गेल्या वर्षी साधारण याच काळात इराणमध्ये व्हॉलीबॉल मॅच पाहायला स्टेडियममध्ये गेलेल्या घोनचेह घवामी या २५ वर्षीय ब्रिटिश-इराणी तरुणीला अटक होऊन एक वर्षांचा तुरुंगवास झाला. स्त्रियांना कोणतेही पुरुषी खेळ cr09बघण्यासाठी स्टेडियमवर जाण्यास इराणमध्ये बंदी असल्याचा फटका तिलाही बसला. तो बसायला हवा होता का, हा प्रश्न विचारायचा नाही. अर्थात प्रकृतीच्या कारणास्तव तिची पाच महिन्यांनी सुटका झाली खरी, पण आज पुन्हा एकदा तोच प्रश्न त्याच उत्तरासह इराणी स्त्रियांच्या इच्छेवर ‘बॅन’ म्हणून थोपवण्यात आला आहे.
अनेकांनी प्रयत्न करूनही, आंदोलनं करून, ट्विटर, फेसबुकवरून आवाज उठवूनही पुन्हा एकदा १९ जूनला झालेली इराण-अमेरिका व्हॉलीबॉल मॅच इराणी स्त्रियांना बघता आली नाहीच. अर्थात हा नकार काही आजचा नाही. असे अनेक नकार पचवतच आजची इराणी स्त्री ‘पुढे’ जाते आहे. अर्थात या नकाराची मुळं थेट पोहोचतात १९७९ मध्ये.
तेव्हाच्या इराणी राज्याक्रांती वा इस्लामिक क्रांतीनंतर करण्यात आलेल्या अनेक ठराव वा कायद्यांपैकी एक आजही इराणी स्त्रीला खेळाचा मनमुराद आनंद घेण्यापासून रोखतो आहे. आणि त्यासाठी तथाकथित कट्टरवादी कसले कारण पुढे करत आहेत, तर स्पोर्ट्स कपडय़ातील पुरुषी देहांचे आणि शेरेबाजीचं. (स्त्रियांचे खेळ बघायला जास्तीत जास्त पुरुष गर्दी करतात, त्यामागे असे कारण देणे आपण समजू शकतो, पण स्त्रियांसाठीही तेच?) इराणी स्त्रियांना पुरुषी देहांशिवाय तिकडे दुसरे काय बघायला मिळणार आहे, असा प्रश्न जेव्हा तिथला सांस्कृतिक विभाग प्रमुख विचारतो तेव्हा तो स्वत: एखादा खेळ कशासाठी बघतो, हा प्रश्न आधी त्यालाच विचारायला हवा. किंवा स्त्री वर्गाला खेळातले काय कळते? असे त्याला म्हणायचे असेल तर त्याने आपली कूपमंडूक वृत्ती बाजूला ठेवून जगभरात स्त्रिया खेळत असलेले विविध खेळ, स्पर्धा पाहायला हव्यात.
खरे तर बदलत जाणाऱ्या जगाचे वारे इराणवरूनही जात आहेत. मात्र स्त्रियांच्या बाबतीत आजही तिथली कट्टरता घट्ट पाय रोवून आहे. खूप संघर्ष करून, स्वत:ला सिद्ध करत आणि मुख्य म्हणजे काही पुरुषांची बदललेली मानसिकता यामुळे स्त्रियांसाठी प्रगतीची दारे काही प्रमाणात किलकिली होत आहेत. आज इराणच्या पार्लमेंटमध्ये २९० पैकी ९ जणींनी आपले स्थान मिळवले आहे, ते या किलकिलत्या दारातूनच. सध्याचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या याच प्रयत्नांमुळे यंदाच्या महिला क्रीडाप्रेमींच्या मनात आपल्याला ही मॅच तरी स्टेडियमवर जाऊन बघायला मिळेल असे वाटले होते. तेहरानच्या १२ हजार प्रेक्षक क्षमतेच्या आझाद क्रीडांगणामध्ये २०० जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्यावर तर या आशा अधिकच पल्लवित झाल्या. मात्र तो फुसका बारच ठरला. कारण त्या इराणच्या स्त्री क्रीडाप्रेमींसाठी नसून परदेशी अधिकारी आणि क्रीडापटूंच्या पत्नी आदींसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले.
स्त्री-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यां आणि सुधारणावादी महिला विभागाच्या उपाध्यक्षा शाहीनडोख्त मोलावाडी यांनी मात्र या बंदीच्या विरोधात ट्विटर, फेसबुकवर जोरदार मोहीमच उघडली आणि ‘लेट वुमन गो टू स्टेडियम’ या हॅशटॅगखाली त्यावर बरीच गरमागरम चर्चाही रंगली. त्यातली आणखी एक आशेची बाब म्हणजे अनेक पुरुषांनीही या बंदीच्या विरोधात आपला आवाज मिसळलाय. पण कट्टरवाद्यांच्या दहशतीला अजून तरी संवेदनशीलता स्पर्श करत नाही. काय असेल यामागे?
तिला खेळ बघण्यापासून रोखण्याइतका मर्यादित उद्देश यामागे नाहीच. बाईची जागा त्यांच्यासाठी फारच खाली, तळातच आहे. तिला तिथून वर काढण्याचे प्रयत्न समाजात अनर्थ घडवेल हे जे गृहीतक वर्षोनुवर्षे कट्टरवाद्यांच्या मनात रुतले आहे ते त्यामागे आहे. जोपर्यंत त्या गृहीतकाची मुळे ढिली होत नाहीत तोपर्यंत ते समूळ नाहीसे करता येणार नाही. मात्र जोपर्यंत या विचारातला फोलपणा त्यांना जाणवत नाही तोपर्यंत या स्त्रीच्या नशिबी आलेला कोंडवाडा नाहीसा होणार नाही. मात्र हे गृहीतक बदलण्यासाठी यापुढे कुणाचे बळी जाऊ नयेत किंवा कुणाला तुरुंगवास होऊ नये, एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो.
आरती कदम – arati.kadam@expressindia.com