शब्दांकन- सुलभा आरोसकर
 ch13आमच्या रानडे घराण्यावर संगीत ईश्वराची खूपच मेहेरनजर आहे. प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारे, कान तृप्त करणारे संगीत पणजोबांपासून आमच्या नसानसात भरले आहे. अर्थातच बँक ऑफ इंडियातली माझी नोकरी सांभाळत माझीही ‘संगीत साधना’ सुरू होतीच. पन्नाशीजवळ आल्यावर मात्र नोकरीत मन रमेना. ‘माया’जालात न अडकता १९९६ साली नोकरीला रामराम ठोकला. संगीतातच काही तरी करायचं हा संकल्प सोडला. ईश्वरदत्त देणगीचा प्रसाद इतरांना वाटायचा. पण कसा? शास्त्रीय संगीत? नाटय़ संगीत? का सुगम संगीत? अभ्यासाअंती लक्षात आलं ‘सुगम संगीत’ हे सर्वासाठी असू शकतं. दररोज १-२ तास साधना पुरेशी आहे. या गीताच्या आदान-प्रदानाने अनेक जीव सुखी होऊ शकतात. ‘सुगम संगीताचे’ गायक घडवायचे यावर शिक्कामोर्तब झालं. बायको व दोन्ही मुलींची साथ होतीच.
     मग ७ जुलै १९९७ रोजी कल्याण येथे ‘श्री समर्थ शारदा सुगम संगीत’ संस्थेची स्थापना झाली. सूर, ताल, वर्ण, अक्षर, शब्द हे गीत गायनाचे प्रमुख घटक. त्यात षड्रसांचा मिलाफ. हे लक्षात घेऊन त्याचा अभ्यासक्रम तयार केला. सहा-सहा महिन्याचा कोर्स करून प्रथमा ते विशारद अशा पदवीयुक्त परीक्षांचे नियोजन केले. पहिल्याच क्लासला २५-३० जण शिकायला आले. संगीताबरोबर, चेहेऱ्यावरील हावभाव स्थळ-काळानुसार, प्रसंगानुसार गाण्याची निवड, असं सर्व शिकवत गेलो. वयोगटाप्रमाणे अभ्यासक्रम आखले,  ६-११ वयोगटासाठीही वेगळा अभ्यासक्रम आहे. त्यात संगीताचे संस्कारही केले जातात. ओमकार, प्रार्थना, आरत्या, देशभक्तीपर गीते, श्लोक यांचा समावेश आहे. प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. मी आणखी उत्साहाने कामाला लागलो. पनवेल, ठाणे येथे शाखा सुरू केल्या. विशारद झालेल्यांना त्यांच्या घराजवळ वर्ग घेण्यासाठी मार्गदर्शन केले. आजमितीस महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा चार राज्यात आमचे विद्यार्थी प्रशिक्षण देत आहेत. इतकेच नाही तर लंडन, कॅनडा, सिडनी येथेही वर्ग सुरू असून अमेरिकेत ऑनलाइन शिकवण्या सुरू आहेत.
सुगम संगीताचा असा सुखकर प्रवास सुरू असतानाच वाद्येही सुगम वाजवता येतील हे लक्षात आल्यावर तबला, हार्मोनिअम, गिटार, कॅसिओ, बासरी या वाद्यांचेही सुलभीकरण सुरू आहे. डॉ. जयंत करंदीकरांची ओमकार साधना संगीताचाच नव्हे तर सर्व जीवनाचा गाभा आहे, याची प्रचीती आल्यावर त्याचे विनामूल्य शिक्षण सर्वाना देऊ लागलो. ४-४ तासाची शिबिरं घेण्यास सुरुवात केली. तसंच ‘व्हाइस कल्चर’ नाटय़संगीत यांचे क्लासेस सुरू आहेतच. आज ‘कृतार्थ मी.. तृप्त मी’ अशी अवस्था आहे. २०० शिक्षक, ३५ परीक्षक, ८० परीक्षा केंद्रे आहेत. एक मात्र खरं, मी वाटचाल सुरू केली खरी..पण ‘लोग साथ आते गये! और कारवाँ बनता चला गया..         

छंद माझा वेगळा
रमेश विटकर
ch14माझा जन्म १९४४ साली हैदराबादला झाला. वडील सरकारी सेवेत असल्यामुळे अनेक ठिकाणी बदली झाल्याने बरीच भ्रमंती झाली. बी.एस्सी. झाल्यावर मुंबईच्या हाफकिन संस्थेत ‘डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी’ ही पदविका प्राप्त करून पिंपरीच्या हाफकिनमध्ये रुजू झालो. २००२ साली येथूनच मॅनेजर पदावरुन निवृत्त झालो. नोकरीत असतांना छंद व सामाजिक सहभाग याकडे फारसे लक्ष देता आले नव्हते. तोच निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा अजेंडा ठरला.
१९६६ सालापासून मुंबई, पुणे, हैदराबाद, उदगिर, धुळे, औरंगाबाद, बँकॉक, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी अनेक नाटके पाहिली. त्या हजारो नाटकांच्या तिकिटांचा संग्रह केला असून निवृत्तीनंतरच्या  काळात त्यात मोलाची भर घातली. त्यावर अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते, समीक्षक यांचा लेखी अभिप्राय घेतला आहे. माझा हा संग्रह पाहून कुणी भारावून जाते तर कुणी कौतुक करते. या अनुभवावर आधारित ‘छंद माझा वेगळा’ हा कार्यक्रमही करू लागलो. या छंदाने शब्दातीत समाधान दिले. दूरदर्शन व आकाशवाणी येथेही माझ्या मुलाखती झाल्या असून लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
पुणे विद्यापिठाचा मानद व्याख्याता असल्याने ‘आठवणी परदेश प्रवासाच्या,’ ‘विषारी साप समज-गैरसमज’ व ‘छंद माझा वेगळा’ या विषयावर मनोरंजक व्याख्याने शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, अनेक मंडळे येथे देत असतो. यामुळे माझा वेळही चांगला जातो व लोकांच्या ज्ञानात भरही पडते.
जमेल तेवढा सामाजिक सहभाग वाढवत असल्याने निवृत्तीनंतरचा सोनेरी काळ, येईल त्या अनुकूल, प्रतिकूल प्रसंगांचा आनंदाने स्वीकार करून घालवत आहे. मी व पत्नी रेणू, उभयतांनी २००६ सालीच देहदानाचा संकल्प सोडला आहे.
    
लेखणी सखी झाली!
मंगला नाफडे
एक दिवस वर्तमानपत्रात जाहिरात वाचली. आपल्या ‘आठवणीतील गाव’ या विषयावर साहित्य पाठवा.झालं! मनातल्या सख्या लागल्या किलबिलायला, एक म्हणाली, ‘घे कागद पेन.. आणि लिही लगेच.’ दुसरी म्हणाली, ‘ए आपली जमाडी जम्मत नाही सांगायची.’ लगेच तिसरी विचारी सखी पुढे झाली. कागद पेन ओढलाच.. आणि पहाते तर काय एक सखी खांद्यावरून खाली वाकली, दुसरी कानावर तर तिसरी चक्क बसली पेनवर.. काय लिहिते ते बघायला. मस्त समा जमला, सगळ्या गेलो की लहानपणात त्या गावी आणि असं माझ्या सख्यांना गोंजारत मी माझा पहिला लेख लिहिला वयाच्या ७०व्या वर्षी! खूप आवडला सर्वाना आणि मग माझ्या आजूबाजूला जे घडते ते सारे, अनुभव, पूर्वाआयुष्यातील प्रसंग शब्दबद्ध करायला लागते. छापून यायला लागलं आणि मला फोन पण यायला लागले. लोकांनी पसंती कळविली. मैत्रिणी मिळाल्या.
लेखणी सखी झाली. जीवन कसं जगायचं. आपल्याला काय हवं ते मला समजलं. आज मी ८२ वर्षांची आहे. दोन पुस्तकं, दोन नाटके, अनेक लेख यांमुळे जीवन समृद्ध झाले आहे. मला मनात शांत वाटतंय.. मी काही करून दाखवलं. मनातलं हे वादळ होतं? नाही होतं.ते एका शांत सरोवराच्या काठी आयुष्य स्थिरावलं आहे. ‘तुम्ही आम्हाला जगायला शिकवलं’ हा मित्र-मैत्रिणींनी दिलेला नजराणा.. त्यासाठी लाख लाख धन्यवाद.