…पण आहार कोणताही असो, शाकाहारी, मांसाहारी, भौगोलिक किंवा पारंपरिक वैशिष्टय़ं असणारे, प्रत्येक व्यक्तीच्या आहारानुरूप योग्य अशी व्यवस्था लावणारे आतडय़ातले ‘डिझायनर’ जंतू वाढवून गोळी किंवा कॅप्सूलच्या रूपात देणं अजून पाच वर्षांत जमू शकेल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

आपल्याला माहीत आहे? शरीरात जेवढय़ा पेशी आहेत त्याच्या दहापट जंतू आतडय़ात नांदत असतात. रोज बाहेर टाकलेल्या कोरडय़ा विष्ठेचा ६० टक्के भाग जंतूंनी बनलेला असतो. येतात कुठून हे जंतू? नवजात बाळाची आतडी जंतूरहित असली तरी काही आठवडय़ांत बाळाच्या आईकडून, घराच्या इतर माणसांकडून मिळालेल्या देणगीमुळे जंतूंची वाढ आतडय़ात होऊ लागते. पुढे आयुष्यभर त्यांची साथ असते.
लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आतडय़ाचे हे रहिवासी उपद्रवी घुसखोर नाहीत, निरुपद्रवी आश्रितही नव्हेत, तर त्यांचं माणसाशी एक परस्परावलंबी नातं आहे. १०० ट्रिलियन इतक्या प्रचंड संख्येच्या या जंतूंच्या ५०० ते १००० प्रजाती असतात. लहान आणि मोठय़ा आतडय़ाची अंतस्त्वचा ते भरून टाकतात आणि परक्या उपद्रवी जंतूंचा शिरकाव होऊ देत नाहीत. इतकंच नव्हे तर घातक अशी प्रथिनं तयार करून त्यांचा नाश करतात. आतडय़ाची वाढ, तेथील लिम्फोसाइट नावाच्या रक्तपेशींची वाढ ही आणखी त्यांची कामं. या रक्तपेशी उपद्रवी जंतूंना मारक अशा अँटीबॉडीज बनवत असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हा अजून एक फायदा. याखेरीज आतडय़ात व्हिटॅमिन बी १२, बायोटिन आणि व्हिटॅमिन ‘के’ची निर्मिती करून मानवी शरीराच्या महत्त्वाच्या गरजा भागवणं अशा विविध प्रकारे आतडय़ातील जंतू आपल्याला मदत करत असतात. त्याच्या बदल्यात त्यांना मिळते सुरक्षितता आणि कधीही कमी न होणारं अन्नभांडार.
ही सर्व माहिती आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचीच आहे. मात्र याहून वेगळी आणि अतिशय वेधक अशी आतडय़ातील जंतूंबद्दलची नवीन माहिती, अलीकडेच नेचर, सायन्स अशा मान्यवर नियतकालिकातून उजेडात येत आहे, नवीन शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ज्यामुळे सध्या विकसित जगाला ग्रासणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या व्याधीवर-लठ्ठपणावर उपाय सापडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आतडय़ातील जंतूंचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे न पचलेल्या टाकाऊ अन्नावर प्रक्रिया करून त्यातून मेदाम्लांची (शॉर्ट चेन फँटी एसिड्स : एससीएफए) निर्मिती करणं. ही आम्ले मोठय़ा आतडय़ाची अंतस्त्वचा निरोगी ठेवण्याचं काम करतात. पण जेव्हा त्यांची निर्मिती प्रमाणाबाहेर होते तेव्हा त्यातून रोज १५० ते २०० उष्मांक शरीराला आहारातील उष्मांकाव्यतिरिक्त जास्तीचे मिळतात. म्हणजेच लठ्ठपणाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते. ज्या व्यक्तींच्या आहारात मेद कमी आणि तंतुमय पदार्थ (भाज्या आणि फळे) जास्त असतात त्यांच्या आतडय़ातील प्रजातींमध्ये जास्त विविधता दिसून येते, आणि त्यात बॅक्टेरॉइड्स हा गट प्रामुख्याने दिसून येतो. ज्या व्यक्तींच्या आहारात संपृक्त मेद जास्त, प्राणिज प्रथिनं जास्त आणि तंतुमय पदार्थ कमी अशी स्थिती असते, त्यांच्या आतडय़ात प्रजातींचं वैविध्य कमी असतं आणि त्यांच्यात फर्मिक्यूट्स हा गट मुख्यत: सापडतो. बॅक्टेरॉइड्स गटाचे जंतू मेदाम्ल निर्मिती कमी करतात, त्यामुळे तेवढे उष्मांक मळामधून बाहेर टाकले जातात. तर फर्मिक्यूट्स गटाच्या जंतूंमुळे मेदाम्ल जास्त प्रमाणात तयार होऊन शोषले जात असल्याने शरीरातील मेद वाढू लागतो. यावरून दिसून येतं की आपल्या आहाराचा आणि जंतूंच्या संख्येचा, विविधतेचा संबंध आहे. आहारात बदल केला तर जंतूंच्या वसाहतींमध्येसुद्धा बदल करता येईल.
ही सगळी निरीक्षणे करण्यात आली शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे. २००४ सालापासून जगात अनेक ठिकाणी आतडय़ातील जंतूंचा अभ्यास चालू आहे. एका प्रयोगात जुळ्यातील एक लठ्ठ आणि एक सडपातळ अशा ४ मानवी जुळ्यांच्या जोडय़ा घेण्यात आल्या. पूर्णत: र्निजतूक वातावरणात वाढलेल्या उंदरांपैकी काहींमध्ये लठ्ठ आणि काहींमध्ये सडपातळ व्यक्तींचे जंतू आरोपित करण्यात आले. १५ दिवसांत पहिल्या गटातील उंदरांमध्ये ‘लठ्ठ व्यक्तीच्या जंतूंची वाढ तर झालीच पण मेद वाढू लागला, तसंच लठ्ठपणाशी निगडित दाहाचे (इन्फ्लेमेशन) बदल दिसून आले, तर दुसऱ्या गटात उंदरांमध्ये सडपातळ व्यक्तींच्या जंतूंची वाढ होऊन मेद मात्र फार कमी वाढला.
स्तनपान करणारी मुलं ही वरचं दूध किंवा फॉम्र्युला घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी वजनाची असतात हे सर्वाना माहीत आहे. याचं कारण अशा मुलांच्या आतडय़ात बायफिडोबॅक्टर नावाचे जंतू सापडतात, ज्यांच्यामुळे त्यांना भरपूर ‘शी’ होते आणि बरेच उष्मांक त्यातून जातात. आफ्रिकेतील मुलं आणि युरोपमधली मुलं यांचा असाच अभ्यास करण्यात आला. आफ्रिकेतली मुलं जास्त काळ आईच्या दुधावर असतात, शिवाय त्यांच्या खाण्यात भरपूर फायबर असतो. त्यांच्या आतडय़ात युरोपीय मुलांच्या तुलनेत जंतूंचे जातिवैविध्य आहे. त्यामुळे त्या मुलांमध्ये लठ्ठपणा दिसून येत नसावा, असं संशोधकांना वाटतं.
आणखी एका अभ्यासात ८०० लोकांच्या श्वासाचं पृथक्करण करण्यात आलं. त्यातील काही जणांच्या श्वासात मिथेन आणि हायड्रोजन वायू सापडला. त्यांच्या आतडय़ात एम. स्मिथी नावाचे जंतू हे वायू निर्माण करत असून या जंतूंमुळे आतडय़ातून अधिक प्रमाणात उष्मांक शोषले जाऊन हे सर्व जण लठ्ठ झाले आहेत असं दिसून आलं. सध्या या मंडळींवर विशिष्ट प्रतिजैविकं वापरून एम. स्मिथी नष्ट करण्याचा प्रयोग चालू आहे.
वरील निरीक्षणांवरून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. आतडय़ात जितके जास्त जंतू असतील, तेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, तितके चांगले. देशी जंगल आणि वनीकरण केलेलं जंगल यात जो गुणात्मक फरक आहे तसाच हा प्रकार आहे. जे जंतू न पचलेले टाकाऊ पदार्थ आंबवून (फर्मेन्टेशन) त्यातून मेदाम्ल तयार करतील ते वजन वाढवतील. त्यांच्या जागी पहिल्या प्रकारचे जंतू प्रस्थापित करणं शक्य आहे.
वरील सर्व माहितीचा आरोग्य संवर्धनासाठी उपयोग करता येईल का? या प्रश्नाकडे आपण येतो. तात्कालिक किंवा दीर्घकाळ जुलाब, अ‍ॅन्टिबायोटिक्सचा वापर अशा रुग्णांमध्ये आतडय़ातील जंतूंच्या वसाहती वाढवण्यासाठी प्री आणि प्रो-बायोटिक्सचा उपयोग करतात ही गोष्ट नवीन नाही. पण वजन कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग करता येईल का? प्री-बायोटिक्स म्हणजे जंतूच्या वाढीला अनुकूल असे खाण्यातील पदार्थ- उदा. तंतुमय पदार्थ. डिंक, कच्चा कांदा, लसूण, अस्परगस, गव्हाचा कोंडा, कांदापात, बीट, मका, वाटाणा, कलिंगड, संत्री, डाळिंब वगैरे. तर प्रो-बायोटिक म्हणजे प्रयोगशाळेत वाढवलेले जंतू, जे कॅप्सूल किंवा पावडरीच्या रूपात उपलब्ध आहेत. दही, ताक या घरगुती गोष्टींमधूनही जंतू मिळतील (वजन कमी करायचं तर अर्थात दही-ताकसुद्धा कमी स्निग्धांशाचं पाहिजे). आतडय़ातल्या जंतू वसाहती समृद्ध करण्यासाठी यांचं सेवन केल्यास वजन कमी होऊ शकेल असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे.
अर्थात लठ्ठपणावरचा हा काही एकमेव प्रभावी इलाज आहे असं नाही. कमी उष्मांकाचा आहार आणि व्यायाम यांचं महत्त्व वादातीत आहे, पण आहार कोणताही असो, शाकाहारी, मांसाहारी, भौगोलिक किंवा पारंपरिक वैशिष्टय़ं असणारा, प्रत्येक व्यक्तीच्या आहारानुरूप योग्य अशी व्यवस्था लावणारे ‘डिझायनर’ जंतु वाढवून गोळी किंवा कॅप्सूलच्या रूपात देणं अजून पाच वर्षांत जमू शकेल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.
शेवटी अजून एका अभिनव मार्गाबद्दल सांगितलं पाहिजे, जो आजच्या घटकेला उपलब्ध आहे. त्याला म्हणतात एफएमटी (फीकल मायक्रोबियल ट्रांसप्लांट). एका व्यक्तीच्या आतडय़ातले जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या आतडय़ात घालणे. दीर्घकालीन जुलाबाच्या विकारामध्ये असा उपचार आधीपासून अस्तित्वात होताच. लठ्ठपणावर इलाज म्हणून याचा वापर करण्याची कल्पना अलीकडची. आतडय़ातील जंतूंच्या अभ्यासाची निरीक्षणं प्रसिद्ध झाल्यानंतरच. या उपचारात एका निरोगी सडपातळ व्यक्तीची विष्ठा सलाइन मिसळून गाळून घेतली जाते आणि एन्डोस्कोपी करून लठ्ठ व्यक्तीच्या मोठय़ा आतडय़ात तो द्रव घालतात. काही दिवसात तेथे चांगल्या ‘सडपातळ’ जंतूंच्या वसाहती वाढू लागतात. हे जंतू आधी वर्णन केल्याप्रमाणे मेदाम्ल निर्मिती करत नसल्याने हे उष्मांक विष्ठेतून बाहेर पडतात. याचा इष्ट परिणाम म्हणजे मेद कमी होणे आणि मेदाशी निगडित दाह कमी होणे. अत्यंत माफक खर्च आणि कमी धोक्याची, करण्यास सोपी अशी ही पद्धत २०१३ सालापासून पाश्चात्त्य देशांत काही नामवंत रुग्णालयांत चालू आहे. अद्यापि ती लोकप्रिय झाली नसली तरी लठ्ठपणाच्या सर्वव्यापी प्रश्नावर हा प्रभावी उपाय असू शकतो. ज्या व्यक्तीची विष्ठा यासाठी वापरली जाते ती व्यक्ती बारीक तर पाहिजेच पण अनेक तपासण्या करून तिला कोणतेही संसर्गजन्य रोग नाहीत याची खात्री आधी करून घेतली जाते.
कोणत्याही कारणांनी आतडय़ातले जंतू नष्ट झाले तर त्वरित ते पुन: प्रस्थापित केले पाहिजेत, ही गोष्ट या अभ्यासातून अधोरेखित झाली आहे.
डॉ. लीली जोशी- drlilyjoshi@gmail.com
या लेखासाठी विशेष साहाय्य- डॉ. विनय थोरात, एम.डी., डी.एम. यकृत आणि पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय