एका मल्टिनॅशनल कंपनीत सुपरवायझरची १५ वर्षे नोकरी केली. उदारीकरणाच्या फटक्यात व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. माझी नोकरी गेली, पण नोकरी जाणं हा माझ्या छंदाचं करिअर बनवण्यासाठीचा टर्निग पॉइंट ठरला.
फेब्रुवारी १९९७, एका चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत सुपरवायझरची नोकरी होती. साधारण १५ वर्षे नोकरी केली. उदारीकरणाचा फटका आमच्या कंपनीलाही बसला आणि व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा नोकरी करायची नाही, काही तरी धंदा करायचा, असं ठरवत होतो, कारण मी स्वत: डिझायनर होतोच. ती कला मला उपजत होती, त्यासाठी खास काही प्रशिक्षण मला घ्यावे लागले नाही.
माझा एक खास मित्र, ज्याचा जॉब फिरतीचा असे, त्याने विचारले, ‘‘पुण्याला येतोस का?’’ कामधंदा नसल्याने मी लगेच एका पायावर तयार झालो. पुण्यातील भर बाजारात फेरफटका मारत असताना मला अनेक काचविक्री करणारी दुकाने दिसली. त्यांनी शोकेस केलेल्या विविध रंगीत काचा, डिझाइन्स पाहून माझे मन प्रफुल्लित झाले. अरे! या डिझाइन्स तर मी करू शकतो. मालकाकडे विचारणा केली, काचेवरील नक्षीकाम कोठे शिकता येईल; पण त्यांच्याकडून मला नकाराचेच उत्तर मिळत होते. या कामाचे रीतसर शिक्षण आपल्या देशात कोठेही उपलब्ध नाही. हे काम कोणत्या तरी काचेच्या कारखान्यात जाऊन शिकावे लागेल एवढंच कळलं.
माझा डिझाइनचा पोर्टफोलिओ तयार होताच. एका माणसाला मी सहज विचारले, कारण त्याचा भाऊ एका काच कंपनीत डिझायनर होता. तो म्हणाला, ‘‘अरे! संध्याकाळी माझ्या भावाला येऊन भेट. तो तुला मदत करील.’’ मी त्यांना भेटलो, त्याने मला १० पत्ते, फोन नंबर दिले. दुसऱ्या दिवशी घरचा लॅन्डलाइन जवळ घेऊन बसलो. प्रत्येकाला फोन केला, काही प्रस्थापित कारखानदारांनी नकार दिला, पण एक फोन असाही होता की, त्यांनी मला आपला पोर्टफोलिओ घेऊन येण्यास सांगितले. माझ्या डिझाइन्स त्या बाईने पाहिल्या आणि खूश झाली. मला तिने काही डिझाइन्स दिल्या आणि त्यावर काम करण्यास सांगितले. एका डिझाइनचे ती मला १५० रुपये मोबदला देत असे. तिथे मी साधारण सहा महिने काम केले. काचेवरील डिझाइन्स कशा करायच्या याचे ज्ञान व माहिती घेतली आणि आता आपल्याला हे काम स्वतंत्ररीत्या करता येईल हा आत्मविश्वास आला. त्यानंतर मी दोन महिने मुंबईतील मसजीद अब्दुल रेहमान स्ट्रीटवर सकाळी उठून जायचो. प्रत्येक काचेच्या दुकानात फिरलो, त्यांची माहिती घेतली. कच्चा माल कोठे मिळतो, त्याची किंमत किती, कोणत्या प्रकारच्या काच खरेदी करायच्या, त्यांची किंमत याची सविस्तर माहिती, त्यांचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन संध्याकाळी घरी आल्यावर डायरीत नोंद करत असे. पुन्हा ते काम स्वतंत्रपणे जमते का? त्यांची सॅम्पल्स बनविणे, त्या कामाला मागणी किती, आर्किटेक्टचे पत्ते, त्यांना जाऊन भेटणे, सॅम्पल दाखविणे अशा अनेक गोष्टी मी करीत राहिलो.
   आता या कामाला दोनशे चौरस फूट जागा तरी हवी होती. व्ही.आर.एस.ची रक्कमपण त्या दरम्यान हातात आली होती. जागा विकत घेतली आणि माझे काम सुरू झाले. पहिली ऑर्डर मला एका आर्किटेक्टकडून मिळाली. त्यांना माझे काम आवडले आणि अशी
माझी पुढील वाटचाल सुरू झाली. त्याच ओळखीने अनेक कामे मिळत गेली. आज मी या कामात प्रस्थापित झालो आहे. मागे वळून पाहाण्याची गरज भासत नाही. नोकरी करणे तर नाहीच. मला माझा स्वतंत्र धंदा करण्यात आनंद वाटतो. नोकरीपेक्षा किती तरी पटीने मी कमावतो. आज माझ्याकडे २-३ माणसे कामाला आहेत, काही कामे मी आऊटसोर्स करतो. इतरांनाही रोजगार मिळतो आणि मीही आनंदात आहे. नोकरी जाणं हा माझ्या आयुष्यातला छंदावरच करिअर बनवण्यासाठीचा टर्निग
पॉइंट ठरला.