मुलांबरोबरचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीला ‘ना हार ना जीत’ असं म्हणतात. संतापलेल्या डोक्यांनी योग्य मार्ग कधीही निघणार नाही. मुलं काय आपली शत्रू आहेत का भांडण करायला? ती भांडण्याच्या पवित्र्यात असली तरी आपण हसून, मुलाच्या पाठीवर हात फिरवून  समेट करावा.मुलं मोठी होत असताना अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात आणि पालक त्यांची उत्तरं शोधत असतात. समाजातला चंगळवादीपणाचा प्रवाह जोरदारपणे वाहतो आहे. त्याला आपण कुठवर तोंड द्यायचं? मुलांना शिस्त कशी लावायची? मुलं नकार मान्य करत नाहीत. आक्रमक होतात तेव्हा काय करावं?
लहान मुलं हट्ट करतात, रडतात, रुसतात तशी मोठी मुलं आक्रमक होतात. अशा वेळी पालकांनी पहिली महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे आपण आक्रमक न होणं. मोठं मूल अगदी आपल्याला मारायला लागण्याइतकं आक्रमक झालं तर त्याचे हात धरून ठेवा. हात धरून ठेवता येत नसतील तर दुसऱ्या कुणाची मदत घ्या, पण त्याला उलट उत्तर म्हणून मारू नका. त्याला शांत होऊ द्या आणि नंतर त्याच्याशी बोला. अशा कोणत्याही समरप्रसंगात रागवारागवी, भांडण, मारामारी, अपशब्द बोलणं या टाळण्याच्या गोष्टी आहेत. आपली इच्छा अशी असते की मुलांनी समजून घ्यावं एखाद्या गोष्टीला आपला का नकार आहे ते. रागावलेल्या मन:स्थितीत ते होणं शक्य नाही. शांत असताना बोललं की हे समजतं. रागावून प्रश्न अधिक बिकट होतात. राग येणं साहजिक आहे. पण त्याचं प्रदर्शन हिंसक व्हायला नको. मोठं मूल असं म्हणू शकेल की माझ्या मित्र-मैत्रिणींना मी सांगून ठेवलं आहे की आज बाहेर जेवायला जाऊ. आणि आता तुम्ही म्हणताय ‘जाऊ नकोस’ असं कसं चालेल? तुमच्याही नकाराला काही कारण आहे. काही पाहुणे जेवायला यायचेत. तुम्हाला मुलाची मदत हवी आहे. हे तुम्ही त्याला आधीच सांगितलेलं आहे, पण तो ते विसरला आहे. एक मार्ग असा आहे की त्याने सगळी कामं पटापटा करायची आणि मित्रांबरोबर थोडं उशिरा जाणं मान्य कारायचं. दुसरा मार्ग असा की दुसऱ्या मुलालाही कामं सांगायची.
ती वेळ निभावल्यानंतर या घटनेबद्दल शांतपणे एकत्र बसून बोलावं लागेलच. त्यात अशा ठरलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल? ही चर्चा हवी. त्याच्या शब्दाचा मान आपण राखला त्यामुळे त्यानंही आपला मान राखला पाहिजे. ती त्याची जबाबदारी आहे हेही त्याला पटलं पाहिजे. मूल लहान असलं की कसंही वागलं तरी लहान आहे म्हणून आपण सोडून देतो. त्याच्यावर रागवत नाही, पण मोठय़ा मुलांनी वेडंवाकडं वागलेलं आपल्याला चालतच नाही. त्याला हेही सांगावं की आतापर्यंत आम्ही तुम्हाला समजून घेतलं, पण आता तुम्ही मोठे आहात. तुमच्या वागण्यावर आमचं वागणं अवलंबून असेल. मी असं असं का म्हणतो आहे किंवा म्हणते आहे त्याच्यामागे काय कारणं आहेत ते मुलांनी समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे वागावं. त्याला काही विरोध असेल तर तो वेळीच सांगावा. प्रश्न सगळे शांतपणेच सोडवावेत.
मुलांबरोबरचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीला  ‘ना हार ना जीत’ असं म्हणतात. म्हणजे मतभेद झाले की दोन्ही पक्ष आपण जिंकावं या हिरिरीने वाद घालतात. वरच्या उदाहरणात मुलगा आईला मदत न करता निघून गेला तर तो जिंकला, पण आईला मदत करून तो नंतर मित्रांबरोबर गेला तर दोघंही जिंकले. नाहीतरी मुलांच्या बरोबरच्या भांडणात योग्य मार्ग निघावा अशीच आपली इच्छा असते. त्यानं मित्रांबरोबर जाणं रद्द केलं तर आई जिंकली असं होईल, पण मुलगा अस्वस्थ असेल. तेव्हा आईची पंचाईत न करता, मुलाच्याही मनाविरुद्ध न होता मार्ग निघणं महत्त्वाचं. संतापलेल्या डोक्यांनी योग्य मार्ग कधीही निघणार नाही. मुलं काय आपली शत्रू आहेत का भांडण करायला? ती भांडण्याच्या पवित्र्यात असली तरी आपण हसून, मुलाच्या पाठीवर हात फिरवून समेट करावा. मुलांबरोबर ‘शिवाजी म्हणतो’ म्हणजे मी सांगते तसंच वागलं पाहिजे हा खेळ खेळू नये आणि ‘रस्सीखेच’ हा खेळ चालू झाला तर आपल्या हातातली दोरी सोडून द्यावी, कारण मुलं फार चिवट असतात. त्यांच्यात भरपूर शक्ती असते.
मुलं मुळातच जन्मत: काही भांडकुदळ नसतात, आक्रमक नसतात, हट्टी नसतात. ती कोणाकडून तरी हे शिकतात आणि तसे प्रयोग करतात, त्यामुळे आपल्या घरात आपण असं वागायचं नाही हे त्यांना सांगत सांगतच मोठं करायचं असतं. लहानपणी त्यांना आपला खाऊ, खेळणी इतर कुणाला द्यायचं जिवावर येतं, कारण ती तेव्हा स्वार्थीच असतात. म्हणजे देण्यातली गंमत त्यांना कळत नाही. हे ‘माझं’ आहे, एवढंच कळतं. त्यांना पदार्थ शिकवावा लागतो. एक बाबा मुलाला खाऊ दिला की सांगायचे घरातल्या सगळ्यांना खाऊ दे अणि मग तू खा बरं का. हे एकदा अंगवळणी पडलं की मुलं ते प्रामाणिकपणे करतात. शेजारीसुद्धा खाऊ वाटून येतात. खेळण्यांवरून भांडण झालं तर ते खेळणं थोडा वेळ बाजूलाच ठेवावं.
अलीकडे मुलं फार चंचल झालीत. त्यांच्यात एकाग्र होण्याचा गुण नसतो, असं पालक सांगतात. आणि त्यावर उपाय म्हणजे योग शिकायला पाठवणं असं करतात. आपण एकाग्र कधी होतो आठवून पाहा. जेव्हा आपण आपल्या आवडीचे काहीतरी मनापासून करत असतो. तेव्हा आपलं इतर कुठेही लक्ष जात नाही. मुलांना हा अनुभव मुळात असतोच. लहान असताना ती खेळात रमून जातात. पण मोठेपणी न आवडणारा अभ्यास करताना ती चंचल होतात.
तेव्हा कायम सर्व वयाच्या टप्प्यांवर मुलांच्या आवडीच काहीतरी करणं आवश्यक असतं. संगीत, नृत्य यांसारखं काही आवडणाऱ्या मुलाची ती कला दुर्लक्षित होते आणि फक्त अभ्यास अभ्यास असा पालक हट्ट धरतात. एकतरी खेळ आणि एकतरी कला आपल्या आयुष्यात कायम असली पाहिजे म्हणजे एकाग्रतेचा प्रश्न येत नाही. अध्यात्मिक मंडळी ‘क्षणस्थ’ व्हा म्हणतात. याचा अर्थच आत्ताच्या क्षणाकडेच लक्ष देणं, लक्ष असणं असा आहे. काल काय घडलं, उद्या काय होईल याचा विचार सतत केला तर ‘आज’मध्ये जीव रमत नाही. मुले मुळात ‘क्षणस्थ’ असतात. तो गुण टिकायला हवा.
बरीच मुलं अंधाराला घाबरतात. कुठेही एकटी जायला घाबरतात. अशा वेळी त्यांना मुद्दाम एकटय़ाला जबरदस्तीनं पाठवू नये. मुलाला/मुलीला म्हणावं तुला अंधारात जायला भीती वाटते ना? चल आपण दोघं/दोघी हात धरून जाऊ या. अंधारात काय आहे बघ बरं. हा आपला पलंग आहे, हे कपाट आहे. हात लावून बघ. असं करता करता सवय होते अंधारात जायची आणि भीती जाते हळूहळू. याऐवजी ‘जा तू अंधारात. घाबरतोस काय? लहान आहेस का तू आता? घाबरट. तू एकटी/एकटा अंधारात जाऊन आलीस/आलास तरच तुला खाऊ मिळेल नाहीतर दादालाच सगळा देईन’ अशा धाकदपटशांनी त्यांचा गोंधळच उडेल.आपल्या लक्षात येतं की मुलांची भाषा हळूहळू बदलते आहे. त्यांच्या नव्या अनुभवांमुळे इंग्रजी माध्यमामुळे आणि मीडियाच्या परिणामामुळे त्यांच्या हालचालीही वेगळ्या होत आहेत. गोल गोल फिरणारी छोटी नात आजीला सांगते ‘आजी मी लोड होते आहे’ कारण ती लॅपटॉपवर हे नेहमीच बघत असते. आपणही पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपली भाषा बदलली पाहिजे, प्राचार्य लीलाताई पाटील यांनी लिहिलं आहे याबद्दल, त्याचा विचार करावा. – (सोबतची चौकट पहावी)
अनेकदा पालक विचारतात शिक्षा असावी की नसावी? शिक्षा आपण करतो ती शिस्त लागावी म्हणून. शिस्त बाहेरून लादण्यापेक्षा आतून निर्माण व्हायला हवी. तिला स्वयंशिस्त म्हणतात. मुलाला जर पटलं की आपण चूक केली आहे तर मूल आपण होऊन म्हणतं ‘माझी चूक आहे मी भिंतीकडे तोंड करून १० मिनिटं उभा राहतो.’ खाऊ देणार नाही, बाहेर नेणार नाही, असं म्हटलं तर त्याचा अर्थ आपण आपली पालकत्वाची सत्ता वापरतो आहोत. मुलाला कोंडून ठेवणं म्हणजे माझी ताकद तुझ्याहून जास्त आहे याचं प्रदर्शन करणं. रागावणं, मारणं हे तर वज्र्य आहे. आपलं उदाहरण समोर असावं. आपण म्हणावं, ‘आज मी एक महत्त्वाचं काम विसरले आहे. त्यामुळे मी शिक्षा करून घेणार आहे. आज मी दुपारचा चहा पिणार नाही’. तेव्हा शिस्त असावी पण ती घरातल्या सर्वात लहान व्यक्तीवर लादली जाऊ नये. मोठय़ांच्या आचरणातून ती लक्षात यावी हेच पालकत्वातलं मोठं कठीण काम असतं!
शोभा भागवत shobhabhagwat@gmail.com

 

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो