ch15शिक्षकांनी, पालकांनी मुलांना त्यांनी आयुष्यात काय चुका केल्या, त्या कशा सुधारल्या, त्यातून काय शिकवण मिळाली, कोण मदतीला धावून आलं, आपण कुणाच्या मदतीला कसे धावून गेलो याविषयी सांगावे. त्यातून दुसऱ्याच्या मदतीला जावे हा संदेश मिळतो. आयुष्यावरची श्रद्धा, माणुसकीवरचा विश्वास दृढ होतो. – ‘प्रेम, आयुष्य आणि शिक्षण’ या लेखाचा हा तिसरा भाग.

किशोरवयीन मुलांना शाळा-कॉलेजांमध्ये प्रेम हा विषय शिकवला जावा की जाऊ नये हा वादाचा मुद्दा झाला, पण माझ्या मते, या वयातील मुलांना प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळण्यासाठी पालक, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींची नक्कीच मदत होऊ शकते. मागील दोन लेखांमध्ये आपण जी उदाहरणे पहिली त्यातही हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे. शाळा-कॉलेजमधील वर्ग असो, घर असो किंवा रस्त्यांवरून चालणं असो- हे आजूबाजूचं जग म्हणजे मुलांच्या प्रयोगशाळा असतात. इयत्ता आठवीच्या शिक्षिका असलेल्या जाधवबाई त्यांच्या चाळीस मिनिटांच्या तासापैकी ‘तुम्हाला काय वाटतं?’ यासाठी वीस मिनिटे आणि उर्वरित वेळ ‘अभ्यासासाठी’ अशा दोन भागांत विभागून घेतात. अभ्यासाची वेळ संपली की त्या मुलांना आयुष्याबद्दल बोलायला सांगतात. नुकताच त्यांनी मुलांसमोर ‘सलमान खान – हिट अँड रन प्रकरण’ हा विषय ठेवला होता. मुलांनी त्या विषयावर अगदी परखड मते मांडली. विषयाच्या दोन्ही बाजूंनी मते मांडली गेली, पण जाधव बाईंनी कुणालाही मतं मांडण्यासाठी विरोध केला नाही, उलट प्रत्येकाच्या मताचा आदर केला. बाईंनी कुठलाही निर्णय दिला नाही. चर्चेच्या शेवटी मुलांना कळून चुकलं की त्या प्रकरणात काय योग्य आणि काय अयोग्य होतं ते. बाईंनी त्यांची मते मुलांवर लादली नाहीत उलट चर्चेचा निष्कर्ष काढण्याची संधीही मुलांनाच दिली. सुरुवातीला एकच बाजू लावून धरणारी मुलं चर्चेच्या शेवटी मात्र गरिबांचा आणि अपघातात जीव गमाविलेल्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू लागली होती. चर्चेचा प्रवाह कोणत्याही दडपणाशिवाय मुक्तपणे पुढे वाहता ठेवणे आणि इतरांच्या विचारांचाही मान ठेवणे चर्चेत महत्त्वाचे असते. मुलांची मने निर्मळ असतात आणि म्हणूनच ती सखोल विचार करू शकतात.
कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या दामले मॅडमसुद्धा पाचपैकी एक लेक्चर खास मुलांना बोलते करण्यासाठी ‘फ्री’ ठेवतात. एकदा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी मुलांबरोबर शेअर केली. लहानपणीच्या आठवणी, वडिलांचे त्यांच्या आयुष्यातील स्थान, त्यांच्याबरोबर घालविलेले आनंदाचे प्रसंग आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी.. दामले मॅडमनी आपल्या भावनाच जणू मुलांसमोर मांडल्या. आनंदाचे प्रसंग ऐकताना हसणारी मुलं दु:खद प्रसंग ऐकताना हेलावली. दामले मॅडमनी खरंतर त्यांच्या आयुष्यातील एक छोटी घटना त्यांना सांगितली होती, पण त्यामुळे त्यांच्या नात्यातील दरी कमी झाली आणि मग मुलांनी आपापल्या आयुष्यातील कटू आठवणी, दु:खद घटना मॅडमना सांगितल्या. वरील दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे दोन्ही शिक्षिकांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. जे शिक्षक फक्त आणि फक्त शालेय अभ्यासक्रम पूर्ण करायच्या मागे लागलेले असतात ते पाठय़वाचक असतात, शिक्षक नव्हे. शाळा ही एक सुंदर जागा आहे जिथे मुलांना आयुष्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि करुणेबद्दल हसत-खेळत आणि मोकळेपणाने शिकवता येऊ शकते. पण जे शिक्षक मुलांना केवळ ‘हे करा’ किंवा ‘हे करू नका’ एवढंच सांगतात ते शिक्षक मला रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करणारे उद्घोषक वाटतात. शिक्षक वाटत नाहीत.
मुलांच्या बाबतीत शिक्षक परिस्थिती पूर्णपणे बदलू शकत नाहीत हे खरं असलं तरी ते विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर नक्कीच काढू शकतात. आता हेच उदाहरण पाहा ना, अकरावीच्या वर्गात एका प्राध्यापिकेने ‘आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात एका मुलाने आपला अनुभव सांगितला आणि त्याला रडूच कोसळले. त्या मुलाच्या आई-वडिलांच्या नात्यात प्रचंड तणाव होता, ज्याचा परिणाम त्या मुलावर होत होता. परिणामी तो घरापासून दूर-दूर राहायचा. रात्री उशिरापर्यंत घराच्या परिसरात घुटमळत राहायचा, पण घरी जाण्याची इच्छा नसायची. त्यातच तो एकदा अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांच्या संपर्कात आला.. बस्स! एवढे सांगून तो रडू लागला. आता या प्रकरणात ती प्राध्यापिका परिस्थिती बदलू शकणार नव्हती, पण तिने वर्गातील इतर मुलांच्या साहाय्याने त्या मुलाला व्यसनातून आणि दु:खातून बाहेर काढले. थोडय़ा महिन्यातच त्या मुलामध्ये चांगला बदल दिसून येऊ लागला आणि परीक्षेतील त्याची टक्केवारीही सुधारली, त्याचा आत्मविश्वास वाढीस लागला. शिक्षक म्हणजे जादूगार नाही, पण काही वेळेस ते अशी काही जादू करून जातात की बस्स! फक्त आपल्या आतील मार्गदर्शकाला त्यांनी ओळखलं पाहिजे.
या जगात असा एकही माणूस नाही की ज्याला कधीच कुणाची मदत लागत नाही किंवा आयुष्यात प्रेमाची गरजच भासत नाही. बरेच वेळा पालक मुलांना त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी, तेव्हाचा काळ, त्या वेळी केलेला संघर्ष, गरिबीत काढलेले दिवस आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून आपण कसे मोठे झालो याचे सारखे दाखले देत असतात. आयुष्यात संघर्ष कुणालाच चुकलेला नाही, पण पालकांचा आविर्भाव मात्र आपली कथा म्हणजे एखादा चित्रपट असावा आणि आपण अमिताभ बच्चन किंवा रजनीकांतसारखे त्या चित्रपटातील नायक असल्यासारखा असतो. मुलं या कथेतून काहीच शिकत नाहीत. त्याऐवजी पालकांनी मुलांना त्यांनी आयुष्यात काय चुका केल्या, त्या कशा सुधारल्या, त्यातून काय शिकवण मिळाली, कोण मदतीला धावून आलं, आपण कुणाच्या मदतीला कसे धावून गेलो याविषयी सांगावे. असे सांगितल्यास मुलांना त्यातून धडा मिळतो आणि दुसऱ्याच्या मदतीला जावे हा संदेशही जातो. उदाहरणार्थ, ‘शाळेची फी भरण्याची ऐपत नव्हती, पण शिक्षकांनी तेव्हा फी भरली होती’ किंवा ‘परीक्षेच्या काळातही घरात अन्नाचा कण नसायचा, पण शेजारच्या मावशी मायेने जेऊ घालायच्या’ अशा उदाहरणांमधून मुलं परोपकार शिकतात आणि आयुष्यावरची त्यांची श्रद्धा, माणुसकीवरचा त्यांचा विश्वास अधिक दृढ होतो. प्रेमाचा खरा अर्थ त्यांना उलगडतो. प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढल्याच्या गोष्टी रंगवून सांगितल्या जातात, पण एकमेकांना माणुसकीच्या नात्याने बांधून ठेवणाऱ्या आणि माणसातील चांगूलपणाच्या गोष्टी मुलांना नाही सांगितल्या जात नाहीत, खरं तर त्याच सांगणं गरजेचं आहे.
‘तुझा जन्म झाला तो क्षण’, ‘तुला पहिल्यांदा पाहिलं तो क्षण’ असे आनंदाचे क्षण शेअर केले तर मुलांना प्रेमाचा नवा अर्थ कळतो आणि तुमच्यातल्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते. आई-बाबांनी सांगितलेल्या या आठवणी मग मुलंही जपून ठेवतात. एखाद्याला प्रेम देणं सोपं आहे पण आपल्याकडे चालून आलेलं प्रेम सांभाळणं, जपून ठेवणं कठीण असतं याची जाणीव मुलांना होत जाते. प्रेमाने केलेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी मुलांना तुमच्याशी बांधून ठेवतात. या वयात मुलांना फुलपाखरासारखं भिरभिरणारं वरवरचं प्रेम माहीत असतं पण प्रेमाची खोली, त्याची उंची आणि आयाम हे नात्यातील प्रेमातून कळतात. दमून आलेल्या बाबांना ती कधी पाणी आणून देतील, तर कधी दमून झोपलेल्या आईच्या अंगावर हळूच पांघरूण घालतील.. या बारीकसारीक कृतींतून त्यांचं प्रेम व्यक्त होत असतं. पण काही माणसं आंधळी, बहिरी आणि मुकीसुद्धा असतात. त्यांना प्रेमाच्या या लहान लहान गोष्टी ना दिसत, ना ऐकू येत, ना पाहता येत.
जेव्हा पालक, शिक्षक या छोटय़ा छोटय़ा गोष्टींची दखल घेतात तेव्हा प्रेमाचे रूपांतर एकमेकांविषयीच्या आदरात होते. प्रेमाचे बंध, भावनिक विकास आणि एकमेकांविषयी आदरभाव, करुणा या गोष्टींच्या पाठबळावर मुलांचे मोठेपणी एका सुविचारी माणसात रूपांतर होते. पालक जेव्हा मुलांच्या चांगल्या गोष्टींची दखल घेतात, मुलांचाही आदर करतात तेव्हा पालकांच्या कृतीतून योग्य तो संदेश मुलांपर्यंत पोहोचत असतो. भीती, दरारा, आवडीचा-नावडीचा, जवळचा-दूरचा या गोष्टींवर आदर अवलंबून नसतो. एकमेकांना समजून घेणे, स्वीकारणे यातून आदर प्रतीत होत असतो. एखाद्या विषयावर मुलांशी तुमचे जरूर मदभेद असतील पण एकत्र बसून कपभर चहा प्यायला तर मतभेद नसतील ना! मुलं तेव्हाच आदर करायला लागतात जेव्हा ते भिन्न विचारसरणीच्या लोकांना एकमेकांचा आदर करताना पाहतात, जेव्हा भिन्न-भिन्न विषयांच्या शिक्षकांना एकमेकांच्या विषयांचा आदर करताना पाहतात, जेव्हा वडिलांना आईविषयी वाटणारा आदर पाहतात.
अनेक लोक प्रेम, भूतदया वगैरे विषयांची प्रवचनं ऐकायला जातात, पण घरी आल्यावर किंवा कार्यालयात बरोबर उलटे वागतात. मोठय़ांच्या या गोष्टी मुलांना संभ्रमात टाकतात. खरा गुरू आपला आपल्यातच असतो. फक्त आपण त्याला बाहेर आणायला विसरतो. आपल्या आयुष्याचं पुस्तक उघडून पाहिलं तर ते बाहेरच्या गुरूंपेक्षा आणि पुस्तकांपेक्षा अधिक प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी असतं. घरात, बाहेर, वर्गात, प्रवासात जिथे कुठे असाल तिथे ते उघडून तर बघा..
डॉ. हरीश श़ेट्टी
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी