प्रत्येक दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य त्यांचे त्यांचे असते. दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाचा भावनिक पाया जर मजबूत केला व एकमेकांचे लंगिक मानसशास्त्र जर जाणून घेतले तर मग ‘वादळवारं सुटलं’ तरी वासंतीला भीती वाटणार नाही, सीमालाही नवरा ‘दुसऱ्या व्यक्तीला मनात आणतोच कसा’ असे कोडे पडणार नाही आणि जयालाही काही प्रस्थापित वैवाहिक नीतिनियमांना मुरड घालावी लागणार नाही.
‘गे ले काही दिवस मला नीट झोप लागत नाही. मला सारखा त्याचाच भास होतो आणि मग मी बेचन होते.’ पस्तीशीतील वासंती मला सांगत होती. वसंत आणि वासंती हे जोडपे माझ्यासमोर जरा वेगळीच समस्या घेऊन आले होते. लग्नाला नऊ वष्रे झाली होती आणि अचानक गेले दोन महिने एक वेगळाच प्रॉब्लेम त्यांना सतावत होता. जोडपे अगदी एकमेकांमध्ये मिसळून गेलेले. एकमेकांबरोबर अगदी मोकळेपणाने बोलणारे आणि वागणारे. तसे अ‍ॅरेंज्ड मॅरेज पण आता प्रेमविवाहात मोडतील असे. समस्या जी सुरू झाली ती वासंतीने केलेल्या तिच्या एका कबुलीमुळे. कारण तिच्या मताप्रमाणे नवरा-बायको हे एकमेकांना उत्तरदायी (आन्सरेबल) असतात.
काही महिन्यांपूर्वी तिला बॅडिमटन शिकायची हौस आली आणि एका क्लबमध्ये तिने तिच्या समवयस्कांच्या ग्रुपमध्ये नाव घातले. नियमित जात होती आणि तिच्याच त्या ग्रुपमधील माधवच्या संपर्कात आली. माधव दिसायला स्मार्ट, एखाद्या वर्षांनेच मोठा, मनमोकळा, दिलदार आणि त्या दोघांची जोडी डबल्समध्ये एकत्र खेळू लागली. सुरुवातीला संकोचणारी वासंती हळूहळू माधवच्या स्वभावामुळे त्याच्याशी मोकळेपणाने वागू लागली. त्यांच्या एकत्र खेळण्यामुळे मत्री झपाटय़ाने झाली आणि नाते ‘अरेतुरे’चे झाले. आपण माधवकडे आणि माधवही आपल्याकडे आकृष्ट झालो आहोत हे वासंतीच्या लक्षात आले आणि ती बेचन झाली. तिच्या विचारांमध्ये सतत माधवचा विचार येऊ लागला. रात्री तर एक-दोनदा तिला त्याची स्वप्नेपण पडली. आता मात्र ती घाबरली. वसंतावर असणारे तिचे प्रेम तिला अस्वस्थ करू लागले. आपल्याकडून काही तरी चुकीचे घडत आहे अशी तिच्या मनाला टोचणी लागून राहिली.
आपल्याकडून काही ‘भलतेसलते’ घडण्यापूर्वीच आपण अल्पविराम घेतला पाहिजे, असे वाटून ती तीन दिवस क्लबला गेली नाही. आता आपल्यावर ताबा आला आहे असे वाटून चौथ्या दिवशी ती पुन्हा क्लबला गेली. माधव होताच तिथे आणि ती आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. वासंतीलाही तिच्या गालावर लाली आली असल्याचे जाणवले. हे जाणवून आपण आपल्यावर ताबा मिळवलेला नाही हे वासंतीच्या लगेचच लक्षात आले. ती पार गडबडून गेली. माधव पूर्वीप्रमाणेच तिच्याशी सहजगत्या वागत होता, बोलत होता. आपल्याला असे का होतेय हेच लक्षात न आल्याने वसंताचे नामस्मरण करीत तिने कसेबसे दोन सेट खेळून काढले आणि मनाचा निश्चय करून त्या रात्री तिने सर्व हकिकत वसंताला सांगितली. वसंत अवाक् झाला, पण त्याने शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि वासंतीच्या कबुलीजबाबाचे त्याला कौतुक वाटले. तो शांत राहिला. पण नेमके याच कारणामुळे वासंती जास्तच अशांत झाली. अरे याला काहीच वाटले नाही की ‘खूप काही’ वाटूनही वसंत स्वत:वर ताबा ठेवून आहे?
ही झाली वसंता-वासंतीची केस. पण सीमाची केस मात्र जराशी वेगळी होती. इथे तिला वसंतासारखा ताबा ठेवता येत नव्हता आणि नेमक्या याच कारणासाठी तीही माझ्याकडे येऊन गेली होती.
‘पण सर मला सांगा, माझ्यासारखी आकर्षक आणि पुरेपूर साथ देणारी बायको असताना सुभाषला दुसरीचा विचार करायची काय गरज आहे?’ पस्तीशीतील सीमा उद्वेगाने मला विचारत होती. ती एकटीच आली होती तिचे शंकानिरसन करायला.
‘पण मला एक सांगा, तुम्हाला हे कसं कळलं की सुभाष कुण्या दुसरीचा विचार करतोय ते?’ मी कुतूहलवजा आश्चर्याने सीमाला विचारले.
‘आम्ही रोमान्स करता करता बोलताना त्याने तसा उल्लेख केला म्हणून.’ सीमाने प्रांजळपणे सांगितले.
सीमासारखा प्रश्न कित्येक मनमोकळय़ा जोडप्यांमधील स्त्रियांना कदाचित पडतही असेल.. पुरुष असे विचार का करतो? पण स्त्रीसुद्धा असे विचार करत असेल? पहिल्या केसमधील वासंतीने याचे उत्तर हे प्रांजळपणे कबूल करून दिले आहेच. या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी स्त्री आणि पुरुष यांची लंगिक मानसिकता समजून घेतली पाहिजे. दोघांच्या लंगिक मानसिकतेमध्ये मुळातच निसर्गत: फरक असतो हे कळणे आवश्यक आहे. हे न उमजल्यामुळेच ‘मला जशी उत्तेजना असते तशी बायकोला का नाही?’ किंवा ‘मला जसं हवंय तसं नवरा का वागत नाही?’ असे प्रश्न दोघांनाही पडणार नाहीत. लंगिक मानसिकतेच्या मुळात जायला लंगिकता आणि मन यांचे नाते पहिल्यांदा जाणून घेतले पाहिजे. ‘मन’ हे मेंदूचेच एक अंग आहे आणि मेंदूतील वेगवेगळय़ा भागांमधील रासायनिक क्रियांमुळे मनाचे कार्य विकसित होत असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मानवातील ‘विकसित मना’मध्ये मेंदूतील पुढील भागाचा (ऑर्बायटोफ्रंटल, प्री फ्रंटल) तसेच मेंदूतील अँटीरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स आणि भावनेच्या लिम्बिक मेंदूतील एॅमिग्डाला, इन्शुला व हिप्पोकॅम्पस यांसारख्या भागांचा समावेश होत असतो. याचप्रमाणे आकर्षणाच्या वेळी मेंदूतील इतर भागही (कॉडेट, मॅमीलरी बॉडी, व्हिटीए इ.) उत्तेजित होत असतात.
या सर्वाप्रमाणे अजून एका मेंदूभागाचे महत्त्व प्राणीजगतात नातेसंबंधाबाबतीत असते. त्याला म्हणतात व्हेंट्रल पॅलीडम. या भागातील ‘व्हाजोप्रेसीन रिसेप्टर’ हे व्हाजोप्रेसीन हॉर्मोनसाठीचे सूक्ष्म ग्रहणिबदू असतात. यांचा सहभाग हा नात्यातील ‘अ‍ॅटॅचमेंट’ किंवा ‘संबंधनिष्ठा’ याच्याशी असतो. व्हाजोप्रेसीन हा प्राणीजगतातील ‘संबंधनिष्ठा’चा हॉर्मोन आहे. ऑक्सीटोसीन हा ‘संबंध-घनिष्ठते’चा (इंटिमसीचा) हॉर्मोन आहे. स्त्री-पुरुष संबंधांवर त्याचाही पगडा असतो. व्हेंट्रल पॅलीडममध्ये ‘व्हाजोप्रेसीन रिसेप्टर’चे प्रमाण संबंधाच्या वेळी जेवढे जास्त वाढते तेवढा तो संबंध जास्त निष्ठेचा होत जातो आणि संबंधा-संबंधांमध्ये हे व्हेंट्रल पॅलीडममधील ‘व्हाजोप्रेसीन रिसेप्टर’चे प्रमाण बदलत असते.
प्रयोग करताना शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, प्रेअरी व्होल प्राण्यांच्या प्रजातीतील नर-मादीमध्ये ज्याच्याशी पहिल्यांदा संबंध येतो त्या प्राण्याशी शेवटपर्यंत निष्ठा ठेवली जाते. नाते टिकवले जाते. या उलट माऊंटेन व्होल या दुसऱ्या प्रजातीमध्ये असे घडत नाही व ते प्राणी जास्त स्वैराचारी बनत असतात. याचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना असे लक्षात आले की, प्रेअरी व्होल प्रजातीमधे व्हेंट्रल पॅलीडममधील ‘व्हाजोप्रेसीन रिसेप्टर’चे प्रमाण बरेच जास्त व  माऊंटेन व्होल प्रजातीत हे नगण्य असते. असेही आढळले की, प्रेअरी व्होलसारख्या एकनिष्ठावंत प्राणी हे निसर्गात विरळाच आहेत. आणि अर्थातच ‘मानव प्राणी’ हा त्या ‘विरळां’मधला नाही. म्हणजेच त्याच्या मेंदूत नातेनिष्ठेचे व्हेंट्रल पॅलीडममधील ‘व्हाजोप्रेसीन रिसेप्टर’ हे जास्त घन प्रमाणात नसतात.
आता ही वैद्यकीय फॅक्ट, वस्तुस्थिती लक्षात घेतली ‘असे का वाटते?’ याचा वरील दोन्ही केसेसच्या (व समाजात इतरही अशा घडणाऱ्या घटनांच्या) लंगिक मानसिकतेचा उलगडा होऊ शकेल. आणि हे कळल्यावर ‘आता पुढे काय?’ याचेही उत्तर मिळणे आवश्यक आहे.
आकर्षण, संबंध-घनिष्ठता व संबंधनिष्ठा ही वेगवेगळी लंगिक मज्जातंतूंची जाळी आहेत. परंतु एकमेकांशी संबद्ध आहेत. म्हणूनच ‘सेक्स’ला गहरेपणा आणि बहुआयामित्व असते. आणि व्यक्तीसंबंध व्यक्तिगत असल्यामुळे ‘असे का? व असे कसे?’ हे प्रश्न कधीही व कुठल्याही वयात पडू शकतात. पण महत्त्वाचे जे आहे ते ‘पुढे काय?’ व ‘योग्य काय?’ याची विचारणा केली तर उत्तर काय द्यायचे माहीत पाहिजे. आणि त्याचा पाया हा शास्त्रीयतेवर आधारित असल्यास संबंधित व्यक्तीचे अशा प्रसंगात बावचळणे कमी होईल. याला लंगिक शास्त्र नीट माहीत करून व त्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, भावनिक व सांपत्तिक स्थिती नीट समजावून घेऊनच ‘वागणूक-मार्गदर्शन’ करणे गरजेचे असते.
 विविध आकर्षणे ही सर्वानाच मानसिक स्तरावर मोहवतच असतात. म्हणून तर आकर्षक व्यक्तिमत्त्वांना घेऊनच सिनेमे वा जाहिराती केल्या जातात. अनाकर्षक व्यक्तिमत्त्वांचा इथे पाडाव लागत नाही. अशी आकर्षणे वाटणे हे अनसíगक नाही आणि म्हणून त्याला स्वत:ची ‘मानसिक दुर्बलता’ मानायचेही कारण नाही. मुळातच नावीन्याची ओढ व आकर्षण वाटत असल्याने आपल्या वागण्यावर ताबा हा केवळ ‘स्व-मनोशिक्षणा’ने, ‘सेल्फ माइंड ट्रेिनग’ने मिळवता येतो. म्हणजेच ‘वाटणे’ आणि ‘वागणे’ यात समन्वय साधता आला पाहिजे. ‘स्व-मनोशिक्षणा’प्रमाणेच त्या व्यक्तीची दाम्पत्तिक (पती-पत्नी नाते) स्थितीही सुलंगिक असणे जरुरीचे आहे.
जया ही एक तिशीतली आकर्षक स्त्री माझ्याकडे आली होती. पती पस्तिशीतला. दिसायला व्यवस्थित. परंतु पती-पत्नी संबंधांमध्ये आजवर ‘कामचुकार’. असे लग्नापासूनच घडत होते. काउन्सेिलगनेही त्याच्यात फरक पडत नव्हता. (होमोसेक्शुअल?) आता जयाने काय करावे? मनावर ताबा किती वष्रे ती ठेवू शकेल. तिच्या मनाचे लोणी कधी वितळणार नाही याची खात्री कोणी द्यावी? असा एक मोहन तिच्या आयुष्यात एकदा डोकावलाच. मग हा तिचा दोष म्हणायचा का? थोडक्यात जयाची दाम्पत्तिक स्थिती ही पहिल्यापासूनच कमजोर, दयनीय होती. तिच्याकडून मग जर काही अपारंपरिक निर्णय घेतले गेले तर तिचे किती चुकले? पत्नीकडूनही जर कित्येक काळ पतीला ‘कामवंचित’ ठेवले गेले तर त्यामुळेही दाम्पत्तिक स्थिती कमजोर होऊन ‘काहीही’ घडू शकते.
म्हणूनच पती-पत्नी नाते पहिल्यांदा ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ व ‘आर्ट ऑफ सेक्स’ शिकून घट्ट करा. पती-पत्नी नात्यात संवाद, तडजोड व शृंगार ही त्रिसूत्री दांपत्तिक स्थितीचा पाया बळकट करू शकते. संवादाने सामंजस्य निर्माण होऊन दाम्पत्याची मानसिक प्रगल्भता वाढते. नात्यामधील लंगिकतेविषयीची पारदर्शकता व निर्णयक्षमता वाढते. तडजोडीने दाम्पत्यजोड व शृंगाराने रोमांचकता वाढते. त्यामुळे वैवाहिक जीवनात घनिष्ठता वाढून निष्ठा वाढायलाही मदत होऊ शकते.   
प्रत्येक दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य त्यांचे त्यांचे असते. त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास कसा आहे हे केवळ त्यांनाच माहीत असते. परंतु दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाचा भावनिक पाया जर अशा त्रिसूत्रीने मजबूत केला व एकमेकांचे लंगिक मानसशास्त्र जर जाणून घेतले तर मग ‘वादळवारं सुटलं’ तरी वासंतीला भीती वाटणार नाही, सीमालाही नवरा ‘दुसऱ्या व्यक्तीला मनात आणतोच कसा’ असे कोडे पडणार नाही आणि जयालाही काही प्रस्थापित वैवाहिक नीतीनियमांना मुरड घालावी लागणार नाही. कारण..
दिल तो धोखा है बडम नादाँ है.. हर हँसी चीज़्‍ाका तलबग़ार (इच्छुक) है..  (समाप्त)