हृदयाघात नेहमीपेक्षा वेगळय़ा स्वरूपात येऊ शकतो. छातीत दुखणे, अस्वस्थता हे झालेच. पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यायला हवी. तसेच एकदा अँजिओप्लास्टी झाली म्हणून पुन्हा आजार वाढणार नाही, असे गृहीत धरून चालणार नाही. मात्र योग्य आहार-विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी, चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयाघात टाळू शकतात.
बॅडमिंटन खेळून एक ३६ वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनीअर घरी परतला तेव्हा अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि उलटीही झाली. हे काही तरी वेगळे असल्याची शंका त्याच्या पत्नीला आली म्हणून तिने अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. त्याला सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्युटेशनमुळे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन पुरवत रक्तपुरवठा देता येतो. हा अशा रुग्णांसाठी प्राथमिक उपचाराचा भाग आहे.) देत देत ते हॉस्पिटलला पोहोचले. परंतु उशीर झाला होता. यास म्हणतात अचानक झालेला हृदयाघात (Sudden Cardiac Death) यात अनेक वेळा पूर्व इशारा मिळत नसतो. मात्र सर्व हृदयाघात हे हार्टअ‍ॅट्क नसतात.
  हृदय शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव. विशिष्ट मांसाने बनलेला. त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाघात घडतो.
आणखी एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल. एका २७ वर्षांच्या तरुणाला अगदी सकाळी ६ वाजता छातीत दुखायला लागले. त्याने तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे धाव घेतली. त्या ठिकाणी केलेल्या ईसीजीमध्ये त्यास हृदयाघात झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, त्यानुसार लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आणि त्याची तातडीने अ‍ॅजिओप्लास्टी (व्यत्यय येत असलेला रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया) केली गेली. त्यामुळे साहजिकच धोका टळला आणि डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनी सुस्कारा सोडला.
  शुद्ध रक्तवाहिनीत आतील पदरात कोलेस्टेरॉल साठून रक्तवाहिनीची रुंदी कमी होते. काही वेळा रक्त गोठून पूर्णपणे प्रवाह बंद होतो व पुढील भागास रक्त न मिळाल्याने तो भाग निर्जीव होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, कोलेस्टेरॉल जास्त असणे व त्या सोबत तंबाखू, धूम्रपान-मद्यपान. अवेळी जेवणकामाचा ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे अल्प वयात हृदयाघातचे प्रमाण वाढलेले आहे. वयस्कर पुरुष व रजोनिवृत्त स्त्री आणि ज्यांच्या घराण्यात हृदयघाताचा प्रघात आहे. त्यांनी विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे.
 एका डॉक्टराने पोटात जळजळते म्हणून औषध घेतलं, परंतु दुपारी आपल्या डॉक्टर पत्नीकडे तक्रार केली की औषधाचा काहीही परिणाम झालेला नाही. तेव्हा त्या डॉक्टर पत्नीने तातडीने त्यांचा ईसीजी काढला आणि नंतरची धावपळ होऊन आठ दिवसांनी ते डॉक्टर ‘आयसीयू’मधून सुखरूप घरी परतले. सांगायचे कारण असे की हृदयाघात नेहमीपेक्षा वेगळय़ा स्वरूपात येऊ शकतो. छातीत दुखणे, अस्वस्थता हे झालेच. पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यावी. ज्या वेळी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तपुरवठा थोडा वेळ खंडित होतो व नंतर पुन्हा सुरू होतो तेव्हा छातीत दुखणे कमी होते, त्यास वैद्यकशास्त्रात Angina  म्हणतात.
  आपल्या पतीला मध्यरात्रीपासून छातीत दुखते आहे, आपण येऊन त्यांना बघाल का? अशी विनंती एका रुग्णाच्या पत्नीने डॉक्टरला केली. डॉक्टर म्हणाले की शक्यतो लवकर हॉस्पिटलला हलवा. माझ्या येण्या-जाण्यात वेळ होईल, परंतु त्या पत्नीस ते पटले नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. म्हणूनच हृदयाघाताची लक्षणे छातीत दुखणे, अस्वस्थता असताना रुग्णास विनाविलंब रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. अधिक विलंब झाल्यास हृदयाचा जास्त भाग रक्ताअभावी आपले काम थांबवू शकतो व त्याचा अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो Time is Muscle for Heart म्हणजे जेवढय़ा लवकर आपण रक्तपुरवठा पुनर्प्रस्थापित करू शकतो. तेवढा हृदयाचा अधिक भाग वाचू शकतो.
ज्या वेळी हृदयाच्या पंपाचे काम कमी कुवतीने होते व बंद पडते त्यामुळे दम लागतो, चक्कर येते, रक्तदाब कमी होऊन शॉक बसतो, हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात, तेव्हा डॉक्टर घाई करतात अशा वेळी त्यांचे म्हणणे ऐकावे. काही वेळा रुग्णाची स्थिती सुधारायची कशी याचा विचार न करता नातेवाईक स्वत:चे मत मांडण्यात वेळ वाया घालवताना दिसतात.
प्रामुख्याने हृदयघाताचे निदान रुग्णाची स्थिती संज्ञा, हृदयालेख अर्थात ईसीजी, रक्तातील ‘कार्डिअ‍ॅक इन्झायम्स ट्रॉपरी आय’ यावरून केले जाते.
उपाय – हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताची गुठळी दूर करण्यासाठी प्रथम रक्त पातळ करणारे औषध दिले जाते. त्यानंतर किंवा त्याला पर्यायी म्हणून रक्तवाहिन्यांत रंग भरून विशिष्ट ‘रे’द्वारे बघून अँजिओप्लास्टी करता येते. रक्तवाहिन्यांत आधी एक वायर पुढे सरकवली जाते व त्यानंतर त्याच मार्गावर फुगा फुगवून रुंदी वाढविली जाते व पुन्हा अरुंद होऊ नये म्हणून लोहजाळीची नळी (स्टेन्ट) तेथे ठेवली जातो व कॅथेटर काढले जाते. रुग्ण या स्थितीतून स्थिरस्थावर होताना किंवा झाल्यावर पुनश्च रक्ताच्या गुठळ्या तेथे होऊ नयेत म्हणून काही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. उदा- अ‍ॅस्पिरिन. या औषधांचे काही प्रतिकूल परिणाम जाणून घेणेही महत्त्वाचे असते. रुग्णाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास वा शौचास काळा रंग आल्यास आपल्या डॉक्टरांना सांगणे उचित असते.
प्रत्येक रुग्णाची वार्षिक वा द्विवार्षिक तपासणीदेखील नंतरच्या काळात करणे महत्त्वाचे असते. एकदा चार वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण अस्वस्थ वाटतंय म्हणून आला. अपचनाचे लक्षण वाटल्याने ते घरगुती उपाय रात्रभर करीत राहिले होते. ईसीजी काढल्यावर त्यांना पटले की ते हृदयाशी निगडित आहे. त्यांच्या रक्तवाहिन्या चार वर्षांपूर्वी चांगल्या होत्या व म्हणून स्टेन्ट घातले नव्हते पण नेमक्या त्याच रक्तवाहिनीचा प्रवाह बंद झाल्याने हे दुखणे वाढले होते. परत अँजिओप्लास्टी करून त्यांची तब्येत सुधारली. तात्पर्य, एवढेच की एकदा अँजिओप्लास्टी झाली म्हणून पुन्हा आजार वाढणार नाही असे होत नाही. काही रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टी करता येत नाही किंवा योग्य पर्याय नसतो, त्या वेळी बायपास सर्जरी सुचविली जाते.
योग्य आहार, विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी-चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयाघात टाळू शकतात व पुन्हा होऊ न देण्यासाठी मदतही करतात.

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…