‘‘चिकाटीने काम करणारी आणि ‘एस.टी.च्या दरात उपचार गावातच’ नव्हे तर घरात पोहोचवणाऱ्या ‘भारत वैद्य’ या महिला आरोग्य कार्यकर्त्यांनी अल्पावधीत आपली खास ओळख गावात निर्माण केली.’’ गेल्या ३० वर्षांपासून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ‘हॅलो’ या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या, त्यातून सामाजिक बदलाचे आव्हान पेलणाऱ्या डॉ. शुभांगी अहंकारी यांचे हे अनुभव.
तो काळ १९८०चा होता. मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये इतर सहाध्यायी मुलांबरोबर शिकत असताना अनेक तट-गट होते. डॉ. शशिकांत अहंकारींनी नोटीस बोर्डवर एक प्रश्नावली लावली व त्याच्यावर चर्चा करण्यास एकत्र बोलावले. दीड-दोनशे विद्यार्थ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. शिकणाऱ्या व अस्वस्थ असणाऱ्या डॉक्टर मंडळींचा एक चमू यातून तयार झाला तोच -HALO- Health & Auto Learning Organization. वैद्यकीय सेवेचा उपयोग गरिबांना, तळागाळातील उपेक्षित, वंचित जनतेसाठी झाला पाहिजे, हा उद्देश दुय्यम ठरत असल्याची जाणीव या साऱ्यांना अस्वस्थ करत होती. मग हळूहळू रविवारच्या दिवशी पदरमोड करूनही शिकणारी डॉक्टर मंडळी जवळपासच्या गावात जात व तेथे ग्रामसभा, ओपीडी, पोस्टर प्रदर्शन, लसीकरण, आरोग्याचे प्रश्न व त्यावर उपाय योजना आदींचे कार्यक्रम राबवत. अशी अनेक गावे पुढे आली. आपल्या प्रश्नांना भिडली व पुढे शेतीविषयक, पाणीविषयक प्रश्नांपर्यंत त्यांची मजल वाढली. चारशे ते पाचशे डॉक्टर्स ‘हॅलो’च्या चळवळीतून बाहेर पडले व त्यांनी आपल्या कामाचा अनेक गावोगावी ठसा उमटवला. ‘हॅलो’च्या चळवळीचे रूपांतर ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ या संस्थेमध्ये झाले. १९९२ साली समाजाभिमुख डॉक्टर नि वैद्यकाभिमुख समाज कसा तयार होईल, यावर त्यात मंथन झाले. आम्ही उभयतांनी डॉ. शशिकांत व मी अणदूर या गावी १९८३ला प्रॅक्टिस सुरू केली. त्या वेळची परिस्थिती भयावह होती. आजारपणात लोक व्रतवैकल्ये, अंगारे धुपारे नि ‘जाणत्या’कडे आधी जात. सरकारी दवाखान्यातल्या चपराशापासून ते मलेरिया वर्कपर्यंत सर्वच डॉक्टर असत. महारोगाचा प्रादुर्भाव बराच होता. क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय होते. २ मुले नि २ मुली असा कुटुंबाचा आकार होता. दर चार-पाच वर्षांनी दुष्काळाचा फेरा ठरलेला. पाऊसमान अत्यल्प. गुजराण केवळ शेतीवर. रस्ते व दळणवळणाची साधने कमी. औद्योगिकीकरणाचे नाव नाही. मराठवाडय़ात अनुशेष कायमचाच. शिक्षणाचे प्रमाण कमी. आजही शहराकडे कमवायला जाणारे, मजुरी करणारे बरेच जण उस्मानाबाद जिल्हय़ातले असतात. गावोगावी फक्त पाचवीपर्यंतच शाळा असत. मुलगी सातवीत जायला निघाली की धुती व्हायला गाठ पडे आणि तिची शाळा संपे. तिचे पुढे काय करायचे तर लग्न. सतरा वर्षांच्या पहिलटकरिणी दवाखान्यात येत. त्यांची समज नि कुवत बेताचीच असे. कुशीतले बाळ रडताना या मुलींना-आयांना उठवावे लागे की, ‘बाई गं तुझं बाळ रडतंय पाज त्याला.’ विशीच्या वयात नसबंदी झालेल्या तरुणी होत्या नि तिशीच्या आत गर्भाशयाची पिशवी काढण्याचे ऑपरेशन झालेल्याही काही तरुणी होत्या. काहींच्या नशिबी तर अठराच्या आत वैधव्याचे जगणे येई. गरोदरपणात तपासून घेण्याचे कोणाच्या गावी नसे. हिमोग्लोबिनचे प्रमाण ७-८ ग्रॅमपर्यंत जेमतेम. गर्भाशयमुखाचा कर्करोग तर फारच बळावला होता. आंतरतपासणी म्हटलं की, बायका घराकडे धूम पळत ते परत दवाखान्याचे तोंड पाहणार नाही या निश्चयानेच. अडलेली पाळी अशक्तपणामुळे, पांढरा पदर झालेल्या कामामुळे अशी त्यांची स्वत:ची समीकरणे असत. चुकलेल्या पाळीसाठी िलबाच्या बिया वाटून घेणे, पपईच्या बिया खाणे असे घरगुती उपाय हटकून वापरले जात. तरीही पाळी आली नाही तर दवाखान्याची वाट नि तोपर्यंत ती तीन ते चार महिन्याची गरोदर असे. पाच वर्षांची मुले अंगावर पिताना दिसत नि मग ते तोडण्यासाठी अघोरी उपायही. शुद्ध पाण्याचा अभाव, पटकी, कॉलरासारखे आजार, साप विंचू दंशाने प्राण गमावणारे, विष प्राशन करून मृत्यूला कवटाळणारे नि त्यात २००० पर्यंत सर्वासाठी आरोग्य ही हऌड या जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा! लोकांच्या सहभागाशिवाय नि प्रशिक्षणाशिवाय हे केवळ अशक्य होते. सामाजिक आरोग्याच्या मुद्दय़ावर इतके आलबेल होते की, कुठून काम करण्यासाठी सुरुवात करावी अशा संभ्रमात पडायला झाले.
त्यातच एका घटनेने मला कमालीचे अस्वस्थ केले. १९८३चा ऑगस्ट महिना होता. दवाखान्यावरून एक बँड वाजत गेला. लग्नसराई नसताना ही काय गडबड अशी विचारणा केल्यावर कळले की, सुज्ञाना हिची ‘मोठी चोळी’ म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. साडेसात महिन्यांची गरोदर सुज्ञाना जवळच्या गावी, तिच्या माहेरी जाण्यापूर्वी कर्ज काढून कार्यक्रम झाला होता. नवऱ्याला सोने, भटाला आहेर, पाहुणेरावळे यावर खर्च. दोन दिवसांत सुज्ञाना दवाखान्यात आली, ती कशी तर बेशुद्ध अवस्थेत, झटके देत. सुजून टम्म झालेली नि वाढलेले ब्लडप्रेशर. इतका मोठा कार्यक्रम करण्यासह थोडी तपासणी करून घेणे कुणाच्या गावीही नव्हते. खरं तर वजन, ब्लडप्रेशरच्या नोंदीच्या तपासणीतून या गुंतागुंतीची चाहूल आधी लागू शकते. तिची स्थिती पाहता तिचे बाळंतपण आत्ताच करावे लागणार, याचा अंदाज आला. तिच्यावर तातडीने उपचार करत तिला पाहणीखाली ठेवले. एक-दोन दिवसांत ती शुद्धीवर आली नि मला हायसे वाटले. खरं तर हे अज्ञान तिच्या माहेरचे, सासरचे सर्वाचेच होते. त्यानंतर एक महत्त्वाचा धडा शिकले. यानंतर येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रियांना तपासणीला येताना बरोबर दीर, सासू, नणंद, नवरा यांना घेऊन या, हे मी आवर्जून सांगायला सुरुवात केली. नऊ महिन्यांत करावयाची तयारी, तपासणी, उपचार व आराम याबद्दलचे सल्ले देताना मी लांब यादी देत असे. घट्ट वरण, पुरण, पालेभाज्या, मोडाची कडधान्ये, दाणे, शूळ, खजूर, दूधदुभते, फळे. एकदा एक रुग्ण धीर करून मला म्हणाली, ‘आम्ही सासुरवाशिणी, आम्हाला कोण देणार हे, आमच्याकडे तर चहा-साखरही कुलपात असते.’ मी हतबुद्ध. खूप तिखट, तेलकट म्हणजे चवीचे खाणे, खूप गोड चहा म्हणजे पाहुण्यांचे खरे स्वागत असे समज होते. जेवण एकसुरी असे. चौरस आहाराचा पत्ताच नव्हता. शिळ्या भाकरीशिवाय पोट भरत नसे, कारण कळू लागल्यापासून शिळ्याचा रतीब माहीत यांना. दही, दूध, ताक, लोणी, तूप बहुतेकांना आवडत नसे, कारण ते वाटय़ाला क्वचित येत असे कारण ते पुरुषांच्या पंगतीपुरते मर्यादित असे. ३६५ दिवसांपैकी १०० दिवस बायका अनेक कारणांनी उपवास करीत. ज्या कुपोषणावर महाराष्ट्रात गदारोळ झाला त्या कुपोषणाचे किती पदर आणि मुळे कोठवर!
‘उपचारापेक्षा मृत्यू स्वस्त, नि आजारापेक्षा उपचार अघोरी’ अशी गत. वेगवेगळ्या शतकांत जगणारी मंडळी, अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, रूढी-परंपरा आदी अनंत प्रश्न आ वासून समोर उभे. या पाश्र्वभूमीवर १९९३च्या प्रलयकारी भूकंपाची घटना घडली. त्या आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत करून आपल्याला काम करता येईल म्हणून हॅलो मेडिकल फाऊंडेशनने ‘भारत वैद्य’ प्रकल्प राबवण्याचे ठरवले. गावातून ८-१०वी शिकलेली महिला निवडून तिला निवासी प्रशिक्षण देऊन तिने गावात काम करायचे. वैयक्तिक स्वच्छता, परिसर, स्वच्छता, शौचालये, परसबागा, पाण्याचे शुद्धीकरण, जन्ममृत्यू नोंदी, साध्या आजारावर वेळेत उपचार, लोकांचे आरोग्य शिक्षण, गंभीर आजारांच्या प्रकरणात वेळेत मोठय़ा दवाखान्यात पाठवणे अशी कामे ‘भारत वैद्य’ महिला करू लागल्या. अशी महिला मिळणे, तिला घरच्यांनी परवानगी देणे हे ही दुरापास्त होते. त्या वेळी प्रशिक्षणासाठी डॉक्टर, नस्रेस, चळवळीतले कार्यकत्रे आवर्जून येत. बॉडी मॅपिंग, स्लाइड शो, गाणी, नाटके, कथाकथन, प्रश्नमंजूषा आदींच्या माध्यमातून विषय सोपे करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असे. सुरुवातीला यात अनेक अडचणी आल्या, पण महिलांनी यात रस घेतल्याने या उपक्रमाची महती वाढली. प्रशिक्षणास येणे म्हणजे या महिलांना माहेरपणास आल्यासारखे वाटे. भूकंपग्रस्तांना, सर्व गोष्टी मोफत मिळणाऱ्यांना नाममात्र मूल्यानेही ‘भारत वैद्या’कडून गोळ्या घेणे पटत नसे. मात्र बाकीच्या मदतीचा ओघ ओसरल्यावर त्यावर चिकाटीने काम करणारी आणि ‘एस.टी.च्या दरात उपचार गावातच’ नव्हे केवळ तर घरात पोहोचवणाऱ्या भारत वैद्य कार्यकर्त्यांनी आपली खास ओळख गावात निर्माण केली आहे. बायकांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण आता ९ ते १० ग्रॅमपर्यंत पोहोचत आहे.  स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार, िहसा यांबाबत उघडपणे बचत गटात चर्चा होऊ लागली. एच.आय.व्ही.च्या गोष्टी त्या समजावून घेऊ लागल्या. त्यातून किशोरी प्रशिक्षणाची कल्पना पुढे आली.
कानेगावच्या बचत गटाने बायकांच्या कर्करोगासाठी खास शिबीर आयोजित केले. बायकांनी तपासण्या, पॅपस्मिअर करून घेतले. दुसऱ्या दिवशी बचत गटातील एका सदस्य महिलेचा नवरा तिला म्हणाला, ‘कोणाला विचारून शिबिरात गेलीस नि १० रुपयेही दिलेस?’ त्याचा पारा चढला होता. बायकोने शांतपणे न भांडता, शिवीगाळ न करता परसाची वाट धरली. दावणीला बांधलेली म्हैस तिने सोडली. ती म्हशीसह रस्त्याच्या दिशेने चालू लागली. नवरा म्हणाला, ‘काय करतेस?’ ती उत्तरली, ‘गटाच्या कार्यक्रमाला दिलेले १० रुपये तुम्हाला चालत नाहीत तर त्यातून घेतलेली म्हैस कशापायी ठेवू, देते परत.’ नवरा वरमला नि ‘राहू दे राहू दे’ म्हणून आर्जव करू लागला. भारत वैद्यांनी, बचत गटांनी अशी अचूक नाडी पकडली होती. पंचायत राजची प्रशिक्षणे झाली. कोणाच्या हातचे प्यादे होण्यापेक्षा राखीव जागांसाठी महिला पुढे सरसावल्या. गावचा रस्ता, बस, पाणी, दिवाबत्ती, शाळा आदी प्रश्न त्यांनी धसास लावले. बचतीच्या पैशांचा उपयोग शिक्षण नि विकासासाठी व्हावा म्हणून प्रयत्न असे. त्यात अडथळे भरपूर असत. म्हणून वेगवेगळी अभियाने घेतली गेली. उदा. जल अभियान, व्यसनमुक्ती अभियान, बालविवाह प्रतिबंध अभियान, मुली वाचवा अभियान, लिंगभाव समानता अभियान इ. स्त्रियांवरील अन्यायासाठी तालुक्याचे समुपदेशन केंद्र संस्था चालवते. तेथे बायका येतात नि अनेक प्रश्नांची उकल होते. कुटुंब समुपदेशनातून अनेक तुटलेली घरे पुन्हा सावरली आहेत. बायकांनी अक्षरश: कात टाकली. ग्रामस्वच्छता अभियानाने काही गावांचा कायापालट झाला. मुली सायकली शिकल्या नि त्यांच्या जीवनात गती आली. थांबलेली शाळा पुन्हा सुरू झाली. आज बायकांना नीटनेटक्या, नटूनथटून, एकमेकींच्या सहकार्याने पुढे जाताना, धीटपणे बोलताना त्यांचा आत्मविश्वास जाणवतो नि वाढलेला आवाका लक्षात येतो.ज्यांनी हातात वही पेन घेऊन कैक वष्रे झाली, ज्यांनी गावाची वेस सोडाच पण घराचे उंबरठेही ओलांडले नव्हते अशा महिलांनी शैक्षणिक सहलीतून महाराष्ट्रातले प्रकल्प पाहिले. ज्यांना जेमतेम डोक्यावर छप्पर होते त्यांची टुमदार घरे झाली. गरिबी, अज्ञान, परंपरेचे जोखड, पुरुषसत्ताक वातावरणाच्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:ला सोडवून घेत या ग्रामीण भागांतील महिलांची घोडदौड अव्याहतपणे चालू आहे. तुटपुंज्या गोष्टीमध्ये हसतखेळत, अगत्याने, आनंदाने नि प्रांजळपणाने वर्तमानात जगणाऱ्या या साऱ्याजणी आम्हाला खूप भरभरून देतात. अशा अनेक घटनांची पुंजी सोबत घेऊन माझा प्रवास सुरू असतो. माझी जडणघडण सुरू असते. सार्वजनिक विवाह, सामुदायिक डोहाळे जेवण, सासू पुत्र नि सुनांचे स्वागत यातून घराघरातले संवाद वाढले. ‘सुरक्षित मातृत्व नि सुदृढ बाळ’ यासाठी भारत वैद्य गरोदर महिला दत्तक घेतात. लवकरात लवकर गरोदर मातेची नोंदणी, मातेच्या ३ ते ४ वेळा तपासण्या, १०० लोह व कॅल्शियमच्या गोळ्या, २ धनुर्वाताची इंजेक्शने, दवाखान्यातच बाळंतपण, अध्र्या तासात चिक दूध बाळाला पाजवून लसीकरण करून त्या जननी सुरक्षेचा हक्कही त्यांना मिळवून देतात. पाळणा लांबवायचा विचार करतात, माता व बालमृत्यू यात लक्षणीय घट झाली आहे.
सध्या संस्थेचे जानकी रुग्णालय अणदूर जि. उस्मानाबाद येथे कार्यरत आहे. दानशूर व्यक्तींकडून आलेल्या देणगीतून हे उभे राहिले आहे. लोकांना परवडणारी आरोग्य सेवा देण्याकडे आमचा भर आहे. आरोग्य विमा सुरू करणारी ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ ही पहिली संस्था आहे. गावोगावी काम करणाऱ्या ‘आशा’ भारत वैद्य आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य देखरेख प्रकल्पासाठी आता बायका पुढे सरसावल्या आहेत. आरोग्य हा आपला अधिकार आहे व तो कसा मिळेल याची धडपड या बहुआयामी कार्यक्रमांमधून आरोग्य सेवांचे लोकशाहीकरण होत आहे. या प्रकल्पांतर्गत संस्थेच्या कामाचा विस्तार तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट इथेही झाला आहे.‘मारत नाही तो दादला कसला? नि नवऱ्याने नाही मारायचे तर कुणी?’ इथून सुरू झालेला प्रवास आता ‘समजदार जोडीदार’ प्रकल्पापर्यंत येऊन पोहोचला आहे. संस्थेचे ए. एन. एम. नìसग स्कूल आहे. त्यातून मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहतात, १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न करायचे नाही म्हणून निर्धार करतात. संस्थेच्या शाळेतील मुलांसाठी वाचनालय व ग्रामीण विज्ञान केंद्र आहे. तेथे आजूबाजूच्या ३० शाळांमधली मुले प्रयोगासाठी येतात. २३ जानेवारीला या सर्वाचा वार्षकि मेळावा भरतो ज्याची सगळ्याजणी आतुरतेने वाट बघतात. यात आता पुरुषांचाही सहभाग वाढतोय. स्त्रियांवरील अन्याय कमी होण्यासाठी, जे सामाजिक उपाय वा उपक्रम राबवले जातात, त्यात पुरुषांचा सहभाग अधिकाधिक वाढवणं, हे आमचं पुढील ध्येय आहे.    ल्ल
संपर्क-  हॅलो मेडिकल फाउंडेशन,
 जानकी रुग्णालय, अणदूर
फोन नं.- ००९१-२४७१-२४६३८४
ई-मेल :-  hmf.andur@gmail.com

Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…
Uttar pradesh kruti raj
अन् तिने चेहरा लपवून केला पर्दाफाश, आरोग्य केंद्रातील दूरवस्थेची महिला IAS अधिकाऱ्याकडून झाडाझडती!