‘जलसंवाद’ या मासिकाचं सहसंपादन करणाऱ्या मुकुंद धाराशिवकरांनी ‘जलमागोवा महाराष्ट्राचा’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील एकेका नदीच्या खोऱ्याचा ३५ अंगांनी अभ्यास सुरू केलाय. ऋग्वेदातील घरबांधणी, जलसंवर्धन, जलसाठवण आदी विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून  ‘भारताच्या प्राचीन जलपरंपरा’ या पुस्तकात त्यांनीच म्हटल्याप्रमाणे जगातील शाश्वत सिंचन पद्धतीने १५ बंधारे पुनर्जीवित करण्याचं कामही त्यांनी हाती घेतलंय. त्यांचं असं ठाम मत आहे की, आपली आजची लोकसंख्या दुप्पट झाली तरी सर्वाना वर्षभर पाणी पुरेल इतका पाऊस आजही भारतात पडतो, पण नियोजनाचा अभाव. अभियंता, लेखक, विज्ञान प्रसारक व जलतज्ज्ञ असणाऱ्या सत्तरीतल्या ध्येयवेडय़ा मुकुंद धाराशिवकर यांच्याविषयी..
ठा ण्यातील ‘जिज्ञासा’ संस्थेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांचा काही दिवसांपूर्वी फोन आला. म्हणाले, ‘‘तुमच्या ‘वळसा वयाला’ सदरासाठी एक अफाट असामी देतो. मुकुंद धाराशिवकर त्यांचं नाव.’’ मी म्हटलं, ‘‘काय करतात हे गृहस्थ?’’ यावर त्यांचे उद्गार होते, ‘‘तुम्हा लोकांना मुंबई-पुण्याबाहेर जीवतोड काम करणाऱ्या माणसांचं नावही माहीत नसावं, हीच एक शोकांतिका आहे. ललित लेखनाबरोबर विज्ञान प्रसारक व जलतज्ज्ञ म्हणून त्यांनी धुळे जिल्ह्य़ात एवढं प्रचंड काम केलंय की, पत्रावर मुकुंद धाराशिवकर, धुळे एवढाच पत्ता लिहिला तरी ते पत्र सुखरूप त्यांच्या हातात जाऊन पडेल.’’ ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या कामानिमित्त आजची रात्र त्यांचा मुक्काम माझ्याकडे आहे. भेटता आलं तर बघा.’’ हे शब्द ऐकल्यावर त्या ‘सो कॉल्ड’ शोकांतिकेची सुखांतिका करण्यासाठी मी लगोलग निघाले.
   कामाचा झपाटा माणसाला तरुण व तंदुरुस्त कसं ठेवतो हे धाराशिवकरांकडे पाहून पटतं. ते सत्तरीच्या उंबरठय़ावर आहेत हे त्यांच्या परिचयपत्रातील जन्मतारखेवरून खरं मानायचं. धाराशिवकरांचा जन्म धुळ्याचा आणि कार्यक्षेत्रही तेच. एस.एस.सी.ला जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपइतके गुण मिळाल्यावर व पुढे बी.ई.ला (सिव्हिल) चार विषयांत टॉपर आल्यावर संशोधन क्षेत्रात काम करावं असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. पण घरच्या अडचणींमुळे धुळे सोडणं शक्य नव्हतं आणि धुळ्यात त्यांना हवी तशी नोकरी न मिळाल्याने ते व्यवसायाकडे वळले.
धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळेने आपल्या या माजी विद्यार्थ्यांला शाळेच्या दोन खोल्या बांधण्याचं काम दिलं. हीच त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ. त्यानंतर लगेचच म्हणजे १९६८ साली स्थापन केलेल्या आपल्या ‘धाराशिवकर कन्सल्टंट्स’ या कंपनीमार्फत पुढच्या ३८ वर्षांत त्यांनी २०,००० घरं बांधली, ५०० कारखाने उभारले, २७ सिनेमागृहांचं बांधकाम केलं, मंदिरं, व्यायामशाळा एवढंच नव्हे तर मशीदही उभी केली. याशिवाय मूल्यकर्ता या भूमिकेतून २० हजार कोटींचं मूल्यांकनही केलं. व्यावसायिक प्रगतीचा वारू असा चौफेर उधळत असतानाच त्यांनी लेखन, संस्कृतचा अभ्यास, विज्ञान प्रसार, पाणी समस्या या क्षेत्रांतही विपुल काम केलं आणि अगदी ठरवून ६०व्या वर्षी व्यवसायातून निवृत्ती घेतली व पूर्ण बहरात आलेला आपला व्यवसाय हाताखालच्या इंजिनीअर्सकडे सुपूर्द केला. त्यानंतर गेली १० र्वष त्यांनी आपल्या आवडीच्या कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलंय.
धाराशिवकर हे मूळचे ललित लेखक. आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या ‘रिंगण’ या पहिल्या पत्ररूप कादंबरीला विशेष उल्लेखनीय कादंबरी म्हणून पुरस्कार मिळाला. प्रकाशित झालेल्या त्यांच्या एकूण २६ पुस्तकांपैकी ‘ऑपरेशन भागीरथी’ या कादंबरीला सवरेत्कृष्ट लेखनाचं राज्य पारितोषिक (२००८) मिळालं तर ‘लिलिपुटच्या शोधात’ ही कादंबरी बालसाहित्य रत्न पुरस्काराची मानकरी ठरली.
धाराशिवकरांनी सावरकरांच्या जीवनावर ‘मध्यरात्रीचा सूर्य’ नावाने एकपात्री कीर्तनही लिहिलं व आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला- गंधारला उभं करून त्याचे ५५ प्रयोग अमरावतीपासून रत्नागिरीपर्यंत केले. आज हा गंधार बी.ई.एम. टेक् (सुवर्णपदक), पेप अशा पदव्या मिळवून बंगलोरमध्ये कार्यरत आहे. त्याची बहीण गंधाली ही एम.ई. असून स्वत:च्या कथांचं कथाकथन करण्याचा तिचा छंद आहे.
ते म्हणतात, ‘‘मुलांना फॅण्टसी या लेखन प्रकाराचं आकर्षण असतं. त्याला विज्ञानाची जोड दिली तर ज्ञान व मनोरंजन दोन्ही साध्य होतं.’’ हा धागा पकडून त्यांनी मुलांसाठी १७ एकांकिका लिहिल्या. त्यांच्या पत्नी मीराताई या सुट्टीत मुलांसाठी नाटय़ प्रशिक्षण शिबीर घेत असत. त्या माध्यमातून ७०/८० मुलांना घेऊन या एकांकिकांचे प्रयोगही झाले. कुमारवयीन मुलांसाठी त्यांनी लिहिलेली ‘अभिजीत अफलातून सागराच्या पोटातून’ आणि ‘साडे-माडे फॅक्टरी’ ही हसतखेळत विज्ञान शिकवणारी पुस्तकं सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
प्राचीन ग्रंथांचा संग्रह व त्यांचा अभ्यास याचं धाराशिवकरांना भारी वेड. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहालयात ६००० पुस्तकं आहेत. घरबांधणी या विषयावरचे त्यांच्याकडे १४७ ग्रंथ आहेत, तर ‘प्राचीन ग्रंथातील पाणी’ यावरचे ४७ ग्रंथ त्यांनी हाताळलेत. १०८० साली राजा भोज याने स्थापत्यकलेवर लिहिलेला ‘समरांगण सूत्रधार’ तसंच इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील ‘कृषिपराशर’ हा शेतीविषयक ग्रंथही त्यांच्या संग्रही आहे. ऋग्वेदातील घरबांधणी, जलसंवर्धन, जलसाठवण.. इ. विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केलाय. ऋग्वेद हा विज्ञानमय कोष आहे हे पटवून देताना त्यांनी इंद्राने केलेल्या प्रार्थनेसंदर्भातील एक श्लोक सांगितला. त्यात अंतरिक्षाच्या पोकळीतील पाणीही आम्हाला मिळो असा उल्लेख आहे.
अभियांत्रिकीकडे वळल्यावरही त्यांची संस्कृतची ओढ टिकून राहिली ती त्यांच्या आईमुळे. लग्नाआधी नववीपर्यंत शिकलेल्या त्या माऊलीने आठ  मुलं झाल्यानंतर मुकुंदाबरोबर एस.एस.सी. केलं आणि नंतर संस्कृत व इंग्लिश हे विषय घेऊन एम.ए. ही पदवीही मिळवली. त्यांच्या आजोबांचे (आईचे काका) चारही वेद मुखोद्गत होते. या संस्कृतप्रेमामुळेच आज ते धुळ्यातील सरस्वती संस्कृत पाठशाळेचे विश्वस्त आहेत (ही ती पाठशाळा जिचे संस्थापक महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, ज्यांनी ३५० ग्रंथ वाचून ‘अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ’ हे पुस्तक लिहिलं व गांधीजींना पटवून दिलं की अस्पृश्यतेला शास्त्रीय ग्रंथात कुठेही आधार नाही.) या पाठशाळेत यजुर्वेदाच्या आधारावर याज्ञिकी शिकवली जाते. इथल्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातून दरवर्षी ३० मुलं तावून सुलाखून बाहेर पडतात. या मुलांना याज्ञिकीबरोबर इंग्रजी संभाषण व संगणक ज्ञान यात पारंगत करण्याचा धाराशिवकरांचा प्रयत्न सुरू आहे.
कविवर्य कुसुमाग्रज हे धाराशिवकरांचे जवळचे स्नेही. एकदा कविश्रेष्ठ त्यांना म्हणाले, ‘‘ललित लेखन लिहिणारे अनेक भेटतील पण पाणी, घरबांधणी या तुझ्या अभ्यासाच्या विषयांवर त्या ताकदीने कोण लिहिणार?’’ हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट. तेव्हापासून धाराशिवकर तांत्रिक लेखनाकडे वळले आणि त्यांनी झपाटल्याप्रमाणे पाणी या एका विषयावरच १५ पुस्तकं लिहिली.
‘भारताच्या प्राचीन जलपरंपरा’ या आपल्या पुस्तकात त्यांनी फड पद्धतीला जगातील शाश्वत सिंचन पद्धत म्हटलंय. धाराशिवकर म्हणतात, फड पद्धत म्हणजे गावाने, गावाची, गावासाठी राबवलेली, स्वयंशासित, स्वयंनियंत्रित, स्वतंत्र अशी जलवितरण प्रणाली. या फड पद्धतीचे १५ बंधारे पुनर्जीवित करण्याचं काम आता त्यांनी हाती घेतलंय. त्यांचं असं ठाम मत आहे की, आपली आजची लोकसंख्या दुप्पट झाली तरी सर्वाना वर्षभर पाणी पुरेल इतका पाऊस आजही भारतात पडतो. पण नियोजनाअभावी सगळं मुसळ केरात जातं.
   त्यांनी हाताळलेला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘धुळे व्हिजन २०२०’, ज्यात धुळे जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासाचा आराखडा मांडण्यात आलाय. जिल्ह्य़ाच्या विकासाचे २२ पैलू निवडून त्यावर त्या त्या विषयातील तज्ज्ञांचं लेखन त्यांनी यात संकलित केलंय. या प्रकल्पाचे समर्थ ‘धुळे २०२०’ व ‘प्रगतीच्या पाऊलवाटा’ नावाने प्रत्येकी २ खंड (एकूण ४) प्रकाशित झाले आहेत.
याआधी म्हणजे २००६ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या प्रेरणेने धुळ्यातील ‘पांझरा’ नदी बारमाही करण्याचा प्रकल्प सादर केला. चार टप्प्यांच्या या कामातील, उगमापासून पांझरा उध्र्व धरणापर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं काम २००८ मध्ये पूर्ण झालं. त्याचं फलित म्हणजे २०१२-१३ साली त्या भागातील ४४ गावं आणि ६६ पाडे दुष्काळमुक्त राहिले. यावर्षीही उन्हाळ्यात तिकडच्या विहिरींना पाणी आहे, जमिनीत ओल आहे. साहजिकच तिथल्या शेतकऱ्यांसाठी ते देवदूत ठरले.
विद्यार्थ्यांना हाताने प्रत्यक्ष कृती करून गणित व विज्ञानाचे प्रयोग करता येतील, अशी अद्ययावत प्रयोगशाळा, घासकडबी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून उभारणं हे कार्याध्यक्ष या नात्याने धाराशिवकरांच्या हातून आकाराला आलेलं आणखी एक मोलाचं काम. त्यांच्या घरात, तळमजल्यावर थाटलेल्या या प्रयोगशाळेचा लाभ दरवर्षी तीनएकशे मुलं घेतात. मुलांना अनुभवातून शिकू द्या, या विचारातून अत्यंत किरकोळ फीमध्ये तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा उपक्रम म्हणजे धुळेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
बालविज्ञान परिषदेशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेतले आहे. २०१२ मधील १ व २ डिसेंबरला धुळ्यात पार पाडलेल्या २०व्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेच्या यजमानपदाची घासकडबी शिक्षण संस्थेने घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे निभावताना त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली.
विज्ञानप्रसार हे धाराशिवकरांचं एक महत्त्वाचं ध्येय असल्यामुळे त्यांना जेव्हा समजलं की, ‘नाशिकचे एक इंजिनीअर प्रभाकर देशपांडे स्वत: उभं केलेलं वैज्ञानिक संग्रहालय वयोपरत्वे सांभाळणं कठीण जातंय म्हणून कुणा जबाबदार व्यक्तीच्या स्वाधीन करण्याच्या प्रयत्नात आहेत, तेव्हा त्यांनी पाठपुरावा करून ते संग्रहालय धुळ्यात आणलं व त्यात भर घातली, त्याला आता तीन र्वष झाली. २००० स्क्वेअर फुटांच्या जागेत मांडलेल्या या संग्रहालयात वैज्ञानिक पण रंजक असे ६६ प्रयोग पाहायला मिळतात. राईट बंधूंनी बनवलेल्या पहिल्या विमानापासून, अवकाशातील स्थानकापर्यंत सर्व प्रतिकृती इथे आहेत. तसंच भूकंपाचं घर आहे. आरशांमधील प्रतिमांची गणिती सूत्रावर आधारलेली जादू आहे. धुळ्याला गेल्यावर चुकवू नये असं हे एक ठिकाण. धुळे ही आधुनिक अभियंत्यांचे पितामह सर विश्वेश्वरैया यांच्या कामाची गंगोत्री. १८८४ साली पीडब्लूडीच्या इमारतीतील ज्या खोलीत ते काम करत, त्याच ठिकाणी त्यांचा पुतळा उभारून त्यांचं कार्यकर्तृत्व, प्रतिकृती व छायाचित्रांद्वारे कायमस्वरूपी मांडण्याचं भाग्य धाराशिवकरांना लाभलं.
यालाच जोडून एका वेगळ्या दालनात स्वातंत्र्योत्तर काळातील
१८ महान अभियंत्यांचं कार्यही उभं केलंय. या कामासाठी
स्थापन केलेल्या ‘भारतरत्न डॉ. विश्वेश्वरैया स्मृती समिती’चे ते अध्यक्ष होते. या प्रदर्शनाचं उद्घाटन ९ फेब्रुवारी २०१४ ला झालं. या निमित्ताने लवकरच धाराशिवकरांनी लिहिलेल्या
‘द्रष्टा एम. व्ही. (मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया)’ या चरित्राचं
प्रकाशन होतंय.
वर लिहिलेल्या कामांशिवाय आणखी अनेक गोष्टी ते करतात. ‘अर्थात माझ्या मी मध्ये आम्ही सर्व सामावले आहोत,’ हे त्यांनी नम्रपणे सांगितलं. त्यांच्या इतर कामांची यादी अशी.. पाणी या विषयाला वाहिलेल्या ‘जलसंवाद’ या मासिकाचं ते गेली चार र्वष डॉ. देशकरांबरोबर संपादन करताहेत. ‘जलमागोवा महाराष्ट्राचा’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील एकेका नदीच्या खोऱ्याचा त्यांनी ३५ अंगांनी अभ्यास सुरू केलाय. भारतीय जलसंस्कृती मंडळ व महाराष्ट्र सिंचन सहयोग या दोन संस्थांच्या कार्यकारिणीवर ते आहेत. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘सार’ संस्थेचे ते सचिव आहेत. राष्ट्रीय गणित वर्षांच्या निमित्ताने तयार केलेले ‘गणित व खगोल या क्षेत्रातील भारताचे योगदान’ या विषयावरचे अभ्यासपूर्ण व्याख्यान ते ठिकठिकाणी देतात. धाराशिवकरांच्या पत्नी मीराताईही या ‘धुळे आयकॉनला’ साजेशा आहेत. त्यांनीही भरपूर लेखन केलंय. आपल्या ‘सार प्रतिष्ठान’तर्फे दोघं मिळून अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम धुळेकरांना देत असतात.
त्यांच्याशी बोलल्यावर ‘जलमागोवा’ घेत जलसंवर्धन, जलसाठवण आदी विषयांवर ‘जलसंवाद’ साधणाऱ्या धाराशिवकरांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या देशाला, राज्याला लाभला तर त्यातून संपन्नताच लाभेल असं वाटत राहातं.