बोलण्यातून उसंत घेत तिनं खिडकीच्या बाहेर पाहिलं.. आज किती तरी दिवसांनी ती अशी मोकळी होऊन बोलली होती. जुनं काही तरी अचानक गवसल्याचा आनंद. आणि त्याला? ज्या कवितेची इतकी आतुरतेने वाट पाहिली ती कविता सजीव होऊन समोर अवतरल्याचा आनंद..

आज राहून राहून तिला त्याची आठवण येत होती. आठवण येत होती- असं म्हणावं तर त्याचा चेहराही स्पष्टसा आठवत नव्हता. पण लक्षात राहिलं होतं त्याचं ते निव्र्याज हसू आणि डोळ्यांत चमकणारी वीज.. वेडय़ासारखा कोसळणारा पाऊस, खंबाटकी घाटात अडकलेली बस आणि अखंड गप्पा मारणारा तो..
काय म्हणून हाक मारायची त्याला? मित्र? पण ज्याचं नावसुद्धा माहीत नाही अशा कुणाला मित्र कसं म्हणायचं? मग सहप्रवासी? पण त्या तीन तासांनंतर आज कित्येक महिने उलटूनही मनात घर करून बसलेला फक्तसहप्रवासी कसा?
कुठून सुरू झाल्या बरं त्यांच्या गप्पा? हं.. तिच्या मोबाइलवर वाजलेली रिंगटोन.. सदाबहार आर केचं सदाबहार गाणं.. ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’.. हे गाणं वाजलं तेव्हा पहिल्यांदा त्यानं तिच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि म्हणाला,   ‘‘ जर तुझ्या मोबाइलमध्ये हे गाणं असेल तर प्लीज प्ले कर ना.. माझं आवडीचं गाणं आहे हे..’’ तिला त्याच्या आगाऊपणाची कमाल वाटली. ओळख ना पाळख आणि हा थेट अगं-तुगं करत आपल्याला गाणं लावायला सांगतोय.. पण तिच्याही नकळत तिनं गाणं प्ले केलं होतं.. कारण हे गाणं म्हणजे तिच्या जगण्याची किल्ली होती. हिंदी शब्दांचे अर्थ कळण्याच्या वयाची झाल्यापासून ती हे गाणं ऐकत होती. कुणासाठी तरी, कशासाठी तरी सगळं झोकून देणारं गाणं.. जगण्याचा अर्थ शिकवणारं गाणं..
गाणं कधी संपलं आणि गप्पा कधी सुरू झाल्या हे दोघांनाही कळलंच नाही. अवेळी पडणाऱ्या पावसापासून ते सोनचाफ्याच्या अत्तरापर्यंत आणि आम आदमी पार्टीच्या राजकारणापासून ते सुरेश भटांच्या गझलपर्यंत सगळं बोलून झालं.. आणि बोलणं तरी कसं तर एकाच्या मनातलं वाक्य दुसऱ्याने पूर्ण करावं तसं..
बोलता बोलता त्यांना इतकंच कळलं की तो कवी आहे आणि ती पत्रकार. तो शब्दांच्या, भावभावनांच्या राज्यात रमणारा.. आणि ती खोटय़ामागचं खरं आपल्या लेखणीतून दाखवणारी.. तिला त्याचं स्वप्नाळू जग भुरळ घालू लागलं आणि त्याला तिच्या वास्तव जगाचा हेवा वाटू लागला..
हळूहळू पाऊस विरला, अडकलेलं ट्रॅफिक सुटलं आणि बस मार्गस्थ झाली. पण गप्पांना अंत नव्हता. जादूगाराच्या पोतडीतून एकेक करामत बाहेर यावी तसा तोकविता ऐकवत होता आणि आपल्याच मनात ठाण मांडून बसलेलं काहीबाही याच्या शब्दातून कसं काय उलगडतंय याचं तिला आश्चर्य वाटू लागलं होतं.. पत्रकार म्हणून वावरताना पाहिलेलं समाजाचं चित्र तिनं मांडायला सुरुवात केली आणि इतक्या लहान वयात हिनं किती जग पाहिलंय, या विचाराने त्याच्या डोळ्यांत कौतुक दाटलं.
बोलण्यातून उसंत घेत तिनं खिडकीच्या बाहेर पाहिलं.. आज किती तरी दिवसांनी ती अशी मोकळी होऊन बोलली होती. जुनं काही तरी अचानक गवसल्याचा आनंद. आणि त्याला? ज्या कवितेची इतकी आतुरतेने वाट पाहिली ती कविता सजीव होऊन समोर अवतरल्याचा आनंद..
‘‘आता पाच मिनिटांतच माझं उतरण्याचं ठिकाण येईल.’’ त्याच्या शब्दांनी ती जागी झाली..
म्हणजे? त्याच्याबरोबरचा हा प्रवास आता संपणार? आणि आपल्या राहिलेल्या गप्पा? आणि ती मगाशी आठवत नसलेली संदीप खरेची कविता.. आणि त्याचं नाव तरी कुठे विचारलं आपण? आणि फोन नंबर?.. हे सगळं त्याच्याशी बोलायचंय..
‘‘पण अरे ऐक ना..’’
कचकन ब्रेक लावत गाडी थांबली आणि आपली सॅक खांद्याला लावून तो उतरलासुद्धा. पाहता पाहता दिसेनासा झाला..
खूप खूप आनंद झालेला असताना अचानक कळ येऊन तो विरावा असं तिला झालं. तंद्रीतच तिनं बाजूला पाहिलं तर एक चिठ्ठी दिसली.. घाईघाईने वाचायला घेणार इतक्यात फोन वाजला आणि चिठ्ठी हातातून निसटून उडाली..
आज अचानक रेडिओ लावायला आणि तेच जुनं ओळखीचं गाणं लागायला गाठ पडली.
‘किसी को हो ना हो हमें तो ऐतबार, जीना इसी का नाम है ..
गाणं ऐकत, ढगाकडे पाहत ती पुटपुटली..
‘‘अनाम साथी, ये गाना और वो शाम, हम दोनों के नाम!’’     
ऋजुता खरे -kharerujuta@gmail.com