रोजच न चुकता चपात्या करणं, जिकिरीचं व कंटाळवाणं होऊ शकतं, हे जाणून सिंगापूरस्थित मराठी तरुणीनं शोधलं ‘रोटीमॅटिक’ हे पूर्णत: स्वयंचलित यंत्र. हे उत्पादन डिझाइन करण्यापासून ते त्याच्या विपणनापर्यंतच्या आघाडय़ा लीलला पेलणाऱ्या प्रणोती नगरकर या उद्योजिकेविषयी..

फक्त चपात्याच तर करायच्या आहेत. त्यात काय एवढं मोठ्ठं? हे वाक्य तमाम स्त्रीवर्गानं एकदा तरी ऐकलेलं असतंच. पण गरम गरम चपात्या रोज आणि तेही सकाळ-संध्याकाळ लागण्याऱ्या घरातल्या बाईलाच यामागचे कष्ट समजू शकतात. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे येत्या काळात चपात्या करण्याच्या चक्रातून स्त्रियांची सुटका होऊ शकते. याला कारण म्हणजे ‘रोटीमॅटिक’. यातून थेट गरमागरम पोळ्याच तुमच्या ताटात पडू शकतात. आणि मुख्य म्हणजे घरातील पुरुषवर्गही त्या सहजपणे करू शकतो.
करिअर आणि घर अशा दोन्ही आघाडय़ांवर लढणाऱ्या भारतीय- विशेषत: चपाती हवीच, या मानसिकतेतल्या महाराष्ट्रीय- स्त्रियांसाठी तर हे काम अधिकच जिकिरीचं..पण अशा वेळी एखादं यंत्र तुमच्या मदतीला आलं तर! असं यंत्र की ज्यात फक्त पीठ, पाणी आणि तेल घालून बटन दाबलं की तुम्हाला हव्या तशा गरमागरम पोळ्याच बाहेर येतील. हे यंत्र तयार केलंय ते सिंगापूरस्थित प्रणोती नगरकर-इसराणी या मराठी तरुणीनं. ते आहे, ‘रोटीमॅटिक’.
मूळची पुण्याची असलेली प्रणोती दहावीनंतर मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे सिंगापूरला आली. त्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. अकरावी-बारावी आणि इंजिनीअरिंगचं शिक्षण तिनं सिंगापूरध्येच घेतलं. सिंगापूरला असली तरी भारताशी तिची नाळ घट्ट जोडलेली होती. भारतातल्या खाद्यसंस्कृतीमुळे, पोळ्या करणं तिलाही चुकलं नव्हतंच. कणीक मळणं, त्याच्या चपात्या लाटणं आणि भाजणं या प्रक्रियेतील वेळखाऊपणा तिला खटकत होता. स्वयंपाकघरात अनेक अत्याधुनिक उपकरणांनी जागा पटकावली असली तरी पोळी बनवण्याच्या यंत्राची कमतरता तिला जाणवली. मग स्वयंचलित वॉिशग मशीनमधून जसे कपडे धुवून बाहेर येतात त्याचप्रमाणे पोळ्या भाजूनच बाहेर येणारं एखादं यंत्र तयार करण्याची कल्पना या मॅकेनिकल इंजिनीअर तरुणीच्या डोक्यात घोळू लागली. त्यातूनच जन्म झाला तो ‘रोटीमॅटिक’चा.
 ‘झिम्प्लिस्टिक’ ही प्रणोतीची कंपनी. प्रणोती आणि तिचे पती ऋषी इसराणी यांनी ही कंपनी स्थापन केली. सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवी उत्पादनं तयार करणं हा त्यांचा मुख्य उद्देश. ‘रोटीमॅटिक’ हे त्यांचं पहिलंच उत्पादन. त्यासाठी तब्बल सहा र्वष त्याची निर्मितीप्रक्रिया सुरू होती. फक्त एक यंत्र तयार करणं एवढय़ापुरतीच ही संकल्पना मर्यादित नव्हती. तर यंत्राची रचना, त्याचा सुटसुटीत आकार याचा विचार होणंही गरजेचं होतं. ‘रोटीमॅटिक’च्या निर्मितीसाठी प्रणोतीनं सहा वर्षांपूर्वी तब्बल २० हजार डॉलर्स ओतले. गुंतवणूकदारांना आकर्षति करण्यासाठी २००९ मध्ये तिनं याची प्रतिकृती तयार केली. तिची ही संकल्पना सर्वाना इतकी आवडली की नॅशनल सिंगापूर स्टार्टअप स्पध्रेची ती विजेती ठरली. यामुळे प्रणोतीचा आत्मविश्वास दुणावला.
सुरुवातीपासूनच प्रणोतीला स्वत:चं उत्पादन तयार करायचं होतं. त्यामुळेच इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर, मुली फारशा फिरकत नसलेल्या प्रॉडक्ट डिझाइन या क्षेत्रात तिने मोर्चा वळवला. उत्पादननिर्मितीचा अनुभव मिळावा यासाठी काही काळ तिनं ‘अ‍ॅमटेक’ या कंपनीत काम केलं. यादरम्यान तिला व्हॅक्यूम क्लीनरचा एक भाग तयार करण्याच्या प्रकल्पावर काम करायची संधी मिळाली. ‘रोटीमॅटिक’च्या निर्मितीप्रक्रियेत तिला या अनुभवाचा फारच उपयोग झाला.
 तसं पाहायला गेलं तर बाजारात रोटीमेकर्सची कमतरता नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या फूड प्रोसेसरनं कणीक मळण्याचं काम सोपं केलं. तसंच इलेक्ट्रॉनिक रोटीमेकरमध्ये कणकेचा गोळा ठेवल्यावर गरम पोळी तयार होते. पण फूड प्रोसेसरनं कणीक मळून दिली तरी पोळ्या करण्याचं काम स्त्रीलाच करावं लागतं. तसंच इलेक्ट्रॉनिक रोटीमेकरमध्ये ठेवण्यासाठी कणकेचे उंडे स्वत:लाच करावे लागतात, पण या सर्व प्रक्रिया एकाच यंत्रात होतील आणि पोळीही भाजून येईल असं यंत्रं प्रणोतीनं तयार केलंय. स्वयंचलित पद्धतीनं पोळ्या तयार करणारं ‘रोटीमॅटिक’ हे जगातलं पहिलंच यंत्र.
‘रोटीमॅटिक’ संपूर्णपणे रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे या उपकरणाकडून प्रमाणाच्या बाबतीत कोणतीही चूक होत नाही. रोटीमॅटिकची रचना अत्यंत आकर्षक, सुटसुटीत आणि वापरायला सोपी आहे. या यंत्राच्या वरच्या भांडय़ांमध्ये पीठ, तेल आणि पाणी घालायचं, तुमच्या गरजेनुसार चपातीची जाडी आणि त्या किती खरपूस भाजून हव्यात याची नोंद करायची आणि स्टार्ट बटन दाबायचं. एवढं केलंत की पुढची जबाबदारी या यंत्राची. एका मिनिटाला एक पोळी याप्रमाणे एका वेळेला २०-२५ चपात्या या यंत्राद्वारे करता येतात. दिवसभरात साधारण २५० ते ३०० चपात्या यात होऊ शकतात. म्हणूनच मोठय़ा कुटुंबासाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.
चपात्यांसोबतच उत्तम पराठे, पुऱ्याही यात करता येतात. तसंच कणकेचे गोळे तयार करून हवे असतील तर तशी सोयही यात आहे. ‘रोटीमॅटिक’मध्ये पिठातली सर्व पोषणमूल्य कायम राहतील, याकडे प्रणोतीने जातीने लक्ष दिलं आहे.
‘रोटीमॅटिक’च्या निर्मितीत प्रणोतीला तिच्या पतीचीही साथ लाभली. उद्योगपती आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञ असलेले ऋषी इसराणी २०११ साली तिच्या कंपनीत रुजू झाले, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. ‘रोटीमॅटिक’चं संपूर्ण सॉप्टवेअर त्यांनीच विकसित केलंय. तसंच खासगी गुंतवणूकदारांकडून तीन दशलक्ष डॉलर्स उभे करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या तंत्रज्ञ पतीपत्नींच्या एकत्रित प्रयत्नांनी ‘रोटीमॅटिक’ची निर्मिती झाली आहे. प्रणोतीकडे या उत्पादनाचे सहा तर ऋषीकडे आठ पेटंट आहेत.
एक इंजिनीअर ते उद्योजिका हा प्रणोतीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिलाही बराच संघर्ष करावा लागला. जेव्हा स्वत:ची कंपनी सुरू करण्याचं ठरवलं,तेव्हा     
या दोघांना फक्त एक हजार डॉलर्समध्ये मासिक खर्च भागवावा लागे. सिंगापूरसारख्या महागडय़ा शहरात इतक्या कमी पशांत महिना काढणं तसं अवघडच होतं. पण या दोघांनी त्यातूनही मार्ग काढला. ते एकाच बाईकवरून आपल्या कंपन्यांमध्ये जात. तसंच घरात पेइंग गेस्ट ठेवून, दुसऱ्यासोबत त्यांनी आपलं घर वाटून घेतलं. स्त्रियांबाबतचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन प्रणोतीलाही अनुभवायला मिळाला. मुळात मॅकेनिकल इंजिनीअर असणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी. त्यातच एक स्त्री-उद्योजिका, एखाद्या उत्पादनाची निर्मिती करू शकते यावर लोकांचा विश्वास बसणं कठीण होतं. प्रणोती सांगते, ‘‘मी कंपनीची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि इंजिनीअरिंग आíकटेक्ट आहे यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. मी कंपनीच्या विक्री किंवा जाहिरात विभागात काम करते, असंच लोकांना वाटायचं,’’
प्रणोतीला तिच्या आई-वडिलांकडून कायमच पािठबा मिळाला. वडील तर नेहमीच नवं काही करायला उत्तेजन द्यायचे, असं ती म्हणते. भारतात तिचं शालेय शिक्षण झालं. यादरम्यान ती एनसीसीचाही एक भाग होती. या काळात तिनं नेमबाजीचंही प्रशिक्षण घेतलं. जेव्हा मुली जग फिरतील तेव्हाच त्या आपल्या कोशातून बाहेर पडू शकतील, असा संदेश ती आजच्या तरुण मुलींना देते.
 प्रणोतीच्या ‘रोटीमॅटिक’ला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळालाय. अनेकांनी याची आगाऊ नोंदणीही केलीये, पण भारतात अजून हे यंत्र उपलब्ध झालेलं नाही. सध्या त्याची किंमत जवळपास ३५ हजार रुपये एवढी असली, तरी ती भारतात कमी असेल, असे सांगण्यात आले आहे.   
 एका स्त्रीलाच इतर स्त्रियांच्या कष्टांची कल्पना येऊ शकते, त्या सहसंवेदनेतून हे यंत्र तयार झालं असलं तरी त्यामुळे ब्रेडवर वा तयार पदार्थावर अवलंबून रहाणाऱ्या पुढच्या पिढीसाठी याचा वापर नक्कीच लाभदायक ठरेल. 
श्रीशा वागळे-जादोन -shreesha.indian@gmail.com  

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
Prayas Energy Groups work is primarily in the context of energy and power sector policies and consumer interest
वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’
documentary making and Changers of Attitudes
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..