असं म्हणतात की स्त्रीचा प्रवास मनाकडून शरीराकडे होतो, तर पुरुषाचा प्रवास शरीराकडून मनाकडे होतो. हे सत्य दोघांनी जाणून घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मानसिक अनुरूपता हळूहळू मिळवावी लागते त्याचप्रमाणे शारीरिक अनुरूपतासुद्धा मिळवण्यासाठी काही अवधी द्यावा लागतो. अर्थपूर्ण पॉझेस घ्यावे लागतात. मनाचा विचार करत करत शरीरापर्यंत पोचावं लागतं.
सोहम, समिताचा नवरा मला भेटायला आला होता. हनिमूनवरून आल्यापासून समिता त्याचा फोनसुद्धा घेत नव्हती. सोहमने सगळ्या बाजूने प्रयत्न करून पाहिले. तिच्या आईलाही त्याने फोन केला. पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. सोहम हताश झाला होता. काय करावं त्याला समजत नव्हतं. हनिमूनला गेल्यानंतर काहीतरी चुकलं होतं हे त्याला कळलं होतं, पण नेमकी चूक कुठे झाली होती हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. समिता माझ्याकडे येऊन गेली, असं त्याला कळलं होतं. त्यामुळेच तो आज मला भेटायला आला होता.
मी त्याच्याशी हळूहळू गप्पा मारायला सुरुवात केली. हनिमूनला कुठे गेला होतात, कधी गेला होतात, तिथली हवा कशी होती अशा जुजबी गप्पा मारल्यानंतर सोहम हळूहळू महत्त्वाच्या मुद्दय़ावर आला. त्याच्याशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की ज्या गोष्टी धीरानं घ्यायला हव्या होत्या, ज्या ठिकाणी हळूहळू पुढे जायला हवे होते तिथेच जरा घाई झाली होती. थोडी गडबड झाली होती. समिताच्या मनाचा विचार मागे पडला होता. तिच्या भावना समजून न घेतल्याचा फिल तिला आला होता. तिची मानसिकता त्या वेळी काय होती याचा विचार करण्याची तेव्हा आवश्यकता होती. शृंगाराची गरज होती. हळूहळू गप्पा मारत नातं आपोआप फुलू द्यायला हवं होतं. पुढच्या गोष्टी आपोआप घडल्या असत्या.
विवाहोत्तर समुपदेशनासाठी जोडपी येतात त्यावेळी अनेकदा गाडी या वळणावर येते. सगळं काही पहिल्याच रात्री जमायला हवं, असा अट्टहास दिसतो. जे काही ब्लू फिल्ममध्ये पाहिलेलं असतं ते आणि अगदी तस्संच करायला हवं अशी अपेक्षा असते. किंबहुना तेच खरं अशी धारणाही झालेली दिसते आणि याची तिला कल्पनाच नसेल, काही माहितीच नसेल तर गोंधळ होऊ शकतो. तिच्या मनात संबंधांबद्दल भीती निर्माण होऊ शकते.
ज्याप्रमाणे मानसिक अनुरूपता हळूहळू मिळवावी लागते, त्याचप्रमाणे शारीरिक अनुरूपतासुद्धा मिळवण्यासाठी काही अवधी द्यावा लागतो. अर्थपूर्ण पॉझेस घ्यावे लागतात. मनाचा विचार करत करत शरीरापर्यंत पोचावं लागतं.
असं म्हणतात की स्त्रीचा प्रवास मनाकडून शरीराकडे होतो, तर पुरुषाचा प्रवास शरीराकडून मनाकडे होतो. हे सत्य दोघांनी जाणून घेणे गरजेचे आहे. शारीरिक संबंधांची पूर्ण माहिती दोघांनी करून घेणे गरजेचे आहे. या बाबतीत मुलांना काय सांगणार असं पालकांना वाटत असतं. त्यांना सगळं माहितीच असतं. स्नेहलताई म्हणाल्या, ‘‘अहो मुलांना काय सांगायचं? आपल्याला शिकवतील. सारखी तर कॉम्प्युटरवर बसलेली असतात.’’
पण लग्नाच्या वयाच्या मुला- मुलींनासुद्धा या संदर्भात नेमकी माहिती नसते हे आवर्जून इथे नमूद करावेसे वाटते. या बाबतीत घरात खुलेपणाने, मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. खरं तर डॉक्टरांकडे जाऊन शास्त्रीय माहिती घ्यायला हवी. शारीरिक संबंध म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्यायला हवं. बाजारात या विषयावरची शास्त्रीय माहिती देणारी अनेक चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. ती वाचायला हवीत.
हे वाचताना कदाचित कुणाला असे वाटण्याची शक्यता आहे की याची काय आवश्यकता आहे? सगळं तर खुल्लमखुल्ला आहे. सध्याचे चित्रपट तर किती ओपन आहेत. पण अशा प्रकारच्या गोष्टी ज्या पाहिल्या जातात किंवा अनेक ठिकाणी वरवर माहिती दिली जाते, त्यातून नेमकं काय हे कळू शकत नाही. अशावेळी पालकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते.
आपला मुलगा/मुलगी वयात येतात त्याचवेळी पालकांनी लंगिक संबंधांबद्दल आपल्या पाल्यांशी संवाद साधायला हवा. ज्यांनी संवाद साधला नसेल त्यांनी आजच त्याच्याशी बोलायला हवं. सुरुवातीला लगेचच लंगिक संबंध जमतात असं नाही, याचीही जाणीव करून द्यायला हवी. सुरुवातीला चाचपडणं चालू असतं, हे सांगायला हवं. नवीन लग्न झालेल्या नवरा-बायकोनेही एकमेकांना सावरून घ्यायला हवं. ही कुणा एकटय़ाचीच जबाबदारी आहे, असे नाही- याचे भान विशेष करून तिने ठेवायला हवे.
सुदीप आणि ज्योती विवाहोत्तर समुपदेशनासाठी आले होते. लग्नाला सहा महिने झाले होते. एवढे दिवस होऊनसुद्धा त्यांच्यात शारीरिक संबंधांना सुरुवात झाली नव्हती. कुठे चुकतंय दोघांनाही कळत नव्हते. परिणामी दोघांची चिडचिड वाढली होती. त्याला कामावरून यायला रात्र व्हायची. जवळपास दहा वाजायचे. आल्यावर तो इतका दमलेला असायचा की तो लगेच झोपी जायचा. सकाळी उठून परत लगेच कामावर जायचा. ज्योतीला या सगळ्यात नराश्याचा आजार जडला. यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘असा अचानक कसा नराश्याचा आजार सुरू झाला? आधीपासूनच असेल. आम्हाला अंधारात ठेवलं. फसवलं आम्हाला.’’ यावर ज्योती अजूनच चिडली. आणि ती माहेरी निघून गेली आणि मूळ प्रश्नाला वेगळेच वळण लागले. कटुता वाढली. मुख्य प्रश्न त्यांच्या लंगिकतेचा होता.
लग्नाच्या वयाच्या मुला-मुलींचा विचार केला तर आजसुद्धा मुलींच्या मनात रोमॅण्टिक कल्पनांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मुली खूप स्वतंत्र झाल्या असतानासुद्धा काळजी घेणारा, केअिरग नवरा- जोडीदार त्यांना अपेक्षित आहे. छोटय़ाछोटय़ा गोष्टी केवळ तिच्यासाठी करणारा जोडीदार तिला जास्त आवडतो. सरप्राइज गिफ्ट त्यांना हव्याहव्याशा वाटतात. कदाचित वस्तू बदलल्या असतील, पूर्वी तिला गजरा हवा असेल, तर आज काही वेगळ्या वस्तू किंवा एक दिवसाचं आऊटिंग त्यानं स्वत: ठरवावं असं वाटतं. लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत अशा विविध गोष्टी एकमेकांसाठी करून लग्नानंतरच्या सुरेल संबंधांची पायाभरणी करायला हवी. मोबाइलवरच्या मेसेजची देवाण-घेवाण व्हायला हवी. फोन व्हायला हवेत. पालकांनीसुद्धा याबाबतीत समजून घ्यायला हवे.
मेधा ही मुलगी पुण्यातली. मुंबईमधल्या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या विक्रमशी तिचे लग्न ठरले. साखरपुडा ते लग्न यात ३-४ महिन्यांचे अंतर होते. एक दिवस तो तिला म्हणाला, ‘‘या रविवारी तू येशील का अंबरनाथला? आपण मस्त दिवसभर भेटूया. गप्पा मारूया.’’
मेधा म्हणाली, ‘‘हो, मी येईन नं. पण मला ते मुंबईची लोकल वगरे काही माहीत नाही, तर तू मला पुण्याला घ्यायला येशील का?’’ यावर विक्रमची आई त्याला म्हणाली की, ‘‘आत्तापासूनच तुला कामाला लावते आहे. लोकलने येणे-जाणे काही अवघड नाही. तिला पुण्यापर्यंत आणायला जायची काही गरज नाही.’’ दुर्दैवाने विक्रमने आईची आज्ञा शिरसावंद्य मानली.
खरं तर विक्रमच्या आईने मोडता घालायची आवश्यकता नव्हती. कारण लग्न ठरल्यानंतर एकमेकांना भेटावेसे वाटणारच ना? किंबहुना तसे ते वाटलेही पाहिजे. निमित्त कुठलेही असेल. पालकांनी ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. लग्न ठरल्यानंतर जास्तीत जास्त वेळा त्या दोघांनी एकमेकांना भेटले पाहिजे. गप्पा मारल्या पाहिजेत. एकमेकांना जाणून घेतले पाहिजे.
जसं गेल्या लेखात लिहिल्याप्रमाणे विवाहपूर्व लंगिक संबंध अनेकांना हवेहवेसे वाटतात, किंबहुना काही जणांच्या बाबतीत ते घडतातही, तसंच अनेक वेळा अगदी उलटी परिस्थितीसुद्धा दिसते. लग्न झाल्यानंतरही शारीरिक संबंध न आलेले अनेक जण समुपदेशनासाठी येतात. वर लिहिलेलं सुदीप-ज्योतीचे उदाहरण हे या परिस्थितीतील आहे.
आपल्या मुला-मुलींच्या विवाहाचे यशापयश निरोगी लंगिक संबंधांवर अवलंबून आहे, हे पालकांनी समजून घ्यायला हवे. त्यासाठी त्यांना मदतीचा हात कायम दिला पाहिजे. संकोच बाजूला ठेवला गेला पाहिजे. कारण या बाबतीतले खरे समुपदेशक पालकच आहेत हे निश्चित.
इंटरनेटवरच्या माहितीच्या महास्फोटामध्ये वास्तव काय, अवास्तव काय, याचा सारासार विचार करण्यासाठी मुला-मुलींनीही आपल्या आई वडिलांशी संवाद साधला पाहिजे.
मग कधी करताय सुरुवात बोलायला?