विटा तयार करून दुसऱ्याचं घर मजबूत करणाऱ्या वीटभट्टी कामगारांना मात्र त्यांचं स्वत:चं साधं घरही बांधता येत नाही. हातावर पोट असणाऱ्यांना फक्त चिंता असते ती रोज भूक कशी भागवायची याची, पण अशातही इंदुबाई चव्हाणसारखी एखादी चमकून उठतेच. उपाशी राहून, प्रचंड कष्ट करत मुलांना इंजिनीयर आणि ग्रामसेविका बनवते. स्वत:चं आयुष्य माती तुडवण्यात घालवूनही मुलांचं आयुष्य मातिमोल होऊ न देणाऱ्या या इंदुबाईची ही न्यारी कहाणी तिच्याच शब्दांत.

रातचे दोन वाजलेत. भायेर काळोख! माजं घर रानांत. गावाभायेर. मालकान्ला उठिवलं. बाटलीत रॉकेल घेतलं. टेंभ्याच्या उजेडात विटा थापाया बसले. विटांचा साचा घेतला. चिखलाचा गोळा घिऊन साच्यात मारला. वरून हात फिरवला आन् त्यो पलटी क्येला. झाली वीट तयार! सकाळचं सात वाजलं, तसं विटा थापायचं बंद क्येलं. कमरेचा काटा मोडला व्हता. पन पोरांना उठवायचं व्हतं. गावातल्या साळत धाडायचं व्हतं. पेज केली. मालकान्ला दिली. पोरांना दिली. भाजी-भाकरी बांधून दिली आन् लेकरांना साळत धाडलं.
दिस वर आला तसं काम सुरू झालं. चिकणमाती काल यिऊन पडली व्हती. ती फावडय़ानं वढली. तिच्यावर भुसा टाकला. गोल आळं क्येलं. आत अंदाजानं पाणी सोडलं. मंग अळय़ांत राख टाकली आन् पायानं तुडवून चिखल कराया लागले. संध्याकाळ होईस्तोवर गोल अळय़ांत चिखल तयार झाला व्हता. आता रोजच्यासारकं उद्या रातच्या टायमाला दोन वाजता उठूनशान विटा थापायला बसायचं.
आज वाळलेल्या विटांची भट्टी लावायची हाय. आधी भाजलेल्या विटा खाली अंथरल्या. पट्टी काढून तळाला दगडी कोळसा भरला. त्यावर विटांवर वीट लावत गेले. मधेमधे दगडी कोळशाचा थर लावत गेले. त्यात मधेमधे बोळं (भोकं) ठिवली. त्याच्यात लाकूड घातलं आन् रॉकेल घालूनशान पेटवलं. धूर निघाला. कच्च्या विटांवर भाजलेल्या विटा लिंपून घेतल्या. म्हंजी सगळय़ा विटा बॅजवार भाजून निघत्यात. मातीने लाल विटांमधल्या भेगा लिंपून टाकल्या. म्हंजी आतला धूर भायेर येत नाय आन् कुनाला त्रास बी व्हत नाय. पयले ये ठाव नव्हतं मला. तवा गाववाल्यांनी लय तरास दिला. हाकलून दिलं गावांतून! मंग हिथं आले. कानातली बुगडी मोडली आन् या गावांत बिघाभर जमीन घेतली. तिथं वीटभट्टीचं काम सुरू क्येलं. आता संध्याकाळपत्तुर या विटा भाजून निघत्याल. मंग घमेल्यात त्या विटा घिऊन त्याचा थर लावायचा. विटा करण्याआधी मी चुली केल्यात. तुळशीच्या कुंडय़ा, झाडांच्या कुंडय़ा, पान्याचे माठ समदं क्येलंय.
सांच्याला आंगणात वडाच्या पारावर बसली व्हती. येवढय़ात धाकली लेक आली. म्हनली, ‘‘माय माज येक ऐकशील?’’
‘‘बोल!’’
‘‘मला नाय शिकायचं. मी नाय जानार कन्यामंदिरला, मला नगं पाठवू तिथं!’’
‘‘असं म्हनतेस? शिकायचं नाय? ठिकाय. इथंच ऱ्हायचंय वस्तीवर? तर मंग या वीटभट्टीवर रोज दोन हजार विटा थापायच्या. वहायच्या. भट्टी लावायची आन दोन टायमाला स्वयंपाक बनवायचा. हाय कबूल?’’
‘‘व्हय!’’
रोजच्यासारकं उठले. रानांत जाऊन आले. मिश्री केली. आंघोळ करून कपाळावर आडवी कुंकवाची चिरी लावली तर बोचक घेऊन धाकली पोरगी पुढय़ांत! ‘‘माय मी जाती कन्यामंदिरला. आजच निघतो!’’
मी काय बी बोलले न्हाय. मला ठाऊक व्हतं, तिला ह्य़े काम झेपनार न्हाय. आन् शिकली नाय तर जलमभर ह्य़ेच काम तिला करावं लागंल. तवा ती शिकायला जानारच! तिने शिकलंच पायजे. मी माज्या दोन पोरांना इंजिनीअर क्येलंय. थोरली लेक ग्रामसेविका हाय!
आमची कुंभाराची जात! ल्हान व्हते तवाधरनं मी मटकी करते. लय कष्ट केले. कारण आमी अडाणी. शिक्शान न्हाय. बापाची भयानक गरिबी! हातावर पोट, कुठून शिकनार आम्ही! तवाच ठरविलं, कवातरी आपलं लगीन व्हईल. पोरं व्हतील. तवा त्यांना साळा शिकवायचीच! आपण मरस्तोवर कष्ट करू. पन पोरांना लिहायला वाचायला शिकवायचंच. पुढं लगीन झालं. घरांत मोठा बारदाना! सासुसासरे, चार दीर, नणंदा. सासऱ्याची जमीन नव्हती. दुष्काळ पडला तसं सासऱ्यांनी सगळय़ांना भाएर काढलं. ज्याची त्याची चुल येगळी केली. आम्ही सगळी जणं जगायला भाएर पडलो. म्हायेरी थारा नव्हता. मंग येका गावात शिवरीची लाकडं आन् उसाचं चिपाड टाकलं आन कुडाचं झोपडं बांधलं. चार दिस घरात चूल नाय पेटली. निस्तं पानी पिऊन राह्य़लो दोघं. पन मी हिंमत नाय हरली. नवऱ्याच्या मामाला कच्ची मडकी करून इकली. पन्नास रुपयांची पन्नास मटकी! त्या पैशात मीठ मिरची आनली.
पावसाळा आला. पावसाळय़ात मटकी नाय करता येत. निसतं बसून ऱ्हावं लागतं. मंग दोनशे रुपये रोजावर शेतमजूर म्हणून निंदायला, खुरपायला लोकांच्या शेतात जायला लागलो. पावसाळा संपला. विटभट्टीची कामं सुरू झाली तशी आमी दोघं वीटभट्टीवर कामाला लागलो. गावोगाव फिरायला लागलो. पन आसं काम करताना मी भट्टी कशी लावतात, विटा कशा भाजत्यात समदं शिकून घेतलं आन् येकदिवस मालकान्ला म्हणलं, ‘आपण सोताची वीटभट्टी सुरू करायची.’ मालक म्हनलं, ‘‘येडी कां खुळी तू? त्याला बक्कळ पैका लागतो. गारेकरी मजुरीवर ठेवाया लागत्यात!’’ मी म्हनलं, ‘‘सगळी कामं.. बाप्ये करतात ती पन मी सोता करंन! पन वीटभट्टी सुरू करायचीच!’’
दुसऱ्या उन्हाळय़ात दिवस गेलं. माजं करायला कोन नाय. शेजारच्या बायांनी घरीच डिलवरी केली. तवाच मी ठरविलं, ह्य़े दिवस पोरांना नाय दाखवायचे. त्यांना साळा शिकवायचीच! मंग दोन जर्सी गाया पाळल्या. त्यो दुधाचा धंदा, मटक्याचा धंदा आसं करून चारीबी पोरांना साळा शिकविली. येक डाव तर आसं झालं, माझी दोन्ही बी पोरं सातवीत गेली हुती. शाळंची फी भरायची व्हती. पन पैसं नव्हतं. मंग गाठण मोडून शाळंची फी भरली. गाठण परत घेता यील. पन अभ्यास मागं पडला तर भरून काढता यील व्हय?
थोडय़ा दिसांनी गाया बी इकल्या. आन् बिघाभर जमीन घेतली. तवाधरनं वीटभट्टी लावाया लागले. भट्टीवरची समदी कामं मी आन् मालक जोडीनं करायचो. मजुरी द्यावी त्या पैशांत पोरीचं शिक्शान व्हईल! चारही पोरांच्या टायमाला वीट डोक्यावर घिऊनशान भट्टीच्या पायऱ्या चढायची. उतरायची. चिखल तुडवायची. विटा थापायची. येकदा तिसऱ्या लेकराच्या टायमाला नऊ म्हयनं भरलं व्हतं. तरी बी मी भट्टी लावाया वर चढले आन् विटा रचताना माजा पाय सटाकला. उंचावरून पडले खाली! पोटांत कळा सुरू झाल्या. पन देवाची किरपा! मी आन् लेकरू दोघंबी हातीपायी धड राह्य़लो.
आज तीसच्यावर वर्स झाली ही वीटभट्टी सुरू करून! आता जेसीबी आनूनशान माती इकत आणते. भाडय़ाने डंपर घेतलाय. आर्डर यील तशा तयार विटा गावात पोचत्या करतो. आता चिखल कराया ‘गारेकरी’ ठिवलेत. पन त्या समद्यांना ऱ्हायला जागा, लाइट, सरपण समद द्यावं लागतं. चार गारेकऱ्यांनी पैशांची उचल घेतली व्हती. रातच्या टायमाला त्ये पळून ग्येले. माजे पैसे बी बुडाले आन मजूर बी गेल्यानं काम ठप्प झालं.
एवढी वर्स झाली तरी आज बी आमचं हातावर पोट! आज बी भाडय़ाच्या घरात ऱ्हातो. स्वत:चं घरदार नाय. पावसाळय़ात चार म्हयनं काहीच काम नसतं, मंग भावकीतले लोकं म्हनत्यात, ‘‘कशाला शाळा शिकवितेस धाकलीला! त्यापरीस लोकांच्या शेतावर खुरपायला, लावण्या कराया पाठीव! चार पैसं तरी मिळतील!’’
पन मी कोनाचं ऐकत न्हाय. अवो साळा तर शिकलीच पायजे! आमची जिंदगी चिखल तुडवन्यात ग्येली. बस्स झालं! पोरांची जिंदगी अशी मातीत नगं जायला!
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com

Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…