भारतीय संस्कृती, कलावैशिष्टय़े यांच्यासह आपल्या जगण्यातील गमतीशीर विरोधाभासांना टिपत, बंगळुरू च्या  शुभ्रा चढ्ढा या तरुणीने याचा उपयोग अनोख्या पद्धतीने आपल्या व्यवसायासाठी करून घेतला. प्रामुख्याने भारताची ‘सोव्हेनीअर’ तयार करण्याच्या हेतूने सुरू झालेला ‘चुंबक’ या ब्रँडचा प्रवास आता लाइफस्टाइल उत्पादनांच्या श्रेणीत आघाडीवर जाऊन स्थिरावला आहे.
आग्रा येथे गेलात की ताजमहालची छोटीशी प्रतिकृती, राजस्थानात गेलात तर तिथले विशिष्ट कपडे व दागिने, काश्मीरच्या पश्मिना शाली, दक्षिणेकडील राज्यात शंख-शिंपल्यांच्या वस्तू, आसामकडे बांबूच्या सुंदर कलाकुसरीच्या वस्तू अशा प्रकारे भारतातील विविध प्रदेशांची आपापली खासियत तिथल्या संस्कृतीशी, समाजजीवनाशी जुळलेल्या या कलाकृतींतून दिसून येते. पण सहज बॅगेत टाकून परदेशी नेता येतील, तेथील लोकांना ‘भारतातून आणलेली भेट’ म्हणून देता येतील अशी आधुनिक, कल्पक व भारताची प्रतीकचिन्हं म्हणता येतील अशी ‘सोव्हेनीअर’ वा ‘स्मृतिचिन्हे’ मात्र आपल्याकडे क्वचितच दिसतात! शुभ्रा चढ्ढा या बंगळुरूस्थित तरुणीला हे खटकत होतं. यातूनच जन्म झाला ‘चुंबक’ या आगळ्यावेगळ्या उत्पादनाचा.
शुभ्राला पर्यटनाची प्रचंड आवड! अनेक देश-प्रदेश हिंडून झालेले. पण जगभरातल्या भटकंतीदरम्यान एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे आपल्या देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांनी सहज विकत घ्यावीत अशी सोव्हेनीअर आपल्याकडे उपलब्धच नाहीत. भेटी देण्याच्या अनेक गोष्टी आहेत-पण त्या म्हणजे प्रादेशिक वैशिष्टय़े, ठरावीक कलेचा वारसा सांगणाऱ्या आहेत. पण भारताच्या प्रातिनिधिक म्हणता येतील, आपल्या भौगोलिक अस्मितांच्या पलीकडे असतील अशा भेटवस्तू नाहीत. परदेशात फ्रीज मॅग्नेटचेदेखील कितीतरी विविध प्रकार आपल्याला दिसतात, पण आपल्याकडे मात्र तेच ते मोजके रटाळ मॅग्नेट्स! तेही कोण्या कॉर्पोरेट कंपन्यांनी प्रमोशनच्या उद्देशाने फुकट वाटलेले! विविध देशांतून जमवलेले फ्रीज मॅग्नेट्स शुभ्राच्या घरात गर्दी करून होते. पण यात भारताचं असं काही खास नाही हे तिला सतत जाणवत असे.
हीच उणीव ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम’मध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेली शुभ्रा चढ्ढा हिने हेरली आणि पती विवेक प्रभाकर यांच्यासमवेत याच ‘सोव्हेनीअर’ उत्पादनाचा कलात्मक व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प सोडला! ही अचाट कल्पना प्रत्यक्षात यायला फार दिवस लागले नाहीत. खरं तर या ‘स्मृतिचित्रांचे’ किडे शुभ्राच्या डोक्यात बऱ्याच आधीपासून म्हणजे २००२ ते २००६ सालापासून वळवळत होते. त्या वेळी ती बेंगळुरूच्या नेटअ‍ॅप या कंपनीत ‘सेल्स अँड ऑपरेशन्स मॅनेजर’ म्हणून काम करीत होती. तिथेही ही संकल्पना तिने आपल्या वरिष्ठांना सांगितली, पण कुणी फारसे मनावर घेतले नाही. पुढे २००६ मध्ये नोर्टेल या कंपनीत ‘मार्केटिंग हेड’ म्हणून ती रुजू झाली. पुढे वर्षभरातच तिचा विवेक प्रभाकर या आयटी इंजिनीरशी विवाह झाला आणि लवकरच शुभ्राने एका कन्यारत्नाला जन्म दिला. मुलीच्या संगोपनासाठी तिने रजा घेतली खरी परंतु इतकी वर्षे व्यस्त वेळापत्रकाची सवय झाल्यानंतर शुभ्राला घरी राहण्याचाही कंटाळा येई. पण पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रातली एकाच पॅटर्नची नोकरी करण्यासही मन धजेना. पुढे काय करायचं या संभ्रमात असतानाच, विवेकने तिच्या मनातल्या कल्पनेचे व्यवसायात रूपांतर करण्याची हीच संधी असल्याची जाणीव शुभ्राला करून दिली. शुभ्रालाही आव्हानात्मक तरीही क्रिएटिव्ह जॉब हवा होता. अखेर २००९ मध्ये ‘चुंबक’ या लाइफस्टाइल उत्पादने विकणाऱ्या ब्रँडचा श्रीगणेशा झाला.
व्यवसाय करणे जरी निश्चित केले तरी, भांडवल कसे उभारायचे याची काळजी होती. या वेळी शुभ्राला पतीने खंबीर साथ दिली. ‘आपण आपलं घर विकून टाकू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. हा बिझनेस नक्की चालेल. मी काही दिवस माझी नोकरी सुरू ठेवतो म्हणजे आपले निभून जाईल.’ असे त्याने सुचवले. राहते घर विकून त्यांनी ४० लाख रुपयांचे भांडवल उभारले. पहिली पायरी होती, सहज, साधे तरीही भारतीय संस्कृतीची छाप दिसून येईल अशा संकल्पनांची सुटसुटीत मांडणी व डिझाइन तयार करू शकतील असे बुद्धिमान फ्रीलान्स आर्टिस्ट्स शोधणे, त्यांच्याकडून प्रॉडक्टचे सोर्सिग, डिझायनिंग नक्की करून घेणे. या कामात शुभ्राने पुरते वाहून घेतले. रात्रंदिवस यात खर्ची घातले.
आता ते एका भाडय़ाच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले. शुभ्राने मोठीच जोखीम स्वीकारली होती. २०१० साली शुभ्राने आपल्या उत्पादनांचा ब्रँड लाँच केला. ज्यावर भारतीय संस्कृतीची ओळख थोडक्यात आणि गमतीदार संदेशाने केलेली असेल असे विविध फ्रीज मॅग्नेट्स तिने बनवून घेतले. पण केवळ एवढय़ावर भागणार नव्हते. तरुणाई ही आपल्या उत्पादनाची मुख्य टार्गेट आहे हे जाणून भारतीय युवकांच्या बदलत्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब ज्यात ठळकपणे दिसून येईल तेही मजेदार, विनोदी पद्धतीने अशी अनेक उत्पादने खास युवकांसाठी बनवावीत हे तिला जाणवले. विविध प्रकारचे कॉफी मग्ज, कीचेन्स, लॉकेट्स, लॅपटॉप कव्हर्स, स्टोरेज टिन्स, भिंतीवरील घडय़ाळे, गॅजेट कव्हर्स, पुरुषांच्या बॉक्सर्स असे १२ हून अधिक प्रकार तिने बाजारात उतरवले आणि अनेक दुकानांतून विक्रीस ठेवले. मित्रमंडळी आणि नातेवाईक सगळ्यांनाच तिची ही उत्पादने खूप हटके वाटली आणि या संकल्पनेमधला ताजा टवटवीतपणा सर्वानीच तेवढय़ाच खेळकरपणे उचलून धरला व सुरुवातीच्या काही दिवसांतच या उत्पादनांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
पहिल्याच वर्षी तिच्या कंपनीची आर्थिक उलाढाल सव्वा कोटी रुपयांच्या पलीकडे पोहोचली.
पण हे सगळे खरेच इतके सहज सोप्पे होते का? ‘‘नक्कीच नाही’’, शुभ्रा सांगते, ‘‘पहिल्या वेळेस जेव्हा आम्ही आमची उत्पादने तयार करवून घेतली तेव्हा एकाही दुकानाशी किंवा रिटेल चेनशी आमची साधी प्राथमिक बोलणीही झाली नव्हती. एवढेच काय तर उत्पादने ठेवण्यासाठी आमच्याजवळ जागाही नव्हती. माझ्या आत्याचे जुने घर तिने आम्हाला वापरायला दिले आणि तिथे आम्ही हा सारा पसारा नेऊन ठेवला.’’
‘‘कित्येक दिवस तर मी आणि विवेक या पसाऱ्याकडे बघत एकमेकांना चेष्टेने म्हणायचो की हे सगळं नाही खपलं तरी पुढील पंधरा वर्षे कुणाला गिफ्ट देण्यासाठी काय घ्यावे याची काळजी तरी मिटली!’’
मार्च २०१० मध्ये लॉँच झाल्यानंतर बंगळुरू (चामिर्स), पुणे (आयदर ऑर) व चेन्नई (लेव्हिटाटे) येथील प्रशस्त दुकानांमध्ये त्यांची उत्पादने दिसू लागली. तीन-चार महिन्यांतच त्यांनी  ग्राहकांना आकर्षित कारायला सुरुवात केली. ‘चुंबक’ च्या उत्पादनांची अशी काय खासियत होती की तरुणांच्या उडय़ा यावर पडू लागल्या? एक तर ही उत्पादने अतिशय ‘वेगळी’, आकर्षक आणि विनोदाने परिपूर्ण संदेश असलेली अशी आहेत. त्यात भरपूर वैविध्य आहे. त्याचप्रमाणे शाळकरी मुलांपासून, कॉलेजमधली मुलं-मुली, सगळ्यांना आपल्या ‘खिशा’नुसार झेपणारी आहेत. ४० रुपयांपासून दीड हजारापर्यंत आपापल्या आवडीनुसार खरेदी करता येते. म्हणूनच अगदी पहिल्याच महिन्यात ६० हजार रुपयांचा नफा त्यांना झाला. कंपनीचा व्यवसाय एका आश्वासक टप्प्यावर येऊन पोहोचताच, २०१२ साली विवेकनेही आपली आयटी क्षेत्रातली दमदार नोकरी सोडून पूर्णवेळ यासाठीच देण्याचे ठरवले.
त्यांची उत्पादने आता भारतातील २५० हून अधिक दुकानांमध्ये पाहायला मिळतात. शिवाय उत्पादनांची विविधताही आता वाढली आहे. पेन्स, पोस्टर्सपासून ते हँड मेड सोप्स असं बरंच काही  इथे बघायला मिळतं. ३८ प्रकारांतली जवळपास    ४००-५०० उत्पादनं तयार होत आहेत.
शुभ्राने एक नामी युक्ती योजली. ऑनलाइन पद्धतीने उत्पादने विकण्यावर तिने अधिक भर दिला. ट्वीटर, फेसबुक यांचा सुयोग्य वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात ‘चुंबक’ यशस्वी झाले. भारतापाठोपाठ आता अमेरिका, ब्रिटन, जपान, दुबई आदी अनेक देशांतून आता या उत्पादनांची विक्री होत आहे.
आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, जोखीम-आव्हाने स्वीकारण्याची तयारी, नवनवीन संकल्पनांचे स्वागत यासोबत आपल्या कल्पक बुद्धीची चमक या जोरावर यशस्वी उद्योजक ठरलेली शुभ्रा. तिचा आगळावेगळा, अभिनव व्यवसाय, आपल्या देशाप्रती असलेले प्रेम तर दाखवतोच, पण काहीतरी नवं, भन्नाट  करण्याची ऊर्मी जागवते हे नक्की!   
 शर्वरी जोशी -sharvarijoshi10@gmail.com