‘‘माझ्यासाठी ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक मैलाचा दगड ठरलेलं. पुरुषोत्तम दारव्हेकरांचं नाटक, जितेंद्र अभिषेकींसारखा कल्पक संगीत दिग्दर्शक, वसंतराव देशपांडेंसारखा सिद्धहस्त गायक बरोबर होते. ‘आदमी का गला दिल और दिमाग के बीचोबीच क्यों?’ असं एक वाक्य आमच्या ‘कटय़ार’मध्ये आहे. याचा अर्थ हा की, गाणं केवळ बुद्धिनिष्ठ असू नये. ते हृदयस्पर्शीही असावं आणि हेच अभिषेकींनी शिकवलं. गाण्यातले ‘ईकार’ ऊकार’ ‘आकार’ यावर लक्ष ठेवून आवाजाची फेक कशी असावी, ‘षड्जाचा’ घुमारा सबंध थिएटरमध्ये कसा घुमावा हे त्यांनीच शिकवलं. ‘कटय़ार’ म्हणजे आम्हा मुलांसाठी एक ‘गुरुकुल’च होतं.’’ सांगताहेत ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका फैय्याजम्.
पुण्याहून मुंबईकडे बसने निघालेले.. थोडंसं अंधारून आलेलं आणि  ‘लागी करेजवाँ कटय़ार’ मनात रुंजी घालू लागलं. त्या सुरांबरोबर आठवले, वसंतराव देशपांडे, पुरुषोत्तम दारव्हेकरांसारखे माझे गुरू.. माझ्या डोळ्यांसमोर तो काळ साक्षात उभा राहू लागला.. माझा नाटय़प्रवास म्हणजे कॅलिडोस्कोपच आहे. त्यात अनेक रंग आहेत, छटा आहेत. अनेक माणसं आहेत, त्यांच्याकडून मी घेतलेल्या अनेक गोष्टी आणि त्यातून घडत गेलेली मी नजरेसमोर येऊ लागली..
    माझ्या करिअरमध्ये नृत्य, नाटय़, संगीत, चित्रपट, मालिका, पाश्र्वगायन असे अनेक रंग आहेत. त्यातही सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी असे सगळे प्रवाह आहेत. नाटय़संगीत, उपशास्त्रीय संगीत, गज़्‍ाल गायकी, लावणी असे सगळे गानप्रकार माझ्या प्रवासात मला साथ देत आलेत. मी कशालाही निषिद्ध मानलं नाही. जे जे माझ्या वाटय़ाला आलं ते स्वीकारलं आणि त्यात यशस्वी झाले. या माझ्या प्रवासात खूप जण वाटेकरी आहेत. त्या सगळ्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे.
सोलापूर शहराला वगळून मला काही लिहिताच येणार नाही. कारण नृत्य, नाटक, संगीत याचं बीज सोलापुरातच रुजलं होतं. ते मर्यादित होतं हे खरंय. लहानपणी शाळेत असताना जोशीबाई माझ्याकडनं ‘झूमे झूमे दिल मेरा’ या गाण्यावर नृत्य करवून घेत. नऊवारी साडी, पोटीमा कॉलरचा ब्लाऊज, काखेत छत्री असं त्यांचं व्यक्तिमत्त्व! मला आजही त्या आठवतात. तांबेकर बाई, शिंदे बाई, नाईकनवरे सर, मग ह. दे. प्रशालेतील महाजनी सर, देव सर, आगाशे मॅडम या सगळ्यांनीच तर घडवलं मला. महाजनी सरांचा मराठी विषयाचा तास म्हणजे पर्वणीच! माझं मराठी स्वच्छ व अस्खलित असण्याचं श्रेय त्यांना. हिंदी, इंग्रजी व संगीतातही विशेष रुची असणारे बालगंधर्वभक्त देव सर तर माझे वर्गशिक्षक. लहानपणी कलापथके व मेळ्यांतून मी भाग घेत असे. तेव्हा राम जालिहाळ, मनोहर कुलकर्णी, पंचवाडकरबुवा यांच्याकडे संगीताचा श्रीगणेशा झाला होता माझा. तालासुरांशी तोंडओळखही झाली होती. मास्टर हसन व कट्टी मास्तर, पाटील मास्तर यांच्याकडे नृत्याचे शिक्षणही झाले होते माझे. आणि हौशी रंगभूमीवर मधू पाठक, अ‍ॅपरंजीसर, कंपल्ली यांच्याकडून अभिनयाशी परिचयही झाला. त्या छोटय़ाशा गिरणगावात तेव्हा बोलबाला झाला होता माझा. पण दैवाची चक्रं अशी काही फिरली की, ध्यानीमनी नसताना एक दिवस मला मुंबईला यावं लागलं. या महानगरीची काही माहिती नव्हती. समोर अंधकार, डोक्यात विचारांचं काहूर घेऊन मी भविष्याचा वेध घेण्यासाठी आले तेही संगीत नाटकांत काम करण्यासाठी. सुमतीदेवी धनवटेंच्या ‘गीत गाईले आसवांनी’ या नाटकात दत्ता भट, माई भिडे, परशुराम सावंत, कृष्णकांत दळवी या दिग्गजांबरोबर काम करताना भीती वाटली होती. पण ‘ती आली, तिनं पाहिलं, ती जिंकली’ या शब्दांत माझी सर्व वृत्तपत्रांतून तारीफ झाली होती. रकानेच्या रकाने माझ्यावर लिहून आले होते. ही मुंबईनगरी मायावी खरी. ती सगळ्यांना सामावून घेते. म्हणूनच तर नाटककार, साहित्यिक, संगीतकार, अभिनेत्री, अभिनेते, दिग्दर्शक इथं नशीब अजमावण्यासाठी येतात आणि इथेच सामावून जातात. माझ्यावर मुंबैकरांनीच नव्हे उभ्या महाराष्ट्राने, महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे म्हणून मराठी माणूस आहे तिथल्या सगळ्यांनी खूप प्रेम केलंय. माझ्या कलेचं कौतुक केलंय. त्या सगळ्यांची मी ऋणी आहे.
प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात एक ‘माइलस्टोन’ कलाकृती असतेच असते. माझ्यासाठी ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक मैलाचा दगड ठरलेलं आहे. खरंतर प्रभाकर पणशीकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकानं माझं नाव झालंच होतं. महिन्याला ३०-३५ प्रयोग मी करत होते. बऱ्यापैकी अर्थार्जन होऊन मी मुंबईत स्थिरावले होते. स्वत: पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, डॉ. काशिनाथ घाणेकर या त्रयीबरोबर आत्मविश्वासाने माझा नाटय़प्रवास सुरू होता. पण ‘कटय़ार’ने मात्र माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पुरुषोत्तम दारव्हेकरांचं नाटक, जितेंद्र अभिषेकींसारखा कल्पक संगीत दिग्दर्शक, वसंतराव देशपांडेंसारखा सिद्धहस्त गायक, बालकरामसारखा गुणी गायक, प्रसाद सावकारांसारखा हरहुन्नरी गायक नट आणि शंकर घाणेकर असा तो संच होता. या नाटकाने अभिषेकींसारख्या गुरूकडे संगीत शिकण्याचा योग आला. भावस्पर्शी गायकी म्हणजे कशी ते अनुभवायला मिळालं. प्रत्येक गायक-गायिका अभिनेत्री-अभिनेत्यांची काही बलस्थानं असतात. तिचा योग्य तो वापर करून आपले दोष झाकून आपली गायकी कशी पेश करावी हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. ‘आदमी का गला दिल और दिमाग के बीचोबीच क्यों?’ असं एक वाक्य आमच्या ‘कटय़ार’मध्ये आहे. याचा अर्थ हा की, गाणं केवळ बुद्धिनिष्ठ असू नये. ते हृदयस्पर्शीही असावं आणि हेच अभिषेकींनी शिकवलं. गाण्यातले ‘ईकार’, ‘ऊकार’, ‘आकार’ यावर लक्ष ठेवून आवाजाची फेक कशी असावी, ‘षड्जाचा’ घुमारा सबंध थिएटरमध्ये कसा घुमावा हे त्यांनीच शिकवलं. वसंतराव देशपांडेचं आणि माझं नातं बाप-लेकीचंच होतं. ‘कटय़ार’ म्हणजे आम्हा मुलांसाठी एक ‘गुरुकुल’च होतं. वसंतरावांनी ज्याला जे हवं त्याला ते शिकवलं. म्हणूनच तर ‘देणाऱ्याचे हात हजार, किती घेशील दोन कराने’ असं व्हायचं. नाटकाचं गाणं रसपरिपोष तर हवंच, पण ते पेश करताना त्याचं भान हवं. ते गाणं समर्पकच हवं, लोकांना हवंहवंसं वाटत असताना संपवावं हे त्यांच्याबरोबरच्या १६ वर्षांच्या सहवासात कळलं. कारण त्या सीनमध्ये जे गद्य शब्दांनी सांगायचं असतं ते पदांनी सांगायचं. मग ते किती वेळ गावं? शेजारच्या पात्रांनी किती वेळ ताटकळत राहावं असं ते सांगत आणि ते खरंच होतं!
वसंतरावांकडून आणखी एक गोष्ट मी शिकले ती म्हणजे अदाकारी. वसंतरावांना नृत्याचं उत्तम अंग होतं हे अनेक जणांना माहीत नसेल, पण ते नृत्य करून दाखवायचे. उत्तम अदाकारी करायचे. त्याचा मला उपयोग पुढे बैठकीच्या लावणी करतानाही झाला. तसं तर माझ्यावर या अदाकारीचे संस्कार अनेकांनी केले. जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा मेनकाबाई शिरोडकरांकडे (शोभा गुर्टू यांच्या आई) मैफलींना जायचे. ठुमरी गात असताना त्या ज्या काही अदा करायच्या त्याचा प्रभाव माझ्या मनावर खोलवर झाला. त्यांच्याच बरोबर यमुनाबाई वाईकर यांचाही. बिरजू महाराजांचं नृत्य पाहायला जाणं ही तर पर्वणी असायची. ते ठुमरीवर जी अदा करायचे ते एखादी स्त्री काय करेल? मी पाहतच राहायचे. या सगळ्यांचा कळत नकळत परिणाम माझ्यावर होत गेला. पुढे बैठकीची लावणी करताना या अदांचा उपयोग करून केलेल्या ‘तुम्ही माझे सावकार’सारख्या गाण्यांना रसिकांची इतकी दाद मिळायची की मेहनतीचं चीज व्हायचं. तसाच आनंद मला ग. दि. माडगूळकरांचं ‘जोगिया’ गाताना व्हायचा. आजही ‘कोन्यात झोपली सतार’ माझ्या मनाच्या कोपऱ्यात सतत वाजत असतं.
या माझ्या नाटय़प्रवासात मी अनेक भूमिका रंगवल्या. ‘गुंतता हृदय हे’मधली कल्याणी, ‘मत्स्यगंधा’मधली सत्यवती, ‘अंधार माझा सोबती’मधली ज्योती, ‘कटय़ार..’मधली झरीना, ‘मित्र’मधली मिसेस रुपवते.. या त्यातल्या माझ्या काही हृदयाच्या जवळच्या भूमिका. तशीच एक तात्यासाहेबांच्या ‘वीज म्हणाली धरतीला’मधली जुलेखाँ. हे पात्र म्हणजे तात्यासाहेबांची मानसकन्याच! नाटक राणी लक्ष्मीचं, पण ते नकळत जुलेखाँचं झालं असं खुद्द तात्यासाहेब म्हणत; असो. या नाटकासाठी मास्तरांनी म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकरांनी माझ्याकडून खूप मेहनत करून घेतली. ज्याप्रमाणे संगीतात तालासुरांना महत्त्व, दमसास तर हवाच; तसंच गद्यातील स्वगतं म्हणताना त्याला एक लय हवी, सूर हवा, कुठे दम घ्यायचा, त्याचे खंड कसे पाडायचे हे मास्तरांकडून शिकायला मिळालं. मुख्य म्हणजे ते खऱ्या अर्थाने मास्तरच होते. संहितेवर त्यांचा विशेष भर असे. ‘कटय़ार’ या नाटकामुळे वसंतराव, अभिषेकी आणि मास्तर या त्रयींनी मला समृद्ध केलं, संगीताची दृष्टी दिली. या लोकांच्या सान्निध्यामुळे विचारांची खोली वाढली. ‘इतर गायकांचं गाणं ऐकताना आपल्याला त्यातून काय हवं हे ओळखता आलं पाहिजे. कारण विद्या ही देता येते सुपारीसारखी, पण कला उचलावी लागते तपकिरीसारखी. विद्या ही बाहेरून आपल्यात शिरते, कला ही आतून बाहेर पडते. विद्या ही तालासारखी आहे, ती शिकता येते, शिकवता येते; पण कला ही लयीसारखी आहे, ती अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून (वरून) आणावी लागते.’ खरंच मास्तरांनी किती तंतोतंत लिहिलं होतं आणि हेच मी आचरणात आणलं. गाणं गायचं तर शास्त्र शिकलं पाहिजे. आम रागांची माहिती हवी म्हणून अभिषेकींनी मला सी. आर. व्यासांकडे पाठवलं. बुवांनीही हात आवरता घेतला नाही. माझा गळा तिथे तयार झाला. नंतर मी पंडित वसंतराव कुलकर्णीकडे काही काळ शिकले. गुरू कसा असावा तर पंडित वसंतराव कुलकर्णीसारखा, असंच मी म्हणेन. या सगळ्या गुरुजनांनी खरंतर मला घडवलं. माझे लेखक, संगीत दिग्दर्शक, सहकलाकार, निर्माते आणि मुख्य म्हणजे रसिक मायबाप यांनीच तर मला घडवलं.
माझ्या इतर नाटकांचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई व यशवंत देव! मी अभिषेकींच्या संगीत दिग्दर्शनाखाली जास्त काम केलंय, पण वसंत देसाईंना विसरून चालणार नाही. कलावंतांनी आत्मविश्वासाने आपली कला पेश करावी. नकारात्मक असू नये, तर नेहमीच सकारात्मक असावं, असं ते सांगत. तसंच सी. रामचंद्रांबरोबर ‘गीतगोपाल’ आणि ‘घरकुल’ चित्रपटासाठी ‘कोन्यात झोपली सतार’ गायले; ज्याला राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
मी अनेक गाणी गायली आहेत. ‘संशय का मनी आला’  किंवा ‘मम आत्मा गमला’सारखी नाटय़गीतं असोत किंवा ‘निर्गुणाचा संग’सारखा अभंग असो, ‘उगी उगी बाळा’सारखं अंगाई गीत असो किंवा बैठकीच्या लावण्या असोत, विविध गायन प्रकारांनी मी समृद्ध झालेय.
दादा कोंडके हयात असताना ‘विच्छा माझी पुरी करा’च्या किमान सातशे प्रयोगांत मी पाश्र्वगायन केलं तेव्हाही तुकाराम शिंदे लावणीचा बाज, ठसका, नखरा यांविषयी खूप सांगत. त्यांच्याकडून बऱ्याच लावण्या, गवळणी शिकले मी. मोठा हुशार माणूस होता तो. आज प्रभाकर भालेकरांची सातत्याने आठवण येते. माझ्या पहिल्या नाटकाचे तेच संगीतकार होते. माझ्या उत्तर हिंदुस्थानी गळ्याला रुचेल असंच त्यांचं संगीत होतं; ज्यामुळे एका रात्रीत संगीत अभिनेत्री म्हणून माझं नाव झालं. तसं सिनेसंगीत मी खूप कमी गायले, पण संगीत दिग्दर्शकांची नामावली पाहिली तर खरंच यांच्याकडे मी गायले का, असा मला प्रश्न पडतो. मदनमोहन, एस. डी. बर्मन, जयदेवजी, सी. रामचंद्र, आर. डी. बर्मन,  अजित बर्मन, वसंत देसाई, भास्कर चंदावरकर, राम कदम किती नावं सांगू. मी खरंच भाग्यवान! त्यातलंच ‘शक’ चित्रपटामधलं दो नैनों के पंख लगा के किंवा ‘आलाप’मधलं येसूदासबरोबरचं ‘आयी रुत सावन की’सारखी गाणी मनात रुतून बसली आहेत.
मध्ये बरीच र्वष गेली. छोटा पडदा, मोठा पडदा असाही प्रवास झाला. विक्रम गोखलेंबरोबर मालिका, चित्रपट, नाटके केली. त्यांच्याकडून सहजता म्हणजे काय ते शिकले. एखादा पॉजही खूप काही सांगून जातो हे कळलं. क्लोज-अप म्हणजे काय? तो कसा द्यायचा हे विक्रमनी सांगितलं. डॉ. लागूंबरोबर काम करताना सहजता तर होतीच, पण प्रयोगागणिक डॉक्टर त्या भूमिकेचा विचार करत. हे मला अनुभवता आलं आणि नटाला शिस्त हवी हे डॉक्टरांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवलं. माझे सहकलाकार म्हणून तोरडमलांचीही आठवण येते. मी एकच नाटक केलं तेही जयवंत दळवींचं ‘किनारा’. माझे नाटय़दिग्दर्शक दारव्हेकर तर आहेतच; पण नंदकुमार रावते, दिलीप कोल्हटकर हेही होते आणि कांती मडिया व अरविंद ठक्कर हे दोघे गुर्जर रंगभूमीचे. पण कांतींनी जेव्हा ‘वेट अन्टिल डार्क’वरचं ‘अंधार माझा सोबती’ केलं तेव्हा तो रोज एक तास मला ब्लाइंड स्कूलमध्ये नेई. म्हणजे संगीतात श्रवण आणि अभिनयात निरीक्षण हवं हे कळलं. आताच्या विजय केंकरेंबरोबरसुद्धा ‘मित्र’ नाटक केलं. तोही एक वेगळा अनुभव होता.
‘बैठकीच्या लावणी’साठी अशोक रानडे सरांकडे अक्षरश: कोरी पाटी घेऊन गेले होते. त्यांचा व्हॉइस कल्चरचा दांडगा अभ्यास अनुभवला. सरांकडे गेले की ते बोलणार, आपण नुसतं ऐकायचं असं ठरूनच गेले होते!  अशीच एक वेगळी अनुभूती अनुभवली ती  पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर ‘वट-वट-वट-वट’ मध्ये काम करताना दस्तुरखुद्द भाई बरोबर असत. चक्क चार पदे मी गायलेय त्यात आणि द्वंद्वगीत गायलं तेही त्यांच्याचबरोबर. विनोदाचे पंचेस, पॉजेस्च्या जागा त्या भाईंच्याच! आणि हे सगळं मी अनुभवलं म्हणजे धन्य मी कृतार्थ मी असंच म्हणावं लागेल.
आज बेगम अख्तरचीही खूप आठवण येते. माझ्या मनात त्यांना एक विशिष्ट उंचीवर मी स्थानापन्न केलंय  त्यांच्याबरोबर लखनौला गेले असते तर एक वेगळी फैय्याजम् दिसली असती. ‘मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते’ असंच म्हणावं लागेल. पण त्यांच्या मैफली, रेकॉर्डिग्स, त्यांचा सहा वर्षांचा सहवास यातून एकलव्यासारखं जेवढं शिकता येईल तेवढं शिकले. खरं सांगू, आजही मी विद्यार्थिदशेतच आहे. या आजच्या नवीन पिढीकडे खूप शिकण्यासारखं आहे. शिकण्याची उमेदही आहे.
गेल्या ४५-४६ वर्षांतील माझा हा नाटय़प्रवास मनाशी अनुभवताना जाणवलं, प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय.. ढग अधिकच अंधारून आले होते. थोडी थोडी रिमझिमही सुरू होती. मनाला एक पुटपुट लागली. हुरहुर जाणवली आणि आठवल्या त्या बेगमसाहिबांच्या गजम्लेच्या दोन ओळी,
‘यूँ तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी।
आज कुछ बात है जो शाम पे रोना आया।।’
त्यांच्या आठवणीला माझा कुर्निसात करते.
 खुदा हाफिज!    
chaturang@expressindia.com