15-zali‘‘परेशच्या व्यक्तीमत्त्वाला खूप सखोल आध्यात्मिक बैठक आहे. सहजीवनाचा अर्थ मला परेशबरोबरच उमजला.. आमच्या दोघांचाही दृष्टिकोन बरेचदा भिन्न असतो. पण तेच मला आवडतं. आम्ही दोघंही सारख्याच पद्धतीनं विचार करत असतो तर कदाचित आमचं आयुष्य बोअिरग झालं असतं. पण मुळातच सहजीवन म्हणजे काही सारखं असणं नाही, तर वेगळं असूनही एकत्र असणं. थोडे वेगळे.. थोडे सारखे. अशी माणसं एकमेकांबरोबर माणूस म्हणून जास्त प्रगल्भ होतात. त्याचाच पुढचा भाग म्हणजे आता माझं आणि परेशचं निर्माता, दिग्दर्शक म्हणून वेगळं सहजीवन सुरू झालं आहे.. ’’ सांगताहेत लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी आपले लेखक, दिग्दर्शक पती परेश मोकाशी यांच्याबरोबरच्या सहजीवनाविषयी..

आपला समाज खूप लग्नकेंद्रित आहे. प्रत्येक लव्ह स्टोरीचा शेवट हा लग्नात आणि मग ते सुखानं नांदू लागले यात होतो.. पण खरी परीक्षा लग्नानंतर असते.. आधी तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, एकमेकांबद्दल ओढ.. एकमेकांची जबाबदारी नाही.. सगळं छान छान.. तरल.. मस्त.. हवंहवंस.. पण नंतर एकमेकांबरोबर राहणं हे रूटीन झालं, की एकमेकांचे दोष दिसायला लागतात आणि बहुतांशी लग्न मोडण्याची कारणं जोडपी देतात, की लग्नानंतर माणसं बदलत नाही.. परिस्थिती बदलते.. तरलतेची जागा वस्तुस्थिती घेते..ओढ वाटण्याच्या जागी दैनंदिन गरजा येतात. नवराबायकोचं सहजीवन दीर्घकालीन असावं, अशी समाजाची अपेक्षा असल्याने आपल्याला सहजीवनाबरोबर नवरा-बायको असं समीकरण माहीत असतं.. पण सहजीवन लग्न होण्याच्या किती तरी आधी सुरू झालेलं असतं. अगदी जन्मापासून माणसाचं त्याच्या भौगोलिक परिस्थितीशी सहजीवन सुरूच असतं. आपल्या पालकांबरोबर आपलं सहजीवन असतं. पर्यावरणाबरोबर असतं. मित्रमैत्रिणी आणि पाळीव प्राण्यांबरोबर असतं. आपल्या संस्कृतीबरोबर.. संस्कारांबरोबर आणि आपल्या कलाकृतींबरोबरही आपलं वेगळय़ा प्रकारचं सहजीवन असतं..

तसंच फक्त भौतिक जागा व्यापणं म्हणजेही सहजीवन नाही, तर एकमेकांच्या मनात एकमेकांसाठी दीर्घकाळ जागा असणं म्हणजे सहजीवन.. कधी कधी संघर्षांतही सहजीवन असतं. ज्यांच्याशी मतभेद आहेत अशा माणसांचा आपण विचार करतो. त्याच्याशी मनातल्या मनात संघर्ष करतो.. त्यांना हे एक प्रकारचं महत्त्व देणंच असतं. त्या माणसांना स्थान देतो हेही एक प्रकारचं सहजीवनच आहे. नको असलेलं सहजीवन म्हणू या याला हवं तर..
एकमेकांबरोबर एकाच फिजिकल स्पेसमध्ये वेळ घालवणं इच्छेने किंवा नाइलाजानं.. एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेले असणं.. बरोबर असणं म्हणजे सहजीवन.. एकमेकांना सांभाळत, एकमेकांना समृद्ध करत, एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावत, एकमेकांशी शेअरिंग करत आनंदानं आयुष्य कंठणं हे सहजीवन आहे माझ्यासाठी..! त्यात संघर्ष जास्त असल्यानं अर्थातच आनंद कमी असतो. सहजीवनाच्या लेखामध्ये मी हे काय भलतंच लिहायला लागले आहे असा समज होऊ शकतो; पण माझ्यासाठी सहजीवन हे फक्त नवरा-बायकोंनी एकमेकांबरोबर जगण्याचं वचन एवढंच मर्यादित नाही.. सहजीवन तसं गणिती पद्धतीनं मांडता येणार नाही, पण.. काही ठोकताळे असतातच ठरलेले. समंजसपणा असेल तर भांडण कमी, प्रेम असेल तर क्लेश कमी, आदर असेल तर चिडचिड कमी..
लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे, असं मानलं तर माझं सगळं त्यावर अवलंबून नव्हतं.. वय झालंय, आता करायला हवं म्हणून लग्न करणं मला मान्यच नव्हतं. आपली एखाद्याशी वेव्हलेंथ जुळते का? तो माणूस आवडतो का? आणि आवडत राहतो का त्याच्या गुणदोषांसकट, हे स्वत:चं स्वत: तपासून पाहणं महत्त्वाचं असतं.. कारण लग्न म्हणजे विधी नव्हेत.. लग्न म्हणजे गोतावळा नव्हे.. लग्न म्हणजे फक्त सोहळा नव्हे, लग्न म्हणजे मंगळसूत्र बांधणं नव्हे, तर लग्न म्हणजे एकमेकांना मनापासून स्वीकारणं आहे.. लग्न हा फक्त उपचार आहे..
मी आणि परेश लग्नाआधी चार वर्षे एकमेकांबरोबर होतो. आमच्यामध्ये कुठल्याही जोडप्यात होतात तशी खूप भांडणं झाली. खूप वेळा आम्ही तुटलो आणि पुन्हा जोडले गेलो. प्रत्येक नात्यात येतात तसे चढउतार आमच्याही नात्यात आले होते.. पण सगळय़ा भांडणापेक्षा प्रेमाचं पारडं थोडं जास्त जड होतं आणि आमचं लग्न झालं. लग्नानंतर आमच्यातली मैत्री मात्र कमी झाली नाही. आजही घरी असलो, की आम्ही मित्रमैत्रिणींशी मारतो तशा तासन्तास गप्पा मारू शकतो, वेगवेगळय़ा विषयांवर. आमच्या दोघांचाही दृष्टिकोन बरेचदा भिन्न असतो; पण तेच मला आवडतं. आम्ही दोघंही सारख्याच पद्धतीनं विचार करत असतो, तर कदाचित आमचं आयुष्य बोअरिंग झालं असतं; पण मुळातच सहजीवन म्हणजे काही सारखं असणं नाही.. तर वेगळं असूनही एकत्र असणं. थोडे वेगळे.. थोडे सारखे. अशी माणसं एकमेकांबरोबर माणूस म्हणून जास्त प्रगल्भ होतात.
परेशच्या व्यक्तिमत्त्वाला खूप सखोल आध्यात्मिक बैठक आहे. सहजीवनाचा अर्थ मला परेशबरोबरच उमजला.. काही बाबतीत आम्ही खूप विरुद्ध विचारांचे आहोत; पण काही बाबतीत आमची वृत्ती खूप सारखी आहे. लग्न, स्त्री-पुरुष संबंध याबाबतीत आमच्यात खूप मतभेद आहेत. काही कलाकृतींबाबतही अशी टोकाची विरुद्ध मतं आहेत आमची; पण जनरल लाइफ स्टाइल मात्र खूप सारखी आहे. अगदी हुबेहूब, सारखी, ठरवून केल्यासारखी. आम्ही दोघंही कट्टर शाकाहारी आहोत. आम्हा दोघांनाही छानछौकीची आवड नाही आणि आमच्या आवडी खूप सारख्या आहेत. प्रवास, सिनेमा, वाचन.
आमचे स्वभावही खूप वेगळे आहेत.. परेश खूप शांत आहे.. मी शॉर्ट टेम्पर्ड आहे. तो खूप संयमी आहे. मी अधीर आहे. मला नेहमीच त्याच्यासारखं शांत आणि संयमानं वागायला जमावं असं वाटायचं आणि तसं जमत नाही याचं वाईटही वाटायचं.. पण माझ्यातल्या या अधीरतेमुळेच मी हातात घेतलेलं काम कसं झपाटय़ानं पूर्ण करू शकते आणि शॉर्ट टेम्पर्ड असण्याचाही फायदाच होतो.. याची अर्थात त्यानंच मला जाणीव करून दिली. माझ्यातल्या दुर्गुणांची उपयुक्तताही त्यानंच लक्षात आणून दिली. मला वाटतं, आपल्या जोडीदाराच्या दुर्गुणांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचं हे कसब फक्त परेशसारख्या माणसाकडेच असू शकतं. परेशमध्ये मला कधी कुठला दुर्गुण दिसतच नाही. तो जसा आहे तसा मला आवडतो. त्याच्यातलं काहीच बदलावंसं वाटत नाही आणि खरंच पुनर्जन्माची संकल्पना असेल, तर मला प्रत्येक जन्मात हाच नवरा हवा आहे, कारण तो आसपास असला तरी मी आनंदी असते. जेव्हा कधी आम्ही एकत्र घरी असतो, मी माझं लेखन करत असते, तो त्याचं संशोधन लेखन करत असतो. तासन्तास आम्ही एकमेकांशी बोलतही नाही; पण त्याचा वावर असेल तर मला बरं वाटतं. आमच्या दोघांचाही आपापला असा ‘सेन्स ऑफ ह्य़ूमर’ आहे आणि आम्ही एकमेकांना सतत हसवत असतो. आम्ही एकाच क्षेत्रात असल्याचा आम्हाला फायदा होतोच; पण दोघंही लेखक असल्यानं आमच्यात एक अतूट मैत्री आहे. शिवाय, आम्ही खूप ठाम मतं असणारी विरुद्ध विचारांची माणसं असल्यानं आम्हाला लेखनासाठी एकमेकांचा उपयोगच होतो. नाण्याच्या दोन्ही बाजू कळतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा र्सवकष विचार करता येतो.
आमच्या सहजीवनात तसे काही फार मोठे चढउतार नाहीत. अगदी सामान्य नवरा-बायकोचं असतं तसं आमचं सहजीवन आहे. बारीकसारीक कुरबुरी आणि छोटेमोठे आनंद रूटीन झाल्यानं कुरबुरीची कारणं तीच आहेत आणि आनंदाचे विषयही ठरलेले आहेत. परेशच्या जेवणावरून आमच्या घरात ठरलेला संवाद किंवा विसंवाद होतो. तो पुरेसं खात नाही असं मला वाटतं आणि मला हवं तितकं तो खाऊ शकत नाही, असं त्याचं म्हणणं असतं. वाद होतो. मग त्याच्या पोटात जास्त अन्न जावं म्हणून मी वेगवेगळय़ा क्लृप्त्या करायला लागले. त्यात माझ्या स्वयंपाक करणाऱ्या ताईही सामील असतात. म्हणजे त्याचा पोळीसाठी लागणारा कणकेचा गोळाच मोठा घ्यायचा किंवा त्याचा पराठा मोठा करायचा. त्याच्या पानात आधीच जास्त वाढायचं, पण हेही त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलं. आमची चोरी पकडली गेली, की मग आम्ही वाद घालायला लागतो आणि आम्हाला हसायलाच येतं. माझी हमखास कामी येणारी क्लृप्ती म्हणजे मी बाहेर जेवायला गेले, की माझ्या गरजेपेक्षा जास्त मागवते आणि मग जात नाही म्हणून परेशच्या गळय़ात मारण्याचा प्रयत्न करते; पण तेही त्याच्या लक्षात येतं. मग नवं काही तरी शोधायला लागतं आणि त्याला सतत सावध असायला लागतं, असं आमचं बारीक गंमतशीर राजकारण चाललेलं असतं..

सहजीवनात मोठा अडथळा असतो तो म्हणजे नवरा-बायकोच्या व्यक्तिगत सवयींचा आणि त्यांच्या घरच्या पद्धतींचा. तो जमाना गेला जेव्हा मुलीला नवऱ्याच्या घरच्या सगळय़ा पद्धतींना अंगीकारावं लागायचं. आता मुलीही बऱ्याच मोठय़ा वयात लग्न करतात, स्वतंत्र असतात.. त्यांचंही सगळं ठरलेलं असतं. मग माहेर- सासरच्या वेगळय़ा पद्धतींचा रोजच्या आयुष्यात मोठा अडसर ठरू शकतो. माझ्या घरी कुणीही माणूस घराबाहेर पडला, की तो कुठे चालला आहे आणि अंदाजे कधी परत येणार आहे याची कल्पना देण्याची पद्धत आहे. तसं प्रवासाला निघालो, तर पोचल्या-पोचल्या पहिल्यांदा आपण सुखरूप पोचल्याचा फोन अपेक्षित असतो, कारण तो फोन आल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभत नाही आणि परेशच्या घरात असं वातावरणच नव्हतं. सतत एकमेकांना कार्यक्रम सांगणं, प्रवासानंतरचे फोन कंपल्सरी नसायचे आणि त्याचं अवडंबरही केलं जायचं नाही. मला या पद्धतींना अ‍ॅडजस्ट होताच यायचं नाही, कारण कुणी प्रवास करत असेल, तर तो माणूस सुखरूप पोचला आहे याची खात्री मला लागायचीच आणि परेशला तशी सवयच नसल्यानं त्याच्या लक्षातच राहायचं नाही. यावरून आमच्यात खूप वाद झाले. त्या फोनचं मला असलेलं महत्त्व आणि त्याच्यासाठी ती सवयच नसणं ही दोन टोकं जुळतच नव्हती; पण मग हळूहळू बोलून एकमेकांना समजून घेऊन आम्ही सुवर्णमध्य काढला, की त्यानं फोन करायचा किंवा तो विसरला तर त्याच्या प्रवासाच्या वेळेचा अंदाज घेऊन मीच न चिडता फोन करायचा. लग्नानंतर मुलीसाठी खूप गोष्टी नव्या असतात.. नवं घर, नवी माणसं, नव्या पद्धती, नव्या चालीरीती, नवी लाइफस्टाइल यात तिच्या माणसांशी असलेलं घट्ट नातं, तिच्या पद्धती, तिची मतं, तिचे प्राधान्यक्रम हे सगळं असतंच. फ्रिक्शन होण्याच्या याच जागा असतात. परेशच्या घरातलं वातावरण मात्र फारच खुलं आणि मोकळं आहे. त्याच्या घरातली सगळीच काळाच्या पुढची माणसं आहेत. त्याची आई अगदी आई आहे. प्रेमळ आणि लाघवी स्वभाव. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला आपलं करणारी आणि मायेनं खायला-प्यायला घालणारी ती माऊली आईच्या मायेनं सुनेचं सगळं करण्यातही धन्यता मानते. ती तिच्या माणसांत खूप हवीहवीशी असते. सगळय़ांना आपलंसं करण्याचं एक अजब कसब तिच्यात आहे. ती पारंपरिक सासू नाही. तसंच माझे सासरे शाम मोकाशी. यांच्याशी माझी विशेष मैत्री आहे. शाम मोकाशी हा मी पाहिलेला सर्वात गोड माणूस. त्यांचं हसणं मला खूप आवडतं. ते लहान बाळासारखे हसतात. त्यांच्या पडलेल्या दातांमध्येही त्यांच्या हसण्यातला निरागसपणा कायम असतो. ते खूप लिबरल. लग्नाआधीपासून ते माझ्या आणि परेशच्या संबंधात नेहमीच माझ्या बाजूनं पक्षपाती असायचे. आमचं खूप जमायचं. परेशबाबतीत आमचं बऱ्याच गोष्टींवर एकमत होतं. त्यांना नाटक, सिनेमा, साहित्यामध्ये खूप रस. त्यांचंही वाचन अफाट आणि वयाच्या सत्तरीनंतरही स्मरणशक्ती जबरदस्त. आम्ही तिघं असलो, की आम्ही खूप मजा करतो. परेशच्या घरच्यांशी जुळवून घेणं माझ्यासाठी खूप सोपं होतं; पण परेशही माझ्या माहेरच्यांशी इतक्या छान पद्धतीनं जेल झाला, की माझी आई जावयाचं कौतुक करताना थकत नाही.
नुसतं नवरा-बायकोची मनं जुळणं सहजीवनात पुरेसं नसतं. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांबरोबर असणं हे महत्त्वाचं आहे. एकमेकांबरोबर असण्याचे अर्थ निराळे आहेत. मला एकमेकांबरोबर म्हणजे सतत बरोबर असणं अपेक्षित नाही, तर गरज पडेल तसा आधार आणि स्पेस देण्याची मनाची तयारी असणं महत्त्वाचं वाटतं. माझे आनंदाचे विषयही खूप छोटे आहेत. मला परेशने कॉफी करून दिली, की खूप आनंद होतो. परेशला मी कॉफी कमी प्यायले, की आनंद होतो आणि आमच्या दोघांचा सर्वात आवडता विषय म्हणजे प्रवास. वेगवेगळय़ा ठिकाणी आम्ही फिरतो तेव्हा आम्ही खूप खूश असतो.
मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते आमच्याकडे काम करणाऱ्या शांताबाईंचा. गेली दहा वर्षे माझ्याकडे त्या निष्ठेनं आणि प्रेमानं आपलं घर मानून काम करत आहेत. माझं शूटिंग. रायटिंग, फिल्म, नाटक या सगळय़ा व्यापात मी घराबाबतीत बिनघोर असते ती आमच्या शांताबाई आणि नंदाताईंमुळे. त्यांच्याशी असलेल्या नात्यालाही सहजीवनच म्हणावं लागणार, कारण त्या आता माझ्या घराचाच नाही, तर आयुष्याचा महत्त्वाचा भाग झालेल्या आहेत. अशी माणसं तुमच्याशी जोडली जाणं हा ऋणानुबंधच असतो. आपण देणं-घेणं लागतोच एकमेकांचं.. भावनिक..
माझं हल्ली फारच बिझी शेडय़ूल असतं. माझा एक पाय घरात दुसरा बाहेर अशी परिस्थिती आहे; पण परेशची त्याबाबत तक्रार नसते. जेव्हा जेवढा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकत्र असतो. परेश खूप अचूक बोलतो. त्याच्याशी बोलल्यानंतरच कधी कधी माझ्या मनातला गोंधळ कळतो, सोडवता येतो. माझं परेशशी शेअरिंग हा सगळय़ात महत्त्वाचा भाग आहे. मी खूप बोलते. त्याला ऐकायला जास्त आवडतं. मी त्याच्याशी सगळं बोलू शकते. आपण आपल्या मनाशी बोलतो तसं काही न लपवता कसलाही आडपडदा न ठेवता सगळंच. लोक मला म्हणतात, की तुझा नवरा आंतरराष्ट्रीय कॅलिबरचा दिग्दर्शक आहे. मला त्याच्या हुशारीचं जेवढं अप्रूप वाटतं तेवढाच दराराही वाटतो. मला नेहमीच वाटायचं, मी लिहिलेलं नाटक किंवा चित्रपट त्यानं दिग्दर्शित करावा; पण तसा योग येत नव्हता. त्याची रुखरुखही वाटत होती मला. एकदा असंच गप्पांच्या ओघात बोलता बोलता मी परेशला माझ्या लहानपणीचे काही किस्से सांगितले आणि परेशला तो फिल्मचा विषय वाटला. मी त्या गोष्टींचा कधीच चित्रपटासाठी विचार केला नसता; पण परेशचं म्हणणं मला पटलं. मी कथा लिहिली. परेशने त्यावर पटकथा लिहिली. आम्ही दोघांनी मिळून संवाद लिहिले. त्यानं गाणं लिहिलं. मी कार्यकारी निर्माती झाले आणि आमचा एकत्रित चित्रपट तयार झाला- ‘एलिझाबेथ एकादशी’. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नंतरचा परेशने दिग्दर्शित केलेला हा आणखी एक मराठी चित्रपट. ‘झी’ने घेतला आहे आणि येत्या १४ नोव्हेंबरला तो रीलीज होतोय. या सिनेमाची गोष्ट खूप साधी आहे. एकदम सोपी, तुमच्या आमच्यातली!
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेची पटकथा लिहितानाचा माझा दीड वर्षांचा अनुभव असा आहे, की मला एखादी गोष्ट खूप आवडली, जर लिहिताना मी ती एन्जॉय केली, मला भावली, तर ती लोकांना भावतेच भावते आणि ‘एलिझाबेथ एकादशी’नं मला लिहीत असतानाच खूप हसवलं. अनेकदा माझ्या डोळय़ांत टचकन पाणी आलं. त्यामुळेच मला विश्वास वाटतो की, लोकांनाही ‘एलिझाबेथ एकादशी’ त्याच भावविश्वात घेऊन जाईल. या सिनेमानं मला माणूस म्हणून प्रगल्भ केलं.. माझी जगण्याबाबतची समज वाढवली ती या ‘एलिझाबेथ एकादशी’नं. या सिनेमाचं महत्त्व असं आहे की, खऱ्या अर्थानं हा सिनेमा आमच्या एकत्रित मेहनतीचं फळ आहे. आमच्या सहजीवनाचा परिपाक आहे, असं आम्हाला वाटतं. आम्हाला जे आवडतं ते करण्याचं स्वातंत्र्य आपल्या पद्धतीनं गोष्ट हाताळण्याची, सांगण्याची मुभा मिळणं महत्त्वाचं, ते इथे मिळालं.
या सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी नेहमीप्रमाणं पुन्हा माझे सासरे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि या फिल्ममध्ये घातलेला पैसा कसा परत मिळणार किंवा मिळणार तरी की नाही याचीही शाश्वती नसताना त्यांनी स्वत:चे पैसे या चित्रपटामध्ये घातले. आम्हाला नसेल एवढी खात्री त्यांना या सिनेमाविषयी होती.
मग माझं आणि परेशचं निर्माता-दिग्दर्शक म्हणून वेगळं सहजीवन सुरू झालं. बऱ्याच गोष्टींविषयी आमच्यात मतभेद होते, पण आम्ही एकमेकांच्या अधिकारात ढवळाढवळ केली नाही आणि कसल्याही कलात्मक तडजोडी न करता हा चित्रपट बनवला. परेशनं पंढरपूरची कधीच कॅमेरा फेस न केलेली मुलं निवडली. मी घाबरले होते, पण परेश त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि आज मी त्या मुलांना पडद्यावर पाहाते तेव्हा डोळे दिपून जातात. एवढय़ा छोटय़ा गावात वाढलेल्या, कधीही फारसं एक्सपोजर न मिळालेल्या मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे? थक्क करून टाकतात ही मुलं त्यांच्या अभिनयानं. ती मुलं ती भूमिका जगली आहेत समरसून आणि मला पटलं की ‘डिरेक्टर रूल्स द फिल्म’ – हे दिग्दर्शकाचंच माध्यम आहे.
सध्या मी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेसाठी पटकथा लिहितेय, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’मध्ये अभिनय करतेय. परेशचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. त्याचं महाभारतावरचं संशोधन, त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास, त्याचे चित्रपट आम्ही नेहमीच एकमेकांच्या कामाचा भाग नसलो तरी एकमेकांच्या कामाचा आदर मात्र नेहमीच करतो.
सहजीवन मला वाटतं हेच असतं. एकमेकांना फुलवणं, प्रगल्भ करणं, शेवटी सहजीवनातून आनंद मिळायला हवा हे महत्त्वाचं!