त्या सगळ्याजणींना सर्जनशीलतेचा ध्यास. जे काही करायचे त्यात कलात्मकता असलीच पाहिजे या विचाराने त्यांनी निसर्गातल्या गोष्टींना नावीन्याचा साज चढवला आणि त्यातूनच जन्माला आली ‘लाखी’ अर्थात लक्ष्मी. आपल्यातील कलेलाच त्यांनी व्यवसायाचं रूप दिलं आणि या लक्ष्मीची पावलं त्याच्या कलेत उमटली. त्या मैत्रिणींविषयी..
सर्जनशील मन आणि त्या सर्जनाला साथ देणारे हात यातून होणारी निर्मिती ही डोळे तृप्त करणारी असते; पण अशी गुणवत्ता असलेल्या मैत्रिणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडू शकते, त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे नाशिकमधील ‘लाखी’ हा एक छोटा अनौपचारिक गट. लाखी हा शब्द मूळ बंगाली, ज्याचा अर्थ आहे ‘लक्ष्मी’. या ‘लाखी’च्या मैत्रिणींना हा शब्द वेगळ्या अर्थाने लागू होतो. लक्ष्मी म्हणजे वैभव, समृद्धीची देवता! त्या सगळ्या मैत्रिणींवर ही देवता प्रसन्न आहे, त्यांना रंग-रेषांचे, सृजनशीलतेचे वैभव भरभरून दिले आहे. त्याच्याबरोबर दिली आहे पर्यावरणाबद्दल सजगता आणि या दोहोंच्या मदतीने नवे काही निर्माण करण्याची उमेदही!
या सगळ्या मैत्रिणींची वयं बघितली की त्या एकत्र कशा? असा प्रश्न कदाचित त्यांच्याविषयी ऐकताना पडू शकतो; पण त्यांना भेटल्यावर मात्र या सगळ्या शंका फिटतात इतका या सगळ्यांमधील परस्परसंवाद आणि परस्परपूरक काम करण्याची समज छान आहे. तर या सगळ्या एकत्र भेटल्या त्या चित्रकार सुहास जोशी किंवा अधिक ओळखीचे नाव सांगायचे तर सुहासकाकूंकडे. सुहास ही नाशिकमधील एक अतिशय उपक्रमशील आणि प्रगल्भ चित्रकार. केवळ चित्रावरच नाही तर जगणं सुंदर करणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर मनापासून प्रेम करणं आणि त्यांचा सांभाळ करणारी! चित्रकला शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना किशोरी अमोणकर, कुमार गंधर्व यांचे गाणे सतत ऐकवणारी, इंदिरा संतांपासून गिरीश कर्नाडांपर्यंत अनेकांची पुस्तकं वाचायला लावून त्यावर चर्चा घडवून आणणारी. याच प्रक्रियेत, तिच्या तालमीत तयार झालेल्या या मैत्रिणी सुहासच्या प्रेरणेने एकत्र आल्या. गळ्यावर स्वरांचे आणि बोटांवर रेषांचे केवळ संस्कार होऊन चालत नाहीत. गळा गाता आणि बोटं चालती राहण्याची सवय म्हणजे साधना. नवीन टप्पे गाठण्याचा मार्ग हे सुहासकाकू त्यांना सांगत होती. या प्रयत्नातून जन्म झाला ‘लाखी’चा. ज्यात पुढाकार होता सुहासच्या आर्किटेक्ट डिझायनर मुलीचा, स्नेहलचा. कविता बर्वे, मानसशास्त्र शिकलेली, शिकविणारी राधिका बेलापूरकर, नेहा बर्वे, श्वेता गरे आणि निवेदिता बर्वे या सगळ्या एकत्र आल्या आणि ठरविलं व्यवसाय म्हणून नाही, पोट भरण्यासाठी म्हणून नसेल पण बोटांना चित्रकलेचा विसर पडू नये. किंबहुना त्यात अधिक सफाई, अधिक सुबकपणा यावा म्हणून एकत्र भेटायचे आणि काम करायचे; पण त्या जे काही तयार करीत होत्या ते इतके सुंदर होते की बघता बघता या साधनेस एका व्यवसायाचे रूप आले.
या साधनेस व्यवसायाचे रूप आले याचे कारण या मैत्रिणींनी ज्या ज्या गोष्टी बनविल्या त्या प्रत्येकीला सृजनशील हातांचा अनोखा स्पर्श होता. मग ती कागदाची सुबक लॅम्पशेड असो किंवा मुली खांद्यावर टाकतात तो स्टोल असो. कुशन कव्हर्स, सजावट केलेले आरसे, रेशमी किंवा कॉटनचे स्टोल्स, फाइल-फोल्डर्स, मातीचे दिवे अशा वस्तू बनविताना त्यातील प्रत्येक घटक पर्यावरणस्नेही असेल अशी काळजी घेऊन ती वस्तू घडते. स्नेहलला भारतातील सर्व आदिवासी कलांविषयी विशेष प्रयत्न आणि आस्था. रंग-रूप आणि आकार यामध्ये निसर्गाशी अगदी जवळचं नातं असलेले हे कलाप्रकार आज त्या त्या आदिवासी जमातीपुरते आणि त्यांच्यासाठीच जणू उरले आहेत. या कलाप्रकारांना वाव मिळावा, त्यातील आकारांचा डौल, नैसर्गिक रंगातील ताजेपणा, आकृत्यांचे वेगळेपण व समतोल यातील सौंदर्य लोकांपुढे जायचे तर ते आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातूनच जाऊ शकते हे लक्षात घेऊन या आदिवासी कलांचा मुबलक वापर या मैत्रिणी आपल्या वस्तूंमध्ये करतात. या गटामधील प्रत्येकीचे असे वैशिष्टय़ आहे, खासियत आहे. उदाहरणार्थ, निवेदिता पेपर क्राफ्ट शिकल्याने ती त्यात तरबेज आहे तर कविता ट्रेसिंगची मदत न घेता कापडावर अतिशय सफाईने पेंटिंग करू शकते. स्नेहल डिझायनिंगमध्ये अव्वल आहे, पण कामाची ऑर्डर मिळाल्यावर तो माल थेट परदेशापर्यंत रवाना करण्यासाठी जे ऑनलाइन काम करावे लागते त्याची जबाबदारी घेते. नेहाचे लाइनवर्क, श्वेताचे कलर अ‍ॅप्लिकेशन अशी प्रत्येकीची खासियत वेगळी आहे. मात्र प्रत्येकीला प्रत्येक काम करता आले पाहिजे, हा या गटाचा दंडक आहे आणि प्रत्येकीला प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य ही या गटाने स्वीकारलेली लोकशाही आहे! कलाकार म्हणजे मुढी, बेशिस्त. त्यामुळे वेळेची चौकट न मानवणारा वगैरे ‘तर्कशास्त्र’ इथे चालत नाही. कारण प्रत्येकीला सुहासकाकूने वेळेच्या व्यवस्थापनाचे धडे दिलेले आहेत आणि नीटनेटकेपणाचे डिझाइनचे नमुने फायलीत ठेवून त्याला वरती लेबल लावणे जसे महत्त्वाचे तसेच फळीवरून काढलेली कॅसेट, रॅकमधून घेतलेले पुस्तक किंवा आवडलेल्या कवितेचे कात्रण अशी प्रत्येक गोष्ट त्या जागी ठेवण्याचे हे शिक्षण मिळाल्याने या सगळ्या मैत्रिणींची कार्यक्षमता अफाट आहे! वेगवेगळ्या कलात्मक वस्तूंच्या ऑर्डर्स घेण्याबरोबर त्या आता स्त्रिया व मुलांसाठी छोटय़ा-छोटय़ा कार्यशाळा घेऊ लागल्या आहेत. शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविणे, संस्कार भारतीच्या रांगोळ्या शिकविणे, उन्हाळा-दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी क्राफ्टची शिबिरे घेणे अशा वेगवेगळ्या उपक्रमांना त्यांनी सुरुवात केली आहे.
या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीपूर्वी या मैत्रिणींनी सुहासकाकूच्याच क्लासच्या हॉलमध्ये त्यांनी हाताने बनविलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे एक प्रदर्शन भरविले होते. प्रत्येकीने वर्गणी काढून हे प्रदर्शन पार पाडले. त्यातून त्यांना उत्पन्न किती मिळाले, ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची नव्हती; पण बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्यापासून कागदाचे कटिंग करून घेणे, तयार वस्तूंचे पॅकिंग, लेबलिंग, त्यांची मांडणी, विक्रीच्या योजना अशा कित्येक लहान; पण महत्त्वाच्या गोष्टींचे शिक्षण त्यांना या प्रदर्शनातून मिळाले. चित्र काढणे, रंगविणे यापेक्षा हे व्यावहारिक शहाणपण वेगळे होते, पण फार गरजेचे होते, असे प्रत्येकीला मग वाटले. त्यासाठी तीन महिने एकत्र काम करताना त्यांना जशी गटाची ताकद, सामथ्र्य समजले तसेच कवितासारख्या एखादीच्या मनातील न्यूनगंड, स्वत:ची ढासळणारी आत्मप्रतिमा उजळण्यासाठी खूप मदत झाली. एखाद्या कापडावर शोभून दिसणारी रंगसंगती केवळ सुहासकाकूनेच सांगायला हवी, असे नाही. आपणही त्यावर विचार करू शकतो, हा आत्मविश्वास या प्रदर्शनाने त्यांना दिला.
मानसशास्त्र शिकलेली-शिकविणारी राधिका या सर्व घटनांकडे थोडी वेगळ्या दृष्टीने बघते. ती म्हणते, आम्ही एकत्र काम करू शकतो कारण वैयक्तिक पातळीवर आमची कोणाशीही अद्यापि स्वतंत्र ओळख निर्माण झालेली नाहीय. त्यामुळे तिला धक्का लागण्याचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही. आम्हा सगळ्यांचे उद्दिष्ट एक आहे आणि ते गाठण्यासाठी प्रत्येकीने स्वत:मधील उत्तम ते देण्याची गरज आहे. आयुष्याच्या प्रत्येक भूमिकेत आपणच प्रमुख असलं पाहिजे, हा आग्रह अनाठायी आहे. काही वेळा अनुयायी, कधी सहकारी होऊन आपली भूमिका निभावणं महत्त्वाचं असतं. या गटात काम करताना स्वत:मधील उत्तम ते देण्याची आणि सहकारी म्हणून काम करण्याची जी शिकवण मिळाली ती खूप महत्त्वाची आहे, असं राधिका मानते. आपल्याबरोबर काम करणाऱ्या मैत्रिणींमधील उत्तमतेची दखल घेण्याचा मोठेपणा या एकत्र कामाने शिकविला, असं या प्रत्येकीला वाटतं. खूप लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर एकेकटीने काम करण्यापेक्षा गटाची ताकद अधिक प्रभावीपणे काम करते, या अनुभव घेतलेल्या या मैत्रिणी!
सुहासकाकूकडे त्या शिकण्यासाठी आल्या तेव्हा शाळेचे दप्तर घरी ठेवून इवल्याशा दोन वेण्या सांभाळीत यायच्या आणि काकू सांगेल, तस्सं काम करण्यासाठी धडपडायच्या. काकूच्या शिक्षणाने, एकत्र येऊन केलेल्या कामाने, त्या कामाला मिळालेल्या पावतीने प्रत्येकजण आता ‘मोठी’ झाली आहे. वयाने आणि शहाणपणानंही! आणि कालच्या मुली आज बरोबरीच्या नात्याने डावी-उजवीकडे काम करताना बघणं हा किती आनंदाचा अनुभव असतो, याचा प्रत्यय सुहासला येतो आहे..    
vratre@gmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा