आजवर अल्लडपणे वागणारा माझा कुत्रा- टप्पू त्याच्यापेक्षा लहान पिल्लू घरात आलं की अचानक पालकत्वाच्या वळणावर कसा काय गेला हे मला कळतच नाही.. पण हे नैसर्गिक आहे.. त्यानं तिचा पालक होणं किती सहजपणे घडलं त्यांच्यामध्ये?  माणसाचं असं का नाही होत? का तो क्रूरच होतो अनेकदा? २६ ऑगस्ट हा दिवस काही देशांत राष्ट्रीय श्वान दिन म्हणून साजरा केला जातो. अर्थात भूतदया दाखवण्यासाठी अशा खास दिवसांची आवश्यकता नसते, गरज असते ती प्रत्येकातल्या संवेदनक्षमतेची!

माझ्या मनात माझं आणि माझ्यातल्या लेखकाचं सतत द्वंद्व चालू असतं. माझं लेखकाला म्हणणं हे की तू सतत सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसत जाऊ नको. अरे, मला माणूस म्हणून काही आयुष्य आहे का नाही? का आपलं मी सतत लेखकाच्या चष्म्यातूनच सगळं बघायचं, पण लेखकाचा चष्मा मेंदूला लागला आहे. तो लावणं किंवा काढणं माझ्या हातातच नाही. आता साधं हेच बघा मी टप्पूला रोज सकाळी फिरायला नेते. आता टप्पू म्हणजे माझा आठ महिन्यांचा कुत्रा. तो आहे मोठा लोभस. डोळे तर असे बोलके की भल्या भल्या नटांनी त्याच्याकडून शिकावं नजरेतून कसं बोलायचं.. तर आमचं हे लडिवाळ तसं ‘टॉयलेट ट्रेनड्’ झालं होतं. म्हणजे माणसांची मुलं जिथं आठ-आठ र्वष अंथरुण ओलं करतात तिथे हे खालच्या जातीचं (मनुष्य जात सर्वात श्रेष्ठ मानली जाते या पृथ्वीवर म्हणून खालच्या जातीचं, बाकी काही नाही.) कुत्रं चौथ्या महिन्यातच बाथरूममध्ये जाऊन प्रातर्विधी करायचे असतात हे शिकलं. पण तरी त्यांना व्यायाम हवा म्हणून त्यांना फिरवावं लागतं. त्याबरोबर माझाही व्यायाम होतो हा बोनस. तर टप्पूला सकाळी फिरायला न्यायला लागले..

या फिरण्यानं माझ्या आयुष्यात खूप बदल घडवले. मला वेगळा दृष्टिकोन मिळाला.. माणूस म्हणून या काँक्रीटच्या जंगलात हरवलेल्या माझ्या काही संवेदना टप्पूमुळे मला परत मिळाल्या. माझ्या एका मैत्रिणीच्या कुत्रीला पिल्लं झाली.. तीन ‘मुलं’, दोन ‘मुली’..  ‘मुलं’ सगळी पटापट उचलली गेली. ‘मुलगी’ कुणी घेईना.. तिचा मला सारखा फोन.. मला नाही म्हणायचं होतं.. पण विचार केला एकाबरोबर दुसरं राहिलं त्यात काय? पण ती ‘मुलगी’ असल्यानं मनात अनेक शंका आणि भित्या आल्या. टप्पू पौगंडावस्थेत.. ते छोटं महिन्याभराचं पिल्लू.. आपण काय काय ऐकतो.. चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार, सहा महिन्यांच्या मुलीवर अत्याचार. मला असं वाटलं, टप्पूनं हिला काही केलं तर? ताबडतोब प्राण्यांच्या डॉक्टरांना भेटले. त्यांनी सांगितलं, प्राण्यांमध्ये असं नसतं. हे फक्त माणूसच करतो. ती जोवर वयात येत नाही तोवर तो तिचा ‘बाप’ होईल. मला थोडं स्वीकारायला जड गेलं. कारण माणसांच्या जगात माणसांच्या वर्तनानं आपलं ‘मेंटल कण्डिशनिंग’ झालेलं असतं. तरी मी भीत भीतच तिला आणली. आणि डॉक्टरांचं म्हणणं शब्दश: खरं ठरलं. टप्पू तिचा ‘बाप’ झाला आहे. तिचं नाव मी ‘चिमू’ ठेवलं आहे. वय दोन महिने.. तो तिच्यावर माया करतो. तिच्याशी खेळतो. टप्पूला ‘चला’ म्हटलं की कळतं आता बाहेर जायचं आहे. चिमूला अजून ते समजत नाही. पण मी ‘चला’ म्हटलं की टप्पू दाराशी येतो. ‘चिमू चल’ म्हटलं की ते येडं माझ्या तोंडाकडे बघत बसतं. टप्पूला कळतं मी तिला बोलावते आहे, मग टप्पू पळत तिच्या जवळ जातो. आणि मांजरी जशी तिच्या पिल्लांना मान पकडून उचलून आणते तसा तो चिमूला आणतो. आपले दात तिला लागणार नाहीत याची काळजी घेत. ती दिवसभर दात शिवशिवत असल्यानं त्याला चावत राहते. त्याच्यावर उडी मारत राहते. त्याला छळत राहते. तो शांत असतो. वडिलांच्या मायेनं सगळं निमूटपणे सहन करत.. आजवर अल्लडपणे वागणारा हा टप्पू त्याच्यापेक्षा लहान पिल्लू  घरात आलं की, अचानक पेरेंटिंग मोड अर्थात पालकत्वाच्या वळणावर कसा काय गेला हे मला कळतच नाही.. पण हे नैसर्गिक आहे.. त्यानं तिचा पालक होणं किती सहजपणे घडलं त्यांच्यामध्ये?

आणि ते बघणं किती सुंदर आहे! माणसाचं असं का नाही होत? प्रत्येक लहान मुलाबद्दल मूल म्हणून ममत्व का नाही वाटत माणसांना? कुठल्याही वयात स्त्रीवर अत्याचार होणं वाईटच, पण दोन, अडीच, चार, आठ ही काय वयं आहेत का तावडीत सापडल्या म्हणून त्यांच्यावर अत्याचार आणि बलात्कार करण्याची?  प्रगत प्रगत म्हणणारा माणूस प्राण्यांकडून हे ‘पालकत्व’ शिकेल तर बरं. ही कसली प्रगती ज्यात तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी स्वत:च्याच प्रजातीकडून सर्वात मोठा धोका वाटावा?

असो, तो मोठा, वेगळा आणि चिंतेचा मुद्दा आहे. तर विषय आमच्या टप्पूचा आणि त्याच्यामुळे माझ्या बदललेल्या दृष्टिकोनाचा.. सगळ्यात मोठा बदल झाला तो पहिल्याच दिवशी.. झालं काय होतं.. मध्यंतरी मुंबईत पाण्याचे खूप हाल चालू होते. आमच्या सोसायटीतही पाणी दोन-तीन तास वगैरेच यायचं. तर माझ्या डोक्यावर एका इन्व्हेस्टरचं घर होतं जे भाडेतत्त्वावर कायम दिलेलं असायचं आणि त्याचा मालक लंडनमध्ये असायचा. तर त्यांचे घर नव्याने भाडेतत्त्वावर दिलं जाणार होतं त्यासाठी रंगकाम चालू होतं. त्या रंगाऱ्यानं नळ चालू ठेवला. सगळ्या घरात पाणी साचलं आणि ते खालच्या मजल्यावर ठिबकलं. माझ्या नुकत्याच रंगकाम केलेल्या भिंतींचा ‘कायापालट’ झाला. अखेरीस रंगाऱ्याचा दोष होता हे कळलं, पण त्यामुळे लंडनहून परतलेल्या त्याच्या मालकामध्ये आणि माझ्यामध्ये खूप शाब्दिक ठिणग्या उडाल्या. मी माझ्या भिंती नव्यानं त्या पेंटरकडूनच रंगवून घेतल्या, पण त्या दाम्पत्याशी मात्र छत्तीसचा आकडा झाला. आमच्यामध्ये रंग गेलेली भिंत कायम उभीच. समोर दिसलो तरी एकमेकांची नजर टाळण्याकडे आमचा कल असायचा. माझा राग नंतर निवळला. पण आता मध्ये भिंत उभी होती,  अनावश्यक अदृश्य भिंत..

तर असो. मी पहिल्याच दिवशी टप्पूला फिरवायला नेलं आणि समोर ते दाम्पत्य सकाळचं ऊन घेत फिरत होतं. नेहमीप्रमाणं मी नजर टाळली आणि निघाले तर काय आश्चर्य. ती दोघं माझ्याकडेच येताना   मला दिसली.  काही तरी गल्लत होत असणार म्हणून मी माझ्या मागे पाहिलं तर कुणीच नव्हतं. आणि काय हे? ते माझ्याकडेच आले. पटकन त्यांनी टप्पूला आंजारा-गोंजारायलाच घेतलं.. टप्पूला आमच्यातलं वैमनस्य कसं समजावून सांगावं याचा मी विचार करत असतानाच टप्पू त्यांच्या तोंडावर उडय़ा मारून त्यांना चाटायला लागला. ‘इन्व्हेस्टर’ बाई, ‘ही इज सो क्यूट’ वगैरे वगैरे उद्गार काढत असतातच दस्तुरखुद्द ‘इन्व्हेस्टर’ मला म्हणाले, ‘‘आमच्याकडे लंडनला सेम ब्रीड, सेम कलर आहे.’’     मलाही कुतूहल वाटलं. म्हटलं, ‘‘सारखी जात? सारखा रंग?’’बाईंनी लगेच फोटो काढून दाखवला. मला  धक्काच बसला. दुसरा टप्पूच होता फोटोत. मग त्यांनी विचारलं, ‘‘हा कधी आणला?’’

मी म्हटलं, ‘‘दत्तक घेतला.’’ त्यांनी विचारलं, ‘‘किती महिन्यांचा आहे.’’ मी म्हटलं, ‘‘पाच महिन्यांचा.’’ मग मलाही अनेक प्रश्न पडले की तुमचा टप्पू किती महिन्यांचा आहे. वगैरे वगैरे आणि त्याचा शेवट असा झाला की ते दाम्पत्य माझ्याकडे चहासाठी आलं. जाता जाता रंगवलेल्या भिंती बघून म्हणाले, ‘‘आता ठीक आहे ना?’’

मी पण हसले. म्हटलं, ‘‘हो..’’ ते पण हसले. म्हणाले, ‘‘भेटू पुन्हा.’’ आणि चहाचं आमंत्रण देऊन गेले.. मी गारद..  ही भिंत तोडणं माझ्यासाठी अशक्य होतं.  इगो होता, भीती होती, गेले उडत अशी बेफिकिरी होती. पण त्या सगळ्यापलीकडे कुठे तरी रुखरुख होती.. या तंटय़ाची गरज होती का? ठीक आहे चुका होतात.. त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात. पण आपण चिडलो की जन्मभराच्या अनावश्यक भिंती मध्ये उभ्या राहतात.. टप्पूला माहीतही नाही त्यानं काय केलं आणि आमच्यामधली भिंत तुटली आणि मैत्रीचा नवा पूल तयार झाला.

स्वत:च्या घरात कुत्रं पाळलेली माणसं एकमेकांशी बोलतातच. नाव काय? वय काय? कुठल्या जातीचा? खायला काय देता? बेडवर झोपतो का? वगैरे वगैरे. आणि अशी जोडल्या जाणाऱ्या माणसांची साखळी तयार होते.

कुत्र्याची जात मात्र जीव लावणारी.. मुलांसारखा सांभाळ करावा लागतो त्यांचा. त्यांना मन असतं, भावना असतात. त्यांना रागावलेलं कळतं, माया कळते.. आपण बाहेर निघालो की त्यांचे डोळे कासावीस होतात. पाच मिनिटांत परत आलो तरी त्यांचा आनंद गगनात मावत नाही. शेपटी तुटून पडेल इतकी शेपटी हलवत राहतात. असा हा सखा मी ‘अ‍निमल्स मॅटर टू मी’कडून दत्तक घेतला. गेल्या आठ महिन्यांत मी तोडलेली अनेक माणसं टप्पूमुळे जोडली गेली. काही नव्यानं जोडली गेली. सुरुवातीला कुत्र्यांना घाबरणाऱ्या आमच्या मंजूताई आता मुलांप्रमाणे त्यांच्यावर माया करतात. ही जातच अशी जीव लावणारी आहे. ही झाली टप्पूची कथा..

पण रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांकडे पाहिलं की मात्र मला अनेक हिंदी सिनेमे आठवतात, ज्यात हिरो दुर्दैवानं रस्त्यावर वाढलेला, ‘नाजायज औलाद’ असतो आणि सगळं जग त्याला हिणवत असतं, राग राग करत असतं आणि त्याची रिअक्शन म्हणून तो ही जगावर गुरगुरत असतो. तशी असतात बिचारी ही कुत्री. आता ती माणसांना नको असली तरी जन्माला येतात हा काही त्यांचा दोष नाही. ना त्यांनी माणसांशी कसलं युद्ध पुकारलं आहे. ते निसर्गाला धरून वागतात. या काँक्रीट आणि मनुष्यकेंद्रित जगात जगण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.. काही जगतात.. काही मनुष्य व्यवस्थेपुढे बळी पडतात.

गंमत असते, इमारत बांधली जात असताना एखादी कुत्री पिल्लांना जन्म देते. ती पिल्लं तिथं वाढतात. ती त्यांची सीमा होते. इमारत पूर्ण झाली की लोक राहायला येतात मग इमारत त्या लोकांच्या मालकीची होते. आणि मनुष्य हीच श्रेष्ठ जात आहे आणि देवानं खरं तर ही पृथ्वी फक्त माणसांसाठी निर्माण केलेली असल्यानं त्या फालतू, क:पदार्थ भटक्या कुत्र्यांचं अस्तित्व सोसायटय़ांमध्ये सहन होत नाही. कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय असं वाटतं त्यांना. मग त्यांना वॉचमनकरवी काठीनं झोडपणं ते त्यांना खायला प्यायला देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध मोर्चे बांधणं, ते त्या कुत्र्यांना आणि त्याच्या पिल्लांना जीवे मारणं इतपत आपल्या या श्रेष्ठ मानव जातीची मजल जाते. बंगळुरूच्या एका बाईनं पंधरा दिवसांच्या पिल्लांना त्यांच्या आईसमोर मारून टाकलं.. का? तर ती मारू शकते! त्याबद्दल शिक्षा सोडा तिला कुणी साधा जाबही विचारणार नाही. आपल्याकडे प्राण्यांसाठी परदेशात असतात तसे कायदे नाहीत. तिनं मारलं पन्नास रुपये भरले आणि तिनं केलेल्या कत्तलीच्या दोषातून ती मुक्त झाली. एका बिल्डिंगमध्ये कुत्र्याच्या चार पिल्लांना विष घालून मारलं, दोन पिल्लं अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळाली तर एक पिल्लू खड्डय़ात जिवंत गाडलं होतं. त्या सोसायटीवर काय कारवाई झाली? कुणाला दोषी ठरवलं? दोन तरुणांनी गंमत म्हणून एका कुत्रीला गाडीला दोरीने बांधून स्कूटरवर काही किलोमीटर फरफटवलं. नुकताच घडलेला इमारतीवरून कुत्र्याला खाली फेकण्याचा किस्सा तर सर्वश्रुत आहेच. त्यांना शिक्षा काय झाली.. पन्नास रुपये दंड?

प्राण्यांना मारा, त्यांचे हाल करा, त्यांच्याशी क्रूरपणे वागा. या देशात तुम्हाला कुणी काही विचारणार नाही, कारण त्यांना कसलं संरक्षणच नाही. ना कायद्याचं ना माणुसकीचं! कुणीही या टपली मारून जा अशी बिचाऱ्या प्राण्यांची अवस्था आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांना न्यूटर करणं, त्यांचं निर्बीजीकरण करणं हा उपाय आहे. नवीन कुत्र्यांची पैदास थांबवणं हे योग्य अयोग्यपेक्षा सद्य:स्थितीत आवश्यक आहे, असं म्हणता येईल. पण जे जन्मले आहेत त्या मुक्या जीवाचे असे हाल करणं किंवा त्यांना मारून टाकणं हे माणुसकीला धरून आहे का?  ते या जगात आहेत, हाच त्यांचा दोष आहे का?

एकीकडे कुत्र्यांची अशी कत्तल आणि दुसरीकडे परदेशी कुत्र्यांचं फोर्स फुल ब्रीडिंग, त्याचा मोठय़ा प्रमाणात होणारा व्यापार. पेट शॉपमध्ये त्यांच्या आयांपासून तोडलेली इवलीशी पिल्लं विक्रीसाठी ठेवलेली असतात. त्यांना माहीतही नसतं आपली किंमत पन्नास हजार, साठ हजार आहे. ते बिचारे येणाऱ्या-जाणाऱ्याकडे आपले शेपूट हलवून कुतूहलानं बघत असतात. हौस म्हणून परदेशी जातीचं पिल्लू लोक घरात आणतात पण मुळात भौगोलिकदृष्टय़ा  ते भारतातल्या वातावरणासाठी बनलेलं नसल्यानं त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. मग त्यांचा मेन्टेनन्स झेपेनासा होतो किंवा त्याची कटकट वाटू लागते मग अशी परदेशी जातीची चाळीस-चाळीस पन्नास-पन्नास हजारांना घेतलेली कुत्रीही रस्त्यावर सोडली जातात. जंगलात टाकली जातात. त्या बिचाऱ्यांना कळतंच नाही आपल्याला का सोडलंय.. कायमचं का टाकलंय? आपलं काय चुकलं? काही महाभाग तर नको असलेलं कुत्रं चालत्या गाडीतून टाकायलाही कमी करत नाहीत.

परवा ‘अ‍ॅनिमल मॅटर टू मी’मध्ये एक नवं कुत्रं आलं होतं त्याची गोष्ट कळली आणि घालमेल झाली. चाळीत वाढलेलं हे कुत्रं मुलांबरोबर खेळायचं, बागडायचं. चाळीतल्या सुनील नावाचा माणूस त्याला खायला प्यायला द्यायचा. थंडीत आणि पावसात निवारा द्यायचा. सुनीलच्या घरी त्याचं बाळ आलं. त्या बाळाचीही कुत्र्याशी मैत्री झाली. बाळ सहा महिन्यांचं झालं. रांगायचं. कुत्र्याबरोबर खेळायचं. कुत्रा दोन वर्षांचा होता. त्याला हे बाळ आहे हे कळायचं. सुनीलची चाळीतल्या एका गटाशी मोठं भांडण झालं होतं. सुनील कामाला गेल्यानंतर त्या गटामधले चार-पाच जण त्याच्यावर सूड घेण्यासाठी त्याच्या घरात घुसले. मूल कुत्र्याशी खेळत होतं. ती माणसं बाळाकडे वळली. तसं ते कुत्रं त्या माणसाच्या अंगावर आलं. एकाला चावलं. कुत्र्याच्या भुंकण्याने घरातले सावध झाले आणि बाहेर आले. काठय़ा घेऊन आलेला गट पाहून त्यांनीही आरडाओरड केली. तसा त्यांना काढता पाय घ्यावा लागला. पण जाता जाता त्यातल्या एकानं कुत्र्याच्या पाठीवर सळईनं एवढय़ा जोरात वार केला की कुत्र्याचा मणका खटकन् तुटला. ते चाळीतलं गरीब कुटुंब कुत्र्याला ‘अ‍ॅनिमल मॅटर टू मी’कडे घेऊन आलं. त्याच्यावर उपचार केले पण तसंही ते वाचणं शक्य नव्हतं. अखेरीस तो वारला. सुनीलचं कुटुंब ढसाढसा रडलं.

प्रत्येक सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असतो. आमच्या उच्चभ्रू सोसायटीतही आहे. त्यावरून सतत कटकटी चालू असतात. बहुतांशी लोकांना ही कुत्री आसपास नको असतात. त्यांना कुणी माणुसकीनं खायला-प्यायला देत असेल तर बाकीचे म्हणतात एवढं वाटतं तर घरी न्या. मला हा तर्क, लॉजिकच कळत नाही. रस्त्यावरच्या भुकेनं तळमळणाऱ्या एखाद्या अनाथ मुलाला, माणसाला कुणी खायला दिलं तर त्याला आपण असं म्हणतो का एवढं वाटतं तर घरी ने त्यांना. म्हणजे दया करणं हा गुन्हा आहे का? का दयाभाव असणं पाप?

रणरणत्या उन्हातही सोसायटीचा नियम म्हणून कुत्र्यांना पाणी द्यायचं नाही ही कुठली माणुसकी आहे? आणि कुठला मानवता धर्म आहे हा? अर्थात माणसं माणसांशी चांगलं वागत नाहीत तर प्राण्यांशी चांगलं वागण्याची अपेक्षाच नको करायला. काहीही असलं तरी टप्पूनं मला स्वत: माणूस म्हणून अनेक प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं. माझ्याच मनातल्या अनेक अनावश्यक भिंती गळून पडल्या. माया, प्रेम या भावनांपलीकडे विचारांनाही नवी दिशा आणि जगण्यासाठी नवा आशावादी दृष्टिकोन देणारी ही कुत्र्यांची जात अमर राहो!

मधुगंधा कुलकर्णी

chaturang@expressindia.com