मागच्या लेखात शास्त्रशुध्द ॐकार साधनेतून त्रिकंठशुद्धी व आरोग्यवृद्धी कशी होते हे आपण पाहिले. या लेखात आपण जिव्हाशुद्धीचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व समजावून घेऊ आणि शास्त्रशुद्ध ॐकार साधनेतून जिव्हाशुद्धी कशी होते हे पाहू.
निसर्गत प्रत्येक व्यक्तीला नियतीने एक अतिशय खटय़ाळ, चंचल पण शक्तिमान इंद्रिय दिले आहे ते म्हणजे त्याच्या मुखात वास करणारी जीभ. जिला जिव्हा, वैखरी व इंग्रजीत टंग असे संबोधले जाते. जिभेचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व यासाठी कारण जीभ हे कर्मेद्रियही आहे. (मुख्यत बोलण्याच्या कार्यात जीभचे महत्त्वाचे कार्य आहे) जिभेच्या हालचालीशिवाय शब्दनिर्मितीच होणार नाही. कुणीही व्यक्ती बोलण्यातून आपल्या मनातील भावना व्यक्त करते. जीभ ज्ञानेंद्रिय पण आहे. कारण नियंत्याने जिभेलाच चव दिली आहे. त्यामुळे जिभेला रसना अशा नावानेही संबोधले जाते. जिभेला चव दिल्यामुळे आवडलेला अन्नपदार्थ व्यक्ती भरपेट खाते व आजारी पडते आणि जिभेलाच बोलण्याची क्रिया दिल्यामुळे मनाला वाटेल तसे बोलते व आजाराला निमंत्रण देते. काम-क्रोध-लोभ-मोह मद-मत्सर हे मानवाचे सहा शत्रू आहेत व त्या सहाही विकारांचा जिभेशी संबंध आहे. या सहाही क्रियांचे वेळेस जिभेची अलयबद्ध हालचाल तरी होते अथवा अलयबद्ध लाळ सुटते. म्हणूनच रसनानिग्रह म्हणजे जिभेवर ताबा मिळवणे ही निरामय आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची पण सगळ्यात कठीण गोष्ट आहे.
ॐकाराच्या शास्त्रशुद्ध उच्चारणात जिभेची अजिबात हालचाल होत नाही. ती स्वस्थावस्थेतील जिभेसारखी आहे त्या जागी स्थिर राहाते व ॐकारातील म्कार उच्चारणात ओठ मिटले गेल्याने ॐकाराची परमशुद्ध स्पंदने मुखाबाहेर न पडता उलटय़ा दिशेने मागे फिरतात व प्रथम आघात करतात ते साधक व्यक्तीच्या जिभेवरच. त्यामुळेच ॐकार साधकाची जीभ हळुहळू पातळ, चपळ, शक्तिमान व लयबद्ध होऊ लागते व ती साधक व्यक्तीच्या ताब्यात राहू लागते. त्यामुळेच आहार व उच्चार सात्त्विक होऊ लागतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या मनोविकारांवर ताबा मिळवणे सोपे जाते. म्हणूनच निरामय आरोग्याकडची वाटचाल सुकर होऊ लागते.
सारांश – ॐकार साधनेतून जिव्हाशुद्धी आणि जिव्हाशुद्धीतून आरोग्यवृद्धी..