‘आपल्यापैकी कुणीच निसर्गापेक्षा मोठं नाही. मग निसर्गानं निर्माण केलेलं काहीही चुकीचं किंवा कुरूप म्हणायचा आपल्याला अधिकारच काय?’ तिच्या शब्दांनी अनेक दरवाजांची एकच चावी असावी तसं आतलं बरंच काही ‘बंद’ उघडायला लागलं. त्यातून खऱ्या सुंदर असण्याकडे घेऊन जाणारा एकमेव मार्ग मला दिसतो आहे, तो म्हणजे, आपल्याला निसर्गानं जे दिसणं दिलं आहे त्याच्यापाशी कुठे ना कुठे येऊन थांबावं लागेल. सगळय़ांनाच, मलाही.
लहानपणी बाबांची बदलीची नोकरी होती. त्यामुळे वेगवेगळय़ा गावांमधल्या अनेक वेगवेगळय़ा शाळांमध्ये गेले मी. मला नाच करायला खूप आवडायचा. त्यामुळे जाईन त्या शाळेमध्ये लोकनृत्याच्या स्पर्धेच्या निवडीकडे मी डोळे लावून असायचे. कुठल्याही शाळेत माझा नाच बघताक्षणी बाई मला नाचात घ्यायच्याच. एका गावातल्या एका शाळेत मात्र काहीसं वेगळंच घडलं. नव्या शाळेत गेल्या गेल्या मी नाचाच्या निवडीची सूचना कधी लागते याची वाट पाहत होते. ती काही लागली नाहीच, पण एके दिवशी बाई वर्गात येऊन म्हणाल्या, ‘‘उद्या तमुक वर्गात लोकनृत्य स्पर्धेसाठी मुली निवडण्यात येतील. तेव्हा सगळय़ा सुंदर मुलींनी उद्या तिथे या.’’ मला जरा गोंधळल्यासारखं झालं. बाई ‘‘नाच येणाऱ्या मुलींनी तिथे या’’ असं का नाही म्हणाल्या? शिवाय मी इतकी लहान होते की तोवर मी सुंदर आहे की नाही हा प्रश्न मला कधी पडलाच नव्हता. मला नाच तर करायचाच होता, त्यामुळे मी ठरवलं, ‘‘उद्या सुंदर दिसायचंच!’’ मी घरी येऊन आईला म्हटलं, ‘‘आई, मला उद्या सुंदर बनव, सुंदर मुलींना नाचात घेणार आहेत.’’ आई हसून म्हणाली,‘‘बनवायचं काय त्यात, तू आहेस तशी सुंदरच आहेस.’’ मग मला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी आईनं छान छान वेण्या घालून दिल्या. मी छोटीशी टिकली लावली. डोळय़ांत काजळ घातलं आणि माझी खात्री पटली, ‘मी तर सुंदरच दिसते आहे.’ त्या आनंदात तरंगत मी त्या दिवशी शाळा सुटल्यावर नाचाच्या निवडीसाठीच्या वर्गात शिरले. वर्ग माझ्यासारख्याच सुंदर मुलींनी भरून गेला होता. आम्हाला शाळेत एक कविता होती,
‘‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो.
सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी..’’
मी माझ्या आसपासच्या किलबिलणाऱ्या मुलींकडे पाहिले. काही गोऱ्यापान, काही सावळय़ा, काही बुटकुल्या बाहुल्या, काही सडपातळ उंच, काही काळय़ाभोर डोळय़ांच्या, काही पिंग्या, बदामी, घाऱ्या डोळय़ांच्या. एक मुलगी तुकतुकीत काळी. पांढऱ्याशुभ्र मोत्यासारख्या दातांची. बाई आल्या आणि आमचा किलबिलाट थांबला. संपूर्ण वर्ग एका फुटू पाहणाऱ्या उत्सुक शांततेने भरून गेला. बाईंनी आमच्यातल्या एकेका मुलीला पुढे बोलवायला सुरुवात केली. त्यातल्या काही मुलींचे नाच मला आवडले नाहीत, पण तरी बाईंनी त्यांना का निवडलं हे मला समजलं नाही. पण ते माझ्यासाठी तेवढं महत्त्वाचं नव्हतं. ‘मला नाचायला मिळालं म्हणजे झालं!’ एवढंच मला हवं होतं. बाईंना नाचून दाखवायला माझे पाय शिवशिवत होते. माझी खात्री होती, माझी एक स्टेप बघताच बाई मला निवडणारच! बारा-पंधरा मुलींचं नाचून झाल्यावर अचानक बाई म्हणाल्या, ‘‘झाली निवड, बाकीच्यांनी जा.’’ आणि बाई वर्गाबाहेर निघाल्यासुद्धा! मला काही कळायच्या आत माझे पाय बाईंच्या दिशेनं धावत सुटले होते. मी धापा टाकत बाईंच्या पुढय़ात पोचून म्हणाले, ‘‘बाई, माझा नाच बघा तुम्ही, मला नक्की निवडाल!’’ बाई म्हणाल्या, ‘‘नाही, तुला नाही घेता येणार.’’ म्हटलं, ‘‘का पण?’’ बाई म्हणाल्या, ‘‘अगं, सूचना ऐकली होतीस नं, फक्त सुंदर मुली हव्यात. घाऱ्या आणि गोऱ्या. तू आहेस का तशी?’’ मला यावर काहीच उत्तर सुचलं नाही. पण माझ्या आतलं छोटंस कुणीतरी खूपच हिरमुसून गेलं. त्या दिवशी मी घरी आल्यावर आरशात पाहिलं आणि त्या हिरमुसलेल्या आतल्या छोटय़ाशा कुणालातरी आयुष्यात पहिल्यादांच वाटलं, ‘मी सुंदर नाही का?’
पुढे जसं वय वाढायला लागलं तशी मी स्वत:ला या सगळय़ाबद्दल समजावण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत राहिले. पण ती हिरमुसलेली छोटी मात्र वेळोवेळी माझ्या दिसण्याशी भांडत राहिली. कधी माझ्या गव्हाळ, सावळय़ा रंगाशी भांडायची, कधी फक्त सरळ केस चांगले असतात, असं समजून माझ्या नागमोडी वळणाच्या केसांशी भांडायची, कधी नकटं नाक वाईट असतं म्हणत माझ्या नाकाशी भांडायची. कधी कधी तर तिला माझं काहीसुद्धा आवडायचं नाही, नखंसुद्धा! तिला तिच्या बाईंनी तिच्या आवडीचं काहीतरी करू दिलं नाही आणि याचं कारण तिचं ‘दिसणं’ होतं, हे तिच्या मनात घट्टच बसलं. तिला समोरून कुणी ‘तू छान दिसतेस’ म्हटलं की ते धादांत खोटं वाटायचं. या सगळय़ातनं तिच्या आत एक हतबलता येत होती. तिचं दिसणं तिला जन्मानं दिलं होतं.    
ते ती कसं बदलू शकणार होती? ते नाकारून ती कुठं जाऊ शकणार होती?
तिचं नाक, तिचे डोळे, तिचे कान, ते सगळं तिचं होतं. तसंच निर्माण केलेलं. त्यातलं काहीही तिला नकोसं वाटलं तरी तिच्यासमोर पर्याय काय होता? या अपर्यायानं निरसून तिच्यात अनेक गंड निर्माण व्हायला लागले. तिला तीच नकोशी झाली. मोठं झाल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात आल्यावर आपल्याला सुंदर मुलीची भूमिका कधीही मिळणार नाही या खात्रीनं तिनं मनाची कायमची समजूत घालून ठेवली होती. तरीही जेव्हा काही सुंदर मुलीच्या भूमिका आयुष्यानं तिला दिल्या तेव्हा ती चकित होऊन गेली. तिला वाटलं, ‘या समोरच्याला मी नीट दिसत नाहीये का, असं कसं त्याला माझ्यात सौंदर्य दिसत असेल?’ तिला या सगळय़ाचा त्रास होत होता हे मला लख्ख दिसत होतं. तिच्यापर्यंत पोचता मात्र येत नव्हतं. बाईंबरोबर सगळय़ा जगावरच रुसून ती माझ्या आतल्या कुठल्याशा कोपऱ्यात रुसून बसली होती. तोच, मागच्या महिन्यात मला आयुष्यानं एक अनोखी संधी दिली, तिच्यापर्यंत पोचण्याची. एका चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं साऊथ आफ्रिकेत जोहान्सबर्गला जायचा योग आला. तिथे माझी मैत्रीण शार्दुली तेरवाडकर राहते. तिच्याबरोबर जोहान्सबर्गच्या रस्त्यांवर फिरत असताना आसपास रस्त्यांवर मोठाल्या होर्डिग्जवर अनेक कृष्णवर्णीय चेहरे दिसत होते. पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येनं कृष्णवर्णीय चेहरे पाहत होते मी. साधारण एक दोन दिवस गेले आणि मला लक्षात आलं, माझ्या मनात सतत एक विचार येतो आहे, जो मला आवडत नाही आहे. तरीही तो येतो आहे. तो विचार होता, ‘किती कुरूप आहेत हे सगळे. ना चाफेकळी नाक, ना गोरा रंग, ना मोठ्ठे डोळे, ना सरळ सुळसुळीत केस.’ एकीकडे मला या विचाराची शरम वाटत होती, पण तो मनात येतच होता. त्या विचाराची भाषा माझी स्वत:ची वाटत नव्हती, कुणाची होती ती? खूप दिवसांनी त्या नाचात न घेणाऱ्या बाई आठवल्या. आतून एकदम स्तब्ध व्हायला झालं. लक्षात आलं, त्या बाईंवर रुसलेली छोटी मुलगी जशी माझ्या आत आहे, तशाच बाई पण आहेत! म्हणून तर मला काळं ‘कु रूप’ असं वाटतं आहे. पण त्या का आहेत माझ्यात? मला त्यांचा राग आला होता, तरी त्यांचे विचार माझ्या मनात कुठून, कधी आणि का जोपासले जात आहेत? मी अस्वस्थपणे शार्दुलीला म्हटलं, ‘मला माझं हे वाटणं आवडत नाहीये, पण मला हे सगळी लोक कुरूप वाटतायेत.’ शार्दुली अनेक वर्षे तिथेच राहिली आहे. अनेक कृष्णवर्णीय स्त्रिया तिच्या घट्ट मैत्रिणी आहेत. ती तिच्या मोठय़ा डोळय़ांनी माझ्याकडे बघत शांतपणे  म्हणाली, ‘हे सगळं कुणी ठरवलं गं? कुरूप कोण? सुंदर कोण?’ माझ्या आतून एक छोटा अस्फुट आवाज आला, ‘बाईंनी.’ पण हे उत्तर पुरेसं नव्हतं. शार्दुली शांतपणे पुढचा एकेक शब्द उच्चारत म्हणाली, ‘माझ्या अनेक कृष्णवर्णीय मैत्रिणी आहेत. त्या मला सुंदर वाटतात. मीही त्यांच्याशी या विषयावर खूप बोलले आहे. त्याही मला म्हणाल्या, ‘‘गोऱ्यांनी आमच्यावर राज्य करेपर्यंत आम्ही आहोत तसे आम्हाला आवडत होतो. आमचा कृष्णवर्ण, कुरळे केस, बारीक डोळे, जाड ओठ हे सगळं देवानं निर्माण केलं आहे, ते चुकीचं कसं असेल? पण गोऱ्यांची सत्ता आली आणि ज्याची सत्ता तसा विचार या न्यायानं आम्हाला आमचं सगळंच चुकीचं वाटायला लागलं. मग गोरे वरचढ, काळे निम्न वाटायला लागले. आपल्यापैकी कुणीच निसर्गापेक्षा मोठं नाही. मग निसर्गानं निर्माण केलेलं काहीही चुकीचं किंवा कुरूप म्हणायचा आपल्याला अधिकारच काय?’’ तिच्या शब्दांनी अनेक दरवाजांची एकच चावी असावी तसं आतलं बरंच काही ‘बंद’ उघडायला लागलं. या उघडणाऱ्या दरवाजांनी जे समोर आलं त्यात दिसलं, बाई फक्त माझ्या आत नाहीत. बाई सगळीकडेच आहेत. गोरे होण्याच्या क्रीम्सच्या जाहिरातीत आहेत. वर्तमानपत्रातल्या ‘वधू- गोरी, सुंदर’सारख्या जाहिरातीत आहेत. बाईंच्या मागं खूप वर्षांची गोऱ्यांची सत्ता आहे. हे सगळं तर ठीकच. मला आता वेगळय़ाच गोष्टीकडे लक्ष घालावंसं वाटतं आहे. गोरे गेले. माझ्या आयुष्यातल्या त्या बाईही गेल्या. प्रश्न हा उरतो, कुणीतरी आपल्याला म्हणतं आहे, ‘तुम्ही कुरूप आहात’ तर ते आपण मानायचं कारणच काय? आता प्रश्न उरतो तो हा. आपण ते मानून जी गुलामी पत्करतो आहोत त्यानं आपलं काय भलं होणार आहे? या निमित्तानं माझ्या आतल्या रुसलेल्या छोटीची हाताची घट्ट बंद घडी माझ्या हळुवार हातांनी उघडताना मला आसपासच्या कितीतरी जणांच्या आतल्या रुसलेल्या मुली आणि मुलं दिसतायेत. स्वत:च्या रंगाशी, अवयवांशी भांडणाऱ्या. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करून शरीराच्या सुंदरतेसाठी कष्ट करणं वेगळं. त्यात भांडण नाही, काळजी घेणं आहे. पण ‘मला गाल आवडत नाहीत माझे’ म्हणून ते कृत्रिम यंत्र लावून कमी करायचे, हे भांडण आहे. माझ्या क्षेत्रातल्या कितीतरी अभिनेत्रींची नाकं त्यांच्या पूर्वीच्या सिनेमात नकटी आणि मोठी दिसतात. आता हे बघताना वाटतं, त्यांचं आधीचं नाक नक टंअसलं तरी त्या चेहऱ्याला शोभणारं होतं. हे नवं नाक ‘चाफेकळी’ असलं तरी त्या चेहऱ्याला शोभणारं नाही, त्यामुळे केविलवाणं आणि उपरं दिसतं आहे. त्यामुळे त्यांनी खरोखरच स्वत:चं ‘नाक कापून’ घेतलं आहे.’ तसंच आता कुठूनसे ‘झीरो फिगर’ नावाचे अतिबारीक असण्याचे वारे वाहतायेत. त्यामुळे काही जणी आपल्या शरीराशी किती निर्घृण वागतायेत ते पाहून काळजी वाटते आहे. ते फिके चेहरे, सुकलेली शरीरं सुंदर नाही तर दयनीय वाटतात. हे सगळं करताना आपण निसर्गाशी खेळतो आहोत याचंही भान सुटलेलं असतं. कित्येकांचं हे जीवघेणं ठरू शकेल हेही ते विसरलेले असतात. या सगळ्यानंतर खऱ्या सुंदर असण्याकडे घेऊन जाणारा एकमेव मार्ग मला दिसतो आहे, तो म्हणजे, आपल्याला निसर्गानं जे दिसणं दिलं आहे त्याच्यापाशी कुठे ना कुठे येऊन थांबावं लागेल. सगळय़ांनाच, मलाही. तशी थांबलेली काही माणसं आज या निमित्तानं आठवतायेत. त्यांचं असणं, दिसणं त्यांनी तंतोतंत आहे तसं स्वीकारलं आहे. त्या नावांमधलं एक नाव आवर्जून घेईन, आमच्या क्षेत्रातले मोठे सुपरस्टार ‘रजनीकांत’. ते सिनेमाची गरज म्हणून, अपरिहार्य अभिनयाचा भाग म्हणून पडद्यावर विग वापरतात. चेहऱ्यावर मेकपचे अद्ययावत प्रयोग करतात, पण एरवी ते आहेत तसे फिरतात. ‘तंतोतंत आहेत तसे’, त्यांना टक्कल आहे ते न लपवता. विग न घालता, साध्या लुंगीत, मेकअपचा नामोनिषाण चेहऱ्यावर न ठेवता. कधीकधी ते ओळखूही येत नाहीत. तरीही लाखो करोडो लोक त्यांच्यावर अलोट प्रेम करतात. अलोट प्रेम. मला स्वत:ला पडद्यावरच्या सुपरहीरोपेक्षाही पडद्याबाहेरचे सावळे, लुंगी कुडत्यातले, पांढरी दाढी असलेले नम्र हसणारे रजनीकांत हे खूप खूप सुंदर वाटतात. त्यांचं संपूर्ण आहे तसं दिसणं त्यांनी ज्या सहजतेनं स्वीकारलं आहे ते पाहिलं की त्यांना सलाम करावासा वाटतो. त्यांच्या धाडसानं बळ घ्यावंसं वाटतं, माझ्या या दिसण्याचा मान राखण्याचं.
हे सगळं माझ्या आतल्या रुसलेल्या मुलीसाठी खूप आश्वासक आहे. अनेक गोष्टींची नवी सुरुवात करणारे. तिचं नक्कीच काहीतरी वेगळं घडायला लागलं आहे. बाईंची प्रत्येक गोष्ट ऐकायचीच असते असं नाही, हेही ती शिकते आहे. तिचा रंग, तिच्या दिसण्याकडे नव्यानं बघू पाहते आहे. तिला पुन्हा एकदा वयात आल्यासारखं वाटतं आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय