आज गरज आहे थॉमस अल्वा एडिसनच्या आईसारख्या आयांची. त्या आत्मविश्वासानं सांगतील, ‘आमच्या मुलांसाठी तुमची शिक्षणव्यवस्था कुचकामी आहे.’
न मस्कार! बघता बघता निरोप घेण्याची वेळ आली. मुलांशी संवाद साधताना मजा आली. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या राहिल्या. आज मोठय़ांना छोटय़ांबद्दल काय वाटतंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. वेगवेगळय़ा वयाची, व्यवसायांची परळ ते बोरिवलीमध्ये विखुरलेली ही सर्व मुलं. सर्वातला समान धागा म्हणजे धास्तावलेपण.
नवी पिढी वेगानं बदलते आहे. बदल अपरिहार्य आहे. पण हा बदल नेमका कुठे घेऊन जाईल याबद्दल आशंका आहेत. सर्वानाच वाटतं मुलांनी कर्तृत्वाने मोठं व्हावं; पण ‘मोठेपणा’च्या संकल्पना खुजा आहेत. मुलं जेवढी आपली तेवढीच समाजाची, राष्ट्राची. त्यांना घडवणं म्हणजे राष्ट्रकार्याला सहभाग याची जाणीवही फारच थोडय़ांना आहे. पालक आणि शिक्षकांनाही वाटतंय, ‘आपलं काहीतरी चुकतंय. नव्या पिढीला जे हवंय ते आपण देऊ शकत नाही, पण आपणच काळसूत्री बाहुल्या. मग चूक सुधारायची कशी?’ अनेक सामाजिक संस्थाची तीच गत. आपले पूर्वीचे कार्यक्रम त्यांना बंद करावे लागत आहेत. कोणताही कार्यक्रम असू दे, मुलं-तरुण तिकडे वळतच नाहीत. नवे कार्यकर्ते मिळत नाहीत. शाळा आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळत नाही, ही त्यांची तक्रार.
मुलांच्या माध्यमातून बदल घडवून आणायचं, असं म्हणत शाळेत अनेक विषय शिकवायला सुरुवात झाली खरी. पण सगळंच उथळ, वरवरचं, दिखाऊ; कारण शिकवणारे तेच, शाळेची वेळ, तासिकांची संख्या तीच, कामाचे दिवसही तेवढेच. एस.एस.सी. बोर्डाचा अभ्यासक्रम इतर बोर्डाच्या तुलनेत मागास, तुटपुंजा आणि शिक्षकांच्या दर्जाविषयी पालक साशंक. मग स्पर्धात्मक परीक्षांतील यश, दर्जेदार शिक्षण साऱ्यांबद्दलच प्रश्नचिन्ह. त्यातच प्रेमाचा ओलावा आणि आपलेपणाचा अभाव. जीव तोडून मुलांसाठी कोणी करणारं भेटत नाही. तर शिक्षकांची तक्रार अशी की, पालकांची साथ मिळत नाही. मात्र दोघांचं एका बाबतीत एकमत. मुलांचं मूलपण हरवत चाललं आहे. ‘जुने लागू द्या मरणालागूनी’ म्हणणं ठीक; पण त्या जागी नवं, सकस यायला हवं. ते आहे कुठे! परिणाम, मुलांचा दोघांबद्दलचा आदर कमी होत चालला आहेत. जुने आदर्श मोडकळीत गेलेत. त्यांची जागा खेळाडू आणि नटांनी घेतली आहे तेही केवळ त्यांच्या भूमिका, अ‍ॅक्टिंग यांच्या आधारे! नात्यातले प्रेम, जिव्हाळाच कमी होत चालला आहे. दुधाच्या सायीला जपावं तसं जपणारे आजी-आजोबा घरात नाहीत. आई-बाबांना त्यांची लुडबुड वाटते. आजच्या कित्येक आजी-आजोबांनाही हवं असतं स्वातंत्र्य. परिणाम, घरातली संस्कार केंद्रे उद्ध्वस्त झाली. प्रार्थना, परवचा, पाढे, गोष्टी, बैठे खेळ, नात्यांची घट्ट वीण सारंच थांबलं. मुलांना वर्तमानात जगाला शिकवताना भविष्य घडवण्याची प्रेरणा देण्यास आम्ही कमी पडतोय. आणि इतिहासाचं ओझंच मुलांना वाटू लागलंय. म्हणूनच मग जुने खेळ, गोष्टी, खाण्याचे पदार्थ, कपडे, रीतिरिवाज सारेच नकोसे झालेत. नव्या पिढीला स्वातंत्र्य हवंय. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा अट्टहास आहे. पण परिणामांची जबाबदारी घ्यायला ते कचरतात. आपल्या हट्टासाठी, मागण्यांसाठी मोठय़ांना कसं वापरून घ्यावं, मूर्ख बनवावं हे त्यांना समजतं. पण अपयश येताच, ठोकर बसताच ती कोसळतात. कारण जबाबदारी घेण्याची, ती निभावण्याची सवयच आम्ही त्यांना लावलेली नाही. ज्या वयात थोडा बिनधास्तपणा असतो तेव्हाच काही करण्यापासून मोठी माणसं त्यांना अडवतात. ‘नको बाळा, अभ्यास कर, तेवढंच पुरे!’ मग स्वत:ची कामं स्वत: करायलाही ते तयार नसतात. तरुणांची चळवळ चालवणारे डॉ. मोहन आपटे म्हणतात, ‘नव्या पिढीत अफाट ऊर्जा आहे, पण त्यांच्या क्षमता विकसित करण्यास आणि असलेल्या क्षमता वापरण्यास त्यांना दिशा देणं. यात आम्ही मोठी माणसं कमी पडतोय.’ परिघात फिरणारी प्रसिद्धी माध्यमंही त्याला अपवाद नाहीत. नवे आदर्श, सकारात्मक बदल, भविष्याची गरज नव्या पिढीकडून अपेक्षा हे सारं मांडण्याला जीवन कमी पडते आहे. टी.व्ही.समोर सतत राहण्यानं आम्ही सारेजण ‘रिसिव्हिंग एन्ड’ला असतो. त्यामुळेच विचार करणं, भावभावना जाणवणं, त्या पोचवणं जमेनासं झालंय. नाटय़कर्मी श्री. भालेकर यांना वाटतं की संगणक, मोबाइल यांसारखी इलेक्ट्रॉनिक साधनं नवी पिढी सहज हाताळते. मग आपल्याला वाटतं की ती हुशार झाली आहेत. पण प्रत्यक्षात त्यांची भावनिक, सामाजिक वाढ खुंटली आहे. त्यांना नातेवाइकांकडे यायला नको, इतरांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावं, न मागता मदतीचा हात पुढे करावा असं त्यांना वाटत नाही. कारण हे सारं शिकवणारा मूल्यशिक्षणाचा तास शाळांतून हद्दपार झाला. वाचन संपलं. इतकं की ग्रंथालीसारखी वाचन चळवळ चालवणारी संस्थाही म्हणते, ‘प्रादेशिक भाषांचं काही खरं नाही.’ शहरातल्या नव्या पिढीची मराठी हद्दपारीची लागण ग्रामीण विभागाला लागल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी स्पीकिंगचा ध्यास धरणारे, मुलांना मराठी, लिहिता, वाचता, बोलता यावं यासाठी अट्टहास धरत नाहीत. पूर्वीची तरुणांची मंडळं, वासूनाके, इराणी हॉटेल छोटय़ा मोठय़ा संस्था, सामाजिक चळवळी ज्या व्यक्तिमत्त्व घडवत, त्या राहिल्या नाहीत, मन:शक्ती केंद्र, विवेकानंद केंद्र आदींकडे येणारा ओघ कलापथक, मेळावे कमी झाले. विनामोबदला सेवावृत्तीने झटणाऱ्या या साऱ्यांची जागा व्यावसायिक ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामनी’ घेतलीय. सर्वाचंच व्यापारीकरण. पैशात मूल्य मोजण्याची धडपण. अगदी माणसाची, प्रेमाची किंमतही! शाळेतील बुलबुल, गाइड, एम.सी.सी., एन.सी.सी. बंद झाली. खेळाची मैदाने गायब झाली. रसिकता वाढवणारे, मनावरचा ताण कमी करणारे, कला, संगीत, वादन, चित्रकला, शिवणकाम, विणकाम या विषयांना हल्ली अनेक शाळांतून शिक्षकच नाहीत. आता उरलं फक्त पाठांतर. तेही निरस, ओठांतून पोटात. पोटातून पेशीपेशीत भिनतील असे उतारे, गीत, उद्गार, भाषण.. यांचा कोणी विचार करेनासं झालं, कारण परीक्षेला नाही!
निर्भेळ आनंद देणाऱ्या, एकाग्रता साधायला मदत करणाऱ्या, साऱ्या गोष्टी आम्ही विसरलो. उसातून रस काढलेल्या चिपाडासारखे आपण. मोठय़ांनी ते केलं. ज्यांना परवडतं त्यांनाही शिक्षण फुकट. पुस्तकं फुकट, जेवण फुकट. शिवाय काही माजी विद्यार्थी संघटना, समाजसेवा संस्था, मुलांना दप्तरं, बूट, युनिफॉर्मचेही फुकट वाटप करतात. सारं फुकट सरस कसं असेल? कोणती वृत्ती आम्ही जोपासत आहोत? आम्हाला कसे हात घडवायचे आहेत? शुभंकर, निर्मिती करणारे, मदतीचे हात पुढे करणारे की भीकमांगे, लाचार..
कोणीतरी एखादा विद्यार्थी आत्महत्या करतो, त्याच्या मुळाशी न जाता त्या समस्या सोडवण्याचा सोपा मार्ग शोधला गेला, परीक्षा रद्द. वर्षभराचे गुण, वह्य़ांचे गुण, ओपन बुक टेस्ट, प्रश्नपेढी देणं, सर्वाना पास व्हायला मदत करणारं सरळसाधं सोपं उत्तर, पण आयुष्य एवढं सरळसोपं असतं? त्यांना परिश्रम करायला, लढायला शिकवायचं की.. समतोल फौंडेशनचे विजय जाधव सांगतात की, पळून जाणारी मुलं सर्व थरांतील असतात. ग्लॅमरचं आकर्षण वा घरातील संघर्ष, समन्वयाचा अभाव जास्त असतो. तीच गोष्ट गुणानुसार तुकडय़ा न पाडण्याची, आदेश काढण्याची वा शिक्षकांना ‘माराल तर तुरुंगात जाल’ म्हणून शासनानं सांगण्याची. खरोखर दुष्ट, मारकुटे शिक्षक असतात किती? प्रेमस्वरूप, मातृस्वरूप गुरूंनाच ‘मुलं’ हल्ली धमकी देतात ‘वर तक्रार करू’, म्हणजे त्यांना हवं तसं वागू द्यायचे. शिस्त नको त्यांना लागायला? एकाच वेळी पूर्ण वर्ग वर्गातल्या प्रत्येक मुलाच्या मर्जीप्रमाणे कसा चालवता येईल? हाताची पाचही बोटं सारखी असतात? मग प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे शिक्षण नको घ्यायला? मुलांना त्यांच्या क्षमता, अक्षमता ओळखायला आणि आहोत तसे स्वीकारायला आम्ही कधी शिकवणार?
व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या स्मिताताई सांगतात, ‘मुलं कोणाचं तरी ऐकून काहीतरी सांगतात. गणितात नापास होणारा इंजिनीअर व्हायचं म्हणतो, तर चित्रकलेशी काही संबंध नसणारा फॅशन डिझानर, इंटिरिअर डेकोरेटर व्हायचं स्वप्न बघतो. स्वत:ला हुशार समजणारी मुलं जेव्हा-देशाच्या सीमेवरचा देश कर्नाटक, भारताची राजधानी मुंबई अशी उत्तरं देतात , तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही.’ गेल्या १८ वर्षांत १९४७ नंतरच्या भारताला लढाव्या लागलेल्या लढाया आणि किमान पाच परमवीरचक्र विजेत्यांची नावं सांगणारा एकही तरुण किंवा तरुणी भेटली नाही.
तीच गोष्ट माहिती असणं आणि त्याचा वापर करणं याबाबतीतही. मुलांची प्रदूषण, पर्यावरण, सकस, समतोल आहार यावर प्रश्नोत्तरं पाठ असतात, पण वागणं एकदम विपरीत. या सर्वाप्रमाणे सुजाता, सुवर्णा, निकी अशा असंख्य आया भेटल्या. कित्येकांनी तर मुलांना पुरेसा वेळ द्यायला मिळावा म्हणून करिअरच्या मागे न लागणं पसंत केलेलं. त्यांनाही भीती वाटते की आमच्या मुलांना आम्ही खूप चांगले संस्कार दिलेत. पण त्यांना ज्यांच्यात वावराचंय ती मुलं कशी असतील? चांगलेपणाच त्यांना महागात नाही ना पडणार? तीच गोष्ट शिल्पा, श्वेता यांची. त्यांनाही वाटतं, मुलांनी शिक्षणासाठी परदेशात जावं. करिअर मात्र भारतातच करावं. पण त्या आपल्या मुलांना त्यांनी इथेच का राहावं हे पटवून देऊ शकत नाहीत. कारण खरंच सारं आज बदललंय. प्रामाणिकपणा, सचोटी, खरं बोलणं दुर्गुण बनू पाहत आहेत. समाज आणखी स्तरात दुभंगतोय.
म्हणूनच अनेक जण वाट पाहतात पर्यायी व्यवस्थेची. महाराष्ट्रात आतापावेतो १२ गुरुकुल म्हणजेच १२ तासांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ज्यांचा भर मार्काची शर्यत जिंकणारी मुलं निर्माण करण्यापेक्षा जीवनाची मॅरेथॉन जिंकणारी पिढी तयार करण्यावर आहे. आज गरज आहे थॉमस अल्वा एडिसनच्या आईसारख्या आयांची. त्या आत्मविश्वासानं सांगतील, ‘आमच्या मुलांसाठी तुमची शिक्षणव्यवस्था कुचकामी आहे.’ मादाम मेरी क्युरी आणि तिच्या सहकाऱ्यांप्रमाणे प्राथमिक शिक्षण घरीच देणं पसंत करतील. नंतरही शाळेत पाठवतील, पण त्यांच्यातलं मूलपण आणि माणूसपण जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील, कधी वैयक्तिक तर सामूहिकपणे. नमस्कार!     
    (समाप्त)