गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय. आजचं आमचं हे सगळं वैभव आम्ही जोडीने मिळवलं.. अनुभवलं. अनेक भयानक अनुभव घेत आम्ही हा मार्ग चाललो आहोत ते तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे तत्त्व मनाशी बाळगत.’’ सांगताहेत   माया जोशी आपले पती ‘जोशी वडेवाले’ शैलेश जोशी यांच्याबरोबरच्या ३० वर्षांच्या सहजीवनाविषयी..

बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला असताना कर्नाळय़ाच्या सहलीला आमची पहिल्यांदा ओळख झाली. या ओळखीचं पुढे मैत्रीत आणि मैत्रीचं पुढे प्रेमात कधी रूपांतर झालं हे माझं मलाही कळलं नाही. आज इतक्या वर्षांनी मागे वळून बघताना वाटतं, केवढी मोठी वाट चालून आलोय आम्ही. ती सुरुवातीला काटय़ांचीही होती, अडचणीची होती, अगदी दरीतही कोसळलोय आम्ही; पण तरीही एकमेकांच्या सोबतीने आज तीच वाट हवीहवीशी झाली आहे. ती वर्षे आठवू नयेत अशी, पण हेही माहीत आहे की त्या वर्षांनीच आम्हाला घडवलंय..
ch15आम्ही दोघं प्रेमात पडलो खरे, पण दोघांच्याही घरची सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमी वेगवेगळी असल्याने दोन्हीही घरांतून लग्नाला विरोध होणार हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं. म्हणून पदवी घेईपर्यंत थांबलो. लग्न करून संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच काहीतरी उद्योग करून आर्थिक बाजू सांभाळता यावी या हेतूने शैलशने झेरॉक्सचा व्यवसाय सुरू केला. २६ डिसेंबर १९८५ ला कोर्टात लग्न करून आम्ही अक्षरश: फक्त अंगावरच्या कपडय़ांनिशी एका नव्या आयुष्याला सुरुवात केली..
शैलेश दिवसभर वेगवेगळय़ा ऑफिसेसमधून फिरून झेरॉक्स काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करून आणायचा. दरम्यान, मी त्याच्या झेरॉक्स काढून देई व तो पुन्हा ती सगळी कागदपत्रे जागच्या जागी पोहोचवायचा. सुरुवातीला त्यातही फार कमाई नव्हती, जी मिळायची त्यात अनेकदा दिवसा एकवेळ वडापाव व रात्रीचे एकवेळ जेवण करायचे, असा साधारण दिनक्रम सुरू होता.
या काळात अर्थातच आमची राहायचीही कायमची अशी काहीच व्यवस्था नव्हती, कारण आम्ही केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे आम्हाला आमची घरं बंद झालेली होती. पण एकमेकांच्या विश्वासावर आम्ही हात हातात घेतले होते. हेही दिवस जातील, हा ठाम विश्वास होता. मुख्य म्हणजे मला शैलेशच्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि आयुष्याची ही कठीण लढाई आम्ही लढायची ठरवलं.
त्या काळात काही दिवस रात्री पाठ टेकण्यापुरते एका हॉटेलमध्ये व काही दिवस एका मित्राच्या खोलीवर जायचो. मग महिन्याने ते झेरॉक्स मशीन आमच्या घरमालकाला डिपॉझिट म्हणून देऊन आम्ही डेक्कनजवळ एका इमारतीच्या गच्चीत १० बाय १० ची एक पत्र्याची खोली भाडय़ाने घेतली. गच्चीच्या एका कठडय़ाचा आधार घेत तीन बाजूने उभे केलेले पत्रे असं ते घर होतं. आमच्या या घरात एक कॉट, एक चूल आणि चार भांडी इतकंच होतं. पण तो आमचा, आम्हा दोघांचा संसार होता. अनेकदा तर असह्य़ उकाडय़ात जिन्यात झोपून रात्र काढावी लागत होती. पण ते आम्ही स्वीकारलं.. आयुष्य एका वेगळ्या वाटेने सुरू झालं..
पुन्हा भाडय़ाने एक नवीन झेरॉक्स मशीन घेतलं आणि व्यवसायाला सुरुवात केली. नोकरी करायची नव्हतीच. अथक परिश्रम, जिद्द, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारावर आम्ही व्यवसायाची मोट बांधू लागलो.
शैलेशची आर्थिक परिस्थिती फारच कठीण होती. वडील एकटेच कमावणारे, त्यामुळे त्याचं लहानपण कष्टातच गेलं होतं. त्याला कष्टाची सवयच होती. अगदी आठवी-नववीत असताना तो आणि त्याचा भाऊ माउली (जोशी) बसस्टॉपवर काकडी आणि गजरे विकून पैसे मिळवत असे. प्रत्येक दिवाळी इतर मुलांसाठी आनंदाची असे, पण त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी पैसे मिळवणे हाच उद्देश असे. तो दिवाळीत फटाके विकायचा आणि सोबत किल्ल्यावरील पोस्टकार्डची घरे तयार करून ती पाच-पाच पैशांना विकायचा. पण खेळ त्याचा आवडीचा. शाळेत असताना तो प्रत्येक खेळात भाग घ्यायचा आणि जिंकायचा. त्यातूनच त्याला ज्यूदोचे वेड लागले आणि त्यानेच त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले.
शाळा तर अशी कष्ट करतच गेली, पण पुढचं शिक्षण घेता यावं, कॉलेजमध्ये जाता यावं म्हणून तो रोज सकाळी साडेपाच ते साडेाठ या वेळात गाडय़ा धुण्याचे कामही करायचा. एक गाडी महिनाभर धुतल्यानंतर त्याला त्याचे वीस रुपये मिळायचे. जास्त पैसे मिळावेत म्हणून तो सात सात, कधी जास्त गाडय़ाही धुवायचा. पण तेव्हापासून त्याने आपल्याकडेही गाडी असणारच हे स्वप्न पाहिलं होतं. ते सत्यात आणण्यासाठी तो जिवापाड मेहनत घेत होता. कॉलेजचं शिक्षण होता होता आम्ही प्रेमात पडलो. मी सधन घरातून आल्याने मला त्रास होऊ नये यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असे. आम्हाला नोकरी करायची नव्हती, हे अगदी नक्की होतं पण हाताशी भांडवलही नव्हतं, मग काय करावं हा प्रश्न आल्यावर आम्ही ठरवलं की, झेरॉक्स करण्याचं काम करायचं. दरम्यान, त्याने मित्रांच्या मदतीने आणखी काही छोटेमोठे उद्योग सुरू करायचा प्रयत्न केला, परंतु यश मिळाले नाही. झेरॉक्सच्या कामाने मात्र हात दिला.
लग्नानंतर २-३ महिन्यांनी घरच्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. माझं माहेर खरंतर खूप श्रीमंत. घरी नोकरचाकर होते, पण तिथून आम्ही कधीच कोणतीच मदत घेतली नाही. शैलेश नेहमी म्हणतो की, तुझ्या आई-बाबांचा आशीर्वादच आपल्यासाठी लाखमोलाचा आहे.
आमचा संसार एका विशिष्ट वेगाने सुरू झाला. दरम्यान, आमच्या आयुष्यातली अत्यंत आनंदाची गोष्ट घडली. ८ ऑक्टोबर १९८६ ला आम्हाला विजयेंद्र ऊर्फ ‘विकी’ झाला;  आणि आठच दिवसांत या आनंदात अजून भर पडली. शैलेशला ज्यूदो खेळण्यासाठी जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचं ते स्वप्न होतं. लहानपणापासून पाहिलेलं. प्रत्येक खेळात गोल्ड मेडल मिळवणारा शैलेश यात मागे राहणार नव्हताच. ते गोल्ड मेडल माझे आहे, ते मी मिळवणारच. ही त्याची जिद्द पुढे अनेक गोष्टींत उपयोगी पडली. कष्टाला पर्याय नव्हताच, आणि पैशांची चणचण होतीच, पण त्याच्या बोलण्याने, वागण्याने त्याने अनेकांची मने जिंकलेली होती. त्या सगळ्या मित्रपरिवाराच्या व अनेक हितचिंतकांच्या मदतीने तो जपानला गेला. तीन महिन्यांनी परत आला तो ब्लॅक बेल्ट घेऊनच; पण त्याहीपेक्षा एक नवीन प्रेरणा घेऊन! जपानी माणसाच्या उद्योगी असण्याच्या व सातत्याने कार्यरत राहण्याच्या स्वभावाचा शैलेशवर खूप प्रभाव पडला व परतल्यानंतर आम्ही नव्याने व्यवसायात उडी घेतली. पुण्याच्या सारसबाग येथे भरलेल्या डिस्नेलँडमध्ये आम्ही खाद्यपदार्थाचा स्टॉल टाकला. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की खाद्यपदार्थाचंच दुकान सुरू करायचं आम्ही ठरवलं.
आमच्या पूर्वीच्या झेरॉक्सच्या दुकानाशेजारीच आम्ही ‘विकीज स्नॅक्स सेंटर’ नावाने एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. काही दिवस सारसबागेत खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला. स्वारगेटजवळ डोशाची गाडी चालवली; पण या स्नॅक्स सेंटरच्या कारभारात म्हणावा तसा जम बसत नव्हता. तेव्हाच माझ्या डोक्यात वडापावचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. याला शैलेशचा विरोध होता, पण तरीही मी हट्टाने २ ऑक्टोबर १९८९ ला विकीज स्नॅक्स सेंटरच्या जागी ‘जोशी वडेवाले’ नावाने वडापावविक्रीचा श्रीगणेशा केला, आणि अक्षरश: पहिल्या दिवसापासूनच या उद्योगाला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आमचा उत्साह आणखीनच वाढला. चविष्ट गरमागरम वडापाव, स्वच्छता, ग्राहकांना आपलंसं करण्याची वृत्ती व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आम्ही लवकरच पुणेकरांची मनं जिंकली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी ‘जोशी वडेवाले’ हे क्षणभर विश्रांतीचं ठिकाण बनलं. आमच्या इतर शाखाही सुरू झाल्या. जसजशी प्रगती होत गेली तसं आम्ही स्वत:चं घर, पहिली गाडी घेतली. विकीच्या पाठीवर १९९२ मध्ये गौरीचा जन्म झाला.
इथवरच्या प्रवासात एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांवर असलेला विश्वास आणि कष्टाच्या जोरावर आम्ही साऱ्यातून निभावून गेलो. हळूहळू आमचे मित्र-मैत्रिणी व सर्व नातेवाइकांचीही साथ मिळू लागली. या सगळय़ांच्या प्रेमाने व आशीर्वादाने आमचं आयुष्य सुंदर बनत गेलं. कितीही कष्ट करावे लागले तरीही तक्रार न करता आनंदी वृत्ती जोपासण्याची शिकवण मिळाली.
एकापाठोपाठ एक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं, पण याच काळात एक प्रकारच्या निराशेने आमचं मन ग्रासून गेलं. गेल्या ७-८ वर्षांचा खडतर प्रवास आणि आता मिळालेलं अपरंपार सुख पाहून नको नको ते विचार मनात येत. ‘आपल्या संसाराला कोणाची दृष्ट तर नाही ना लागणार?’ ‘आपल्याबाबतीत काही वाईट तर नाही ना घडणार?’ अशा अनेक शंकांनी मन भरून जाई.
पुढे होणाऱ्या त्या भयंकर घटनेची ती पूर्वसूचना होती की काय कुणास ठाऊक. पण नियतीने आमची परीक्षा पाहिलीच.    ११ डिसेंबर १९९३ ला शाळेच्या ट्रिपसाठी गेलेला विकी एका भीषण अपघातात आम्हाला कायमचा सोडून गेला. आमचं सारं आयुष्यच कोलमडून गेलं. सगळंच अर्थहीन वाटायला लागलं.  पार खचून गेलो आम्ही. अनेकदा जीवन संपवण्याचेही विचार मनात यायचे. फक्त गौरीमुळे आम्ही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करायचो, पण तोही फक्त प्रयत्नच असायचा. विकीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्याने सगळय़ाच गोष्टींतून मन उडालं. व्यवसायातही रस वाटेनासा झाला. वर्षभर आम्ही देवधर्म करत राहिलो. अनवाणी प्रदक्षिणा घातल्या, देवळं पालथी घातली, पळवाटा शोधत राहिलो. मन सारखं त्याला शोधत राहायचं. पण तो आता आपल्यात नाही आणि पुन्हा कधी कधी येणार नाही हे सत्य पचवता येतच नव्हतं. मनाची नुसती तगमग तगमग व्हायची. अशा या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व पुणेकरांची खूप मदत झाली. आम्हाला मानसिक आधार देणारी खूप पत्रं आली.
या सगळ्या काळात मला खरी साथ मिळाली ती शैलेशची. त्याने मला खूपच सावरलं. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून तो माझ्यासाठी उभा राहिला. वेगवेगळ्या प्रयत्नांनी तो मला या दु:खातून बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. आम्ही अनेकांना भेटत होतो. अनेकांशी बोलत होतो. शेवटी त्यानं एक रामबाण उपाय काढला. आमच्यासारखीच ज्यांची मुलं अपघातात गेली होती अशा पालकांना भेटायला मला तो घेऊन गेला. अशा अनेक आई-बाबांना भेटल्यावर समदु:खीपणावर फुंकर मिळाली. थोडा आधार मिळाला. त्याच दरम्यान, एका कुटुंबात आम्हाला सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यांच्या तत्त्वज्ञानाने तर जणू नवी दिशाच मिळाली. त्यांनी सांगितलेले ‘तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तत्त्व पटले. आपण जसा विचार करतो तसाच आपल्या जीवनाला आकार मिळत जातो, हे मनोमन पटले. आम्ही खूप सकारात्मक विचार करायला लागलो. विकीच्या जाण्याने आमची शारीरिक अवस्थाही अशी झाली होती की डॉक्टरांनी पुन्हा मूल होऊ शकणार नाही असं सांगितलं होतं; पण सकारात्मक विचार आणि प्रार्थनेमुळे १९९६ मध्ये माझ्या मुलीचा- जीवनविद्याचा- जन्म झाला. तिच्या पाठीवर दोन वर्षांनी आनंदचा जन्म झाला. पुन्हा एकदा आनंद, सुख या गोष्टी भरभरून मिळाल्या.. आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लागलं..
दरम्यानच्या काळात आमचं आमच्या व्यवसायात काहीसं दुर्लक्ष झालं होतं ते पुन्हा आम्ही एकाग्र केलं. पुण्यातल्या ‘जोशी वडेवाले’ या एका हॉटेलापासून झालेली सुरुवात हळूहळू १८ हॉटेलपर्यंत वाढत गेली. इतकंच नाही तर १९९८ मध्ये आम्ही आणखी एका व्यवसायाला सुरुवात केली आणि आमचं ‘गौरी मस्तानी हाऊस’ डौलात उभं राहिलं.
श्री वामनराव पै यांचा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांची तत्त्वे पटल्यानंतर आमच्या जीवनाला आध्यात्मिक जोड मिळाली. आता आमच्यामध्ये मतभेदाचे प्रसंग फार क्वचित येतात. आमच्या सुखी जीवनाचे रहस्य विचारलं तर मी सांगते, ‘शैलेश जर चिडला असेल तर मी शांत राहते आणि मी चिडलेले असेन तर तो शांत राहतो आणि राग शांत झाल्यावर चुका एकमेकांना समजावून सांगतो. त्या दिवशीचं चिडणं, राग त्या दिवशीच संपतो. पुन्हा तो विषय मुद्दाम काढून उगाळला जात नाही. त्यामुळे एकमेकांची साथ असते. परस्परांची मने जाणून घेऊन त्या पद्धतीनं वागणं हाच सहजीवनाचा खरा गाभा असतो. आमच्या लग्नाला ३० वर्षे झाली असली तरीही या सगळय़ामुळे आम्हाला रोजचा दिवस नवा वाटतो.
मुलांबद्दल बोलायचे झाले तर माझी तीनही मुलं खूप गुणी आहेत. अर्थात प्रत्येक आईला तसेच वाटते. गौरी सध्या होमिओपॅथीच्या शेवटच्या वर्षांला शिकत आहे. जीवनविद्या कला शाखेत पहिल्या वर्षांला, तर आनंद अकरावीत शास्त्र शाखेत शिकत आहे. असं हे आमचं कुटुंब एकमेकांवरच्या प्रेमाचं, विश्वासाचं म्हणून दिवसेंदिवस जगण्यातली रंगत वाढवणारं आहे. समाधान देणारं आहे.
एक काळ असा होता जेव्हा शैलेश कुणीच नव्हता. फक्त आणि फक्त कष्टच त्याच्या नशिबी होते. गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलांचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय. आजचं आमचं हे सगळं वैभव आम्ही जोडीने मिळवलं.. अनुभवलं. एक काळ असा होता जेव्हा त्याच्याशी लग्न करायचं म्हणून मला माझ्या घरच्यांना दुखवावं लागलं. तो नाइलाज होता, परंतु आज वाटतं, शैलेशशी लग्न केलं म्हणूनच अनेक संकटांवर मात करत का होईना मी खूप खूप काही मिळवलं. आज मी माझ्या संसारात सुखात आहे. आणखी काय हवं असतं माणसाला जगायला?   

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी