‘‘सर्वच वैवाहिक नाती एका अर्थाने ९५ टक्के रुटीन म्हणजे ओढणे या रीतीने जगायची असतात. कारण रोज नव्या रीतीने जगणे शक्य नाही. परंतु उरलेले पाच टक्के क्षण तुम्ही कसे वापरता यावर तुमचे नाते किती प्रगल्भ होऊ शकते ते अवलंबून आहे’’

ब्रेकअपवरचे लेख वाचल्यावर एका स्त्रीने सांगितले, ‘‘आम्ही आमच्या ऑफिसमध्ये नेहमी तुमच्या लेखांवर चर्चा करतो. पण तुम्ही आमच्यातील अनेकांच्या अनुभवांवर लिहिलेच नाही. ब्रेकअपबद्दलचे तुमचे लेख चांगले आहते. पण आमच्यापकी अनेकींचे संसार जणू काही ब्रेकअप झाल्यासारखेच आहेत. त्यांचे काय? त्यांच्याबद्दल तुम्ही कधी लिहिणार आहात? का आमचा प्रश्न तुम्हाला जाणवतच नाही?
तिच्या थेट प्रश्नांमुळे मी विचारात पडलो. अरेच्या अशा माणसांच्या प्रश्नांबद्दल मी लिहिलं कसं नाही? जुने लेख पुन्हा एकदा चाळले. जाणवले, थेट जरी हा प्रश्न मी हाताळला नसला तरी अनेकदा मी याबाबत लिहिले आहे. पण आता या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेता या प्रश्नाकडे तपशिलात जाऊन बघूया.
तो आणि ती. लग्न होऊन पंधरा र्वष झाली आहेत. एकच मुलगा. डोंबिवलीत छोटेखानी घर. लग्नावेळी तिला नोकरी होती. लग्नानंतर ही चालू ठेवली. त्यांची प्रगती झाली. तो म्हणाला, आता तुझ्या नोकरीची गरज नाही. दोन वर्षांत मुलगा दहावीला जाईल, तेव्हा तू त्याची काळजी घायला त्याच्या जवळ हवीस. मग तिने नोकरी सोडली. सकाळी तो लवकर डबा घेऊन जायचा. मुलाची उत्तम तयारी व्हावी म्हणून आठवीपासून कोचिंग क्लास. शाळा-क्लासमुळे मुलगा दिवसभर बाहेर. त्यालाही यायला खूप उशीर होई. त्यात कामानिमित्त त्याचे दौरे. देशात-परदेशात. रविवारी फक्त सगळे एकत्र घरात. तो रविवारी सकाळी निवांत इंग्रजी-मराठी पेपर वाचत पडून राही. तिचा रविवार सकाळ कार्यक्रम ठरलेला असे. आधी रंगोलीतील गाणी पाहायची. मग नारळाचे दुधात भिजवलेले कोकणी पोहे. नाश्ता झाला की स्वयंपाक. तोपर्यंत तो लोळत पडलेला असायचा. दरम्यान तिचे मुलाच्या मागे लागणे. होमवर्क पूर्ण करण्यासाठी. जेवणे झाली की दुपारी थोडीशी झोप. चार वाजता चहा. संध्याकाळी दोघेजण मार्केटमध्ये जाऊन भाजी आणायचे. मग तो नाक्यावर मित्रांना भेटायला जाई. तिला रात्रीचा स्वयंपाक. दर रविवारी रात्री मुगाच्या डाळीची खिचडी, कधी पापड-लोणचे असा ठरलेला बेत. रात्री त्याच्याजवळ झोपण्याचा प्रयत्न. आठवडाभर तो दमलेला असल्यामुळे तो लगेच झोपी जात असे. म्हणून ती रविवारची वाट बघत असे. पण तरीही सगळे रविवार तिच्या पदरी पडत नसत. बेडवर झोपल्यावर ‘‘तुझे वजन वाढले आहे. तू अजून थोडी नीटनेटकी राहत जा, अशा कॉमेंट करी. त्यामुळे तिचा उत्साह मावळे. तरीही त्याची मागणी असेल तर मागणी तितका पुरवठा या न्यायाने ती समागमात सहकार्य करे.
सोमवारपासून नवीन सप्ताह
तेच रुटीन. सारे कसे यंत्रवत.!
तो आणि ती एकाच घरात राहतात. एकच अन्न खातात, एकच बेडवर झोपतात तरीही किती दूर. ही कहाणी लिहीत असताना मी इतका कंटाळलो तर अशा प्रकारचे जीवन जगत असलेली माणसे किती कंटाळलेली असतील? त्यांच्यात काही नाते आहे असे समजायचे का?
मला तर वाटते त्यांच्यात फक्त व्यावहारिक नाते शिल्लक राहिले आहे. भावनिक ओलावा, वैचारिक संवाद आणि शारीरिक ओढ या पती-पत्नी नात्यातील महत्त्वाचे घटकच या नात्यात मिसिंग आहेत. शिल्लक आहे ते एक रूक्ष रुटीन. निसर्गत: काळ पुढे जातो तशी लग्नाची र्वष जातात, नोकरीत प्रगती होते, मुलं मोठी होतात, आíथक प्रगती होते, एकमेकांचे आई-वडील वृद्ध होतात. यथावकाश या विश्वात राहत नाहीत.
यापलीकडे नाते वाढतच नाही, ते काळप्रवाहाबरोबर फक्त सरकत राहते. आपोआप. विनासायास अशा नात्यात निश्चित काही आनंदाचे क्षण असतात. परिघावर नातेवाईक -मित्रमत्रिणी असतात, परंतु ते नात्याचा अंगभूत भाग बनू शकत नाहीत.
आमच्या कार्यशाळेत आम्ही अशा नात्यांना ‘ओढणे नाते’ असे म्हणतो ( इतर प्रकार : लोढणे नाते यात नात्यातून बाहेर पडता येत नाही म्हणून ‘ढकलत राहायचे आणि तिसरा प्रकार म्हणजे वाढवणे )
माझे एक जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ मला सांगत होते. सर्व नाती एका अर्थाने ९५ टक्के रुटीन म्हणजे तुझ्या भाषेत ओढणे रीतीने जगायची असतात. कारण रोज नव्या रीतीने जगणे शक्य नाही. परंतु उरलेले पाच टक्के क्षण तुम्ही कसे वापरता यावर तुमचे नाते किती प्रगल्भ होऊ शकते ते अवलंबून आहे.
त्यांनी हे सांगितल्यावर मला प्राजक्तीची आठवण झाली. प्राजक्तीचे आयुष्य खूपच रटाळ झाले आहे असे तिला वाटू लागले. विशेषत ती अमेरिकेतून परत आल्यावर. मुलांचे शिक्षण भारतात चांगले होईल म्हणून ती दोन वर्षांपूर्वी भारतात परत आली. चतन्याला चांगली नोकरी लागली. तिने मुलांकडे लक्ष द्यायचे ठरलेलेच होते. आल्यावर पहिल्या वर्षांत नवे घर घेणे, मुलांचे प्रवेश यात बराच वेळ गेला. आणि मग एकदम सगळे रुटीन होऊन गेले. पसे भरपूर होते, हाताखाली दोन बायका होत्या ( अमेरिकेत नसलेली महत्त्वाची गोष्ट). पण तरीही काहीतरी हरवलेले होते. चतन्य कामाच्या रगाडय़ात इतका अडकला होता की तिकडे असताना बरे अशी परिस्थिती. मुलांचे बघणार तरी किती. लग्नापूर्वी ती सतारीच्या क्लासला जायची आणि चतन्य तबला वाजवीत असे. तिकडे गेल्यावर तबला आणि सतार ते विसरलेच होते. तिला वाटले आपले रुटीन होत चाललेले नाते उत्कट करायला सतार ही संधी असेल. तिने बाजारात जाऊन नवी सतार विकत आणली. मुले शाळेत गेल्यावर सतारीची शिकवणी लावली आणि रियाज सुरू केला. चतन्याने फक्त ‘वा वा, तुझा वेळ चांगला जाईल’, अशी तोंडदेखली दाद दिली. ते आत्ताच तिला आवडले नाही. काही दिवसांनी तिने चतन्याला सविस्तर ई-मेल पाठवली
प्रिया चतन्य,
गेले वर्षभर आपण एकमेकांपासून दूर जात आहोत असे नाही कारे तुला वाटत? रात्री फक्त कुशीत घेऊन झोपावेस अशी माझी साधी अपेक्षा असते. पण आवराआवर करून मी बेडरूममध्ये येईपर्यंत तुला शांत झोप लागलेली असते. तू मला मिस करत नाहीस, असं मला वाटू लागलंय. दिवसातून एखादा फोन करावासा असं अजून मला वाटतं. गेला बाजार एसएमएस तरी. तुझा फोन आला की मला ठाऊक असतं तू काय सांगणार ते. मिटिंग आहे उशीर होईल किंवा जेवायची वाट बघू नकोस. पण तेही तू अनेकदा एसएमएस करून कळवतोस.
तुझा आवाज ऐकवासा वाटतो मला. माझी एक नम्र मागणी आहे. दर रविवारी मी जेव्हा सतारीचा रियाज करते तेव्हा एक तास फक्त तबल्यावर तुझी साथ दे. तुला सराव नाही हे माहिती आहे मला, पण निदान एक तास तू माझ्या डोळ्यासमोर राहाशील. बस्स! करशील ना एवढे माझ्यासाठी?
तुझीच,
प्राजक्ती.
.आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका हल्ली दोघे सकाळी एक तास चालायला जातात, रविवारी एक तास रियाज करतात आणि बऱ्याचदा प्राजक्तीला खुशी मिळते!
माझे असे प्रामाणिक मत आहे की, नात्यातला गोडवा कमी झालेला कमी-अधिक फरकाने दोघांनाही जाणवत असतो. पुरुष बोलून दाखवत नाहीत आणि मित्र, पाटर्य़ा, क्लब अशात मन रमवतात. महिलांना भिशी, स्वयंपाकातील नवीन गोष्टी, घर आवरणे अशा गोष्टींत गुंतल्यावाचून पर्याय नसतो. आणि संशोधनांती सिद्ध झालंय की नात्यात येणारे शिळेपण स्त्रियांना अधिक प्रमाणात जाणवते आणि मग एकतर नवऱ्याशी या ना त्या कारणाने कटकट करणे, चिडचिडेपणा करणे अशा मार्गाचा अवलंब करतात.
आपले नाते चांगले व्हावे याचा पुढाकार कोणी घ्यायचा हा कळीचा आणि इगोचा मुद्दा असतो.
आसावरी मला थेटच म्हणाली होती, हे सगळं मीच का करायचं? त्याला काहीच वाटत नाही का? दर वेळेला पडती बाजू माझी? रिलेशनशिपबद्दल मी वाचलेले तुमचे लेख पेपर उघडून त्याच्यासमोर ठेवायचे. तो तेही सवडीने वाचणार. पुन्हा त्या विषयावर बोलती बंद. तुमचे लेख वाचून आमच्या संसारात काहीही फरक पडलेला नाही. मी उगाच कात्रणे वगरे ठेवते.
मी लगेच तिच्या भावनांशी सहमती दाखवली. तिच्या भावना निश्चित योग्य होत्या. गडबड होती विचारांची! प्रथम माझे लेख कात्रण काढून ठेवण्यासारखे वाटतात म्हणून मी तिचे आभार मानले आणि सांगू लागलो, आसावरी, इथे पुढाकार कोण घेतो आणि पड कोणी घ्यायची हा प्रश्नच नाही. आपले नाते चांगले व्हावे असे ज्याला अधिक तीव्रतेने वाटते त्याने पुढाकार घ्यायचा. माझ्याकडे समुपदेशनासाठी नवरे मंडळीसुद्धा बरीच येतात. त्यामुळे पुरुषांना चांगले नाते नकोच असते किंवा त्यांना काहीच पावले उचलावीशी वाटत नाहीत, हा नियम नाही. बरेच पुरुष या बाबत उदासीन असतात हे वाक्य मला मंजूर आहे. कदाचित तुझा नवरा त्यापकी एक आहे, असे क्षणभर आपण गृहीत धरूया. म्हणजेच नात्यात टवटवी आणण्यासाठी तूच शिल्लक राहातेस. इतकेच नाही तर तुझे आणि मििलदचे नाते उत्तम व्हावे हे तुझे उद्दिष्ट झाले नाही का? म्हणजे तुझे जर ते उद्दिष्ट असेल तर तुलाच मार्ग काढायला पाहिजे. यात मििलदचा प्रश्नच येत नाही.
तुमचे नाते पूर्वी कसे होते, त्यात कोणते मोलाचे आठवणीत राहणारे क्षण होते ते तुझ्या पक्के लक्षात असतील. पूर्वी ज्या गोष्टी मििलद बऱ्याचदा करायचा आणि तुला आवडायच्या त्या गोष्टींची यादीच तुझ्याकडे असेल. त्याच्या आवडीनिवडी तुला माहिती आहेतच. आणि सगळ्यात महत्त्वाचे तू पूर्वी जशी वागायचीस आणि आत्ता कशी वागतेस यातला फरक तुला माहिती आहे. ठीक आहे. तुझ्या वागण्यातील बदलणं मििलदसाठी निमित्त असेल. पण त्या बदलात तुझा काही सहभाग असेलच की
या सगळ्या माहितीचा वापर करून तू सगळे चांगले बदल घडवून आणू शकतेस. अटी दोनच. सुरुवात तुझ्यातील बदलांपासून करायची आणि दुसरे म्हणजे मिलिंदशी संवाद साधताना आपला टोन, स्वर यांवर नियंत्रण ठेवायचे. जे तुला अपेक्षित आहे आणि का अपेक्षित आहे ते सौम्य स्वरातपण ठामपणे मििलदपर्यंत पोहोचव. आणि काय फरक होईल ते सांग.
आसावरीसाठीचा उपाय ज्यांना पटेल त्यांनीही करून बघायला काय हरकत आहे, कदाचित त्यांनाही पुन्हा जवळिकीचा आनंद मिळेल!