आपले ‘मानवत्व’ जर शाबूत ठेवायचे असेल तर आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे बघता आले पाहिजे. एक प्रकारचे सिंहावलोकन केले पाहिजे. त्यातूनच नवीन जाणिवा निर्माण होतील. भूतकाळाचे मूल्यमापन करता येईल. भूतकालीन घटनांचे शैक्षणिक मूल्य ध्यानात येईल. त्या केवळ घटना न ठरता शिकण्याच्या संधी होतील आणि आपल्याला हवा तसा भविष्यकाळ निर्माण करण्याची, आपल्याच भवितव्याची व आपल्या मुलांच्या भविष्याचे नियंत्रण करण्याची साधने शोधता येतील. अन्यथा आयुष्याच्या शेवटी ‘कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे’ असे म्हणण्याची वेळ येईल.
पूर्वजन्मावर माझा विश्वास नाही. आपल्याला एकच आयुष्य मिळतं. गंमत म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या या चित्रफितीला पॉझचे बटण नसते. तसे असते तर क्षणभर उसंत घेऊन कसं जगायचे, पुढचा क्षण कसा घालवायचा यावर विचार करता आला असता. असं ठरवण्याची उसंत आयुष्य आपल्याला कधीच देत नाही. अनेक वेळा असं वाटतं की आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्याची चित्रफीत जर रिवाइंड करता आली तर आपण फारच वेगळ्या तऱ्हेने जगलो असतो. आपल्या नकळत काहीशा अनवधानाने आपली मुले आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. मुले भराभर मोठी होतात. त्यांच्यावरच्या निरपेक्ष प्रेमाची जागा त्यांच्याविषयीच्या अपेक्षा घ्यायला लागतात. आता त्याने काहीही केलेले चालेनासे होते. जर हे केलं तरच तुला ते मिळेल, अशी जर-तरची भाषा सुरू होते. थोडक्यात अवर्णनीय आनंद देणारे ते मूल आता तसे न राहता आपल्या आर्थिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक अस्तित्वाचा भाग होऊ लागतं. आई-वडिलांची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमा उंचावण्याची किंवा कमीत कमी तो न ढासळू देण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे त्या मुलांवर येते. हळूहळू निव्र्याज प्रेमाला फाटा देऊन अपेक्षांना व सामाजिक स्थानाला जास्त महत्त्व प्राप्त व्हायला लागते. मूल मात्र त्याच निरपेक्ष प्रेमाच्या शोधात असते जे त्याला लहानपणापासून/ जन्मापासून मिळत होते. खरोखरच आयुष्य रिवाइंड करता आले तर यापैकी बऱ्याच गोष्टी आपण वेगळ्या तऱ्हेने करू यात शंका नाही, पण ते अशक्य आहे. तेव्हा आपल्या हातात काय आहे निव्वळ जे घडते ते बघत बसण्याचे आणि आयुष्याच्या शेवटी ‘कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे’ असे म्हणण्याची वेळ येऊ द्यायची की काहीतरी नवीन वेगळ्या स्फूर्तिदायक अशा नवीन उन्मेषाने पुढील आयुष्यावर चालून जायचं हे ठरवता आलं पाहिजे.
 सुदैवाने माणूस म्हणून आपल्याकडे हा दुसरा पर्याय नेहमीच शिल्लक असतो. माणूस हा प्राणी असला तरी माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. जो त्याला त्याचे माणूसपण बहाल करतो. मानव हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला स्वत:च्याच अस्तित्वाची जाणीव आहे. म्हणजे क्षणभर असे करा जे काही करत असाल ते थांबवा, स्तब्ध व्हा आणि स्वत:चच निरीक्षण करत राहा. इथे बसलेला हा माणूस कोण आहे, त्याला आयुष्यात काय करायचे आहे? आत्तापर्यंत काय केले? कुठे केले? काहीतरी वेगळे हा करू शकेल काय? तसेच करायचे असेल तर त्याने काय पावले उचलली पाहिजेत? थोडक्यात स्वत:चे त्रयस्थपणे मूल्यमापन करण्याची ही क्षमता फक्त माणसात असेल. पण वर्षांनुवर्षे एखाद्या प्राण्यासारखे आपण जगत राहतो. समोर येईल किंवा जे अतिशय महत्त्वाचे वाटेल ते करत राहतो, का? कशासाठी? उद्देश काय? हे प्रश्न आपण रोजच्या रामरगाडय़ात कधी विचारतच नाही. थोडक्यात आयुष्य जगण्याच्या नादात आपले माणूसपणच आपण हरवून बसतो.
आपले ‘मानवत्व’ जर शाबूत ठेवायचे असेल, तर आपल्या आयुष्याकडे त्रयस्थपणे बघता आले पाहिजे. एक प्रकारचे सिंहावलोकन केले पाहिजे. त्यातूनच नवीन जाणिवा निर्माण होतील. भूतकाळाचे मूल्यमापन करता येईल. भूतकालीन घटनांचे शैक्षणिक मूल्य ध्यानात येईल. त्या केवळ घटना न ठरता शिकण्याच्या संधी होतील आणि आपल्याला हवा तसा भविष्यकाळ निर्माण करण्याची, आपल्याच भवितव्याची व आपल्या मुलांच्या भविष्याचे नियंत्रण करण्याची साधने शोधता येतील. तेव्हा क्षणभर आपण माणूस व्हायचे ठरवू या. असे आपल्या मुलांच्या संदर्भात जर केले तर पहिली तुम्हाला जाणीव होईल ती तुमच्या त्याच्यावर असलेल्या आणि एकेकाळी संपूर्णपणे व्यक्त होत असलेल्या प्रेमाची किंबहुना त्यात व्यक्त करण्यासारखे काय आहे. त्याला माहीत असायलाच हवे एवढे सगळे करतोय ते त्याच्यासाठीच ना? या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी तुम्ही ते प्रत्यक्ष व्यक्त करायला काही हरकत आहे का? केल्याने काही नुकसान तर होणारच नाही. उलट एकमेकांभोवती कळत- नकळत उभारलेल्या संरक्षण भिंती जमीनदोस्त होतील आणि खऱ्या अर्थाने सुसंवाद होऊ शकेल. एक प्रकारचा निकोप सुसंवाद साधायला अनुरूप अशा वातावरणाची निर्मिती होऊ शकेल. मग तो किंवा ती स्वत:च तुम्हाला विचारेल तुमच्या अपेक्षा काय आहेत? त्यामागील कारणे काय? तुम्ही पण त्याला किंवा तिला विचारू शकाल. तुला आयुष्याकडून काय हवे? कशात तुला आनंद मिळेल? तसे व्हावे म्हणून पालक म्हणून मी काय करू शकतो? आत्तापर्यंत तुम्ही काय चुका केल्या आहेत? यापुढे त्या कशा टाळता येतील? याची कबुली देता येईल. एखादी गोष्ट ती चुकीची होती हे कबूल केल्यामुळे ती चूक जरी नष्ट होत नसली तरी तिच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळू शकते. अशा वेळी भूतकालीन घटनांचा कडवटपणा, वैषम्य सगळे मिटून जाते आणि एका निकोप नवीन नात्यांची निर्मिती होऊ शकते. गंमत म्हणजे हे आपल्याला केव्हाही करता येते. त्यासाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. हा लेख वाचायचे थांबवा. आजूबाजूला मुले असतील तर मी म्हणालो ते करा आणि त्यानंतर हा लेख पुन्हा वाचा. एका वेगळ्याच आनंदाने तुम्ही पुढचे वाचन कराल याची मला खात्री आहे.
यापूर्वीच्या लेखांमधून बऱ्याच पालकांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांच्या मते ज्या मुलांविषयीच्या समस्यांचे ते निराकरण करू इच्छित होते, त्या मुलांनी त्यांना काही मानसिक समस्या आहेत हेच कबूल करायला नकार दिला आणि त्या मुलांना माझ्याकडे घेऊन येण्याची शक्यताही मावळली आणि त्यात मला तरी अजिबात आश्चर्य वाटले नाही. पालक आणि पाल्यामधला हा जो ब्रेकडाऊन पाहायला मिळतो त्यावर उपाय म्हणून मी जे काही लिहिले आहे त्याचा विचार करावा. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधायचा असेल तर तुमची त्याच्याविषयी असलेली सर्व मते (पूर्वग्रह) दूर ठेवायची तयारी ठेवा. एका तुम्हाला संपूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीशी तुम्ही बोलता आहात. त्याच्याविषयी असलेल्या तुमच्या अपेक्षा वर्णन करण्यापेक्षा तुमच्या त्यांच्याविषयीच्या भावना आधी व्यक्त करा. त्यातून निर्माण होणाऱ्या वातावरणात एकमेकांबद्दलचा विश्वास वाढून मुले तुम्हाला हवं ते करण्यास जर ते त्यांना पटले तर उद्युक्त होतील. हे करत असतानात कदाचित तुमचे म्हणणे त्याला पटणार नाही ही शक्यता गृहीत धरून न पटण्याचे स्वातंत्र्यसुद्धा त्यांना द्या, तरच सुसंवादाची शक्यता निर्माण होईल.
साधारणपणे सर्व मध्यमवर्गीच्या आपल्या मुलांविषयीच्या यश-अपयशाच्या कल्पना त्यांच्या शैक्षणिक यशाशी निगडित असलेल्या आपण पाहतो. या लेखामालेची सुरुवात आय.आय.टी. जेईईसारख्या स्पर्धा परीक्षेला तोंड कसे द्यावे यातून झाली. स्पर्धात्मक परीक्षांचे आव्हान मनापासून स्वीकारता आलेच पाहिजे व आपला मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास त्यातून घडवता आला पाहिजे. त्यासाठी कुठल्या तऱ्हेचे मनोव्यापार आवश्यक आहेत, काय करायला हवे वगैरे याआधीच्या लेखांमध्ये मी स्पष्ट केलेच आहेत, परंतु एक गोष्ट इथे सांगायलाच हवी की आपण मध्यमवर्गीय एक विसरतो की, ज्या तऱ्हेचे शिक्षण आपल्याला शाळा- कॉलेजात मिळते, ज्या तऱ्हेच्या परीक्षा पद्धतीला आपण सामोरे जातो त्यात पारंगत असलेली बरीच मुले शैक्षणिक जगात यशस्वी होताना दिसतात. पण आर्थिक यश त्यांना मिळेलच असे नाही. शैक्षणिक, नैपुण्याचा उपयोग किमान सुरक्षित अशी जीवनशैली किंवा जीवनमान मिळवण्यासाठी जरूर होतो. पण त्यापलीकडे काहीच नाही. खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे यशस्वी म्हणवून घेण्याची, कर्तृत्व व आर्थिक ताकद असते त्या बहुतेक व्यक्ती शैक्षणिक जगतात बहुधा नगण्य असल्याची अगणित उदाहरणे आहेत. ११ वी, १२ वीत प्रथम येणारी किंवा आय.आय.टी.तसुद्धा गेलेली किती मुले जगप्रसिद्ध उद्योजक किंवा संशोधक झालीय हा एक संशोधनाचा विषय आहे.
आपली शिक्षणपद्धती लॉर्ड मेकॉलेने सुमारे २०० वर्षांपूर्वी ब्रिटिश साम्राज्यासाठी राबणाऱ्या कारकुनांची फौज निर्माण करण्यासाठीच निर्माण केली हे विसरता कामा नये. या पद्धतीत उत्तम कारकून सेक्रेटरी, जास्तीत जास्त आय.ए.एस. पब्लिक सर्व्हट करण्याची कॅपॅसिटी आहे. थोडक्यात दुसऱ्या माणसाला श्रीमंत करण्यासाठी आपल्याकडे जे गुण असायला हवेत, ते आत्मसात करायला मदत करणारी ही शिक्षणपद्धती आहे. पैसे कसे कमवावेत, आर्थिक यश कसे मिळवावे याची झलकदेखील यात मिळत नाही. बिल गेट्स, फोर्ड, वॉरेन बफे, मित्तल ब्रदर्स असे अनेक उद्योजक जे आज जग चालवतात, त्यांचे शैक्षणिक यश यथातथाच होते. तेव्हा धडेच्या धडे पाठ करून त्यांची पाठ केलेली उत्तरे परीक्षांमध्ये मार्क्‍स मिळवणाऱ्यांची फौज खरोखरच हुशार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा शैक्षणिक जगातल्या यशाबद्दल हे अतीव आकर्षण जे मध्यमवर्गाला आहे ते कमी झाले पाहिजे. त्यापेक्षा या जगात आर्थिक व सामाजिक यश मिळवण्यासाठी आवश्यक अशा शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आजच्या राजकारणात आपल्या तथाकथित हुशार मुलांचा सहभाग नगण्य आहे. खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी म्हणजे शैक्षणिक, वैचारिक व सांपत्तिक पातळीवर आपला श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी लागणारे जीवन शिक्षण आजच्या व्यवस्थेत नाही. हे शिक्षण कसे असायला हवे. निदान अशा प्रशिक्षणातून काय अपेक्षा ठेवाव्यात. त्याची रचना काय असायला हवी आणि मुख्य म्हणजे आपल्या पाल्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन जगावे यासाठी कुठल्या गोष्टींची पूर्तता आपण पालक म्हणून केली पाहिजे हे आपण पुढील काही लेखांत पाहूया!    
 pmjakatdar@gmail.com