आपली पत्नी चवळीच्या शेंगेसारखी असावी अशी अनेक नवऱ्यांची सुप्त इच्छा असते. पण त्यासाठी तिला मदत करण्याची तयारी मात्र नसते. तिला समजून घेण्याची गरज नवऱ्यामंडळींमध्ये कधी येणार हा प्रश्नच आहे.
परवा माझ्याकडे एक-दीड वर्षांच्या बाळाचे बाबा पत्नीला घेऊन आले होते. त्यांचं सांगणं होतं, ‘माझी बायको फार जाड झाली आहे. तिला पुन्हा लग्नाच्या वेळी होती तेवढी होण्यासाठी औषधे द्या. पहिलं बाळंतपण झालं आणि ती अशी बेढब झाली. किती वेळा सांगितलं, काही परिणामच नाही.’ ते विनंतीवजा तक्रार करत होते आणि ते ऐकताना ती मात्र शांत होती.
मी त्यांना म्हटलं, ‘अहो, ही काय कायमची अशी राहणार नाही. बाळंतपणाचं बाळसं उतरायला काहींना वेळ लागतो. बाळ जसं जसं मोठं होऊ लगेल, तसं तसं त्याच्या मागे धावपळ करताना ही आपोआपच कमी होईल.’ एकीकडे तिलाही आहारातले हाय कॅलरीज असलेले पदार्थ कमी करायला सांगितले. आत्ता वजन कमी करायला औषधांची गरज नाही हे मी त्यांना पटवून सांगत होते. पण ‘नवरोबा’ मात्र, ‘ही फार जाड झाली आहे, किती खराब दिसते ही’ ही जपाची माळ ओढतच होते. मुळात त्या तरुणीला लग्नापूर्वीही मी ओळखत असल्याने मला हे नक्की माहीत होतं की तेव्हाही ती कधीच ‘चवळीच्या शेंगेसारखी बारीक’ या गटात मोडणारी नसून तिच्या माहेरचेही सगळे जण जरा जास्तच सुदृढ या वर्गवारीत बसणारे होते. लग्नातही हा मुलगा अंगयष्टीने तिच्यापेक्षा नाजूकच दिसत होता. तेव्हा त्याला हे मुद्दे सुचले नाहीत, पण आता ती हक्काची बायको झाल्यावर तिला कितीही टोचून बोललं, तरी काय फरक पडतो?
साधारणपणे आपल्याकडे लग्नापूर्वी बारीक असलेली मुलगीदेखील लग्नानंतर आणि पहिल्या बाळंतपणानंतर ‘वजनदार’ होते व नंतरही कायम थोडी जाडच राहते. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. प्रयत्नपूर्वक पुन्हा पूर्ववत होण्यासाठी झटणाऱ्या थोडय़ाच. याला बरीच कारणं त्या त्या घराच्या चालीरीतींवर व माणसांच्या विचारधारेतच सापडतात. ‘बाळ अजून लहान आहे’ या कारणास्तव बाळंतपणाची विश्रांती लांबत जाते. या काळात शरीराची ‘झीज भरून काढण्यासाठी’ दिलेले पौष्टिक लाडू, तूप प्रमाणात न राहता अंगावरची चरबी वाढवतात. खरं तर या काळात गरज असते ती फक्त रोजच्या आहारातील लोह व कॅल्शियमयुक्त पदार्थ वाढवण्याची. बाळंतपण हे आजारपण नसून ही स्त्रीची एक नसíगक अवस्था आहे हे लक्षात घेऊन आपली झोप (बाळाच्या झोपेच्या वेळेशी जुळते घेऊन) पुरेशी झाल्यावर घरात फिरणे, वाचन करणे, घरातली हलकी कामे करणे, घरच्यांशी गप्पागोष्टी करणे या सर्व गोष्टी सुरू करण्यास काहीच हरकत नसते. पण काही कारणाने शारीरिक चलनवलन आणि खाण्यातल्या कॅलरीज यांचा समतोल बिघडला, की वजन लवकर उतरत नाही.
थोडक्यात काय, या वजनवाढीच्या अवस्था तात्कालिक असतात. थोडय़ाच दिवसांत बाळ इकडेतिकडे रांगू लागले, की त्याच्यामागे धावताना, ऊठबस करताना आईला सारखं डोळ्यात तेल घालून सदैव जागरूक राहावं लागतं. कारण परिणामांची कल्पना नसताना विलक्षण वेगाने धावणारं ते एक निष्पाप वारू असतं. त्याला वाढवताना होणारा शारीरिक व्यायामच आईला पूर्ववत शरीरयष्टीचं बनवायला पुरेसा असतो. पण हे लक्षात कोण घेतो? काही बालरोगतज्ज्ञांच्या मते तर, जोपर्यंत आई स्तनपान करीत आहे तोपर्यंत तिचे वजन कमी होता कामा नये, नाही तर मुलाच्या दुधावर विपरीत परिणाम होतो.
बाळंतपणानंतरचे तात्कालिक ‘जाड’पण, तिच्या जाडपणाची माहेरून असलेली आनुवंशिक पाश्र्वभूमी हे मी त्यांना समजावून सांगितले पण तरीही त्याचे समाधान झाले नाही. तिच्या लग्नाच्या वेळेच्या प्रकृतीचीही मी आठवण करून दिली. कमी कॅलरीज देणारे कोणते पदार्थ खावेत हे पण मी तिला सांगितले. तरीही शेवटी एक शेलकी वाक्य नवऱ्याने आपल्या मनाच्या खदखदणाऱ्या पोतडीतून बाहेर काढलेच. ‘कित्ती गोष्टी करायला सांगितल्या हिला, पण काही बारीकच होत नाही. नाही तरी आम्ही ऑफिसला गेल्यावर काम काय असतं यांना घरी?’
अरे वा! लहान मुलं सांभाळणं, मोठय़ा व समवयस्क माणसांचे डबे, म्हाताऱ्या माणसांची सेवा, घराची आवराआवर, पाहुणेरावळे, सणवार, दोन तीन वेळचे खाणे बनविणे, बँकांची कामं, बिलं भरणं या सर्व गोष्टी करताना चोवीस तासांचा जॉब असलेली ‘घर’ ही एक संस्था आहे, हे अशा माणसांना कधी कळतच नाही. राबणारे हातही कधी दिसत नाहीत किंवा ऑफिसचं नऊ ते पाच करून आल्यावर या घरच्या आघाडीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करावंसं वाटतं. अर्थार्जनाला घराबाहेर पडलेल्या पुरुषाला कष्ट, ताण नसतात, असं मला बिलकुल म्हणायचं नाही; पण आपण घराबाहेरची एक बाजू सांभाळत असताना गृहिणी असलेली आपली बायको घराशी संबंधित कामांची सर्व बाजू तोलून धरते यात तिचेही काही कर्तृत्व आहे, योगदान आहे याची जाणीव किती पुरुषांना होत असेल? ‘आज तू काम करून दमली असशील, मी तुला मदत करतो’ असे चार समजुतीचे, प्रेमाचे शब्द किती गृहिणींच्या वाटय़ाला येत असतील?
मी हा विचार करत असतानाच समोरच्या गृहस्थांनी अजून एक अस्त्र काढलं, ‘मी हिला किती वेळा चालण्याचा व्यायाम करायला सांगितला, पण हिला काही करायलाच नको.’ बायको तरीही शांतच होती. चालायला जाण्यासाठी सर्वात सोयीची वेळ म्हणजे सकाळ किंवा ऊन उतरल्यानंतर संध्याकाळ. दोन्ही वेळची तिची घरातली कामं तिच्या नजरेसमोर दिसत होती. मी तिचा चेहेरा वाचला आणि तत्काळ तिला सल्ला दिला, ‘तू एक कर. सकाळी सहा ते सात चालण्यासाठी घराबाहेर पड. प्रथम अर्धा तास, मग हळूहळू वाढव. त्या वेळेतली घरातली कामं-सासूबाई सासरे, दीर-जावा आणि ‘हे’ बघतीलच. नोकरीला जाणाऱ्यांचे डबे भरणं, बाळ उठलं तर त्याची शी-शू, आंघोळ, खाणं-पिणं, घराचे केरवारे हे सगळं तू चालून येईपर्यंत घरचे सगळे जण करतीलच. तू तुझ्या चालण्याकडे लक्ष दे. घरची काही चिंता करायची नाही. अगदीच तुला सकाळी जाणं अवघड वाटलं, तर संध्याकाळी साडेपाचला बाहेर पड. नोकरीवरून आलेल्या माणसांचं खाणंपिणं, चहापाणी, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी हे सगळं घरचे करतील. फक्त ‘हे’ घरी येतील तेव्हा त्यांना हातात चहा द्यायला तू नसशील; पण हे सगळं सांभाळून घेतील. वाटलं तर तू येईपर्यंत बाळालापण बघतील. तू तुझ्या चालण्याचं व बारीक होण्याचं बघ. तुझी वेळ झाली की तू निघ, जराही हयगय करू नकोस हं!’
हा सल्ला – दोन-अडीच र्वषच लग्नाला झालेल्या एकत्र कुटुंबातील सुनेला, दीड वर्षांच्या बाळाच्या आईला, पुरुषप्रधान विचारसरणीच्या घराला ‘माननीय’ होता की नाही हे मला माहीत नाही, पण बारीक होण्यासाठी लागणारे कष्ट ती करत नाही अशी प्रामाणिक (?) तक्रार करून सतत जाडीवरून टोचून बोलणाऱ्या नवऱ्याला – त्यासाठी आपल्याकडून व आपल्या कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या वेळाचं, सहकार्याचं सुयोग्य भान वेळीच आलं आणि तो निरुत्तर झाला.
सकाळ-संध्याकाळच्या चालण्याच्या वेळातील घरच्या कामांची यादी मूकपणे वाचणारे तिचे डोळे – माझ्या सल्ल्यातला उपरोधिकपणा लक्षात येऊन आता हसरे झाले होते!

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो