कालिदास राजाकडे येऊन म्हणाला, ‘‘महाराज, मला आपली कुंडली बघू द्या.’’ राजाची कुंडली नीट पाहून कालिदास प्रसन्नतेने म्हणाला, ‘‘महाराज आपण फार भाग्यवान आहात. आपल्याला उदंड आयुष्य आहे. आपल्या कुटुंबात आपण दीर्घायुषी म्हणून जीवन जगाल.’’ हे ऐकून भोजराजाने स्वत:ला दु:खातून सावरलं. सत्य तेच होतं. कालिदासाची सांगण्याची तऱ्हा मात्र प्रिय होती. त्यामुळे संवाद आनंददायी ठरला.
* प्रेमळपणे बोला : आपलं बोलणं प्रेमळ, सभ्यतापूर्ण असावं. अति आग्रही, हट्टी, हेकेखोर, अरेरावी, हुकमत गाजवणारं बोलणं विघातक ठरतं. आपलं बोलणं दुसऱ्यावर लादलं गेलं, तर तो ते मनापासून कधीच स्वीकारणार नाही. स्वच्छ, शांत, प्रेमळ बोलणं आनंदाने स्वीकारलं जातं.
* गोड बोला : कडवट बोलण्याने, रुक्ष, रोखठोख भाषेने आपण दुसऱ्याला दुखावतो. शत्रुत्वाची भावना निर्माण करतो. कित्येकदा बाहेरच्या माणसांशी गोडगोड बोलून कुटुंबात आपण कटू बोलतो. त्यामुळे घरात ताण निर्माण होतो. गोड बोलतानाही सत्य व संयम विसरता कामा नये. उगाच खोटी स्तुती करून गोडगोड बोलणाऱ्या किंवा हुजरेगिरी करणाऱ्याच्या मनातील खऱ्या भावना लपत नाहीत. दुसऱ्याच्या अस्तित्वाचा सहज स्वीकार आणि त्याच्याबद्दल आदरभाव गोड बोलण्यात अंतर्भूत असावा.
* परिणामकारक बोला : बोलण्यातून परिणाम साधणार नसेल तर ते बोलणं निर्थक ठरेल. हेतुपूर्ण अत्यावश्यक मुद्देसूद बोलणं परिणामकारक ठरतं. एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करायचा असेल तर तो मात्र सोदाहरण मांडला पाहिजे. जास्त बोलण्याने परिणाम पातळ होतो. जड भाषा ऐकणाऱ्याला कंटाळवाणी ठरू शकते.
* सकारात्मक बोला : सकारात्मक बोलण्यातून मनाचा काळ सकारात्मक होतो. त्याचा उत्तम परिणाम होतो. एखाद्या आजारी माणसासमोर त्याच्या आजाराची गंभीर चर्चा करण्याऐवजी ‘तू लवकर बरा होशील, मी तुझ्यासाठी रोज प्रार्थना करतो आहे’ असं बोललं तर त्याला धीर येतो, मनोबल वाढतं. सकारात्मक बोलणं अपयशी माणसाला निराशेतून बाहेर येण्यासाठी मदत करतं. आपली भाषासुद्धा सकारात्मक हवी. खोटे बोलू नये म्हणण्याऐवजी खरं बोल म्हणणं जास्त योग्य.
* राग, संताप, िनदा, हेटाळणी बोलण्यातून वज्र्य करा : अपमानास्पद बोलणं जिव्हारी लागतं. शरीराचे घाव भरून येऊ शकतात. शब्दांनी झालेल्या जखमा मात्र द्वेष आणि शत्रुत्व निर्माण करू शकतात. कित्येकदा आपण रागाच्या भरात नको ते बोलून जातो आणि मग पस्तावतो. अशी वेळ शक्यतो येऊ देऊ नये. िनदा करू नये. इतरांकडे एक बोट रोखताना चार बोटं आपल्याकडे वळलेली असतात हे लक्षात असू द्यावं.
या साऱ्या बाबी लक्षात ठेवून संवाद साधला तर तो सार्थ ठरतो.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…