सुरेश तळवलकर
प्रख्यात तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आणि ख्यातनाम शास्त्रीय गायिका पद्मा तळवलकर यांच्या सुमारे चार दशकांच्या सहजीवनात लय-ताल ओतप्रोत भरून आहे. संपूर्ण समर्पित वृत्तीनं त्यांनी केलेल्या संगीत साधनेचा प्रवास इतर संगीत कलावंत व रसिकांना प्रेरणा देणारा आहे.  संगीताच्या वाटेवरच्या या सहयात्रींच्या सहजीवनाविषयी..
आमचं लग्न झालं १९७५ साली. त्याच्या सुमारे पाच वर्षांआधी मी पद्माताईंचं गाणं ऐकलेलं होतं. त्या वेळी त्या गानसरस्वती मोगूबाई कुर्डीकर ऊर्फ माईंकडे शिकत होत्या. त्या वेळी त्यांचं गाणं नवोदित कलावंताचं असलं, तरीही त्यात काही उत्तम गोष्टी मला आढळल्या. विशेषत: स्वर छान लागत होता. त्यांच्या समकालीन असलेल्या जयश्री पाटणेकरांचं आणि खुद्द पद्माताईंचं गाणं एका कार्यक्रमात पाठोपाठ ऐकलेलं आठवतंय. पद्माताईंचे आतेभाऊ पोंक्षे हे माझे मित्र होते. त्यांच्याकडून माझ्यासाठी पद्माताईंचं स्थळ सुचवलं गेलं.
मला खर्चीक पद्धतीनं लग्न नको होतं. कारण मी गोरेगावच्या डॉ. जगदीश सामंतांसोबत जे सामाजिक काम करीत होतो, त्यानं माझं विचारविश्व प्रभावित झालेलं होतं. डॉ. सामंतांनी कुष्ठ रुग्णांच्या उपचारांसाठी एक न्यास उभारला होता. त्या माध्यमातून कुष्ठ रुग्णांना मलमपट्टी करणं, औषध देणं यासाठी त्यांना सहकाऱ्यांची खूप गरज होती. त्यांच्या मदतीला मी दररोज पाच वर्षे जात होतो. ती कामं करीत होतो. नंतर मात्र तबल्यासाठी वेळ अपुरा पडू लागला, तेव्हा ते म्हणाले, की तू तबल्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्यरत राहा. त्यांच्या सहवासात मनात रुजलेली मूल्यं जपत मी विद्यादानाचं काम करीत आलो.
मला नेहमी असं वाटत आलंय, की मिळालेली ही विद्या माझी एकटय़ाची नाही. परंपरेतून ती माझ्यापर्यंत माझ्या गुरूंमार्फत पोहोचली. ही विद्या पुढच्या पिढीला देणं हे माझं कर्तव्य आहे. ही कला हा सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा घटक असल्यानं ती माझ्या एकटय़ाची नसून राष्ट्रीय संपत्ती आहे. ती मी हातची न राखता शिष्यांना द्यायला हवी, या विद्येबाबत समाजाची जाण वाढवायला हवी.
अशा सगळ्या विचारांमुळे मला लग्नही अगदीच साध्या पद्धतीनं हवं होतं. पद्माताईंच्या कुटुंबीयांनाही ते मान्य झालं आणि फक्त पंधरा-वीस जणांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीनं आम्ही विवाहबद्ध झालो. आम्हा दोघांमध्ये संगीत हा समान धागा आहे. तेच आमचं जीवितकर्तव्य आहे. आम्हा दोघांना त्याचाच रात्रंदिवस ध्यास लागलेला असतो. मी त्यांच्याकडे गृहिणीच्या मर्यादित भूमिकेतून बघत नाही. मी जसा तबलावादनातला साधक तशाच त्या गायन विद्येतल्या साधक आहेत. हे सारं लक्षात ठेवून मी त्यांना आजवर कधीही रियाझातून उठवलं नाही. माझ्याकडे कुणी भेटायला आलं, तर त्यांची संगीतसाधना खंडित केली नाही.
पद्माताईंनी अर्थातच कुटुंबाची जबाबदारी अत्यंत मनापासून पार पाडली आहे. आमचा मुलगा सत्यजित आणि मुलगी सावनी हिच्याकडे पुरेपूर लक्ष देताना त्या शंभर टक्के आईच होत्या आणि आहेत. मात्र मी माझी वैयक्तिक कामं त्यांना सांगत नाही. कारण कुठल्याही कलावंताला त्याची कला जिवंत ठेवण्यासाठी किती जागरूक राहावं लागतं, त्यासाठी किती जीव ओतून काम करावं लागतं हे मला माहीत आहे.
पद्माताईंचा स्वभाव आध्यात्मिक आहे. त्या गोंदवलेकर महाराजांच्या भक्त आहेत. गुरूंच्या कृपेनं आमचं सारं व्यवस्थित चाललेलं आहे. आध्यात्मिकतेमुळे समाधानी वृत्ती विकसित झाल्यानं त्यांना भौतिक गोष्टींची हाव नाही. तसं नसेल तर भौतिक गोष्टींच्या मागण्या केल्या जातात. त्यामुळे कित्येक जोडपी समाधान हरवून बसतात. पण पद्माताईंचं तसं नाही. त्याही संगीताच्या आराधनेत सदोदित असतात. त्यामुळे संसारासाठी लागणारी मनोवृत्तीची स्थिरता त्यांच्याकडे आहे. त्या म्हणजे परमेश्वरानं मला दिलेला मौल्यवान ठेवा आहे.
माझ्याकडे कलावंतांचा राबता असतो. मी त्यांच्यात रमलेला असतो. या सगळ्यातली सार्थकता पद्माताई स्वत:च्या अनुभवामुळे समजून घेऊ शकतात. काही वेळा कलावंतांची तंद्री लागते. त्यात चित्त एकाच दिशेनं धावत असतं. अशा वेळी समतोल साधण्यासाठी दोघांमधला समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. मी त्यांना खासगीत एकेरी हाक मारत असलो, तरी चारचौघांसमोर त्यांचा उल्लेख ‘पद्माताई’ असाच करतो. कारण त्यांचं समाजात एक विशिष्ट स्थान आहे. जो आदर त्यांना मिळतो, त्याला सर्वादेखत मी ‘अगं-तुगं’ केल्यानं बाधा पोहोचता कामा नये.
आपला दर्जा उत्तरोत्तर उत्तमोत्तम होत जाण्याची दीक्षा आम्हा दोघांना आमच्या गुरूंकडून मिळालेली आहे. कलेच्या क्षेत्रात आपलं अंतिम ध्येय काय आहे, याची काही निश्चित अशी खूणगाठ आम्ही आमच्या मनाशी बांधून वाटचाल करीत आहोत. कार्यक्रम, प्रसिद्धी किंवा पैसा हे आमच्यासाठी दुय्यम आहेत. आपण उच्चतम दर्जा मिळवायच्या प्रयत्नात असलो की बाकी सारं आपोआप येतं. आमचं मुख्य काम असतं ते ध्येयाचा नम्र भावनेनं पाठपुरावा करणं. त्यामुळे रियाझ केला नाही तर अस्वस्थ वाटतं.
 संगीतासाठी काहीही न करता दोन दिवस आम्ही जेवलो तर आमचं मन आम्हाला खात राहील. असे आम्ही दोघं आहोत, याचा अर्थ आम्ही साधनेला लागलेलो आहोत. अशांबाबत बाकीची आकर्षणं नाहीशी होत जातात. सहजीवन अत्यंत सुरळीतपणे चालण्याचं तेही एक कारण असावं. आमच्या जीवनाचं ध्येयच मुळी कला आहे आणि कला हेच आमचं जीवन आहे. संगीताचं वेड जडलेली माणसं फार मोठी ऊर्जा बाळगून असतात. यांना सर्वसामान्यपणे व्यवहाराचं भान सतत ठेवणाऱ्यांसारखं जगणं कधी सुचत नाही. स्वर-लयीचं अवधान कलाकाराला ठेवावं लागतं. राग-तालाचं अनुसंधान साधावं लागतं. अवधान आणि अनुसंधान या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, पण कलावंत तारेवरची कसरत करून स्वत:ला एका विशिष्ट अवस्थेपर्यंत नेत असतो. यालाच एक प्रकारची योगसाधना म्हणता येईल.
मूल्यांचं महत्त्व स्वत: अनुभवलेलं असल्यामुळे आम्ही आमच्या सत्यजित आणि सावनीलाही त्याबद्दलच सांगत राहिलो. त्यांना पुढे आणायचा आम्ही आटापिटा केला नाही. तशा प्रकारानं शाश्वत यश मिळू शकत नाही. उलट त्यांनी स्वत:ची क्षमता प्रचंड वाढवल्यावरच ते मिळेल. त्यांनी त्यांची विद्या भरभक्कम कमवावी, असंच आम्हा दोघांनाही वाटतं. आमची सून (सायली) गायिका आहे. तिलाही हे पटलेलं आहे. रंगमंचावर कला सादर करणारं पाचही जणांचं आमचं कुटुंब आपली परंपरा आणि मूल्यांचाच वारसा जपण्यात धन्यता मानणारं आहे. आमच्या घरातली नवी पिढी, परंपरा आणि नवता यांची सांगड घालू पाहते आहे. संगीत हे प्रवाही असल्यानं आम्ही त्यांचाही विचार समजून घेतो आहोत.    अहोरात्र कलेतच –
पद्मा तळवलकर
पंडित सुरेश तळवलकरांची पत्नी म्हणून मी एका मोठय़ा संयुक्त कुटुंबात सामावली गेले. माझ्या गाण्याला, कार्यक्रमांना त्या सगळ्यांनी कौतुकानं पाठिंबा दिला. माझ्या मुलांच्या संगोपनातही सासूबाईंचा मोठा वाटा होता. सुरेशजींना प्रथमपासूनच त्यांच्या कलेत खूप व्यग्र असलेलं मी पाहिलं. त्यांनी मलाही माझी विद्या जोपासण्यासाठी कायम उद्युक्त केलं. ‘तू गा’, ‘तू रियाझ कर’, असंच त्यांचं सतत सांगणं. कधीही मला त्यातनं मध्येच उठवलं नाही. त्यांच्या तोंडून कधीही मी काही वेडंवाकडं ऐकलेलं नाही. अत्यंत मोठय़ा कलावंताचंच हे लक्षण. ते अहोरात्र कलेतच असतात. मलाही असंच राहता आलं तर किती छान होईल, ही प्रेरणा मला नेहमीच त्यांच्याकडून मिळत राहिली. संयुक्त कुटुंबात वीस वर्षे राहिल्यानंतर आम्ही जेव्हा स्वतंत्र राहू लागलो, तेव्हा घरातल्या कित्येक प्रसंगी हे मदतीला धावून आले. मुंबईहून आम्ही पुण्याला राहायला आलो, तेव्हा आधी तेच इथं आले होते. नव्या घरातलं सगळं काही त्यांनी एकटय़ानं सज्ज केलं. सगळं फर्निचर, अगदी स्वयंपाकघरातल्या सर्व वस्तूंपर्यंत एकटय़ानंच खरेदी केलं. घर आमच्या स्वागतासाठी जणू जय्यत तयार ठेवलेलं होतं.
आमच्या चर्चा सर्वसाधारणपणे संगीतावरच होतात. माझ्या गाण्याबाबतही मी विचारलं तरच ते काही सूचना करतात. आपणहून ढवळाढवळ करीत नाहीत. नुसतं तबलावादनच नव्हे तर गायन किंवा इतर वाद्य वाजवणारे व कथ्थक नृत्यकलावंतही त्यांच्याशी सखोल चर्चा करतात. सुरेशजींना या सगळ्यांमधलं फार छान विश्लेषण करून सांगता येतं. आमच्या घरात निरनिराळ्या कलावंतांशी होणाऱ्या चर्चाच्या वेळी मी घरी असले तर मलाही त्याचा लाभ मिळतो. संगीतातली समृद्धी वाढते. त्यांनी माझ्या गाण्याबाबत केलेल्या काही सूचना माझ्यासाठी टर्निग पॉइंट ठरल्या. वयाच्या तिशीत एखाद्या बाबतीत त्यांनी सांगितलेली वाक्यं आजही तशीच आहेत. यावरून त्यांच्यात किती ठामपणा आहे, ते लक्षात येतं.
कुठल्याही कलावंताच्या कलंदरपणापेक्षा त्याच्या विचारांशी, तत्त्वांशी त्यांची घट्ट गाठ आहे. ही दिशा फार महत्त्वाची. त्यांच्यामुळे संगीताकडे बघण्याचा माझा नजरियाच बदलत गेला. त्यांचे विचार केवढे गतिमान आहेत! कलाकारानं तन-मन-धन एकरूप करून कसं काम करावं, याचा ते वस्तुपाठच आहेत. शंभर टक्क्य़ातले काही टक्केच ते व्यवहारापुरतं बोलतात आणि लगेच त्यांच्या कलेच्या विश्वात परततात. ही उघड-झाप फार अवघड आहे.
शंकराचार्यानी त्यांना दिलेली ‘तालयोगी’ ही पदवी किंवा राष्ट्रीय पातळीवर ‘पद्मश्री’ या अलंकरणानं केला गेलेला त्यांचा गौरव ते कायम विसरलेले असतात. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत ते सदोदित संगीतातलं काही ना काही करीत असतात. दुपारी झोपणं त्यांना माहीत नाही. दुपारचा वेळ लेखनासाठी ते राखून ठेवतात. देशातच नव्हे तर परदेशातही कित्येक ठिकाणी त्यांना तालविषयक सप्रयोग व्याख्यानं तसंच चर्चासत्रासाठी निमंत्रित केलं जातं. त्यांनी केलेल्या विवेचनाचे इतर जण संदर्भ देतात. जे करायचं ते परिपूर्ण, अर्धवट काहीच नाही, या विचारसरणीचा हा माणूस अत्यंत उमदा आणि दिलदार आहे.
पुण्यातल्या धायरी भागात त्यांनी सुरू केलेलं गुरुकुल कित्येक ग्रामीण व दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना तबलावादनाचं शिक्षण घेण्यासाठी वरदान ठरलं आहे. आघाडीचे कित्येक तबलावादक सुरेशजींचे विद्यार्थी आहेत. आमच्या अनोख्या सहजीवनात लय-ताल दुथडी भरून वाहत आहेत. सत्यजित तीन वर्षांचा असताना त्याला तबल्याचा एखादा बोल दिला की तो त्याचा विस्तार करायचा. तो आता जगभर तबलावादन करीत फिरतो. नवे नवे प्रयोग करतो. सावनी पाच वर्षांची असताना तिचा पहिलावहिला तबलावादनाचा कार्यक्रम झाला. तीही आज तरुण महिला तबलावादक म्हणून जाणकारांचं लक्ष वेधून घेते आहे. सून (सायली) गाण्याच्या वाटेवर पुढं चाललेली आहे. हे सारं पाहून अतिशय कृतार्थ वाटतं.    

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा