‘तुम्ही तुमच्या भाऊ-भावजयीशी सतत भांडता, त्यांना त्रास देता, इतकेच नाही तर तुमची तुमच्या अल्पवयीन पुतणीवर वाईट नजर आहे, तिच्याशी गैरवर्तन करण्याची तुम्ही आजकाल धमकी देता, अशी सुमनची तक्रार आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे?’ बाईनी थेट प्रश्न विचारल्यावर सदा खुर्चीतून धडपडत उठला. त्याचे हातपाय थरथरू लागले..  
बाई, पोरीच्या काळजीने कित्येक रात्री माझा डोळ्याला डोळा लागला नाही. नको नको ते विचार मनात येतात. आणि..’ गळ्याशी हुंदका आल्याने पुढे बोलू न शकलेल्या सुमनच्या हाती तक्रार निवारण केंद्रातील बाईंनी पाण्याचा ग्लास दिला. मुसमुसत पाणी पिणाऱ्या सुमनचे आणि शेजारी बसलेल्या तिच्या नवऱ्याचे त्या निरीक्षण करू लागल्या.
‘शांत व्हा आणि न घाबरता सुसंगतपणे तुमची तक्रार सांगा पाहू.’ बाईंनी धीर दिल्याने सुमनने डोळे पुसत तिच्या मोठय़ा दिराविषयी तक्रार नोंदवली. ‘बाई आम्हा चौघांबरोबर म्हणजे आम्ही दोघे आणि आमच्या दोन मुलांबरोबर माझा मोठा दीर गेली कितीतरी वर्षे राहतोय. माझे मालक कुरिअर कंपनीत काम करतात आणि मी बाजूच्या कॉलनीतल्या मुलांना शाळेत ने-आणायचे काम करत होते. आमचे जेमतेम हातावर पोट आहे. मोठा मुलगा दहावीत आहे. हुशार आहे. त्याची काहीपण काळजी नाही. पण आमची १० वर्षांची पोर- सायली- थोडी वेडगळ आहे. ‘मतिमंद.’ नवऱ्याने दुरुस्ती केली. ‘हां, तेच ते.’ सुमन म्हणाली. माझा मोठा दीर घरात बसून रोज आमच्याशी भांडण काढतो. आमच्या छोटय़ाशा एका खोलीमध्ये दिवसरात्र पहारा ठेवल्यासारखा असतो; आणि आजकाल तर भांडणात धमकी देऊ  लागलाय की.. मी तुझ्या पोरीला, सायलीला..’  सुमनला पुढे बोलवेना. नवऱ्याने तिला थोडे थोपटल्यासारखे केल्यावर  ‘.खूप घाण घाण बोलतो बाई. कित्येक वेळा सायलीशी खेळत बसतो. माझी पोर वयाने आणि अकलेने अर्धवट आहे हो. त्याच्या नजरेची मला भीतीच वाटते. आजकाल आपण काय काय ऐकतो आणि बघतो न बाई. तिच्या काळजीने मी या वर्षी तर मुलांना शाळेत सोडायचे कामही सोडलेय. दिवसभर घारीसारखी नजर ठेवून असते तिच्यावर..’ सुमनचे पुन्हा हुंदके सुरू.
‘बाई, इथे जागेची अडचण होते. सदाला म्हणजे भावाला आम्ही किती वेळा गावी जायला सांगितले, म्हणजे हिच्याबरोबरची रोजची भांडणे तरी थांबतील, पण ऐकत नाही आणि आता ही नवी धमकी.’ सुमनच्या नवऱ्याने प्रथमच तोंड उघडले. तोच धागा पकडून ‘बाई आजकाल बायका-पोरींसाठी बरेच कायदे झालेत. माझ्या दिराचा कायमचा बंदोबस्त करा ना. लई उपकार होतील.’ सुमनने आपली इच्छा व्यक्त केली. तक्रार नोंदवून सायलीच्या दृष्टीने काही सावधगिरीच्या सूचना देत बाईंनी त्यांना शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन देत पुन्हा भेटण्याची तारीख दिली. दोघे गेल्यावरही सायलीचा विचार बाईंना कितीतरी वेळ अस्वस्थ करत होता.
पद्धतीनुसार तक्रारीची कल्पना देण्यासाठी तसेच दुसरी बाजू ऐकण्यासाठी बाईंनी सदाला केंद्रात बोलावले. भांबावलेल्या चेहऱ्याने किंचित लंगडत तो बाईंच्या टेबलासमोर येत हात जोडून उभा राहिला. ‘काय चुकी झाली बाई माझी?’ सदाने विचारले. त्याच्या चेहऱ्यावरून, चुळबुळीवरून तो प्रचंड गोंधळलाय हे स्पष्ट दिसत होते. त्याला बसायला सांगून त्याच्या वस्तीची, बंद पडलेल्या कंपनीची त्याच्या दिनक्रमाची जुजबी विचारपूस केल्यावर तो थोडा बोलता आणि मोकळा झालाय असे वाटल्यावर बाईंनी त्याला थेटच विचारलं. ‘तुम्ही तुमच्या भाऊ-भावजयीशी सतत भांडता, त्यांना त्रास देता, इतकेच नाही तर तुमची तुमच्या अल्पवयीन पुतणीवर वाईट नजर आहे, तिच्याशी काही गैरवर्तन करण्याची तुम्ही आजकाल धमकी देता, अशी सुमनची तक्रार आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे?’ बाईंनी असे सांगताच सदा खुर्चीतून धडपडत उठला. त्याचे हातपाय थरथरू लागले. एका हाताने टेबलाचा आधार घेत पटकन त्याने खाली वाकून पायातली चप्पल हाती घेतली. तो काय करतोय हे न समजून बाईही क्षणभर गोंधळल्या. ‘बाई, ही. ही वहाण घ्या आणि माझ्या थोबाडात मारा. नाहीतर तसे कशाला, तुम्हा सर्वाच्या पायातली पायताणं काढून त्याची माळ माझ्या गळ्यात घालून माझी धिंड काढा..’ बोलताना सदाने खरोखर गालावर चप्पल मारली. त्याला थांबवत अवाक् झालेल्या बाईंनी त्याला खाली बसायला सांगून पाणी पिण्यास दिले. अत्यंत क्षुब्ध झालेल्या सदाला पाणी पिण्याचेही भान नव्हते. काही वेळ गेल्यावर तो थोडा शांत झालाय, असे वाटून त्या म्हणाल्या, ‘अहो आम्ही फक्त त्यांची तक्रार तुमच्या कानी घातली. यावर तुमची काय बाजू असेल ती निर्धास्तपणे मांडा की. त्यासाठीच तर तुम्हाला इथे बोलावलेय ना. अगदी शांतपणे सांगा.’
बाईंच्या आश्वासक शब्दांनंतर सदाने त्यांच्यापुढे वेगळीच वस्तुस्थिती मांडली. ‘बाई, गेल्या वर्षांपासून आमच्याकडे बिल्डर लोक येताहेत. आमची वस्ती साफ करून इथल्या स्कीममध्ये आम्हाला मोठय़ा इमारतीत स्वतंत्र रूम मिळणार आहे. आताची जागा माझ्या आणि या भावाच्या नावावर आहे. त्याच्या एकटय़ाच्या नावावर त्याला रूम हवीय, म्हणून माझे राहणे त्यांना खुपतेय. म्हणून मला गावी हाकलायला बघतात. पण माझी आख्खी हयात इथे गेली. गावी आमचे कोणी नाही. शिवाय त्यांच्या मेहरबानीवर नाय जगत मी. कंपनी बंद पडल्यावर आलेल्या फंडाच्या पैशांवर माझ्यासकट त्याच्या दोन्ही पोरांची नावे पण घातली आहेत. पण तरीही मला हुसकून लावायला रोज कायतरी कारण शोधतात. वर्षांमागे बायको मेली. आम्हाला पोर ना बाळ. या पोरांवरच जीव लावला. त्यात ही सायली अर्धवट. म्हणून तिच्यावर पोटच्या पोरीपेक्षा अधिक माया केली मी. घरी बसल्यापासून तिचे आईबाप कामाला गेल्यावर मीच तिचे खाणेपिणे करत आलोय. अहो, वस्तीतली इतर लोक पण माझ्या विश्वासावर त्यांची पोरंबाळं सोडून जातात. माझ्या शेजाऱ्याला, नाहीतर माझ्याआड वस्तीतल्या कुणालाही माझ्या वागण्याबद्दल विचारा. दोषी सापडलो ना तर हाताची नस कापून घेईन.’ अत्यंत प्रक्षुब्ध झालेला सदा हरतऱ्हेने आपली बाजू मांडायचा प्रयत्न करीत होता. ‘बाई, या नालायक माणसांनी माझ्यावर इतर कुठलाही आरोप केला असता ना तर एकडाव मी सहन केला असता. पण हा आरोप मला जन्मात सहन होणार नाही. जागेसाठी आपल्या अजाण लेकराला पणाला लावतील याची मी कल्पनाच केली नाही.’ कितीतरी वेळ सदा टेबलावर डोके ठेवून स्फुंदत होता. काही वेळानंतर तो उठला. ‘जाऊ  दे बाई, त्यांना म्हणावं घ्या ती जागा तुमच्या बोडक्यावर. जातो मी घर सोडून गावी, पण माझ्यावरचा हा गलिच्छ आरोप मागे घ्या आणि त्या सायलीला- माझ्या अश्राप पोरीला- स्वार्थासाठी असे वापरू नका.’ तो तिरीमिरीत उठला आणि तसाच धडपडत बाहेर गेला. सुमनच्या तक्रारीनंतर वस्तीतून मिळालेल्या माहितीशी सदाची कैफियत सुसंगत होती. शेजाऱ्याच्या मदतीने पाय ओढत चाललेल्या सदाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना   माणसाच्या स्वार्थीपणाच्या अतिरेकांचा बाई बराच वेळ विचार करत राहिल्या.