‘लग्नाविना’ या कादंबरीचा विषय खरं तर ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीमुळे पुढे आला असं म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. माझा ‘लैंगिकता आणि नैतिकता’ हा लेख २५ जून  २०११ रोजीच्या ‘चतुरंग’मधून प्रसिद्ध झाला आणि ‘लोकसत्ता’च्या सुजाण वाचक वर्गात खूपच उत्साह आलेला मला ई-मेल वरून जाणवला.
‘तरुण मुले ब्ल्यू फिल्म्स का पाहतात? पुरुष गर्दीत वा अंधारात स्त्रीची छेडछाड करण्याची संधी का शोधतात? स्त्रिया अंगप्रदर्शनाच्या आहारी का जातात? भारतात विवाहसंस्था मजबूत असूनही आपण कोणत्या अतृप्त इच्छेच्या मागे धावत आहोत? एकीकडे विवाहाद्वारे लैंगिक (मुक्त)संबंधांवर बंधने घालून घेऊन दुसरीकडे तीच बंधने झुगारण्यासाठी नकळतपणे चोरवाटा, पळवाटांचा आधार माणूस का घेत राहतो? हे वास्तव बदलायचं कसं?’ या मुद्दय़ांवरचा तो लेख वाचून काही वाचकांनी आणि प्रकाशकांनीसुद्धा यावर तरुणांसाठी काही वेगळी निर्मिती करा, अशी सूचना केली आणि या विषयावर कादंबरी लिहावी, असं मला वाटू लागलं. पण कादंबरी-स्वरूप लेखन हा माझा पिंड नाही, तरी ते आव्हान समजून लिहायचं ठरवलं! त्यात पुढील वर्षांत, ‘आदर लिंगभावाचा’ हा लेख धरून  २०१२-१३ मध्ये लैंगिक विषयावर माझे आणखी चार लेख ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर बरोबरीने चाललेल्या कादंबरी लेखनास योग्य दिशा मिळत गेली.
मध्यमवर्गातील सुशिक्षित आणि उच्चशिक्षित वर्ग मुख्यत: नजरेसमोर आणून वय वर्षे १५ ते ३० या वयोगटातील तरुण आपल्या जीवनातील प्रश्न कसे सोडवतील? याची कल्पना करून ही कादंबरी लिहीत गेले. हा वयोगट म्हणजे ‘कामभावना’ उत्तेजित होत रहण्याचा ‘पीक’ टाइम! त्यात लग्नाचे वाढणारे वय आणि तरीही स्वत:ला चारित्र्यवान सिद्ध करण्यासाठी पालकांच्या आणि समाजाच्या दडपणाखाली आपली कामऊर्जा कोंडून ठेवण्याचासुद्धा हा महत्त्वाचा कालखंड! तरुणांच्या या लैंगिक जाणिवांचा आणि कोंडलेल्या मन:स्थितीचा अचूक गैरफायदा उठवून धंदा साधणारी आपली चित्रपट, टी.व्ही.सारखी प्रसारमाध्यमे आणि पुन्हा त्यामुळे कामवासनेने अस्वस्थ होणारा, कामपूर्तीचे बरे-वाईट मार्ग निवडणारा तरुणवर्ग असे हे चक्र आपल्या समाजात चालू झालेले आहे. या वस्तुस्थितीची डोळसपणे दखल घेणारा व उपाय शोधणारा, कॉलेज तरुण-तरुणींचा गट हाच या कादंबरीचा ‘नायक’ आहे. सध्या ‘लग्नाविना’ राहण्याचा ‘ट्रेड’ किंवा परिस्थिती जी समाजात येऊ घातलेली आहे, तिला योग्य वळण देणारी तरुण मित्र-मैत्रिणी या कादंबरीत आपल्याला भेटतात. विवाहमुक्त पण विविध प्रकारच्या कुटुंबसंस्था हा तरुण गट व्यवहारात कसा स्वीकारीत जातो आणि आपापल्या प्रश्नांना उत्तरे कशी मिळवतो, हा या कादंबरीचा वैचारिक गाभा म्हणावा लागेल.
समाजातील तरुण मुला-मुलींना ही कादंबरी विकत घेणं परवडलं पाहिजे हा विचार लक्षात घेऊन प्रकाशकाची भूमिकासुद्धा मीच पार पाडलेली आहे. मला खात्री आहे की, कादंबरीचा वेगळेपणा लैंगिक कोंडी व्यक्त होण्यास हातभार लावणारा आणि पालक व तरुणांना दिलासा देणारा ठरेल.
mangala_ samant@yahoo.com
या सदरासाठी मजकूर पाठवताना –
लेखाची शब्दमर्यादा ५०० असून जानेवारी २०१२ ते सप्टेंबर २०१३ दरम्यान प्रसिद्ध झालेलीच पुस्तकेच पाठवायची आहेत. पुस्तक का लिहावेसे वाटले हे सांगण्याबरोबरच पुस्तकापलीकडचे मनोगत या मजकुरात अपेक्षित आहे. या विषयी कोणताही संवाद साधला जाणार नसून अंतिम निर्णय संपादकांचा असेल. मजकूर पाठवा. -चतुरंग, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०. वा  chaturang@expressindia.com